Kaayguru.Marathi

शनिवार, डिसेंबर ०६, २०२५

कुणाच्या प्रेमात?


कुणाच्या  प्रेमात कोण?
आपण  विचारावे  कसे
सवाल ऐकताच  येते हो
दुसऱ्याला आपल्यावर हसे !

पुत्र म्हणून...मी आहे हो
आईच्या वात्सल्य प्रेमात
अन् आकंठ बुडालोय मी
प्रिय बाबाचा विश्वासात!

पती   म्हणून... पत्नीवर
करतो मी जिवापाड प्रेम
मला वाटते  तुमचे माझे
अन् जगभर असेल सेम!

कुटुंब  प्रमुख म्हणून तर
सगळ्यांचा  मला  लळा
चंदनाची शितलता जपून
फुलवितो प्रेमाचा  मळा !

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"


रविवार, नोव्हेंबर ०९, २०२५

माझा पहिला प्रवास


माझा   पहिला   प्रवास 
आजही आठवतो मला 
आईसोबत नावेत बसून
गेलो मामाच्या  गावाला 

नावाड्याने मग सोडले
नावेवरचे  पांढरे  शिड 
नाव वल्हवत पाहताना 
पळून गेली मनीची भिड

भरले होते सूर्यकन्येचे 
दोन्ही काठ पूर्ण जलपात्र
नाव डोलतांना व्हायचा
बालमनाला आनंद मात्र

मध्यभागी नाव येताच 
आईने एक रुपया काढला  
तापीमायला केला अर्पण
मनोभावे नमस्कार केला

प्रकाशा क्षेत्रावर जाताच
आजही स्मरतो तो प्रवास
पुलावरुन गाडीत जातांना
होत  नाही आनंद खास !

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"

शनिवार, ऑक्टोबर ०४, २०२५

रम्य पहाट!

सातपुडा साहित्य मंच आयोजित
उपक्रम क्र- ६९
विषय - रम्य  पहाट !
सूचक - सौ.पुष्पा पी.पटेल " पुष्पम्"

-----------------------------------------------------------

वाट   चाले   नर  नारी
पंच   पंच   उषःकाळी
भक्ती  भावे आळवती
गाऊनिया  हो भूपाळी

आले    सोडून   वेंकुंठ
वृंदावनी      वनमाळी
खेळ   खेळे   राधासंगे
हरी   यमुनेच्या   जळी

प्राची  हसते  आकाशी
पहाटेच्या  रम्य  काळी
प्राजक्ताचा  गंध  दाटे
शांत   शांत    तरुतळी

रवि  किरणांचे    कुंकू
शोभे अवनिच्या भाळी
पहा  पाखरं   निघाली
उंच   प्रसन्न    सकाळी

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"


रविवार, सप्टेंबर १४, २०२५

लोकं काय म्हणतील?

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र. ५७
विषय- लोकं काय म्हणतील?
सूचक- सौ.राजश्री जाधव,पुणे
दि.१४/०९/२०२५
-----------------------------------------------------------
लोकं काय म्हणतील?[कविता]
लोकं काय म्हणतील 
मला  नाही घेणं देणं
सखे,मी फक्त जाणतो
आपलं प्रेम निभवणं!

सखे,तुझं सोबत येणं
माझ्यासाठी परिसस्पर्श 
तुझ्या एक एक शब्द
जगण्याला देतो  हर्ष!

सखे,तू  गंध फुलांचा
करिते प्रसन्न तन मन
नको घाबरु ग् जगाला
तू राधा मी  मनमोहन

सखे,मी तुझ्या प्राजक्त 
तू तर माझी चाफेकळी 
सखे, मिठीत  ये ना तू
चांदण्यात या तरुतळी

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेंन म.पटेल " पुष्प "

बुधवार, ऑगस्ट २७, २०२५

देवा,एक हे मागणे!



गणराया कृपा तुझी लाभू दे
दुःखहर्ता चरण तुझे पाहू दे
जन्मोजन्मी असावा तू सांगाती
देवा,एवढेच माझे हे मागणे !

देवा दर्शन घडो नित्य तुझे
ओठी गुणगुणू दे तुझे गाणे
जेथे जातो तेथे तू रहा सांगाती
देवा,एवढेच माझे हे मागणे !

रुप तुझे सदैव राहो डोळा
मुखी असू दे नाम आळवणे
दुःख संकटी तू व्हावा सांगाती
देवा,एवढेच माझे हे मागणे !

गर्व न निपजो दे सद्बुद्धी 
मनमंदिरी व्हावे सदैव येणे
नको दुरावा तुझ्या माझ्यात 
देवा,एवढेच माझे हे मागणे !

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल " पुष्प ”

मंगळवार, ऑगस्ट २६, २०२५

ओल्या सांजवेळी


ओल्या या सांजवेळी
नको   राहू   तू   दूर
तू    नसता   जवळी
मनी   दाटते   काहूर

ओल्या या सांजवेळी
भेटीस  झाले  आतूर
सख्या आळवू आपण
प्रीतीचे   मधुर   सुर

ओल्या या सांजवेळी
यावा  मिलनाचा पूर
तुझ्या  मिठीत  येता
वदनी   हर्षाचा  नूर

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल " पुष्प "

शुक्रवार, ऑगस्ट २२, २०२५

आम्ही सर्जा-राजा बोलतोय!

आम्ही सर्जा-राजा बोलतोय!
[ आज पोळा: वृषभांसाठी आनंदसोहळा ! शेतकरी धन्यासाठी सर्जा-राजाची भावना सांगणारे काव्य!]
----------------------------------------------------------
धनी… आज आमुची दिवाळी 
समस्त हिंदुवर्षातील हो “पोळा”
विसरुन वर्षभरीचे दुःख क्लेश
हर्ष भरे साजरा करू “सोहळा!”

धनी… तुमच्यासाठी हा सर्जा
अख्खं आयुष्य पणाला लावील
अंगात अखेरच्या श्वास असेतो
तुमच्या संग इमाने उभा राहिल!

धनी…ह्यो राजाच्या मनात सुद्धा 
तुमच्याविषयी खच्चून आदर !
उन पाऊस वा असो वादळ वारा
तुमच्या सेवेसी सदैव मी सादर!

धनी…आम्ही जगू तुमच्यासाठी 
विनंती आमची एक नक्की ऐका
कितीही आली संकट तरीही…
आत्महत्येचा धरु नका हो हेका!

धनी…तुम्हीच आमचं मायबाप
तुम्हासाठी आमची जीवनज्योती
विनंती मेल्यावर शेतातच पुरा 
नका हो देऊ कसायाच्या हाती !

धनी…आम्ही तुमच्यासाठी राबू
काळ्या आईशी निभावू नाती !
रात्रंदिन सेवा करता करता…
पिकवू सुखाचे माणिकमोती !

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “ पुष्प ”

रविवार, ऑगस्ट १७, २०२५

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय?
भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज' म्हणजे 'भक्ती करणे' किंवा 'देवाचे गुणगान, जप करणे', आणि भज शब्दाला 'अन' हा प्रत्यय लागून 'भजन' हा शब्द तयार होतो, ज्याचा अर्थ 'देवाचे गुणगान करण्यासाठी गायलेले गाणे' असा घेता येईल.
  भजनात  टाळ,चिपळी,मृदंग, पखवाज,तबला, हार्मोनियम ,बासरी या वाद्यांसह भगवंताची स्तुती गायन व नामस्मरण केले जाते.विशेषत: आजही महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील देवळात वा मंदिरात बसून आठवड्यातील निदान एक दिवस तरी भजन गायन करण्याची प्रथा सुरू असल्याचे दिसून येते.चातुर्मासात तर अनेक गावांत मंदिरांमध्ये चार महिने दररोज रात्री नित्य भजनाचे गायन होते.
भजन म्हणजे देवाचे गुणगान करणारे एक प्रकारचे धार्मिक गीत किंवा भक्तीगीत.देवाची स्तुतीपर काव्यरचना साग्रसंगीत गाऊन देवाला भजणे किंवा आळविणे यालाच भजन असे म्हणतात. हा योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे. ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय लोककला आहे. वारकरी संप्रदायात भजनाला आत्यंतिक महत्व आहे. पूर्वीच्या संतपरंपरेतील संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वरमाऊली, संत निळोबा महाराज,संत तुकाराम महाराज,संत सोपानदेव महाराज, संत एकनाथ महाराज,संत नामदेव महाराज,संत चोखामेळा महाराज, समर्थ रामदास स्वामी,संत जनाबाई,संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई, कृष्ण भक्त संत मिराबाई इत्यादी पुरुष - स्री संतांनी अनेक भजने अर्थात लहान अभंग,मोठा अभंग, गवळणी, विरहिणी,रचियेल्या आहेत. त्यांपैकी काही रचना भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे, सुधीर फडके, लता मंगेशकर आणि अन्य अनेक गायकांनी गाऊन अजरामर केल्या आहेत.
   भजन गाण्याला कोणत्याही भाषेचे बंधन नाही. अभंग, श्लोक,साधे मंत्र किंवा शास्त्रीय संगीतावर आधारित विविध प्रकारच्या भक्तीगीतातून ते  सादर करता येते.
भजनाचे महत्त्व:
भजन हे भक्तांना आध्यात्मिक आनंद, शांती आणि एकाग्रता प्रदान करते. ते देवाशी नाते जोडण्याचा एक प्रभावी मार्ग आहे, असे मानले जाते. 
भजनाचे दोन मुख्य प्रकार आहेत: 
१) चक्री भजन :
ज्यामध्ये अनेक भजन गायक असतात.ते एका विशिष्ट पद्धतीने फेर धरून, चक्राकार फिरत भजने म्हणतात.हे भजन करताना,एक अभंग म्हटल्यानंतर लगेचच दुसरा अभंग, पहिल्या अभंगाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू करतात. यालाच चक्री भजन म्हणतात, या भजनामुळे गायकाला एक खास ऊर्जा आणि आनंद मिळतो.
२) सोंगी भजन: 
ज्यामध्ये कलाकार विशिष्ट वेषभूषा (सोंगे) करून विविध पात्रांच्या रूपात अभिनय करतात व भजन गातात.यात देव-भक्तांमधील संवाद किंवा पौराणिक कथांचे सादरीकरण केले जाते,ज्यामुळे श्रोत्यांना एक वेगळा अनुभव मिळतो.
भजनाचा अजून एक प्रकार सांगितला जातो.
३) खंजिरी भजन :
तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भजनाचा हा एक नवीन प्रकार सादर केला आहे. त्यांनी खंजिरी या वाद्याचा वापर करून भजनाच्या माध्यमातून जनजागृती आणि समाजसुधारणेचे कार्य केले.
  खंजिरी भजनाद्वारे, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीय भेदभावाचे उच्चाटन, स्वच्छता,शांतता, समता, हे ग्रामविकासाचे सामाजिक संदेश लोकांपर्यंत सहज पोहोचवले जातात.  

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल " पुष्प"

शुक्रवार, ऑगस्ट १५, २०२५

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३
विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र
दिनांक -१५/०८/२०२५
सूचक - सौ.पुष्पा पटेल "पुष्प"

आला उत्सव स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सवी दशकाचा
घरोघरी फडकवू तिरंगा
संदेश पसरवू एकतेचा

देशप्रेमाची ज्योत पेटवू 
गाऊन गाथा बलिदानाची
वंदे मातरम् देऊन नारा
जागवू हो स्मृती शहीदांची

केशरी पांढरा आणि हिरवा
जगावेगळा तिरंगा आमुचा
श्वेतभागी अशोकचक्र साजे
जाणीव करी ते कालचक्राचा

केशरी रंग शिकवी त्याग 
श्वेत सत्य शांती पावित्र्याचा
समृद्ध राष्ट्रनिष्ठा शिकवी हिरवा
प्राणाहुन प्रिय तिरंगा भारतभूचा

शपथ घेऊ भूमाता रक्षणाची
करु या अभिषेक हा रक्ताचा
फडकत ठेवू उंच आभाळी
प्राणपणे तिरंगा स्वातंत्र्याचा

विसर न व्हावे कधी न आम्हा
लाल बाल पाल यांचे कार्य 
खल कितीही असो बलवान
हरवू त्यास टिकवूनी धैर्य !

शब्दाशब्दांत करु या गर्जना
भगतसिंगांचा इन्कलाब जिंदाबाद 
आठवून विदाची स्वातंत्र्य निष्ठा
देऊ देशअभिमानाची साद !

चंद्र सूर्य असेतो नभी राखू
आपण गौरव भारतमातेचा
वाकड्या दृष्टीने पाही जो शत्रू
घोट घेऊ त्या असूर रक्ताचा !

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “पुष्प”

शुक्रवार, जुलै २५, २०२५

श्रीशिवस्तुति

 
shivastutiश्री शिवस्तुति
कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १॥रवींदु दावानल पूर्ण भाळीं । स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी ।ब्रह्मांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २॥जटा विभूती उटि चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची ।पंचानना विश्वनिवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३॥वैराग्ययोगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी ।उमानिवासा त्रिपुरांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ४॥उदार मेरू पति शैलजेचा । श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ।दयानिधी जो गजचर्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ५॥ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरि सोमकांत ।गंगा शिरीं दोश्ह महाविदारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ६॥कर्पूरगौरीं गिरिजा विराजे । हळाहळे कंठ निळाचि साजे ।दारिद्र्यदुःखें स्मरणें निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ७॥स्मशानक्रीडा करितां सुखावे । तो देवचूडामणि कोण आहे ।उदासमूर्तीं जटाभस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ८॥भूतादिनाथ अरि{}अंतकाचा । तो स्वामि माझा ध्वज शांभवाचा ।राजा महेश बहुबाहुधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ९॥नंदी हराचा हर नंदिकेश । श्री विश्वनाथ म्हणती सुरेश ।सदाशिव व्यापक तापहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १०॥भयानक भीम विक्राळ नग्न । लीलाविनोदें करि काम भग्न ।तो रुद्र विश्वंभर दक्श मारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ११॥इच्च्हा हराची जग हें विशाळ । पाळी रचीतो करि ब्रह्मगोळ ।उमापती भैरव विघ्नहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १२॥भागीरथीतीर सदा पवित्र । जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ।विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १३॥प्रयाग वेणी सकळा हराच्या । पादारविंदीं वहाती हरीच्या ।मंदाकिनी मंगल मोक्षकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १४॥कीर्ती हराची स्तुति बोलवेना । कैवल्यदाता मनुजां कळेना ।एकाग्रनाथ विश्ह अंगिकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १५॥सर्वांतरीं व्यापक जो नियंता । तो प्राणलिंगाजवळी महंता ।अंकीं उमा ते गिरिरूपधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १६॥सदा तपस्वी असे कामधेनू । सदा सतेज शशि कोटिभानू ।गौरीपती जो सदा भस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १७॥कर्पूरगौर स्मरल्या विसांवा । चिंता हरी जो भजकां सदैवा ।अंतीं स्वहीत सुचना विचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १८॥विराम काळीं विकळ शरीर । उदास चित्तीं न धरीच धीर ।चिंतामणी चिंतनें चित्तहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १९॥सुखावसाने सकळें सुखाचीं । दुःखावसाने टळती जगाचीं ।देहावसानें धरणी थरारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २०॥अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय ।कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥शांति स्वलीला वदनीं विलासे । ब्रह्मांडगोळीं असुनी न दीसे ।भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २२॥पीतांबरें मंडित नाभि ज्याची । शोभा जडीत वरि किंकिणीची ।श्रीदेवदत्त दुरितांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २३॥जिवाशिवांची जडली समाधी । विटला प्रपंच तुटली उपाधी ।शुद्धस्वरें गर्जति वेद चारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २४॥निधानकुंभ भरला अभंग । पहा निजांगें शिव ज्योतिलिंग ।गंभीर धीर सुरचक्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २५॥मंदार बिल्वें बकुलें सुवासी । माला पवित्र वहा शंकरासी ।काशीपुरीं भैरव विश्व तारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २६॥जाई जुई चंपक पुष्पजाती । शोभे गळां मालतिमाळ हातीं ।प्रतापसूर्य शरचापधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २७॥अलक्शमुद्रा श्रवणीं प्रकाशे । संपूर्ण शोभा वदनीं विकासे ।नेई सुपंथें भवपैलतीरीं । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २८॥नागेशनामा सकळां जिव्हाळा । मना जपें रे शिवमंत्रमाळा ।पंचाक्शरी ध्यान गुहाविहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २९॥एकांति ये रे गुरुराज स्वामी । चैतन्यरूपीं शिव सौख्यनामीं ।शिणलों दयाळा बहुसाल भारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३०॥शास्त्राभ्यास नको श्रुती पढुं नको तीर्थांसि जाऊं नको ।योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको ॥काळाचें भय मानसीं धरुं नको दृष्टांस शंकूं नको ।ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको।। 
।।हर हर हर महादेव।।💐 🙏 🙏 🙏 🙏 

शनिवार, जून २१, २०२५

करा योग रहा निरोग

सातपुडा साहित्य मंच आयोजित
उपक्रम क्र-.३६
विषय- करा योग रहा निरोग
दिनांक -२१/०६/२०२५
--------------------------------------------------------------
मित्र,मैत्रिणींनो...
कामाशी नि:संग झाला तर 
सुदृढ होईल  अंग
आळसात राहाल तर
देहात निपजतील अनंत व्याधी रोग
होईल आयुष्य अमंगळ!
करतो विनंती टाळावे भोग 
सदैव रहा निरोग !
ठरवावा वेळेचा नियम 
करावा सकाळ सायंकाळ
न विसरता प्राणायाम
मिळते स्फूर्ती अन् 
नवीन जोश दम 
आणिक वाढे वाचा मने संयम !
संपन्न सशक्त आरोग्य लाभे 
करता नित्य योगासन
अन् विविध आसन ! 
योग दिनाच्या अमृतमय शुभेच्छा!🎉🏋️🧘
©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"

बुधवार, जून १८, २०२५

सजनवा [लावणी]


सजनवा तू ये ना
मिठीत घे ना
काखेत शिरली मुंगी
तिने घेतलाय चावा 
मज आलीया गुंगी
ये तू सत्वर घेऊन 
तुझी मलमेची पुंगी
सजनवा लावून जा ये ना

ज्वानीला आला पूर
नको राहू तू दूर
ये ना बघू नको वाट
तंग झाली चोळी
कधीही सुटेल रे गाठ
काठोकाठ भरलेय
दोन पिरतीचे माठ
सजनवा पिऊन जा ये ना

स्पर्श होता तुझा
मोहरेल नाजूक अंग
नको ना रे करु
आस हृदयीची भंग
ना आवरे बावरे मन
भरु रे दहादिशी
आपुल्या मिलनाचा सुगंध
सजनवा भ्रमर होऊन ये ना

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “पुष्प”

मंगळवार, जून १७, २०२५

वाट पहाते [ चारोळी]


सकाळची झाली सांज
सख्या तू कधी येशील
वाट पाहतेय तुझी  मी
रात्र  ही  सरुन जाईल

©®प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"

गुरुवार, मे २९, २०२५

शिवशंकर [डमरू काव्यरचना]


डमरू काव्य 
-----------------------------------------------------------
शिर्षक - शिवशंकर
  शिवजी हाती डमडम डमरू वाजे 
    नाद  सारा त्रिभुवनी  गाजे
      कैलाशीचा स्वामी साजे
          स्वयंम काशीराजे
               शीवशंकर
           पार्वतीचे पतीदेव
       नाव शोभतसे  महादेव
   ऐंसा द्वादश ज्योतीर्लिंगांचा देव
सप्त  दुनियेचा  वाली तुच आदिदेव

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “ पुष्प

सोमवार, मे १२, २०२५

रोटी कपडा मकान!

रोटी  कपडा  आणि  मकान 
सोबतीला जीवनसाथी छान
कितीही  आली  संकटे  तरी
स्फुरते संसाराचे  सुरेल गाण

रोटी  कपडा  आणि  मकान
नातं अन् मर्यादांचे ठेवा भान
बहरते   सहजीवनाची   वेल
समाजात लाभे कीर्ती महान

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल " पुष्प"

शुभ सकाळ 🌹🙏

शुक्रवार, मे ०९, २०२५

व्वाव अजितजी डोवाल,केले पाकिस्तानचे हाल!

 

सातपुडा साहित्य मंच आयोजित 


उपक्रम क्र- २७

विषय -  व्वाव…अजितजी डोवाल, केले पाकिस्तानचे    

             हाल

सूचक -  विनोद डंबे “मामाश्री”

दिनांक - ९/५/२०२५

—----------------------------------------------------------

शिर्षक - भारताचे जेम्स बॉण्ड:अजितजी डोवाल (कविता)

भारतमातेचे  जेम्स  बॉण्ड 

नाव  शोभे अजित डोवाल

पाकची  जमवून   माहिती

भारतीय सेनेचे झाले ढाल


भारतभूचे  गुप्तहेर होऊन 

वर्षं  पाकिस्तानात राहिले!

शिवरायांचे बहिर्जी नाईक 

जणू तुमचा रुपात जन्मले


इस्लामाबाद  उच्चायोगात 

झाले  भारतीय अधिकारी  

सहा वर्ष प्राणपणे पाकची 

जमवली माहिती खरीखुरी 


खलीस्तान्यांना  वाटे  तुम्ही 

आयएसआय एजंट सर्वस्वी 

तुमच्या  धैर्याने  झाले खरे

ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी


सिक्कीम भारतात  यायला

तुमचे महा मौलिक योगदान 

भारत संघराज्य नकाशावर

सिक्किम  राज्य शोभे सान


तुमचा  रणनीतिने राबविले

भारताने  ऑपरेशन  सिंदूर

दहशतवाद्यांचे   नऊ   अड्डे 

एका  रात्री झाले चकनाचूर


जैश - ए - मोहम्मदचा तळ

नाव  ऐंका  हो  बहावलपूर 

अन् लश्कर - ए - तैयबाचा 

मुरीदके तळाचा बदलला नूर


हिजबुल मुजाहिदीनचा तळ 

मुजफ्फराबादेत  होता  दृष्ट

भिंबर,सियालकोट,चकअम्रू

गुलपूर, कोटी सारे केले नष्ट


पाकड्यांनो आता शांती धरा

नका रे झडकू फुकट लाथा

गुप्तहेर  ग्रंथावरची तर वाचा

अ-जित डोवालांची शौर्य गाथा


तुमची  ऐंशी वर्षांची तपश्चर्या 

दहशतवाद्यांना  ठरलीय ताप

ना-पाकड्यांनो  सुधरा आता

हिंद भूमीवर राहतो तुमचा बाप!


©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “पुष्प”



बुधवार, एप्रिल १६, २०२५

अहाहा...बहावा फुलला!

सातपुडा साहित्य मंच आयोजित
उपक्रम क्र- १५
विषय - अहाहा!बहावा फुलला!
--------------------------------------------------------------
शिर्षक: बहावा फुलला!

ऋतुराजाचा स्वागताला
पहा उभा नटून अहाहा
कवेत घेण्या  आतूरला
प्रसन्न   हा  सोनबहावा १

पर्ण भासे  हिरवा  चुडा
पुष्प अहाहा मदनबाण
हृदयाला देई संजीवनी 
प्रसन्न   आनंदाचे  दान २

हळद  माखून  अंगावर
सृष्टी  भासे  नवी नवरी
पुष्पमाळा घेऊन आला
पितांबर  नेसून  श्रीहरी ३

पानं  भासे हिरवा चुडा
फुलं    पिवळी   हळद
लाजेचा   नेसून   शालू
बहावा  घालतोय  साद ४

बहावा  वाटे   प्रितवेडा
जणू करितो प्रियाराधन
राधेसंग रासक्रीडा खेळे
नयनी  दिसे  मनमोहन ५

इवली  इवली  पाकळी
जणू  मिणमिणते  डोळे 
टोकावरच्या   कळ्यांचे
भाव भासती  हो भोळे ६

फांदी  फांदीवरची फुलं 
वाटे   मोती अन् पोवळे
रविकिरणात   शोभतसे
नवरत्नांचे मळे  आगळे ७

भुईने लावली जणू नभी 
पिवळ्या दिव्यांचे झुंबर
सृष्टी  भासे  नवी  नवरी
बहावा दिसे नयनमनोहर ८

वाढता उन्हाची काहीली
बहावा   येई‌  बहरायला
खिन्न   मानवी   मनाला 
प्रसन्न होऊन हसवायला ९

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “ पुष्प ”

रविवार, एप्रिल ०६, २०२५

राम जन्मला !




शिर्षक: राम जन्मला !

चैत्र मास शुद्ध नवमी राजा दशरथाचे नगरी
राणी कौशल्या उदरी जन्मले वैकुंठीचा हरी ।।१।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी

पुष्पांजली अर्पितसे स्वर्गीचे सुरवर ऋषीमुनी
प्रसन्न होऊन नाचती नभीच्या दिशा चारी ।।२।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी

पुत्रदर्शने आनंद अश्रु दाटे कौसल्या लोचनी
कुंकुम लाली विलसे कैकयी सुमित्रा गालावरी।।३।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी

पाळणा सोनियाचा आज सजला राजमहाली
बाळाच्या मुखदर्शना गर्दी दाटली राजद्वारी ।।४।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी

आनंदे नाचती अवघी अवधपुरीची नरनारी
कल्लोळ उठे दशदिशी वाजते सनई तुतारी ।।५।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी

उष्ण वायू अश्ववेगे पुण्य वार्ता घेऊन पळे
स्तब्ध कळ्या फुलल्या दरी खोरी तरुवेलीवरी।।६।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी

सूर्यही थांबला नभी पाहाया हर्ष मुखकमळे
कुहुकुहू गाते कोकिळ सु-स्वरे आम्रवृक्षावरी ।।७।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी

चौखूर उधळीत आल्या पान्हावल्या धेनू अंगणी
भाट गाती स्तुतीसुमने नृपतीचे मध्यान्ह प्रहरी।।८।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “पुष्प”

सोमवार, मार्च ३१, २०२५

विठूराया [अभंग ]


सातपुडा साहित्य मंच आयोजित

उपक्रम क्र- १०
विषय- देवाचिये द्वारी
दिनांक -३१/०३/२०२५
—------------------------------------

आलो तुझ्या द्वारी। तुला पाहावया।
पायी चालोनिया  । विठूराया    ।।१।।

उभा वाळवंटी    । वारकरी मेळा 
पाहाया सोहळा  । आषाढीचा   ।।२।।

नित्य माझा नेम  । गातो तुझे नाव ।।
अन्य नसे ठाव    । तुझे विना    ।।३।।

घ्यावे कडेवरी    । सोडुनिया हात ।।
तुच माझा तात  । पांडुरंगा।    ।।४।।

सोडून गाभारा   । यावे घाई घाई।।
होऊनिया आई  । पांडुरंगा     ।।५।।

करीतो प्रार्थना    । पुरवावी आस ।।
लाभो तुझा वास । सदोदित     ।।६।।

©® प्रा पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल‌ " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...