नवरात्रोत्सव हा विशेष करुन गुजरात राज्यात आणि पश्चिम बंगाल राज्यात मोठया धुमधडाक्यात व आनंदाने साजरा केला जातो. आज इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा सर्वत्र बोलबाला आहे.त्याचा परिणाम कोणताही उत्सव असू द्या...तो सर्वच ठिकाणी अनुभवणे,साजरा करणे सोपे ठरु लागले आहे
शरद ऋतुतील आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत होणारा शारदीय नवरात्रोत्सव हा एक परंपरेचा भाग आहे. अलीकडे महाराष्ट्रातही दुर्गा उत्सव शहरी भागांसह अगदी खेड्या-पाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ लागला आहे.शारदीय नवरात्रींनाच दुर्गादेवीचे नवरात्र म्हणतात. जातात. प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंतचा काळ हा या कृषिप्रधान उत्सवासाठी निश्चित केलेला आहे.
महिषासुर दैत्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांसह अन्य सर्व देवतांनी दुर्गा देवीचे आवाहन केले. देवीच्या या शक्ती रुपाचे महिषासुरासोबत तब्बल नऊ दिवस युद्ध झाले. प्रचंड आणि भयंकर युद्धानंतर दहाव्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला. यानंतर वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून नवरात्र साजरे करण्याची परंपरा सुरू झाली, अशी देखील पुराण कथा असल्याचे सांगितले जाते.
दुर्गा देवीचा उत्सव वर्षातून दोनवेळा साजरा करण्याची ही प्रथा अगदी वेदकाळापासून चालत आली आहे.
चैत्र शु ।। प्रतिपदापासून ते चैत्र शु।। नवमीपावेतो (श्रीरामनवमी) साजरा केला जातो. हा वासंतिक
चैत्र नवरात्रीला आत्मशुद्धी आणि मुक्तीचा आधार मानले आहे.रब्बीचा हंगाम सुरू झाला की चैत्रातील उत्सव साजरा होतो.
दुसरा नवरात्रोत्सव आश्विन शु।। प्रतिपदापासून घटस्थापना करुन विजयादशमीपर्यंत साजरा केला जातो. शारदीय नवरात्रीला वैभव आणि भोग प्रदान करणारे मानले जाते. खरीपाचा सुगीचा हंगाम सुरू झाला की,शारदीय नवरात्रोत्सव प्रारंभ होतो.
दोन्ही नवरात्रोत्सव शेतकर्यांच्या कामाशी निगडित आहे.
शेतीची कामे संपली की शेतकर्यांना उत्साहाने या उत्सवात सहभागी होता यावे, अशी या मागील संकल्पना असावी. याच नऊ दिवसांत दररोज एक माळ अशा नऊ माळा देवीला चढवली जाते.
मार्कंडेय पुराणातील देवी माहात्म्यात सांगितले आहे- “ शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते. (८९.११.१२)
अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंतचे अत्यंत विलक्षण आणि अद्भूत असे नऊ दिवसांचे महापर्व मानवाच्या अंतरिक ऊर्जेच्या विभिन्न प्रकारांचे प्रतिनिधित्व करते. याच ऊर्जेला नऊ देवींच्या शक्तीची उपमा दिली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायणी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री या मनुष्यातील ऊर्जेची वेगळेवेगळी रुप असल्याचे म्हटले जाते.
आज अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात घटस्थापनेचा दिवस. आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीत आपण देवीच्या नऊ रूपांचे महात्म्य जाणून घेणार आहोत.ही नऊ रूपे :-
" प्रथमं शैलपुत्रीच द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चंद्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीच् ।
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं ।
नवममं सिद्धिदात्रीच नवदुर्गा: प्रकीर्तिता:।।"
देवीच्या नऊ रूपांची नावे वरील श्लोकात दिली आहेत.
१) शैलपुत्री, २) ब्रह्मचारिणी, ३) चंद्रघंटा, ४) कूष्मांडा, ५) स्कंदमाता, ६) कात्यायणी, ७) कालरात्री, ८) महागौरी आणि ९) सिद्धीदात्री अशी ती नावे आहेत. देवीने जो पराक्रम गाजवला, त्याला अनुसरून देवीला या नावांनी ओळखले जाऊ लागले. काय आहे त्यामागील कथा, जाणून घेऊया.
प्रथम रुपदर्शन :-
🌹 शैलपुत्री :
आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या दिवशी देवी दुर्गाचं पहिलं स्वरुप शैलपुत्री रुपाची पूजा केली जाते. नवरात्रीदरम्यान नऊ दिवस देवी दुर्गाच्या नऊ स्वरुपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लोक घरात घटस्थापना करतात.
देवी शैलपुत्री उपासना मंत्र :-
ऊँ देवी शैलपुत्र्यै नमः।
वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।
वृषारुढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम् ।।
देवी शैलपुत्री हिला देवी पार्वतीचंच एक स्वरुप मानलं जातं. माहितीनुसार, देवी शैलपुत्रीचे स्वरुप म्हणजे चार हात ,भाळी अर्धचंद्र आणि त्या नंदीवर (बैल) स्वार आहे.तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ शोभून दिसते. तीला पार्वती, हेमवती, सती, भवानी इत्यादी नावानेही ओळखली जाते. शैलपुत्री शब्दाचा अर्थ डोंगराची (हिमालयाची) कन्या आहे.
आई दुर्गा आपल्या पहिल्या स्वरूपात `शैलपुत्री ' या नावे ओळखली जाते. हिमालयकन्या म्हणून तिचा जन्म झालेला असल्याने, तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले. दुर्गेच्या सर्व रूपांमध्ये ही पहिली दुर्गा होय.
शैलपुत्रीचा पूर्वजन्म प्रजापती दक्ष यांच्या कन्येच्या रूपात झाला होता. तेव्हा तिचे नाव ` सती ' होते. त्यावेळेस सतीचा विवाह भगवान शंकराशी झाला. एकदा प्रजापती दक्ष यांनी मोठा यज्ञ केला. सर्व देवी-देवतांना यज्ञात आमंत्रित केले. मात्र, भगवान शंकराला आमंत्रण दिले नाही. आपल्या वडिलांनी भल्या मोठ्या यज्ञाचे आयोजन केले आहे, ही वार्ता जेव्हा सतीला कळली, तेव्हा तिने यज्ञाला जाण्याचा मनोदय आपले पती भगवान शंकराजवळ व्यक्त केला. भगवान शंकर म्हणाले, " सती, तुझ्या वडिलांनी सर्वांना आमंत्रण दिले आहे, परंतु आपल्याला आमंत्रण दिलेले नाही. याचा अर्थ त्यांचा आपल्यावर काहीतरी राग असला पाहिजे. अन्यथा, त्यांनी असे केले नसते. कारण जाणून घेतल्याशिवाय आणि आमंत्रण मिळाल्याशिवाय तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. " परंतु, सतीचे मन माहेरी धाव घेऊ लागले होते. आपण एकाच घरचे आहोत, म्हणून कदाचित वेगळे आमंत्रण दिले नसेल किंवा घाईगडबडीत राहून गेले असेल, अशीी स्वतःची समजूत काढत सतीने पुन्हा भगवान शंकराकडे यज्ञाला येण्याचा आग्रह केला. तिची माहेराप्रती असलेली ओढ पाहून शंकरांना तिचा आग्रह मोडवला नाही. त्यांनी सतीला जाण्याची अनुमती दिली, परंतु आपण येणार नाही, असे कळवले. सती आनंदाने यज्ञ समारंभी सहभागी झाली.
संपूर्ण राज्यात दिव्याच्या लखलखाट केला होता. प्रजाजन प्रसन्न दिसत होते.स्वर्गातील देव आणि सप्तर्षी,ऋषीमुनी,देशोदेशीचे
राजे पाहुणे आले होते. सगळे वातावरण आनंदी झाले होते. तिथे गेल्यावर सतीचा आनंद द्विगुणीत झाला. कधी एकदा जाऊन आपल्या पित्याला, मातेला, बहिणींना भेटते, असे तिला झाले होते. ती राजवाड्यात पोहोचली. परंतु, तिला पाहुनही कुटुंब सदस्यांपैकी कोणीही तिचे स्वागत केले नाही. उलटपक्षी तिला दुर्लक्षित केले. त्यांच्या नजरेतले भाव अत्यंत अपमानास्पद होते. सतीला गहिवरून आले. भगवान शंकरांचे बोल आठवले. आमंत्रणाशिवाय आपण उगीचच येथे आलो, असे तिला जाणवू लागले. तिच्या मनात एकाच वेळी दु:ख, कारूण्य, क्रोध, संताप उफाळून येत होता. हा अपराधी भाव घेऊन शंकरांसमोर कसे जाणार, या विचाराने तिने तिथल्या तिथे स्वत:ला यज्ञकुंडात उडी घेऊन संपवून टाकले. सतीचा असा अपमान झाल्याचे कळताच, भगवान शंकरांनी रागाच्या भरात आपल्या गणांना पाठवून दक्ष प्रजापती राजाचा यज्ञ समारोह उधळून लावला.
सतीने योगाग्निद्वारे पुढचा जन्म हिमालयाच्या कुळात घेतला आणि तिथे ती `शैलपुत्री ' या नावाने विख्यात झाली. पार्वती, हेमवती ही देखील तिचीच नावे. गेल्या जन्मात अपूर्ण राहिलेला संसार पूर्ण करण्यासाठी शैलपुत्रीने तपश्चर्या करून पुन्हा एकदा भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आणि ती त्यांची अर्धांगिनी झाली. तिने अनेक देव-देवतांचे गर्व हरण केले.
🌹देवी शैलपुत्रीची पूजा विधी
सकाळी स्नान करावं आणि या दिवशी देवी शैलपुत्रीच्या मूर्तीची पूजा करावी. देवी शैलपुत्रीच्या मंत्रांचाही जप करावा.आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी देवीची आरती करावी.
या दिवशी या मंत्राचा जप करावा –
या देवी सर्वभूतेषु मां शैलपुत्री रूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
ओम देवी शैलपुत्रीय नम: ।
सर्वस्वरूपे सर्वेशे, सर्व शक्ति समन्विते ।
भये भ्यास्त्राहि नो देवि, दुर्गे देवी नमोस्तुते।।
एतत् वदं सौमं लोचनं त्राहुशीतम् ।
पातु नः सर्वभूताभिः कात्यायनी नमोस्तुते ।।
ज्वाला करला मत्युग्रामम् शेषासुर सुदणम् ।
त्रिशुलम पातु न भितर भद्रकाली नमोस्तुते ।।
(टिप- सदर माहिती ही ऐकीव,आणि मिळालेल्या कथा-किर्तंन श्रवणातून प्राप्त आहे.वाचकांना केवळ प्राथमिक माहिती व्हावी,करिता लिहिली आहे.योग्य त्या ज्योतिषी कडून,पंडिताकडून विधी करावा.लेखक पुण्यफळाची कोणतीही हमी देत नाही.)
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिम वाह सुंदर
उत्तर द्याहटवासरजी, मनापासून आभार!🙏
हटवाखूप खूप मस्त रचना
उत्तर द्याहटवासरजी, मनापासून आभार!🙏
हटवाखुप सुंदर माहिती 👌👌✍️✍️✍️
उत्तर द्याहटवामॅडम- मनापासून आभार!🙏
हटवाखुपच सुंदर...
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏
हटवाअतिशय सुंदर माहितीपर लेखन सर
उत्तर द्याहटवाआपले मनापासून आभार!🙏
हटवाअतिशय सुंदर माहिती दिली सर 👌👌👌👌✍️✍️
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद मॅडम!🙏
हटवाखूप छान 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाआपले मनापासून धन्यवाद रंजुजी!✍️🙏🙏🙏
हटवाखूप छान माहिती दिली सर...👌👌🙏🏻
उत्तर द्याहटवाआपले मनापासून आभार!🙏
हटवा