Kaayguru.Marathi

रविवार, ऑगस्ट १७, २०२५

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय?
भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज' म्हणजे 'भक्ती करणे' किंवा 'देवाचे गुणगान, जप करणे', आणि भज शब्दाला 'अन' हा प्रत्यय लागून 'भजन' हा शब्द तयार होतो, ज्याचा अर्थ 'देवाचे गुणगान करण्यासाठी गायलेले गाणे' असा घेता येईल.
  भजनात  टाळ,चिपळी,मृदंग, पखवाज,तबला, हार्मोनियम ,बासरी या वाद्यांसह भगवंताची स्तुती गायन व नामस्मरण केले जाते.विशेषत: आजही महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील देवळात वा मंदिरात बसून आठवड्यातील निदान एक दिवस तरी भजन गायन करण्याची प्रथा सुरू असल्याचे दिसून येते.चातुर्मासात तर अनेक गावांत मंदिरांमध्ये चार महिने दररोज रात्री नित्य भजनाचे गायन होते.
भजन म्हणजे देवाचे गुणगान करणारे एक प्रकारचे धार्मिक गीत किंवा भक्तीगीत.देवाची स्तुतीपर काव्यरचना साग्रसंगीत गाऊन देवाला भजणे किंवा आळविणे यालाच भजन असे म्हणतात. हा योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे. ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय लोककला आहे. वारकरी संप्रदायात भजनाला आत्यंतिक महत्व आहे. पूर्वीच्या संतपरंपरेतील संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वरमाऊली, संत निळोबा महाराज,संत तुकाराम महाराज,संत सोपानदेव महाराज, संत एकनाथ महाराज,संत नामदेव महाराज,संत चोखामेळा महाराज, समर्थ रामदास स्वामी,संत जनाबाई,संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई, कृष्ण भक्त संत मिराबाई इत्यादी पुरुष - स्री संतांनी अनेक भजने अर्थात लहान अभंग,मोठा अभंग, गवळणी, विरहिणी,रचियेल्या आहेत. त्यांपैकी काही रचना भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे, सुधीर फडके, लता मंगेशकर आणि अन्य अनेक गायकांनी गाऊन अजरामर केल्या आहेत.
   भजन गाण्याला कोणत्याही भाषेचे बंधन नाही. अभंग, श्लोक,साधे मंत्र किंवा शास्त्रीय संगीतावर आधारित विविध प्रकारच्या भक्तीगीतातून ते  सादर करता येते.
भजनाचे महत्त्व:
भजन हे भक्तांना आध्यात्मिक आनंद, शांती आणि एकाग्रता प्रदान करते. ते देवाशी नाते जोडण्याचा एक प्रभावी मार्ग आहे, असे मानले जाते. 
भजनाचे दोन मुख्य प्रकार आहेत: 
१) चक्री भजन :
ज्यामध्ये अनेक भजन गायक असतात.ते एका विशिष्ट पद्धतीने फेर धरून, चक्राकार फिरत भजने म्हणतात.हे भजन करताना,एक अभंग म्हटल्यानंतर लगेचच दुसरा अभंग, पहिल्या अभंगाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू करतात. यालाच चक्री भजन म्हणतात, या भजनामुळे गायकाला एक खास ऊर्जा आणि आनंद मिळतो.
२) सोंगी भजन: 
ज्यामध्ये कलाकार विशिष्ट वेषभूषा (सोंगे) करून विविध पात्रांच्या रूपात अभिनय करतात व भजन गातात.यात देव-भक्तांमधील संवाद किंवा पौराणिक कथांचे सादरीकरण केले जाते,ज्यामुळे श्रोत्यांना एक वेगळा अनुभव मिळतो.
भजनाचा अजून एक प्रकार सांगितला जातो.
३) खंजिरी भजन :
तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भजनाचा हा एक नवीन प्रकार सादर केला आहे. त्यांनी खंजिरी या वाद्याचा वापर करून भजनाच्या माध्यमातून जनजागृती आणि समाजसुधारणेचे कार्य केले.
  खंजिरी भजनाद्वारे, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीय भेदभावाचे उच्चाटन, स्वच्छता,शांतता, समता, हे ग्रामविकासाचे सामाजिक संदेश लोकांपर्यंत सहज पोहोचवले जातात.  

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल " पुष्प"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...