Kaayguru.Marathi

सोमवार, ऑगस्ट ०५, २०२४

इसवी सन २०२४ मधील पुण्यपावन श्रावणमास

वर्ष २०२४ मधील पुण्यपावन श्रावण मास…
 
    श्रावणसरी अंगावर बरसु लागल्या की, मला बालकवी त्र्यंबक बापुजी ठोमरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून जन्मलेली –
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, 
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे" या कवितेची आवर्जून आठवण येते. हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना (Shravan Month) म्हणून मानला जातो. आजपासून (सोमवार दि.५ ऑगस्ट २०२४) श्रावण महिना सुरू झाला आहे.

    यावर्षीच्या श्रावण महिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी पाच श्रावण सोमवार आले आहे.श्रावण सोमवार दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रारंभ होत असून २ सप्टेंबर २०२४ सोमवारीच समाप्त होणार आहे.हा आश्चर्यकारक, अद्भूत, अलौकीक, योगायोग तब्बल इसवी सन १९५३ मध्ये आला होता.

१९५३ मध्ये पाच सोमवार घेऊन आला होता श्रावणमास :-

१ ला सोमवार - दि.१० ऑगस्ट १९५३
२ रा सोमवार - दि. १७ ऑगस्ट १९५३
३ रा सोमवार - दि. २४ ऑगस्ट १९५३
४ था सोमवार - दि.३१ ऑगस्ट १९५३
५ वा सोमवार - दि.०७. सप्टेंबर १९५३
  
   त्यानंतर ७१ वर्षांनी असा पावन योग आला असल्याने सन २०२४ च्या श्रावण मास आणि या महिन्यात करावयाच्या व्रत विधी आणि उपवास व‌ पूजन-अर्चंन यास अधिक महत्त्व असल्याचे बोलले जात आहे. 
   हिंदू धर्म शास्त्रानुसार पावन चातुर्मास प्रारंभ झाल्यावर (म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशीनंतर) येणारा पहिला मास हा श्रावण मास होय.रूढी परंपरेनुसार श्रावण मासापासून व्रत वैकल्ये सुरू होतात.
श्रावण महिन्यातील सणांची यादी :-
-: श्रावण महिन्यातील सण आणि तारखा :-
श्रावण महिना म्हटला की सर्वात पहिल्यांदा डोळ्यासमोर उभे राहतात ते श्रावण महिन्यातील सण. देवीची पूजा, मंगळागौर, श्रावण सुरू झाल्यावर येणारे श्रावणी सोमवार, महादेवाची पूजा, श्रावण महिन्याची माहिती तशी जरी सगळ्यांनाच असते. पण त्यातही मंगळागौर म्हटलं की मंगळागौर माहिती, मंगळागौरीची आरती ही सगळी मजा कशी डोळ्यासमोर येते. पण खरं तर श्रावण महिन्यापासून सर्व हिंदू सण जोरात साजरे व्हायला लागतात आणि श्रावण महिना सुरू झाला की वर्ष पटापट संपायला सुरूवात होते अशी सर्वांचीच भावना असते. या महिन्यापासून अनेक उपवास सुरू होतात. अगदी श्रावणी सोमवार, मंगळागौरीचा उपवास, श्रावणातील शुक्रवारी जिवतीची पूजा, नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी असे अनेक सण एकापाठोपाठ एक लागून येतात. यावर्षी श्रावण चालू होत आहे तो ४ ऑगस्ट -सोमवारी.(Shravan Month 2024) आणि पहिलाच येत आहे मंगळागौरीचा वार.तर श्रावण महिना संपेल २ सप्टेंबर सोमवार रोजी.. या महिन्यातील प्रत्येक सणाला एक वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक दिवशी वेगळे व्रत आणि वेगळी पूजा असते. या महिन्यात प्रत्येकाच्या घरी लगबग चालू असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रावणात सहसा मांसाहार केला जाता नाही. पूजाअर्चा आणि हा कालावधी माशांच्या उत्पत्ती ,संवर्धन करण्याचा असल्यामुळे या काळात मांसाहार शक्यतो टाळला जातो. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारे श्रावणातील वेगवेगळ्या पूजा साजऱ्या होतात. यानिमित्ताने एकमेंकाना आणि सोशल मीडियावर श्रावण महिन्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. त्याआधी आपण पाहूया श्रावण महिन्याचे नक्की काय महत्त्व आहे. 

२०२४ च्या श्रावण महिन्यातील सणांची यादी 
५ ऑगस्ट - १ ला श्रावण सोमवार (तांदुळ)
६ ऑगस्ट - मंगळवार 
मंगळागौर व्रत आरंभ
 ९ ऑगस्ट शुक्रवार 
नागपंचमी आणि जिवंतिका पूजन
१२ ऑगस्ट - २ रा श्रावण सोमवार (तिळ)
१६ ऑगस्ट - शुक्रवार 
पुत्रदा एकादशी
१९ ऑगस्ट - ३ रा श्रावण सोमवार (मूग)
१९ ऑगस्ट -
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन
२२ ऑगस्ट - गुरुवार 
संकष्ट चतुर्थी 
२६ ऑगस्ट - ४ था श्रावण सोमवार (जवस)
श्रीकृष्ण जयंती.
२ सप्टेंबर - ५ वा श्रावण सोमवार (सातु)
दर्श-पिठोरी अमावास्या 
असा हा श्रावण मास 
"श्रावण मास मासात वेगळा
करितो सण उत्सवांचा मेळा "
म्हणूनच श्रावण मासाला पवित्र मास असेही म्हणतात.

" मासात मास श्रावण मास
व्रतवैकल्ये आणतो खास
निर्मळ  मने करता भक्ती 
लाभतो शंभोचा सहवास "
    
   हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे.यानंतर यंदा तब्बल ७१ वर्षांनंतर हा योग पुन्हा आला आहे. या श्रावण महिन्यात पाच सोमवार आले आहेत. श्रावणाची सुरूवात सोमवारी होणं हे शुभ मानले जाते. कारण, भगवान शंकरांचा वार सोमवार आहे. ७१ वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सन १९५३ मध्ये श्रावण मासाची सुरूवात दि.१० ऑगस्ट सोमवारी झाली होती.

   २०२४ मध्ये पुढिलप्रमाणे पाच सोमवार घेऊन आलाय श्रावणमास :-

१ ला सोमवार- दि.५ ऑगस्ट - शिवामूठ तांदूळ 
२ रा सोमवार - दि.१२ऑगस्ट - शिवामूठ तीळ 
३ रा सोमवार - दि. १९ऑगस्ट - शिवामूठ मूग 
४ था सोमवार - दि.२६ ऑगस्ट - शिवामूठ जव 
५ वा सोमवार - दि. २ सप्टेंबर - शिवामूठ हरभरा

    हिंदू धर्मात आठवड्याचा प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. त्याचप्रमाणे, सोमवार हा भगवान शिवशंकराला समर्पित आहे. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का की-भगवान शिवशंकराच्या पूजेसाठी, उपासनेसाठी सोमवारचाच दिवस का निवडला गेला? याचं कारण नेमकं काय? तर जाणून घ्या.
    सकल दुनियेतील शिवभक्त सोमवारी शंकराची (Shiva) मनोभावे पूजा करतात. शिवशंभूंचा आशीर्वाद आपल्यालाही मिळावा असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. भोलेनाथाची पूजा केल्याने नशिबात नसलेल्या गोष्टीही प्राप्त होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. खरं तर, सोमवारी शिवशंकराची पूजा करण्याची परंपरा फार जुनी आहे. पुराणात याचे संदर्भ मिळतात. असं मानलं जातं की, सोमवारी शिवशंकराचे व्रत आणि पूजा केल्याने महादेव खूप प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करतात.
      पुराणात सोमवारीच शंकराची पूजा करण्याबद्दल काही तथ्यं सांगण्यात आली आहेत.आठवड्याच्या सात दिवसांमध्ये फक्त सोमवार हा दिवसच भगवान शंकराच्या उपासनेसाठी का समर्पित आहे? त्याचं अर्धं रहस्य या दिवसाच्या नावातच दडलेलं आहे. सोमवारमधील सोम म्हणजे चंद्र, जो स्वतः भगवान शिवाच्या जटांमध्ये असतो. सोमचा दुसरा अर्थ कोमल असाही आहे आणि भोलेनाथ हे सौम्य स्वभावाचे मानले जातात.आपण जेव्हा सोमवारचा उच्चार करतो, तेव्हा त्याच ओम असा उच्चार देखील होतो. म्हणजेच सोमवारमध्ये ओम देखील समाविष्ट आहे आणि शिव शंभू हे स्वतःच ओंकार आहेत, त्यामुळे हा दिवस अधिक महत्वाचा ठरतो. या सर्व कारणांमुळे सोमवार हा शिव शंकराच्या उपासनेसाठी समर्पित करण्यात आला आहे.
     असे म्हणतात की,संपूर्ण वर्षभर पुजा,अर्चा , उपासना करुन जे पुण्यफल मिळते.त्याहून मोठ्ठे पुण्य श्रावणमासी सोमवारच्या दिवशी शिवशंकराची पुजा, अर्चना ,उपासना,भक्ती केल्याने मिळते.

     या लेखात दिलेली ही शिवस्तुती मनोभावे केली असता शिवशंकराची कृपा प्राप्त होते.

कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथां मुकुटी झळाळी
कारुण्यसिंधू, भवदुःखहारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
रवींदु दावानल पूर्ण भाळी, स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी
ब्रह्मांडधीशा मदनांतकारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
जटा विभूति उटि चंदनाची, कपालमाला प्रित गौतमीची
पंचानना विश्वनिवांतकारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
वैराग्ययोगी शिव शूलपाणी, सदा समाधी निजबोधवाणी
उमानिवासा त्रिपुरांतकारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
उदार मेरु पति शैलजेचा, श्रीविश्र्वनाथ म्हणती सुरांचा
दयानिधीचा गजचर्मधारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ, भुजंगमाला धरि सोमकांत
गंगा शिरीं दोष महा विदारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
कर्पूरगौरी गिरिजा विराजे, हळाहळें कंठ निळाचि साजे
दारिद्र्यदुःखे स्मरणें निवारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
स्मशानक्रीडा करितां सुखाबो, तो देव चूडामणि कोण आहे
उदासमूर्ती जटाभस्मधारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
भूतादिनाथ अरि अंतकाचा,तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा
राजा महेश बहुबाहुधारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
नंदी हराचा हर नंदिकेश, श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश
सदाशिव व्यापक तापहारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
भयानक भीम विक्राळ नग्न, लीलाविनोदें करि काम भग्न
तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
इच्छा हराची जग हे विशाळ, पाळी रची तो करि ब्रह्मगोळ
उमापति भैरव विघ्नहारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
भागीरथीतीर सदा पवित्र, जेथें असे तारक ब्रह्ममंत्र
विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
प्रयाग वेणी सकळा हराच्या, पादारविंदी वाहाती हरीच्या
मंदाकिनी मंगल मोक्षकारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
कीर्ती हराची स्तुति बोलवेना, कैवल्यदाता मनुजा कळेना
एकाग्रनाथ विष अंगिकारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
सर्वांतरी व्यापक जो नियंता, तो प्राणलिंगाजवळी महंता
अंकी उमा ते गिरिरुपधारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
सदा तपस्वी असे कामधेनू, सदा सतेज शशिकोटिभानू
गौरीपती जो सदा भस्मधारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
कर्पूरगौर स्मरल्या विसांवा, चिंता हरी जो भजकां सदैवा
अंती स्वहीत सुवना विचारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
विरामकाळीं विकळ शरीर, उदास चित्तीं न धरीच धीर
चिंतामणी चिंतनें चित्तहारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
सुखावसाने सकळ सुखाची, दुःखावसाने टळती जगाचीं
देहावसाने धरणी थरारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
अनुहात शब्द गगनी न माय, त्याने निनादें भव शून्य होय
कथा निजांगे करुणा कुमारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
शांति स्वलीला वदनीं विलासे, ब्रह्मांडगोळी असुनी न दिसे
भिल्लीभवानी शिव ब्रह्मचारी,तुजवीण शंभो मज कोण तारी
पीतांबरे मंडित नाभि ज्याची, शोभा जडीत वरि किंकिणीची
श्रीदेवदत्त दुरितांतकारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
जिवाशिवांची जडली समाधी, विटला प्रपंची तुटली उपाधी
शुद्धस्वरें गर्जति वेद चारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
निधानकुंभ भरला अभंग, पाहा निजांगें शिव ज्योतिर्लिंग
गंभीर धीर सुर चक्रधारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
मंदार बिल्वें बकुलें सुवासी, माला पवित्र वहा शंकरासी
काशीपुरी भैरव विश्व तारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
जाई जुई चंपक पुष्पजाती, शोभे गळां मालतिमाळ हातीं
प्रताप सूर्यशरचापधारी, तुजवीण शंभो मज कोण तारी
अलक्ष्यमुद्रा श्रवणीं प्रकाशे, संपूर्ण शोभा वदनीं विकसे
नेई सुपंथे भवपैलतीरीं, तुजवीण शंभो मज कोण तारी
नागेशनामा सकळा जिव्हाळा, मना जपें रे शिवमंत्रमाळा
पंचाक्षरी घ्यान गुहाविहारीं, तुजवीण शंभो मज कोण तारी
एकांति ये रे गुरुराज स्वामीं, चैतन्यरुपीं शिवसौख्य नामीं
शिणलों दयाळा बहुसाल भारी,तुजवीण शंभो मज कोण तारी
शास्त्राभ्यास नको श्रुति पढुं नको तीर्थासि जाऊं नको
योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको
काळाचे भय मानसीं धरुं नको दुष्टांस शंकूं नको
ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडू नको.

🙏🌹 जय श्री शिवशंकर शंभो! 🌹🙏

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल “ पुष्प ”


११ टिप्पण्या:

  1. अप्रतिम भक्तीमय माहिती दिली सरजी ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. श्री. किशोरजी एफ. चव्हाण६ ऑगस्ट, २०२४ रोजी ५:५७ AM

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  3. उपयुक्त माहिती फक्त तुमच्या लिखाणातून प्राप्त होते. खूप सुंदर संकलन

    उत्तर द्याहटवा
  4. श्रावण मासातील उत्कृष्ठ माहिती सादर केलीत सर खूपच सुंदर 👍🏻👌🙏🙏

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...