Kaayguru.Marathi

वात्सल्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वात्सल्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जानेवारी २३, २०२२

आई

  आई

आई, माझ्या जन्मासाठी 
नऊ मास नऊ दिस तू
सोसल्या अनंत वेदना 
आई, तुझ्यामुळेच 
मी पाहतोय ही दुनिया ।।१।।

आई, जन्मापासून तूच
माझ्या आद्य वंद्य गुरु 
तुझ्याच संस्कार वाटेवर 
माझी वाटचाल सुरु.   ।।२।।

आई, तुझा एकेक शब्द 
मला गीता रामायण 
कृतघ्न अन् अधम ठरे 
तुझे होता विस्मरण    ।।३।।

◽प्रा.पुरूषोत्तम पटेल " पुष्प "
 म्हसावद

शुक्रवार, डिसेंबर १७, २०२१

आई

आई 
शब्दात  जिच्या सदैव माया 
आयुष्यभर झिजविते काया
उभी राहते उन्हा - पावसात
होते लेकराची छाया...आई !

उपवास नावे सोसते त्रास
बाळा भरवी मुखीचा घास
शब्दात तीच्या अमृत शिंपण
घरादाराच्या  श्वास ... आई !

नयनी लपवीते खारे पाणी
दुःख पिते देई जीवन संजीवनी
प्रसन्न वदने घरात दरवळे 
जिव्हाळ्याची जाई... आई  !

पहाटे उठते उशिरा निजते
मोल  ती  कसला  ना  घेते
लोभ ना तिजला मोठेपणाचा
जखमेवरची  फुंकर... आई !

राब राबते परी न विसरते
मन तिचे खोप्यातच रमते
नजर पिलावरी भिरभिरते
जणू ऊंच आकाशी घार...आई !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, डिसेंबर ०५, २०२१

आईचे प्रेम

आश्चर्य   झाले  त्या  दिवशीं
देवाला  ही  नसावे   ठाऊक
तिरडीतून   आला   आवाज
ऐकताच  मी  झालो  भावूक

तिरडीवरील  आई  म्हणाली
काय रे बाळा..!थकलाय ना
थांब   जरासा   थोडा    वेळ
माझे  ओझे   वाटून  दे  ना !

का रे बाळा दुखत असेल ना
माझ्या ओझ्याने तुझा खांदा
त्रास  होतोय  न्   तुला...मग
कशाला करतोय तू हा वांधा?

लाडक्या,वेडा की खूळा रे तू
बाळा ! तुला कळत नाही का
अनवाणी चालतांना पायाला
उन्हाचा लागेल ना रे चटका !

बाळा !स्वतःची घे तू काळजी
मी  चालले  की  दुजा  जगात
तू  सुखी  आणि  आनंदी रहा
समृद्ध हो की तुझ्या जीवनात !


पुत्रासाठी जगणे आणि मरणातही पुत्राच्याच सुखाच्या विचार करणारी "आई "
🙏🙏🙏
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
म्हसावद

बुधवार, नोव्हेंबर २४, २०२१

सासुरवाशीण लेकीचं बाबांना पत्र...

सासुरवाशीण लेकीचं बाबांना पत्र…

प्रिय बाबा...!
   बाबा, मी सासरी आल्यापासून ते आजपर्यंत एकही क्षण तुमच्या आठवणीवाचून गेला नाही...
रोज पहाटे लवकर उठतांना तुम्ही मला आठवता….
  तुम्ही आईला नेहमी म्हणायचे, अग.. झोपू दे! हे काय सासर आहे का लवकर उठाया? 

रोज पहाटेपासून उठल्यावर घरातील सगळ्याचं हवं नको ते करतांना दमछाक होताच बाबा तुम्ही आठवता…
माझ्याकडे कामाचा तगादा लावणा-या आईला तुम्ही म्हणत, अग, किती काम करुन घेशील तिच्याकडून..?
ती काय यंत्र आहे का एकसारखं काम करायला? बस्स. पुरे आता! 

स्वयंपाकघरात गेल्यावर बाबा तुम्ही आईशी केलेला संवाद आठवू लागतो…
अग, तूच कर ना आज स्वयंपाक. सासरी गेली का आपली ताऊ करणारच आहे सासरच्यांसाठी सुगरणीचा स्वयंपाक..! 

दिवसभराच्या रांधा वाढा उष्टी काढा करुन उशिरा झोपतांना तुम्ही डोळ्यासमोर उभे राहता...
अरे, बेटा! झोपली नाही अजून. बरीच रात्र झाली; झोप आता. उशिरा झोपणे प्रकृतीसाठी योग्य नाही बरे! 

रात्री झोपतांना अंगावर पांघरुन घ्यायलाही त्राण नसतांना बाबा तुम्ही आठवता...
काळजीने मी झोपले की नाही हे पाहण्यासाठी आले असता... किती वेडी पोर ही.. एवढ्या थंडीतही पांघरुन न घेताच झोपली.. अन् स्वतःचे पांघरुन माझ्या अंगावर घालणारे तुम्ही ..! 

बाबा, अंगात तापाची कणकण येताच तुमच्या मायेची ऊब आठवते...
अरे, आज आमचं वेडं फूल कसं हिरमुसले? अरेरे.. ताऊला तर ताप चढलाय. चला, चला..! उशिर नको. डॉक्टरांकडे लवकर जाऊ या. अंगावर ताप मिरवणे आरोग्यासाठी चांगले नाही बेटी ! 

बाबा, सासरी आल्यापासून हे सारं काही आठवतं हो.. पण त्या आठवण्याला सुगंध असतो तुमच्या मायेचा अन् आंतरिक जिव्हाळ्याचा..!
तुम्हाला माझी असणारी काळजी मला  जगण्यासाठीचे  हे बळ... म्हणजे अमृतसंजीवनी हो बाबा!

लेक… बापासाठी वडाचा पार !
लेक… बापाच्या सुखाचं सार !
लेकीवर जीवापाड प्रेम करणा-या सर्व बाबांना समर्पित...!

©प्रा.पुरूषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, ऑक्टोबर २२, २०२१

अंगाई गीत

अंगाई ✍️
हातांचा करुनी पाळणा
ओढिते ममतेची दोरी
निज निज माझ्या बाळा
गाते तुला मी अंगाई ।।धृ।।

परतुनी आल्या गोठ्यात गाऊ
खोप्यात निजले चिऊ अन् काऊ
सवे खेळाया नाही कोणी
निज निज माझ्या बाळा 
गाते तुला मी अंगाई ।।१।।

नारायण गेला नारायणी
झाले शुभं करोती म्हणोनी
अंगणी झगमगे काजव्यांचा वाती 
निज निज माझ्या बाळा
गाते तुला मी अंगाई ।।२।।

गगनी चांदोबा उगवला 
चांदणं रांगोळी स्वागताला
निद्राराणी आली स्वये तुला जोजवाया
निज निज माझ्या बाळा
गाते मी तुला अंगाई ।।३।।

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, सप्टेंबर २२, २०२१

प्रेमस्वरूप आई!

प्रिय....
समस्ततिर्थदर्शिनी, प्रात:पूजनीय,आई...
तुला अनंत दंडवत प्रणाम !🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पत्र लिहिण्यास कारण की,
आज तुझा वाढदिवस ! 🎂
प्रथम तुला वाढदिवसाला माझ्याकडून आशुतोष भगवान शिवाला प्रार्थना ...!" माझ्या  आईच्या समस्त इच्छा पुर्ण झाल्याचे समाधान तिला लाभावे. इच्छापूर्तीच्या आनंद अनुभवण्यासाठी तिचे शरीर निरोगी ठेव!ही विनम्र प्रार्थना! "  
आई...केवळ दोनच अक्षरे ! पण त्या दोन अक्षरांचे सामर्थ्य कितीतरी मोठ्ठे आहे.त्या अक्षरात  त्रिखंडाचे साम्राज्य पुर्णतः सामावले आहे.मी एका प्रवचनात संतांनी सांगितलेला महिमा ऐकल्याचे आठवते.ते म्हटले होते, " आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर.ईश्वरच आत्मा होऊन जिथे स्थिरावतो.ती आई ! " सर्व तिर्थात पवित्र आणि महान असं तिर्थ तुझ्या चरणसेवेत आहे.म्हणून तर आई-बाबांची चरणसेवा करणा-या पुंडलिकाच्या भेटीसाठी वैंकुठनाथ पृथ्वीतलावर आला.आणि इथंच २८ युगे उभे स्थिरावला. आई,तुझ्याच ठायी मला अखिल त्रिखडांची दैवते दिसतात. म्हणून तू माझी तिर्थरुप आई...तुला माझा त्रिवार प्रणाम !🙏🙏🙏
आई,मला खूप दिवसांपासून इच्छा होती, तुझ्याबद्दल काहीतरी बोलावं ! लिहावं ! पण...तुझ्यावर लिहिता-लिहिता कित्येक ओळी,कित्येक पानं, कित्येक रात्री संपल्या ग् ऽऽ पण,तुझ्यावर लिहण्यासाठी शब्द अपुरे पडू लागलेत !
आई तुझ्याबद्दलच्या भावनांना योग्य असे स्थान देऊ शकतील असे शब्दच मला अजूनतरी मिळालेच नाही ग् !
माधव ज्युलियन यांनी लिहलंय तेच खरंय , पटलंय मला !
" प्रेमस्वरुप आई, वात्सल्यसिंधू आई,"
माझी आई ...अगदी तशीच आहे तू ! समुद्र जसा कधीच आटत नाही.त्यांचे पाणी कमी झाले असे दिसत नाही.
समुद्राला तरी भरती येते,ओहोटी ही येते.तुझ्या प्रेमाला
ओहोटी ठाऊकच नाही तर ठाऊक आहे फक्त प्रेम, जिव्हाळा , माया-ममत्वाची भरती! तुझेही प्रेम कधीच कमी होत नाही. उत्तरोत्तर ते वाढतच जाते.🙏
आई, मग तूच सांग...तुला,तुझ्या कर्तृत्वाला,तुझ्या त्यागाला,
तुझ्या प्रेमाला मांडू तरी मी कुठल्या शब्दात ? हे शब्दात मांडणं म्हणजेच अशक्य !
आई,मला आठवतंय , मी एकदा आजारी पडले.तू माझ्या उशाशी रात्र रात्र जागत बसली होती म्हणे ! मला शांत झोप लागावी म्हणून आपल्या मांडीची झोळी करुन मला हळूवार
थोपटत,सलग तीन रात्रीचे दिवस करुन बसून राहिली होतीस ना तू ? तुझ्या ह्या वागण्याला मला " त्याग " म्हणता येईल का ग्ं आई ?
शाळेत दररोज मी जाते...पण वेळेची शिस्त तू पाळते...अगदी घड्याळाचे काटे होऊन राहतेस तू ! पहाटे दोन तास माझ्या आधी  तू उठते.माझी सगळी तयारी तू करुन ठेवतेस.माझे दप्तर,माझा युनिफॉर्म,माझा खाऊचा डब्बा,सगळं काही काढून तय्यार ठेवतेस तू .
हे माझं काम, तू निरपेक्षपणे करते.तुझे हे वागणे " जिव्हाळा " ह्या भावनेत बांधता येईल का ग्ं आई ?
तूझी मला कळलेली अनेक रुपे...
तू माहेरची लेक, मामा-मावशीची ताई , सासरची सून , वहिणी , बाबाची बायको- अर्धांगिनी,आम्हा बहिणींची 
" आई " आणि आजी-आजोबांची सुनबाई तूच आहेस...ही नाती निभवताना तू स्वतःचे अस्तित्वच विसरुन गेलीय.
अस्तित्व विसरण्याची तुझ्या ह्या वृत्तीला " कर्तव्य " म्हणता येईल का ग्ं ?
मी म्हणेन की,आई,राखतो तो राक्षस ! देतो तो देव !
तू तर काहीही न मागता तुझ्या इच्छा,मौजमजा,नटण-
सजणं,सगळं काही माझ्यासाठी सोडून दिलंय ! म्हणून भक्तांसाठी देव जसा हातातील काम व मुखातला घास सोडून धावत येतो.तशी तू वागते !
म्हणून मी तुला " ईश्वरी " असंच म्हणेन . कारण फ.मुं.नी म्हटल्याप्रमाणे -


आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही उरतही नाही!


कवी प्रा.पुरुषोत्तम पटेल आईपणाची थोरवी सुंदर शब्दांत वर्णन करतात,


" आईपणाची देवालाही वाटे नवलाई ।
वैंकुठींचा राणा पंढरीत झाला विठाई । "


तुझी माझ्याबाबत असलेली प्रिती,लळा,जिव्हाळा,ह्यात वापरलेले रसायन बाजारात मिळणे अशक्यच ! कुठून झिरपते ग् आई हे रसायन ? आई,त्याची धनी फक्त आणि फक्त तूच !
आई...पुन्हा एकदा तुला माझे त्रिवार वंदन !
आणि वाढदिवसाचे अभिष्टचिंतन!!!🎂💐🙏
@ तुझीच प्रिय ,
        स्विट

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...