Kaayguru.Marathi

मंगळवार, नोव्हेंबर ३०, २०२१

संघर्ष माझा!


पराभव मी सहजच पचवून घेतो
मनात न ठेवता संयमाने जाहीर करतो !
लढेन  पण कधी  वाकणार नाही
संघर्षाला न  घाबरता तयारी मी करतो !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " 

शनिवार, नोव्हेंबर २७, २०२१

अहो दाजी...!

अहो दाजी ! जाऊ नका हो लांब,
कशाला चाचपडता शिळी ती भाजी
बघा या झाडाला 
लगडले आंबे आले की पाडाला
रस चाखाया व्हा की तुम्ही राजी
अहो दाजी ! कशाला चाचपडता शिळी ती भाजी

आठवा भेट ती आपुली पहिली
रिमरिम सरी त्या ऋतू पावसाळी
नभी चमकली विज अवकाळी
कवेत येता तुमच्या झाले मी राजी
रस चाखाया या ना हो तुम्ही दाजी
अहो दाजी ! कशाला चाचपडता शिळी ती भाजी

मन झाले अधीर भेटाया हुरहूर
वाट पाहिन सायंकाळी नाक्यावर
घडता भेट तुमची आणि माझी
कशाला हवा दोघांत आपुल्या काझी
रस चाखाया या ना हो तुम्ही दाजी
अहो दाजी ! कशाला चाचपडता शिळी ती भाजी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, नोव्हेंबर २६, २०२१

अंगाईगीत

अंगाईगीत

सजली रात्र चांदण्याच्या शालू नेसुनी
रातकिडे वाजवती पिपाणी
वारा   गातसे  मंजुळ गाणी
निज रे माझ्या बाळा गाते तुला अंगाई

परसात निजली बाळा जाई जुई
जोजवण्या आली रातराणी ताई
सोबतीस तिच्या निद्रा राणी बाई
निज रे माझ्या बाळा गाते तुला अंगाई

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, नोव्हेंबर २५, २०२१

शेल चारोळी लेखन नियम

शेल चारोळी/काव्य रचना 
एका ओळीत मुळाक्षरांची [ अक्षरसंख्या] संख्या जी आहे तीच इतर ओळींमधे असायला हवी. .
✒️ लेखन नियम :-
अ ) लेखन चार ओळीतच असावे.ही शेल चारोळी म्हटली जाते.
ब ) चार-चार ओळींचे दोन,तीन,गट केल्यास ते शेलकाव्य म्हटले जाते.
१ ) ओळीत अक्षरसंख्या किती असावी.याला बंधन नाही.पण...मला वाटते दहा सोळा-सतरा अक्षरे योग्य ठरतात.
२ ) पहिल्या ओळीत आलेली अक्षरसंख्या ही उर्वरित तीनही ओळीत सारखीच असावी.म्हणजेच चारही ओळीत समान अक्षरसंख्या यावी.
३ ) शब्दसंख्येचे बंधन नाही.पण एक ते चार ओळीत अक्षरसंख्या समसमान असावी. 
४ ) पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द हा दुसऱ्या ओळीची सुरूवात असावा .
५) दुस-या ओळीच्या शेवटच्या शब्दाने तिसऱ्या ओळींची सुरुवात नसावी.
६ ) तिसरी ओळ स्वतंत्र सुरुवात असावी. 
७ ) तिसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दानेच चौथ्या ओळीची सुरुवात करावी.
८) यमक हे दुसऱ्या ओळीच्या शेवटी व चौथ्या ओळीच्या शेवटी जुळविला असावा.
९ ) चारही ओळी ह्या परस्परांना अर्थदृष्ट्या पुरक असाव्यात.
उदा. शेल चारोळी 

✒️ आपण दोघे 

सखी,ती वेळ पुन्हा परत यावी   [अक्षरे - १२]
यावी घेऊन पुन्हा त्या आठवणी [अक्षरे - १२]
आठवणींच्या झोक्यावर असावे [अक्षरे - १२]
असावे आपण दोघे नको भीती  [अक्षरे - १२]


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

उदा. शेलकाव्य
नात्याची विण
उसवू नको ग तू नात्याची विण   [अक्षरे - १२ ]
विण पुन्हा तशी जुळणार नाही   [अक्षरे - १२ ]
तू उगाच नको वाढवूस वाद.      [अक्षरे - १२ ]
वाद हा विनाशाचे कारण होई.   [अक्षरे - १२ ]

नाते मिळत नाही कुठे बाजारी    [अक्षरे - १२ ]
बाजारी नात्याला नसतेच नाव    [अक्षरे - १२ ]
विण असू द्यावी फिट्ट आणि घट्ट [अक्षरे - १२ ]
घट्ट विणीत नक्की गावतो गाव   [अक्षरे - १२ ]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "



नको हे हेवेदावे ![ शेल काव्य ]


खरंय...हे  हेवेदावे  का आणि कशाला

कशाला  त्या  वेदना कोमल हृदयाला !
स्वतः प्रामाणिक असावे  नको देखावा
देखावा  कळे  मन  जळे  क्षणाक्षणाला

जिभेवर   कटूता   समोर   येता  स्तुती
स्तुती असेल  तिथे समजावा हो स्वार्थ
निडरपणे    बोला   हे   वाईट   हे  भले
भले    करता  दुजांचे   लाभे   परमार्थ

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


बुधवार, नोव्हेंबर २४, २०२१

सासुरवाशीण लेकीचं बाबांना पत्र...

सासुरवाशीण लेकीचं बाबांना पत्र…

प्रिय बाबा...!
   बाबा, मी सासरी आल्यापासून ते आजपर्यंत एकही क्षण तुमच्या आठवणीवाचून गेला नाही...
रोज पहाटे लवकर उठतांना तुम्ही मला आठवता….
  तुम्ही आईला नेहमी म्हणायचे, अग.. झोपू दे! हे काय सासर आहे का लवकर उठाया? 

रोज पहाटेपासून उठल्यावर घरातील सगळ्याचं हवं नको ते करतांना दमछाक होताच बाबा तुम्ही आठवता…
माझ्याकडे कामाचा तगादा लावणा-या आईला तुम्ही म्हणत, अग, किती काम करुन घेशील तिच्याकडून..?
ती काय यंत्र आहे का एकसारखं काम करायला? बस्स. पुरे आता! 

स्वयंपाकघरात गेल्यावर बाबा तुम्ही आईशी केलेला संवाद आठवू लागतो…
अग, तूच कर ना आज स्वयंपाक. सासरी गेली का आपली ताऊ करणारच आहे सासरच्यांसाठी सुगरणीचा स्वयंपाक..! 

दिवसभराच्या रांधा वाढा उष्टी काढा करुन उशिरा झोपतांना तुम्ही डोळ्यासमोर उभे राहता...
अरे, बेटा! झोपली नाही अजून. बरीच रात्र झाली; झोप आता. उशिरा झोपणे प्रकृतीसाठी योग्य नाही बरे! 

रात्री झोपतांना अंगावर पांघरुन घ्यायलाही त्राण नसतांना बाबा तुम्ही आठवता...
काळजीने मी झोपले की नाही हे पाहण्यासाठी आले असता... किती वेडी पोर ही.. एवढ्या थंडीतही पांघरुन न घेताच झोपली.. अन् स्वतःचे पांघरुन माझ्या अंगावर घालणारे तुम्ही ..! 

बाबा, अंगात तापाची कणकण येताच तुमच्या मायेची ऊब आठवते...
अरे, आज आमचं वेडं फूल कसं हिरमुसले? अरेरे.. ताऊला तर ताप चढलाय. चला, चला..! उशिर नको. डॉक्टरांकडे लवकर जाऊ या. अंगावर ताप मिरवणे आरोग्यासाठी चांगले नाही बेटी ! 

बाबा, सासरी आल्यापासून हे सारं काही आठवतं हो.. पण त्या आठवण्याला सुगंध असतो तुमच्या मायेचा अन् आंतरिक जिव्हाळ्याचा..!
तुम्हाला माझी असणारी काळजी मला  जगण्यासाठीचे  हे बळ... म्हणजे अमृतसंजीवनी हो बाबा!

लेक… बापासाठी वडाचा पार !
लेक… बापाच्या सुखाचं सार !
लेकीवर जीवापाड प्रेम करणा-या सर्व बाबांना समर्पित...!

©प्रा.पुरूषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, नोव्हेंबर २३, २०२१

तुज नमो !

श्री गजाननाय भिमोदराय
उमासुताय   तुज नमो
भालचंद्राय तू गणनायकाय तू
शिवपुत्राय  तुज  नमो
सिद्धवेदाय तू गणाध्यक्षाय तू
शुर्पकर्णाय  तुज  नमो
कांतीदाय तू दिर्घतुण्डाय तू
अव्यग्राय   तुज   नमो
करुणामय तू शरण्याय तू
महाग्रिवाय  तुज  नमो
रत्नसिंहासनाय तू नित्याय तू
मुषकाधिपवाहनाय तुज नमो
अमेयाय तू विकटाय तू
भक्तकल्याणाय तुज नमो
सिंदुरवदनाय तू शांताय तू
एकदंताय  तुज  नमो
सिद्धिविनायक तू योगीशाय तू
कमलाक्षाय तुज नमो
शरण्याय तू  पूर्णाय तू
वेदस्तुताय  तुज  नमो
सुमुखाय तू गणेशाय तू
अनंताय   तुज   नमो
तुज नमो ! तुज नमो ! तुज नमो !

© प्रा. पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, नोव्हेंबर २२, २०२१

विभूति [कविता]

जगात पूज्य विभूति एकदाच येते जन्माला
होऊ  शकत नाही तुलना तिच्या कर्तृत्वाला

मॉसाहेब जिजाऊ एकच शिवरायांची आई
त्यांच्या तोडीचे  कार्य  कुणा जमायचे नाही

शून्यातून मुहूर्तमेढ केली हिंदवी स्वराज्याची
शिवरायांनी वाहिली काळजी स्वतः रयतेची

पावन गंगा भूवरी आणितो तो एक भगिरथ
ज्योती सावित्रीने  ओढीला  ज्ञान सुवर्ण रथ

विज्ञान अंतराळ  क्षेत्री  चमकले रत्न कलाम
टाटा-बिर्ला अंबानी पतंजली उद्योगा सलाम

हास्यलेखन जगी जन्मले चिंवी पुल गडकरी
दमा,रमेशमंत्री,भेंडे,नगरकर लेखन मनोहारी

कविता नाट्य कथा विश्वी रमले शिरवाडकर
कथा कादंबरी  रमिले देसाई नेमाडे खांडेकर 

पुन्हा न  होणे फडके टिळक गांधी सावरकर
भगतसिंग राजगुरु  सुखदेव अन्  आंबेडकर

धन्य महान  विभूति  ज्यांनी रचिला इतिहास
गाईन मी  किर्ती त्यांची श्वासात असेतो श्वास

करितो मी  लेखन  त्याहून  मी कधी ना मोठा
वंद्य  ह्या  विभूति वंदितो चरण शब्द न खोटा

      © प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शनिवार, नोव्हेंबर २०, २०२१

ते सात कृतघ्न !

माझे   पाय   मागे ओढण्याची
बरीच   खलबतं   झाली  होती
संपल्या कितीतरी दिवस रात्री
पण त्यांना यश येत नव्हतं हाती !

आजही   आठवतात  मला  ती
दुराचारी  हो  फक्त सात  डोकी
त्यांना पाहून  वाटते आहे जगी
धृतराष्ट्र  दुर्योधन  ह्या  भूलोकी

ते नव्हते घरचे  होते मला परके
गड्या मी मानले त्यांना  आपले
कृतघ्न त्या शिरी चढवता मुकूट 
मुखवट्यातील  रुप मज कळले

बापच नव्हता त्यांना माहित हो
मीच दिधले की ओळखीचे नाव
दाखला  तयार होताच सगळेच
विसरुन गेले  आपुलकीचा गाव

कफल्लक  होते  तरी मी त्यांना 
स्वबुद्धी  केले प्रधान अन् राजा
अधम असूर  ते खरे! नव्हते सूर
केसाने कापून गळा दिली सजा

म्हणे पुरुषोत्तम ! घ्या   हे ध्यानी
मानव असेल   तर तो मेळवावा
निर्बुद्ध , कपटी  शकुनी वृत्तीला
सुर आपुला कधी ना आळवावा

ऐका माझा मंत्र उघडे ठेवा कान
अधमांचा गळा घालू नका माळा
उपकाराची  ते ठेवत  नाही जाण
कृतघ्न  हो   ते  नका  लावू लळा

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "




गुरुवार, नोव्हेंबर १८, २०२१

मनमंदिर [ भूलोळी ]

लैला,तुम्हारे कंधे पे
कधी नको कसलाही भार
मनभावन गीत गाती लुभाने 
भोवताली असावं ग् वारं गार गार


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, नोव्हेंबर १६, २०२१

अंगाई

अंगाई ( बालगीत )
आई गोष्ट नको सांगू मला जाड्या रड्याची
ऐकेन मी गोष्ट आज चिऊ काऊची

चिवचिव करुन जागवाया ती दिसेना चिऊ
तिच्याविना एकटा मी कसा ग् राहू
हुरहूर लागली मला तिच्या भेटीची
ऐकेन मी गोष्ट आज चिऊ काऊची… ।।१।।

पहिला घास माझ्यासवे ग् खातो तो काऊ
त्याचाविना एकटा मी कसा ग् जेवू
शिकवि कला तो मज ख-या खोट्याची
ऐकेन मी गोष्ट आज चिऊ काऊची...।।२।।

आई चिऊ वाटे ताऊ अन् भाऊ वाटे काऊ
आम्ही तिघे नाचू गाऊ सोबत राहू
तिघे सोबतीला शोभा वाढवू अंगणाची
ऐकेन मी गोष्ट आज चिऊ काऊची...।।३।।


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, नोव्हेंबर १५, २०२१

जाणता शिवशाहीर : बाबासाहेब पुरंदरे

जाणता शिवशाहीर: बाबासाहेब पुरंदरे 
आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे,
 ‘' राजा शिवछत्रपती '’ या ग्रंथाचे लेखक, ‘' जाणता राजा '’ या महानाट्याचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे.२९ जुलै १९२२ रोजी त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवड येथे झाला. परंतु ते इतिहास संशोधन व साहित्य क्षेत्रात विशेष करून बाबासाहेब पुरंदरे याच नावाने सुविख्यात झाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी याच वर्षी २९ जुलै २०२१ रोजी वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्याप्रसंगी भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री 
मा.नरेंद्रजी मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे , मा.राज ठाकरे, आणि विविध क्षेत्रातील दिग्गज नेते, जनसामान्य नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करुन त्यांना शतकोत्तर आयुष्याचा शुभेच्छा दिल्या होत्या.तेव्हा नुकतीच वयाची ९९ वर्षे पूर्ण करुन १०० व्या वर्षात पदार्पण करताना ते म्हणाले होते की, " महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाचा अभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज हा समजून घेण्याचा मोठा विषय आहे. या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास, वाचन आणि लेखन करून स्वत: काही करी निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. पण, शिवचरित्राविषयी अजूनही खूप काही समजून घ्यायचे आहे ! तेव्हाच ते म्हटले होते की “आणखीन दोन तीन वर्षे मिळाली तर…! ” असं म्हणत एक इच्छा व्यक्त केलेली होती.ती इच्छा पूर्ण होण्यापूर्वीच नियतीने त्यांना आपल्यातून हिरावून नेले.त्यांचे जाणे म्हणजे -
मला वाटते की, " बाबासाहेब पुरंदरे हे शिवकालीन इतिहासाचे जीवंत साधन होते.महाराष्ट्रातील एकेक किल्ला ; जे किल्ले छत्रपती शिवरायांनी पायाखाली घेतले,ज्या किल्ल्यांवर छत्रपतींनी भगवा झेंडा रोवला,आऊसाहेबांच्या व आबासाहेबांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य स्थापन केले, गडकोटावरुन आपल्या आदर्श विचारांचे दशदिशांना वा-याद्वारा अन्याय अत्याचार करणा-या यौवनी सत्तेला ' याद राखा, माझ्या आया-बहिणींवर वाकडी नजर टाकली तर डोळे काढून हातात देईन- गर्दंन छाटली जाईल.' असे खलिते पाठविले.त्या आऊसाहेब जिजाऊ सरकार, छत्रपती शिवाजीराजे यांच्याशी संबंधित एकेक घटना, एकेक संवाद, एकेक खलबत, राजांचा दिलदारपणा,राजांची सहिष्णूता,
राजांची युद्धनीति, राजांचे शिलेदार व मावळ्यांप्रती असणारे प्रेम - जिव्हाळा, शत्रूला देण्यात येणारी वागणूक, शिवरायांचा रयतेविषयी व कुटुंबीयाविषयीचे समान विचार व शिस्त , राज्यकोषाचा सांभाळ, युद्धनिती व युद्धाची साधने, गडकोटांची व गिरिकंदरांची माहिती, इत्यादि त्यांनी स्वतः आयुष्यभर गडकिल्ले व परिसर भ्रमंती करुन मिळविली.जुने दस्तावेज मिळवून माहितीची खातरजमा केली. माहिती संकलित करुन शिवचरित्राचा अनमोल ठेवा घराघरात पोहचविला.ते जणू शिवकालीन इतिहासाच्या चालता बोलता " संवाद कोश " होते असे म्हणता येईल.
त्यांनी अखेरपर्यंत शिवचरित्राची १२००० व्याख्याने दिलीत.
बाबासाहेब पुरंदरे लिखित ग्रंथ साहित्य :-    
✒️आग्रा.                          ✒️कलावंतिणीचा सज्जा.    
✒️जाणता राजा.     ✒️पन्हाळगड
✒️पुरंदर.                ✒️पुरंदरच्या बुरुजावरून
✒️पुरंदर्‍यांच्या सरकारवाडा  ✒️महाराज
✒️पुरंदर्‍यांची नौबत.          ✒️प्रतापगड. ✒️फुलवंती
✒️महाराज.                      ✒️मुजर्‍याचे मानकरी
✒️राजगड.                        ✒️लालमहाल
✒️राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध
✒️शिलांगणाचं सोनं.           ✒️शेलारखिंड
✒️सावित्री.               ✒️ सिंहगड
🌟ध्वनि-फीती
🎤बाबासाहेब पुरंदरे यांचे कथाकथन - भाग १, २, ३ (कॅसेट्‌स आणि सीडीज)
🎤शिवचरित्र कथन भाग १ ते १५ कॅसेट्‌सचा आणि सीडीजचा सेट
प्राप्त सन्मान आणि पुरस्कार :-
🌟 डी. लिट. (२०१३)
🌟 महाराष्ट्रभूषण पुरस्कार (१९ ऑगस्ट २०१५ )
🌟 गार्डियन-गिरिप्रेमी जीवनगौरव पुरस्कार (२१-२-२०१६)
🌟 प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१२)
🌟 पद्मविभूषण (२०१९)
अखिल भारतीयांना व शिवप्रेमींना वंदनीय आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ५ वाजून ०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले.त्यांच्या निधनाने एक सच्चा शिव-गड-कोट प्रेमी , इतिहास संशोधक , गडकिल्ल्यांच्या साहित्यिक कालौघात विलीन झाला.त्यांच्या इतिहास संशोधन कार्याविषयीविषयी एकच म्हणता येईल - 
" झाले बहू । होतील बहू । परि या सम हा ।। "
त्यांच्या कार्य कर्तृत्वाला मानाचा त्रिवार मुजरा ! 
        🙏🌹💐भावपूर्ण श्रद्धांजली!💐🌹🙏

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

तूच दिसे मज

देवा,तू आहेस फुलात
म्हणून दरवळे परिमळ
गुंततो  फुलात  मी रे  विसरुन भान सारे

देवा तूच आहे पाऊसधारा
म्हणून खुलते वसुंधरा
नयनी भरतो ते चैतन्य,विसरुन भान सारे

देवा,तूच आहे किरणांत
म्हणून पळतो तिमिर
जागते जीवनाची आस विसरुन भान सारे

देवा तूच वाहतो वारा
म्हणून घेतो मी श्वास‌
आळवितो नाम तुझे विसरुन भान सारे

देवा आहेस बिज तू 
म्हणूनच अंकुरे तू  मातीत   
पाहतो अनंतकोटी रुपं विसरुन भान सारे
 
तू बिजात,पानांत,फुलात,जलात
गगनात,श्वासात रज:कणी,वृक्षात
गिरी-कंदरी,पशू पक्ष्यात 
पाहतो  सर्वत्र  तूज मी,विसरुन भान सारे

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
    म्हसावद
   भ्रमणध्वनी-९४२१५३०४१२

शनिवार, नोव्हेंबर १३, २०२१

स्वर ते ऐंकता

मैफिलीत  तू गायिलेस ते गीत
गीत  अमृतापरी  गोड स्वर  ते
सखे  ते जन्मभरी गाईन ग् मी
मी  देतो वचन  न  विसरणे  ते

मधुर   मधुर    एक   एक  शब्द
शब्द  बसविले  हृदयी  कोंदणी
सप्त  सुरांची   सुरावली अविट
अविट  झाले जीवन ते ऐकोणी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


शुक्रवार, नोव्हेंबर १२, २०२१

कान्हा [ गवळणी ]

गवळणी 

कान्हा ....
नको मारु खडा नको फोडू मडकी
नको भिजवू रे आमूची लुगडी कोरी 
खोडी ऐकता तुझी थोडी जरी
मैय्या बांधिल कान्हा तुझ्या पायी दोरी
आम्ही गोकुळीच्या गौळणी
विकाया दहिदूध ताक लोणी
निघालो मथुरेच्या बाजारी ।। १।।

आम्ही गोकूळच्या साध्या भोळ्या नारी
विनवतो अरे तुला गिरीधारी !
आम्ही यौवनातील तरण्या पोरी
नको छेडू आम्हा कृष्णमुरारी
आम्ही गोकुळीच्या गौळणी
विकाया दहिदूध ताक लोणी
निघालो मथुरेच्या बाजारी ।।२।।

नको मारु खडा नको फोडू मडकी
नको भिजवू रे आमुची लुगडी कोरी…
आम्ही गोकुळीच्या गौळणी
विकाया दहिदूध ताक लोणी
निघालो मथुरेच्या बाजारी ।।२।।


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, नोव्हेंबर ११, २०२१

वैभवलक्ष्मी

मला नको  सोने-चांदी अन् रुपे काही
नको पैसा - अडका धन-धान्य संपत्ती
तुझ्याशिवाय  काहीही  जमणार नाही
तू  तर  माझी  जीवनाची वैभव लक्ष्मी !


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


बुधवार, नोव्हेंबर १०, २०२१

प्रभो कंसारी [ अभंग ]


हे प्रभो कंसारी। तू कृष्ण मुरारी।
कुंजविहारी तू । गिरीधारी  ।।

देवकी नंदन    । पितांबरधारी।
बन्सीबिहारी तू ! मनोहारी ।।

कालियामर्दक  । गोपालसखा तू ।
नंदनंदन तू       । वासुदेव ।।

राधारमण तू    । मनमोहन तू ।
माखनचोर तू   । वनमाळी  ।।

कंजलोचन तू   । कमलवदन।
मधुसूदन तू      । जगदिशा ।।

शामसुंदर तू     । रुक्मिणी वल्लभ । 
पुरुषोत्तम तू    । नारायण।।

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, नोव्हेंबर ०९, २०२१

चाहत



एक  प्यार  भरी  चाह़त  थी
आपके संग जिने- मरने की…
हाथ में लेकर हाथ चलेंगे साथ ।

उम्मीद  थी   तुम  आओंगे
इंतज़ार  रहा   सारी  रात ।

नज़र  थमी थी दरवाजे पर
राह तक़ती रही सारी रात ।

सेज़ सजी थी अरमानों की
अश्क़  बहते रहे सारी रात।

दिल मोम जैसा जलता रहा
पिघलता  रहा  सारी   रात।

भोर   हुई   तो  जाना  हमने
ए    दिल   तू    ही   नादांन
प्यार   किसे   कर  बैठे  हम
जिसे हमारी चाहत़ ही न थी ।

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


सोमवार, नोव्हेंबर ०८, २०२१

लक्ष्मणाचे बंधुप्रेम

🌹 जय श्रीराम !✍️

प्रभू श्रीरामांचे अवतार कार्य अतुलनीय असे आहे.त्यांनी समस्त मर्यादांचे पालन केल्याने ते
' मर्यादा पुरुषोत्तम ' ठरले.पण त्यांच्या कार्यात त्यांची सावली बनुन जगणारी एक महत्वाची व्यक्तीरेखा...ती म्हणजे लक्ष्मण होत!
लक्ष्मण हे प्रभू रामाचे संपूर्ण अवतार कार्यात सदोदित सावली बनून सोबत राहिले.त्यांच्या त्यागाला सीमा नाही.रामकथा लक्ष्मणाशिवाय पुर्णच होऊ शकत नाही.ते आपण आज जाणून घेऊ या---
राम-रावण युद्धानंतर श्रीराम अगस्त्य ऋषींना म्हणाले,
" की आम्ही रावण आणि कुंभकर्ण ह्या शक्तीशाली वीरांचा वध आणि लक्ष्मणाने रावणपुत्र इंद्रजीत आणि अतिकाय या दोन्ही असूरांचे निर्दालन केले."
त्यावर ऋषी अगत्स्य म्हणाले," श्रीरामा, रावण आणि कुंभकर्ण हे महाशूर होते.पण त्याच्याहून ही महाशक्तीशाली तर इंद्रजीत होता.त्याने प्रत्यक्ष इंद्राला जिंकून घेतले होते.अशा या महाविराचा वध लक्ष्मणाने केला हा पराक्रम साधा नव्हे ! म्हणून लक्ष्मण हे अतिशुर योद्धा होत ."  हे ऐंकूण श्रीरामांना आश्चर्य वाटले खरे , पण प्रिय भावाची स्तुती ऐंकूण त्या़ंना मनोमन आनंदही झाला.पण तरी त्यांच्या मनात निर्माण झालेल्या कुतूहलाने उचल खाल्लीच !
ते विचार करु लागले की, " ऋषी अगत्स्य का म्हणाले की,इंद्रजीतला मारणे हे रावणापेक्षाही महाकठीण होते ? "
त्यांच्या शंकेला उत्तर देताना ऋषी अगत्स्य म्हणाले,
" श्रीरामा , इंद्रजीताला असे वरदान होते की त्याचा वध असा माणूस करेल की ज्याने..." ते क्षणभर थांबले.
" बोला ऋषीवर,कोणते वरदान ? आणि कोणता माणूस ? " श्रीराम असे म्हणताच ऋषी अगत्स्य म्हणाले ,
" श्रीरामा , इंद्रजीताचा वध तोच माणूस करु शकणार होता जो...
१) चौदा वर्षांत ज्याने पळभरही झोप घेतली नसेल.
२) चौदा वर्षांत ज्याने एक क्षणही स्रीमुखाचे दर्शन घेतले नसेल.
३) चौदा वर्षांत एकही घास जो जेवला नसेल. "
श्रीराम म्हणाले, " ऋषीवर हे कसे शक्य आहे.
वनवासात असताना मी नियमित लक्ष्मणाला त्यांच्या वाट्याची,हिश्याची फळे देत होतो. 
दुसरी बाब , मी  व सीता एका कुटीतच राहत होतो,
आणि जवळच दुस-या पर्णकुटीत लक्ष्मण राहत असे.
त्याने सीतेचे मुखदर्शन घेतले नसावे हे शक्यच नाही.
तिसरी गोष्ट,लक्ष्मण चौदा वर्ष झोपलाच नाही हे कसे शक्य आहे.मला हे अशक्य वाटत आहे ."
श्रीरामांनी सांगितलेली गोष्ट ऐकताच ऋषी अगत्स्यांनी स्मित हास्य करीत श्रीरामांच्या मनातील गोष्ट अंर्तज्ञानाने जाणून घेतली.रामाचे गुणगान तर सप्तखंडात होत होते.पण लक्ष्मणाचा त्याग आणि तप व बंधुप्रेमाची चर्चा अयोध्येतील घराघरात व्हावी असे  श्रीरामांनाही वाटत होतेच!
ऋषी अगत्स्य म्हणाले , " श्रीरामा,आपण ह्या गोष्टी लक्ष्मणाकडूनच जाणून घेतल्या तर...? "
लक्ष्मणजीला बोलावण्यात आले, त्यांना सांगण्यात आले की, तुम्हाला जे विचारण्यात येईल,त्याचे उत्तर खरेखुरे असेच द्यावे ! 
श्रीरामांनी विचारले,  " लक्ष्मणा ,
१) आपण तीघेही चौदा वर्ष वनवासात सोबत राहिलो असता,तू तुझ्या वहिनीचे मुख  बघितले नाही का ?
२) तुला तुझ्या वाट्याची फुले-फळे मी दररोज आहारासाठी दिली तरी ती तू का खाल्ली नाहीस ?
३) आणि तू १४ वर्ष  का झोप घेतली नाहीस ?
तुला हे कसे काय शक्य झाले ? ते सांग ! "
श्रीरामांनी विचारलेल्या तीनही प्रश्नाला विनम्रतेने उत्तर देत लक्ष्मणजी म्हणाले,
" हे प्रभो,
✍️  तुम्हाला आठवत असावे की,जेव्हा वहिनींच्या शोधात फिरत असता आपण ऋष्यमुख पर्वतावर पोहोचलो तेव्हा सुग्रीवाने काही दागिने दाखवून त्यावरुन ओळख पटविण्याचे सांगितले.तेव्हा मी फक्त वहिनीच्या पैंजणाशिवाय दुसरे कोणतेही दागिने ओळखू शकत नसल्याचे बोललो होतो.कारण मी  माझ्या वहिनीच्या चरणाव्यतिरिक्त तिला बघितलेच नाही.
✍️* चौदा वर्ष मी भोजन न करता कसा राहिलो तर..तुम्ही मला माझ्या वाट्याचे फुलं-फळ देतांना " हा ठेव तुझा वाटा ! " असे म्हणून मला नियमित देत होते.तुम्ही मला " तू हे खाऊन घे ! " असे कधी म्हटलेच नाही.तुमची आज्ञा नसल्याने मी भोजन कसा घेऊ !
तुम्ही दिलेले ते फुलं-फळ मी सर्व सांभाळून ठेवली आहे . ते सर्व आताही पर्णकुटीत पडूनच आहेत.
लक्ष्मणजी चित्रकुट पर्वतावरील पर्णकुटीत जाऊन फूलं-फळांची टोपले उचलून घेऊन आले.ती श्रीरामांसमोर ठेवली.ती फळे मोजण्यात आली.त्यात सात दिवसांची फळे कमी भरली.तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, " ज्याअर्थी सात दिवसाची फळे कमी भरताहेत.त्याअर्थी हे लक्ष्मणा,तू निदान सात दिवस तरी जेवलाच आहेस की ! "
त्याचाही हिशेब देत लक्ष्मणजी म्हणाले, 
✍️" हे प्रभो,
मला पुढील सात दिवस फूल-फळं मिळालीच नाहीत . ते सात दिवस असे-
१) ज्या दिवशी आपणास पिताश्रीच्या स्वर्गवासाचा शोकसंदेश मिळाला,त्या दिवशी आपण निराहारी म्हणजेच काहीच न खाता  राहिलो.
२) ज्या दिवशी रावणाने मातासितेचे हरण केले त्या दिवशी आपण शोकमग्न होऊन मातेच्या शोध घेत राहिलो.  फळे आणावयास कोण जाणार तो दिवस आपण निराहार काढला.
३) ज्या दिवशी तुम्ही समुद्रदेवाला प्रार्थना करुन त्यांची संमती मागीत होता.तो एक दिवस.
४) ज्या दिवशी तुम्ही इंद्रजीताच्या नागपाशात बांधले गेल्याने मुर्छित पडून राहिले.तो दिवस निराहार होता.
५) ज्या दिवशी इंद्रजीताने मायावी सितेला कापल्याने आपण सर्व शोकमग्न होतो.तो दिवस निराहारी गेला.
६) ज्या दिवशी रावणाने मला शक्तीने मारले.तो दिवस सगळेच निराहार राहिले.
७) ज्या दिवशी तुम्ही स्वतः रावण वध केला.त्या शोकात आपण निराहारी राहिले.
प्रभो,भ्राता...ह्या सात दिवशी आपणास वा इतर कोणासही जेवण्याची इच्छा तरी होती काय ? आणि हो , गुरुदेव विश्वामित्रांकडून मला एक दिव्य विद्या प्राप्त झाली होती.ती म्हणजे ' काहीही न खाता जीवंत राहण्याची विद्या ! '
त्याच विद्येच्या बळावर मी चौदा वर्ष माझ्या भूखेवर नियंत्रण ठेवू शकलो.
✍️ तिसरी गोष्ट म्हणजे मी चौदा वर्ष झोपच घेतली नाही ते कसे...ते सांगतो ,
तर,तुम्ही आणि वहिनी एका पर्णकुटीत विश्रांती घेत.मी मात्र बाहेर थांबून रात्रभर माझ्या धनुष्याला बाण चढवून डोळ्यांची पापणी लवू न देता जागता पाहरा करीत असे.चौदा वर्षाच्या काळात मी निद्रेला माझ्या बाणांनी बांधून ठेवले होते.निद्रेने शेवटी हार मानून मला वचन दिले होते की,चौदा वर्ष ती मला स्पर्शही करणार नाही.
पण भ्राताश्री,तुम्हाला स्मरत असेल तर,तुमच्या राज्याभिषेक होत असता माझा हातून छत्र खाली पडले होते.कारण तेव्हा मला निद्रेच्या स्पर्श झाला होता. ह्या कठोर तपामुळेच  आणि संयमामुळेच मी इंद्रजीतास ठार करु शकलो.
प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणजीची कठोर व संकल्पित निष्ठा ऐंकूण त्यांना हृदयासी लावले.
        🙏🙏🙏🌹धन्य ते लक्ष्मणजी! 🌹🙏🙏🙏
          🙏🙏🙏🌹धन्य ते बंधुप्रेम !🌹🙏🙏🙏

      🙏🌹🙏ॐ लं लक्ष्मण देवताभ्यो नमः:🙏🌹🙏

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, नोव्हेंबर ०७, २०२१

विठ्ठल माझा

विठ्ठल माझा गाव विठ्ठल माझा भाव ।
हृदयी विराजे विठ्ठल माझा ।।

विठ्ठल माझा देव विठ्ठल माझी ठेव ।
अंतरीची तळमळ विठ्ठल माझा ।।

विठ्ठल माझी भक्ती विठ्ठल माझी शक्ती ।
चौ-याशीची मुक्ती विठ्ठल माझा ।।

विठ्ठल माझी नीति विठ्ठल माझी मती ।
जन्माची पुण्याई विठ्ठल माझा ।।

विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता ।
तारक गुरु अवघा  विठ्ठल माझा ।।

विठ्ठल माझा ठाव विठ्ठल माझा राव।
दिनदयाळू माऊली  विठ्ठल माझा ।‌।

विठ्ठल माझा राम विठ्ठल माझा शाम ।
जन्मभरीचा विश्राम विठ्ठल माझा ।।

विठ्ठल माझी इंद्रायणी विठ्ठल माझी चंद्रभागा।
पावन भिमाई विठ्ठल माझा ।।

पूजीन मी विठ्ठल गाईन मी विठ्ठल।
जपीन अखंडित विठ्ठल माझा।।

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
   म्हसावद
   भ्रमण-9421530412

शनिवार, नोव्हेंबर ०६, २०२१

भूलोळी रचना ✍️

❤️ भूलोळी रचना ✍️

भूलोळी क्रं.१ : कोहिनूर-
तेरी प्यारी प्यारी नैना
वाटे  मज  कोहिनूर  हिरा
नज़र  तेरी  बड़े  प्यार  से भरी
एकदा ये ! प्रेमाने  बघून  जा  न्  जरा
-----------------------------------------

भूलोळी क्र.२ : मनमंदिर 

आपके ओठो की लाली
हृदय  माझे  घायाळ  करी
आपने दिया था एक लिप किस 
जीवापाड जपलाय  मी  मनमंदिरी
---------------------------------------------
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, नोव्हेंबर ०५, २०२१

त्या वळणावर

त्या वळणावर ! 


आपणच   गावे  आपुले  गाणे
कधी एकटे कधी सारे मिळूनी
झाले  गेले   विसरुन जावे
क्षणभर एका वळणावरती

कधी हसावे कधी फुलावे
स्वप्नात आपुल्या आपण फिरावे
विसरुन जावे दुःख ते सारे
क्षणभर एका वळणावरती

कधी उजेड कधी काळोखराती
कधी  न  स्मरावी  काजळवाती
थांबून  गावी  जीवनगाणी
क्षणभर एका वळणावरती

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, नोव्हेंबर ०४, २०२१

दिवाळी


भाद्रपद  सरला आश्विन आला
गेली गौराई आपुल्या सासुराला
आश्विन  पंधरवडा   देतो  हाळी
आली  दिवाळी  आली दिवाळी

आम्रपर्णी  तोरण  बांधिले दारी
शेणसडा  टाकीला  मी  अंगणी
रेखाटली त्यावरी सुबक रांगोळी
आली दिवाळी  आली  दिवाळी 

सांजवेळीच्या   सुवर्ण    पणती
लखलख  करिती  लक्ष  ज्योती
चंदेरी  प्रकाश  काळोख  जाळी
आली दिवाळी  आली  दिवाळी

लाडू   करंज्या   आणि   सांजरी
चकली  सुवास  दरवळे घरोघरी
तेला   तुपात   नाचे  शंकरपाळी
आली  दिवाळी  आली  दिवाळी

आरोग्य   देवता   धन्वंतरी   सवे
लक्ष्मी   कुबेर  येतील  घरमंदीरी
गातो पाडवा प्रातःकाळी भूपाळी
आली  दिवाळी   आली  दिवाळी

भाऊ येईल मज न्याया माहेराला
येता  भाऊबीज    पावन  पर्वाला
औक्षण करीन टिळा लाविन भाळी
आली  दिवाळी   आली  दिवाळी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


बुधवार, नोव्हेंबर ०३, २०२१

राष्ट्रीय गृहिणी दिवस

राष्ट्रीय गृहीणी दिवस 

मित्र मैत्रिणींनो 
आज ३ नोव्हेंबरचा दिवस.
हा दिवस आपण भारतीय नागरिक " राष्ट्रीय गृहिणी दिवस " म्हणून साजरा करतो.खरे पाहता, संसारातील सर्वात कठीण कार्य कोणते ? याचे उत्तर निश्चितच " गृहिणी " बनणे असेच येईल. कारण घर आणि कुटुंबाला ख-या अर्थाने एकात्मतेच्या धाग्यात बांधून ठेवण्याचे काम " गृहिणी " करते.म्हणूनच तिच्या हा एकमेवाद्वितीय त्याग आणि ती नि:स्वार्थपणे करीत असलेल्या कर्तव्याप्रती तिच्या सन्मान वर्षातून एक दिवस का असेना ,आपण सर्वांनी तिला द्यावा.म्हणून हा दिवस तिलाच समर्पित आहे.
या दिनी तिच्या गौरव, अभिनंदन करावे.यासाठी आजचा हा ३ नोव्हेंबर हा दिवस खास भारतात " गृहिणींसाठी " राखून ठेवण्यात आला आहे.
 मी तर असे म्हणेन की, एक महिला ही मुलगी,सून,आई, आजी,काकू,मावशी,आणि मैत्रीण असू शकते...पण ती एक उत्तम " गृहिणी " असणे अती कठीणच!
 मला वाटते ,गृहीणी कोणाला म्हणावे ? तर जिच्या सेवेप्रती सगळे गृह म्हणजे घर ऋणी म्हणजे देणेकरी बनते तीच खरी " गृहिणी " होय.अशा गृहीणीचे आदर्श गुण मी पुढीलप्रमाणे वर्णन करेन :-
१) घर व कुटुंबाला २४×७ आपल्या निःस्वार्थ हेतूने एकाच धाग्यात बांधून ठेवते.
२) स्वतःच्या नोकरी व्यवसाय सांभाळून पती,मुले, सासू, सासरे यांच्यात योग्य समन्वयकाची भूमिका पार पाडते.
३) आपले कुटुंब गुण्यागोविंदाने एकत्र रहावे.त्यांच्यात वाचा - मने कोणतीही कटुता निर्माण होणार नाही.म्हणून सदैव वादविवाद टाळते.
४) कुटुंब विभक्त होणे ही काळाची गरज आहेच! पण,विभक्त कुटुंबातील आपलेपणा भंग पावणार नाही याचीही काळजी घेते.
५) घर-कुटुंबाची धुरा सांभाळताना योग्य त्या आवश्यक गरजांचीच पूर्तता करुन अनावश्यक खर्च आवर्जून टाळते.
६) स्वयंपाक करतांना आवश्यक तो मिठ,मोहरी,तिखट,
मिरची,मसाला,तेल,इंधन वापरुन निगुतीने अन्नपूर्णेच्या स्वयंपाक बनविते.
७) कुटुंबात सर्वांना पुरेल,पण जास्तीचे काही पदार्थ उरणार नाही.याचा योग्य अंदाज राखून सकाळ सायंकाळच्या स्वयंपाक बनविते.
८) घरातील वडीलधारी मंडळींच्या मान राखून प्रसंगी त्यांच्याशी सल्लामसलत करते.घरी आलेल्या नातेवाईकांचा योग्य सन्मान करते.
९) शेजा-यांशी स्नेह,आपुलकी राखते.सुख-दुखात सहभागी होते,अडीअडचणीच्या प्रसंगी शक्य त्या मदतीला धावून जाते.
१०) घरात असो वा, शेजारणींच्या बाबतीत,किंवा नातेवाईक स्त्रियांच्या बाबतीत सदैव सलोखा राखून " चुगलखोरपणा " कटाक्षाने टाळते.
११) आपल्या पती व कुटुंबाशी एकनिष्ठ राहून क्रोध, संताप ,उर्मटपणा टाळते.
१२) मुला-मुलींवर,सुनेवर योग्य संस्कार उदा, वडिलधाऱ्या मंडळींचा मान राखणे, क्रोध न करणे,कुलदेवतेचे पूजन, कुलदेवतेचे वर्षाकाठी दर्शन करणे,कुलाचार पाळणे, रुढी,प्रथा ,परंपरा,सण उत्सव आनंदाने साजरे करणे, सर्वांशी आपुलकीने वागणे, इत्यादि संस्कार करते.
१३) सर्वात महत्वाचे मुला मुलींप्रती सदैव जागृत राहते, त्यांच्या आवडी-निवडी जोपासणे,हौस -मौज पुरविते,स्वतः व्यसनांपासून दूर राहून मुला-मुलींना शिक्षण व विज्ञानाचे महत्त्व पटवून देते, श्रद्धा जोपासावी,पण अंधश्रद्धा टाळते.
१४) आपल्या उत्पन्न मर्यादा समजून काटकसरीने आर्थिक व्यवहार करते.कर्ज न करणे.गरजेसाठी कर्ज घेतल्यास ते इमानदारीने व वेळेवर परतफेड करते.
१६) वस्तू,पदार्थ, रोख रक्कम इ.ची उसनवारी टाळते.
    मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, मला जन्माने मिळालेली माझी आई...तिच्या वागण्या-बोलण्यात मी हे गुण अनुभवले.व ते गुण मी माझ्या जगण्याचे ' मूलमंत्र ' बनविले.दुसरी गोष्ट मला लाभलेली माझी अर्धांगिनी सुद्धा वरील गुणांचा एक " आदर्श ठेवा " आहेच!
म्हणूनच… " मी एक भाग्यवान पुरुष आहे की, माझ्या जन्म एक आदर्श मातेच्या पोटी झाला. व माझा विवाह एका आदर्श पत्नीशी झाला असून ह्या दोन्ही महिला म्हणजे माझ्या जीवनरथाच्या मुख्य आस आहेत. आजच्या राष्ट्रीय गृहिणी दिनानिमित्त मी सदैव त्यांच्या ऋणातच राहणे पसंत करेन! "
कारण आईने आदर्श गृहिणी बनुन माझे आयुष्य फुलविले.आई आज माझ्यापासून कोटी योजन दूर निघून गेली असली तरी ती विचाराने सदैव जवळच आहे.तिला विनम्र अभिवादन!🌹🙏🙏🙏
     पत्नीने आदर्श गृहिणी बनुन माझा संसार फुलविला.
तिच्या सोबतीने संसारात मी पूर्ण समाधानी आहे तिलाही आजच्या दिवशी मनभावन हार्दिक शुभकामना! 🌹🙏🙏

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " 

संस्कार

संस्कार
          संस्कार. ... प्रत्येकाच्या जीवनवेलीवर उमलणारे अप्रतिम पुष्प ! पुष्प जसे सुगंधित वासाचे आणि बिनसुगंधित वासाचे असे दोन प्रकारचे असतात, तसे संस्काराचे देखील आपणास दोन प्रकार सांगता येतील.
 १) पवित्र-आदर्श संस्कार आणि 
 २) कुसंस्कार; हा विघाशक विघातक  संस्कार होय.
          अयोध्यापती श्रीरामचंद्रजी यांचावर जे संस्कार झाले ते पवित्र व आदर्श होत. विनम्रता, सहिष्णुता, प्रजाहितदक्षता,मातृ-पितृभाव,गुरूज्ञाचे पालन,
कुटुंबवत्सलता,परस्त्रीला माता मानणे,पित्रृज्ञेचे पालन, एकपत्नीभाव,सज्जनाचे रक्षण, दृष्टांचे निर्दालन, बंधूभाव त्याग व इतराप्रति समर्पण ,बाहूबलाचा समाज संघटनेसाठी उपयोग इ.संस्कार झाले.त्यातून त्यांची प्रतिमा व वर्तन समाजाला ललामभूत ठरली.हजारो वर्षे झाली आहेत तरी श्रीरामप्रभुजी आपणास वरील संस्कारामुळे आदर्श ठरतात.
हीच गोष्ट छत्रपती शिवाजी राजेबाबत म्हणता येईल.आजही ते अखील मानव विश्वाला आदर्श वाटतात.
     तर दुसरीकडे रावणासारख्या महापराक्रमी ,शिवभक्त, वेदांच्या सर्वश्रेष्ठ व्यासंगी, शुरविर असा त्याचा सप्तखंडात सर्वदूर लौकिक होता. पण.... रावणाकडे प्रचंड सामर्थ्य असूनही त्याला या सर्वाचा उपयोग स्वत:च्या विषयवासनेपलीकडे जाऊन करता आलेच नाही. कारण गम्य ते गेले तरी दुसरे गम्य ते प्राप्त करणे.हे रावणाचे ध्येय असे.हे संस्कार त्याचावर माता कैकसीच्या वाणी-वर्तनातून कोरले गेले होते. हे लक्षात घ्यावे लागेल. हीच गोष्ट मुघल सम्य्रा औरंगजेब याांच्याबाबत सांगता येईल. 
याउलट श्रीरामप्रभुंनी विषयापलीकडे जाऊन निर्णय घेतला. मग तो पितृआज्ञेतून मिळालेला चौदा वर्षांच्या वनवासही सहज स्विकारला.हा संस्कार मुलाचे पित्यावरील अलौकिक प्रेम सिध्द करतो.रावणाच्या आयुष्यात त्यांस असा आदेश झाला असता तर त्याने आदेश करणारा व हट्ट धरणा-या या दोहोंच्या जागीच तत्क्षणी शिरच्छेद केला असता. या सर्व गोष्टी संस्कारावरच ठरतात. यापैकी एक श्रीरामप्रभु हे
 " रघूकुल रीत सदा चली आयी
     प्राण जाय पर वचन ना जाई "
अशा संस्कारात वाढत होते. तर रावण हा
  " त्रिखंड मे मेरे जैसा बडा ना कोई " या संस्कारात वाढत राहीला.शेवटी या कुसंस्कारानी रावणाच्या   नाश ओढवला.
संपूर्ण कुटुंबासह लंकेचा विनाश ओढवला.
     
प्रा.पुरूषोत्तम पटेल, उपप्राचार्य,म्हसावद, भ्रमणध्वनी-9421530412

मंगळवार, नोव्हेंबर ०२, २०२१

धनत्रयोदशी

                ✍️ धनत्रयोदशी 🪔🙏

दिवाळी सण-उत्सवातील धनत्रयोदशी म्हणजे आश्विन पंधरवड्यातील तेरावा दिवस.आश्विन महिन्यातील दुस-या पंधरवड्यातील आश्विन ।। कृ।। त्रयोदशीचा हा मंगलमय दिवस.
" धनत्रयोदशी " या शब्दांत सहा अक्षरे आहेत.प्रत्येक अक्षर एक नैतिक मूल्य शिकवून जाते.या दिवसाचे शब्दमय पावन महत्व ✍️ 

✒️ - धर्माचरण ( धर्माने आचरण करणे )
✒️ - नम्राचरण ( विनम्रतेने वागणे )
✒️त्र - त्रपाचरण ( ऋग्वेद, यजुर्वेद,
             सामवेदानुसार आचरण करणे.)
✒️यो - योगाचरण ( आठ नियम व त्यातील
             " योग " नियमाचे पालन)
✒️  - दयाचरण. ( सर्वांभूती दयाभाव राखणे )
✒️शी - शीताचरण ( शांत राहणे व क्रोध न करणे.)

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

घडवू देश नवा

घडवू देश नवा *
स्वच्छतेची शपथ घेऊ या 
नवा भारत  देश घडवू या
चारही  बाजू  स्वच्छ  ठेऊ 
कचरा उचलून फेकू या || धृ. ||
        ओला कचरा सुका कचरा
        वेगवेगळा  टाकू  चला
        त्यावरती  संस्कार करुनि 
        उज्ज्वल भारत घडवू या ||१||
शौचास जाता बाहेर 
उघड्यावर बसणे टाळू या
शौचालय बांधून आपण
गाव हागणदारीमुक्त करु या || २||
        घर असू द्या भुवन
        गाव बनवू नंदनवन
        स्वच्छ ठेवा तन-मन आपुले 
        संकल्प आपण करुया ||३||

©प्रा. पुरुषोत्तम पटेल, उपमुख्याध्यापक 
कुबेर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज म्हसावद,
ता. शहादा, जि.नंदुरबार. 
mhasawad.blogspot.in

सोमवार, नोव्हेंबर ०१, २०२१

दिपावली

ही दिपावली आपणास सुखाची, समाधानाची,
समृद्धीची,आनंदाची, भरभराटीची,व समस्त
इच्छापूर्तीचा आनंद देणारी ठरो!ही शुभेच्छा!
🪔🪔🪔🪔🪔🎇🎆🪔🪔🪔🪔🪔

     दिपावली (कविता)

महालक्ष्मी देवी मी नमितो
आद्य वंदन चरणी तुजला 
लावितो दिपावली ज्योती
आई !आशिष दे तू मजला ।।१।।

पसरु   दे अखिल संसारी 
लखलख     चंदेरी आनंद
विश्वाचे   दुःख दूर कराया
मनी लागू दे छंद मजला ।।२।।
महालक्ष्मी देवी मी नमितो
...आई, आशिष दे मजला

दे   सद्बुद्धी   जळो  क्लेश
मनामनात  जुळू  दे नाते !
दुष्प्रवृत्ती, दृष्टभाव  हरोनी
नीति,सूमती किर्ती सकला।।३।।
महालक्ष्मी देवी मी नमितो
...आई, आशिष दे मजला

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...