Kaayguru.Marathi

माहिती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माहिती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, जानेवारी ३१, २०२२

द्रोण काव्य लेखन नियम

द्रोण काव्य कसे लिहावे ? 
द्रोण काव्यरचना करतांना कोणते नियम लक्षात घ्यावे.याचे हे सुंदर नियम आज आपण समजून घेणार आहोत.
चला तर...नियम समजून घेऊन द्रोण काव्य लिहू या !
१) यमक गरजेचे नसते.
२) पहिल्या ओळीत जेवढी अक्षरे असतील, त्यापेक्षा दुसऱ्या ओळीत एक अक्षर घटलेले हवे. दुसऱ्या ओळीत जेवढी अक्षरे असतील त्यापेक्षा तिसऱ्या ओळीत एक अक्षर घटलेले हवे. असेच एकेक अक्षर घटवीत पुढे लिहीत जावे.
३) शेवटच्या ओळीत केवळ एक अक्षर असलेला शब्द हवा! 
४) खालील उदाहरण पहा म्हणजे नियम समजतील:
द्रोण काव्य : शिर्षक - का ?
पाणी काहीच का दाटत नाही -------------११
आता आधीसारखे डोळ्यात--------------१०
का कोण जाणे अलीकडे ----------------- ९
काही वाटतंच नाही -----------------------८
कोणाविषयी मला ------------------------७
का बरे रडावे ---------------------------- ६
नाहकच मी ------------------------------५
कुणासाठी--------------------------------४
कशाला----------------------------------३
नाही ----------------------------------- २
का ---------------------------------- ---१
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
म्हसावद.  

रविवार, जानेवारी ३०, २०२२

षढाक्षरी काव्यलेखन

षढाक्षरी काव्यलेखन 
------------------------------------------------------
षढाक्षरी काव्यलेखन हा कविता लेखनातील एक सहज सुलभ काव्यनिर्मितीचा प्रकार होय.
षढाक्षर शब्दांची फोड अशी करता येईल.
षढ् म्हणजे सहा .याचाच अर्थ सहा अक्षरात लिहायचे ते षढाक्षरी काव्य.
काव्य लेखन नियम :-
१) हे काव्य लिहितांना सामान्यतः चार ओळींचे एक कडवे असे लिहावे.
२) चार ओळींची कडवी किती असावी ? याला बंधन नाही.
३) पण...शक्यतो षढाक्षरी काव्यलेखन करतांना चार चार ओळींचे सहा कडवे रचिले तर ते अधिक सुंदर वाटावे.
[ माझे मत.]
४) हे काव्य लिहितांना काव्यातील प्रत्येक ओळीत मोजून सहाच अक्षरे असावीत.
५) ओळीच्या प्रारंभीच्या शब्द एक दोन तीन चार अक्षरी असला तरी चालतो.
६) अष्टाक्षरी काव्यलेखनाप्रमाणे शब्दलेखनाचे बंधन नाही.
७) कडव्यातील प्रत्येक ओळ ही सहा-सहा अक्षरांचीच असावी.
८) चार ओळीपैंकी दुस-या आणि चौथ्या ओळीत " यमक " साधला जावा.हे लक्षात घ्यावे.
९) कडव्यातील प्रत्येक ओळ ही सहा-सहा अक्षरांचीच असावी. 
उदा. १).                       २) 
काय मागू देवा.        * सखे तुझे रुप
तुजपाशी मी रे.        * वेड लावी मला
न मागता दिले          * काढू कसा ग मी
तू सर्वकाही रे.          * जीव हा गुंतला
चला तर मग...लिहू आपण षढाक्षरी काव्य !👍
          🙏🌹शुभस्य शिघ्रम !🌹🙏
         ©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, जानेवारी १७, २०२२

कविता लेखन करतांना...

कविता म्हणजे काय ?
असे म्हणतात की, " गोष्टीला द्रवरूप होऊन भिडण्याची क्षमता म्हणजे कविता होय. " 
म्हणून म. सु. पाटील म्हणतात, 
‘ तिचा वेध घेण्यासाठी कवी स्वत:मध्ये जितका खोलवर बुडी घेतो, तितका तो कमी वैयक्तिक बनत जातो. तो मानवाच्या मूलभूत स्वभावापर्यंत पोचतो. अशा वेळी सर्वांना समान अशा मानवभावांची नाना रूपे आकलण्यात व ती अभिव्यक्त करण्यात तो गढून गेलेला असतो. तेथे कवीचे भाव वैयक्तिक राहत नाहीत. आविष्कार प्रक्रियेतच ते स्व-पर-तटस्थ
संबंधांच्या पलीकडे जातात.म्हणून ते कोणाचेही होतात. त्यांना विश्वात्मता प्राप्त होते. ’ त्यामुळे जगण्याच्या सर्वसामान्य तऱ्हांपेक्षा ती जाणिवेला अधिक तीव्र भासते. या तीव्रतेमागे चिरंतन आणि सार्वत्रिक होण्याची इच्छा प्रबळपणे कार्यरत असते. सर्वसामान्य चेहऱ्यांमधीलच एक स्वतंत्र आवाज म्हणजे " कविता " होय
२) रचना आणि धारणा यांमधील सगळ्यात कमी अंतर म्हणजे कविता होय. त्यामुळे ‘स्व’ला पुन:पुन्हा मोडण्यातून आणि रचण्यातून ती उत्पन्न पावते.
' स्वप्न रचणे ’ हा कवितेचा स्थायी भाव असतो. त्यामुळे ‘ कविता ’ ही रचना तीनही काळांच्या पार्श्वभूमीवर खरचटून उभी राहणारी रचना ठरते. ती विसंगतीने व्याकूळ होऊन घडणारी रचना आहे. त्यामुळे कवितेतील कुठलेही विधान जितके अधिक स्वप्नपूर्ण, तितके तीनही काळांच्या पार्श्वभूमीवर ते अधिकाधिक प्रभावी ठरते. कारण हे स्वप्नपूर्ण विधान काळाशी, वास्तवाशी फटकून उभे राहत नाही, तर काळाला सामावून त्याच्या पुनर्रचनेतून हे विधान उभे राहते.

@ प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, डिसेंबर २२, २०२१

अंक संकेत - ३ ची महानता.

             🙏 ॐ नमो गणपतये। 🙏
अंक संकेत  - ३
तीन अकारण वैरी - 
) हरिण- पारधी (२) मासा - कोळी (३) साधु - खलपुरुष
तीन अग्नी - (अ) ज्ञानाग्नि  ( शुभ-अशुभ सांगतो तो. )
दर्शनाग्नि (रुपाचे दर्शन घडवितो.)
कोष्ठाग्नि (खाल्ले-प्याले पुरवितो तो.)
(ब) दावाग्नि ,वडवाग्नि,जठराग्नि
(क) पिता- गार्हपत्य अग्नि, माता- दक्षिणाग्नि, गुरु - आहवनीय अग्नि.हे तिघेही श्रेष्ठ होत.
"पिता वै गार्हपत्योऽग्निर्माताग्निर्दक्षिण: स्मृती: ।
गुरुरावहनीयस्तु साग्नित्रेता गरीयसी ।।"

तीन अंगे (धर्माची)-
आचार, व्यवहार व प्रायश्चित
तीन अतिदाने -
गौदान,भूदान आणि विद्यादान
तीन अयोनीसंभव स्त्रिया -
वेदवती जानकी,द्रौपदी या तिघी अयोनिसंभव आहेत.
वेदवती -   कुशध्वजाच्या तपस्याफलातून जन्म.
जानकी -  भूमीकन्या.
द्रौपदी   -  यज्ञातून जन्म
" संभूता वाड्:मयीकन्या नाम्ना वेदवती स्मृता । "
[संदर्भ- वाल्मीकि रामायण,उत्तरसर्ग १७-९]

तीन अवस्था -
आत्म्याच्या  : बहिरात्मा, अंतरात्मा,परमात्मा
देहाच्या.      : बाल्य,तारुण्य, वार्धक्य
नृत्यकलेच्या : लयतालमुलक,भावमुलक,रसमुलक
जीवनाच्या   : पुत्र,पती,पिता.
स्रीजीवनाच्या: कन्या,कांता ,माता
प्रेमाच्या       : पूर्वराग,मीलन,वियोग .
बाल्यदशेच्या : 
कौमार (एक ते पाच वर्ष )
पौगंड (सहा ते दहा वर्षे )
किशोर ( दहा ते पंधरा वर्षं )
" कौमारं पंचमाब्दान्तं पौगण्डं दशमावधी ।
कैशोरमांपंचदशाद्यौवनं तु तत: परम् ।। "
[संदर्भ - भागवद.स्कंध १० अध्याय.१२ तळटीप]
सृष्टीतील पदार्थांच्या: घनरुप,द्रवरुप,वायुरुप.
तीन अर्थ -
वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, व्यंगावर.
हे तीन अर्थ अलंकार शास्त्रात मानले आहे.
तीन अमावस्या :
दिपअमावस्या       (आषाढ वद्य अमावस्या)
पिठोरी अमावस्या  (श्रावण वद्य )
सर्वपित्री अमावस्या ( भाद्रपद वद्य )

तीन अश्रू : आनंदाश्रू, दु:खाश्रू ,नक्राश्रू

तीन अक्षरात तीन गोष्टींचे प्रतिनिधित्व:
भ-र-त से तीन अक्षरे होत.
भ - भाव (भावाविष्कार )
र  - राग  (रागाविष्कार )
त - ताल (प्रमाणबध्दता )

तीन आदर्श पतीव्रता : अनसूया, द्रौपदी, दमयंती.
तीन आद्य महाकवी - ब्रम्हा, वाल्मिकी,व्यास.
तीन आधारस्तंभ शरिराचे - आहार,निद्रा, ब्रम्हचर्य
तीन उपमाता -
दाई, माता नसतांनाही पालन करणारी दुसरी बाई,आणि सावत्र आई.
तीन ऋणे - देवऋण, गुरुऋण,मातृपितृऋण.
तीन ललितकला - नर्तन,गायन, वादन
" नृत्यं गीतंच् वाद्यंच् त्रयं ललितमुच्यते । "
तीन कर्मांनी पुत्रधर्माची सार्थकता -
१) असेतो पर्यंत माता-पिता यांची आज्ञा पालन.
२) कालतिथीस त्यांचे स्मृतीप्रित्यर्थ अन्नदान.
३) गयेस पिंडदान.
" जीवतो वाक्यकरणात क्षयाहे भूरिभोजनात ।
गयायां प ण्डदानाच्च त्रिभि: पुत्रस्य पुत्रता ।। "
[संदर्भ - देवी भागवत ६-४-१५]
तीन कायिक पापे -
१) दिल्याविना एखादी वस्तू घेणे.
२) निषिद्ध हिंसा 
३) परस्रीसंग. ही तीन शारीरिक पापे होत.
" अदत्तानामुपादानं हिंसा चैवाविधानत: ।
परदारोपसेवा च् कायिकं त्रिविधं स्मृतम ।। "
[संदर्भ - मनुस्मृती १२-७ ]
तीन गण - देवगण,मनुष्यगण,राक्षसगण.
तीन गया - 
मातृगया : सिद्धपूर - गुजराथ
पितृगया : गया - बिहार
शिवगया : काशी. - उत्तरप्रदेश
तीन गुण वाड्:मयाचे - माधुर्य, ओज, प्रसाद
तीन गुण काव्याचे - उपमा,अर्थगौरव,पदलालित्य.
" उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवम् ।
दण्डिन: पदलालित्यं माघे सन्ति त्रयो गुणा: "।।
तीन गुण स्रीचे महत्व वाढवितात.
रुप, शील,आणि स्वभाव (योगीश्वर याज्ञवल्क्य)
तीन गुण शास्त्रास आवश्यक -
ग्रंथाचे संपुर्ण ज्ञान, तात्पर्याचे निरुपण करता येणे ,ग्रंथाच्या भागासंबंधी विवेचन करता येणे.
तीन नयन : शंकराचे -
अ) कृशानु (अग्नि ),भानु (सूर्य ), हितकर (चंद्र )
म्हणून शंकराला ' त्रिनेत्र ' म्हणतात.
ब) श्वेतभानु -सोम, बृद्धभानु- अग्नि,भानु-सूर्य
हे महादेवाचे तीन नेत्र होत[स्तुतीकुसुमांजलि]
तीन धूर्तलक्षणे -
मुख-कमलाप्रमाणे, वाणी-चंदनाप्रमाणे शीतल, आणि पोटात राग .
" मुखं पद्मदलाकारं वाणी चंदनशीतला।
हृदयं क्रोधसंयुक्तं त्रिविधं धूर्तलक्षणम् ।।"
तीन दानाचे नाशहेतू -
दिल्य नंतर वाईट वाटणे, अपात्री दान देणं,आणि देतांना जर श्रद्धा नसेल.
" यद्दत्वा तप्यते पश्चादपात्रेभ्यस्तथा च् यत ।
अश्रद्धया च् यद्दानं दाननाशास्रयस्त्वमी ।। "
तीन नीतिशास्त्र प्रवर्तक -
शुक्र, विदूर आणि चाणक्य से तीन आद्य नीतिशास्त्र प्रवर्तक होत.
तीन पीठे - व्यासपीठ,पूजापीठ, आणि दिपपीठ.
तीन पुरुष जगात दुर्लभ -
जननिंदेला पात्र न झालेला श्रीमान.
स्वतःची प्रौढी न सांगणारा शूर आणि
सर्वत्र समदृष्टी असणारा राजा .
" श्रीमानजननिद्यश्च शूरश्चाप्यविकत्थन: ।
समदृष्टि: प्रभूश्चैव दुर्लभा: पुरुषास्रय: ।। "
[संदर्भ - योग.वा.१-१३-११]
तीन पुराणकालीन महाक्रोधी-
दुर्वास,जमदग्नि, आणि विश्वामित्र.हे तिघेही महाक्रोधी म्हणून परिचित.
तीन पुराणकालीन महालोभी -
कंस,जरासंध, दुर्योधन [महाभारत उपसंहार]
तीन पुराणकालीन मामा -
कंसमामा, जांगीळमामा (भिमपुत्र घटोत्कचाचा कारभारी ) आणि शकुनिमामा.
हे तीन कपटनीतिनिपूण मामा होत.
तीन प्रकारच्या ओढी-
१) विषयासक्त माणसाची विषयासंबंधीची
२) मातेची मुलासंबंधी असलेली.
३) सतीची पतीविषयी असलेली.
या तीन प्रकारच्या ओढीची शक्ती एकत्रित झाल्यास भगवंताचे दर्शन घडते.
तीन प्रकार सूर्यकिरणांचे-
ताप देणारे, प्रकाश देणारे, आरोग्य देणारे.
" किरणास्रिविधा: सूर्ये तापाऽरोग्यप्रकाशदा:।
हरन्ति स्वप्रभावेण दैंन्यं तापंच् पातकम् ।। "
तीन प्रकार दानाचे -
अभयदान,उपकारदान, द्रव्यदान.
तीन दूत -
१) स्वतंत्रपणे कार्य साधणारा.
२) सांगितले तेवढेच करणारा.
३) नुसता निरोप पोहोचविणारा.
तीन दोष भोजनात टाळावे-
१) जातिदोष (पदार्थांचा स्वाभाविक दर्प वगैरे.)
२) आश्रयदोष (पदार्थ शुद्ध हवा तरी अपवित्र स्थानी ठेवल्यामुळे. )
३) निमित्तदोष ( कुत्र्याच्या स्पर्शामुळे अशुद्ध)
तीन प्रकारचे नास्तिक -
क्रिया दृष्ट (कर्म न करणारे )
मनोदृष्ट (मनानेच बिघडलेले )
वाग्दुष्ट (वाणीने दोष देणारे )
तीन गोष्टी शहाणपण प्राप्तीचे -
१) शास्त्राचा अभ्यास केल्याने.
२) संप्रदायात वापरल्याने.
३) निरीक्षणातून.
तीन प्रकार सद्गुरूला शरण जाण्याचे-
प्रणिपात, प्रश्न, आणि सेवा.
तीन प्रकार स्वयंवराचे -
इच्छास्वयंवर, पण लावून स्वयंवर ,पराक्रम करुन.
तीन प्रकार स्वरांचे -
१) तारस्वर - वरचा षड्ज् = निषाद
२) मंद्रस्वर - मधला षड्ज् = मध्यम 
३) घोरस्वर- खालचा षड्ज् = खर्ज
तीन प्राचीन संस्कृत व्याकरणकार-
१) पाणिनी - सूत्रकार
२) कात्यायन- वार्तिककार 
३) पतंजली - भाष्यकार.
तीन प्राचीन भारतीय जोतिर्विद-
आर्यभट्ट, वराहमिहीर, भास्कराचार्य.
तीन महान आनंद -
१) स्वतःचा विवाह (२) सत्पुत्रलाभ (३) पुत्राला पुत्रप्राप्ती होणे.
 तीन मूर्ख - 
१) विरक्त पण लोभी (२) योगी पण इंद्रियांच्या ३)व्युत्पन्न पण क्रोधी 
तीन युगातील तीन दाते -
सत्ययुग. - बलिराजा
त्रेतायुग - श्रीरामचंद्र
द्वापारयुग - कर्ण 
तीन वस्तू परस्वाधीन करु नये.
ग्रंथ , स्री, पैसा
तीन विद्याप्राप्तीची साधने -
गुरुसेवा,विपूल धन, विद्या देऊन विद्या ग्रहण करणे.
तीन विद्येचे शत्रू -
गुरुसेवेचा अभाव, घाई, आत्मश्लाघा
" अशुश्रुषा त्वरा श्लाघा विद्याताई: शत्रुवत्त्रय:।।"
[संदर्भ- महाभारत,उद्योगपर्व ४०-४]
 तीन विश्रांतीस्थळे सांसारिकाची-
पुत्र, पत्नी, सज्जनसमागम्
तीन वेळा प्रभुचे विश्वरुपदर्शन-
१) धृतराष्ट्राच्या राजसभेत शिष्टाईस गेल्या वेळी.
२) अर्जुनास गीतोपदेश करतांना
३) युधिष्ठिराला राज्याभिषेक झाल्यानंतर द्वारकेला परत जात असतांनाच,उत्तंक नावाच्या तपोवन ऋषीस त्याचे विनंतीवरुन श्रीकृष्णाने विश्वरुपदर्शन दिले.
तीन वैभव लक्षणे -
१) दुस-याच्या गोष्टीत ढवळाढवळ न करणे.
२) आपल्या कामामध्ये मग्न असणे.
३) मिळालेल्या संपत्तीचे रक्षण करणे.
तीन गोष्टींनी प्रतिष्ठा वाढते-
संपत्ती, सत्ता, सन्मान
तीन संग्रहणीय वस्तू -
ग्रंथ , स्नेही, औषधी.यांचा संग्रह करावा.
तिघांचा नाश अटळ -
अज्ञ- ज्ञान नसणारा,
अश्रद्ध - स्वतःला ज्ञान नसून ज्ञानी पुरुषाच्या वचनावर विश्वास न ठेवणारा. आणि विश्वासघातकी.
तिघेजण स्वर्गप्राप्तीस जातात.
अन्नदान करणारा.
पाणपोई घालणारा, रोगी बरा करणारा.
या तिघांना उत्तम गती प्राप्त होते.
तिघेही सुखी असावेत-
अन्नदाता,भोजन करणारा,स्वयंपाक करणारा.
त्रिपथगा-
स्वर्ग, मृत्यू , आणि पाताळ या तिन्ही लोकांत वाहणारी (भागीरथी नदी)
त्रिदोष - वात,पित्त, कफ
त्रिभूवन- स्वर्ग,मृत्यू, पाताळ
त्रिशूल- कटिशूल(कामेच्छा) , पोटशूळ,
मस्तकशूल
त्रिस्थळी यात्रा - काशी,प्रयाग,गया.
[ पुढील भागात पाहू अंक संकेत ३।। ची माहिती]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


गुरुवार, नोव्हेंबर २५, २०२१

शेल चारोळी लेखन नियम

शेल चारोळी/काव्य रचना 
एका ओळीत मुळाक्षरांची [ अक्षरसंख्या] संख्या जी आहे तीच इतर ओळींमधे असायला हवी. .
✒️ लेखन नियम :-
अ ) लेखन चार ओळीतच असावे.ही शेल चारोळी म्हटली जाते.
ब ) चार-चार ओळींचे दोन,तीन,गट केल्यास ते शेलकाव्य म्हटले जाते.
१ ) ओळीत अक्षरसंख्या किती असावी.याला बंधन नाही.पण...मला वाटते दहा सोळा-सतरा अक्षरे योग्य ठरतात.
२ ) पहिल्या ओळीत आलेली अक्षरसंख्या ही उर्वरित तीनही ओळीत सारखीच असावी.म्हणजेच चारही ओळीत समान अक्षरसंख्या यावी.
३ ) शब्दसंख्येचे बंधन नाही.पण एक ते चार ओळीत अक्षरसंख्या समसमान असावी. 
४ ) पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द हा दुसऱ्या ओळीची सुरूवात असावा .
५) दुस-या ओळीच्या शेवटच्या शब्दाने तिसऱ्या ओळींची सुरुवात नसावी.
६ ) तिसरी ओळ स्वतंत्र सुरुवात असावी. 
७ ) तिसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दानेच चौथ्या ओळीची सुरुवात करावी.
८) यमक हे दुसऱ्या ओळीच्या शेवटी व चौथ्या ओळीच्या शेवटी जुळविला असावा.
९ ) चारही ओळी ह्या परस्परांना अर्थदृष्ट्या पुरक असाव्यात.
उदा. शेल चारोळी 

✒️ आपण दोघे 

सखी,ती वेळ पुन्हा परत यावी   [अक्षरे - १२]
यावी घेऊन पुन्हा त्या आठवणी [अक्षरे - १२]
आठवणींच्या झोक्यावर असावे [अक्षरे - १२]
असावे आपण दोघे नको भीती  [अक्षरे - १२]


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

उदा. शेलकाव्य
नात्याची विण
उसवू नको ग तू नात्याची विण   [अक्षरे - १२ ]
विण पुन्हा तशी जुळणार नाही   [अक्षरे - १२ ]
तू उगाच नको वाढवूस वाद.      [अक्षरे - १२ ]
वाद हा विनाशाचे कारण होई.   [अक्षरे - १२ ]

नाते मिळत नाही कुठे बाजारी    [अक्षरे - १२ ]
बाजारी नात्याला नसतेच नाव    [अक्षरे - १२ ]
विण असू द्यावी फिट्ट आणि घट्ट [अक्षरे - १२ ]
घट्ट विणीत नक्की गावतो गाव   [अक्षरे - १२ ]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "



रविवार, ऑक्टोबर ३१, २०२१

त्रिवेणी लेखन प्रकार : नियम

काव्यलेखन प्रकार : त्रिवेणी 
नियम:-
१) त्रिवेणी ही रचना लिहायला अगदी साधीसुधी अशीच! त्रिवेणी म्हणजे तीन.तीन ओळीत लिहावयाची ही रचना,म्हणून हि " त्रिवेणी रचना " म्हणून ओळखली जाते.
२) त्रिवेणी ही रचना करतांना प्रत्येक ओळीत अक्षरांचे बंधन नाही.मात्र पहिल्या ओळीत जितकी शब्दसंख्या असेल तितकीच शब्दसंख्या तिस-या ओळीतही असावी.म्हणजेच पहिल्या आणि तिस-या ओळीत शब्दसंख्या सारखीच असावी.
३) पहिल्या दोन ओळीत एक विचार मांडलेला दिसतो.तर,तिसरी ओळ कधी पहिल्या दोन ओळींच्या अर्थामध्ये भर घालते.तर कधी ही तिसरी ओळ वेगळाच अर्थ- किंवा दृष्टिकोन देऊन जाते.
४) दुसरी ओळ लयबद्ध आणि अर्थपूर्ण होईल.इतकेच शब्द असावेत.म्हणजेच,या ओळीत पहिल्या आणि तिस-या ओळीत असतात इतके शब्द असणे बंधनकारक नाही.
५) पहिल्या आणि दुसऱ्या ओळीत शेवटच्या शब्दांत " यमक " साधला जावा.ह्यामुळे त्रिवेणी वाचतांना लयबद्धता येऊन नादमयता येते.

चला तर...✒️ लिहू या त्रिवेणी काव्य !

माझी प्रिया [ त्रिवेणी ]

तूच माझा श्वास तुझ्याविना गोड लागेना घास = 
[७ शब्द संख्या]
तुझ्याविना क्षणाक्षणाला होतात भास! 
प्रिये आयुष्यभर तुला सुखी पाहीन देवाला विनवतो ! = [७ शब्द संख्या.]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, ऑक्टोबर १२, २०२१

नवरात्रोत्सव : देवी स्वरुप :कात्यायनी

🌹 शारदीय नवरात्र: सहावी माळ : 🌹
💎 देवी स्वरुप : कात्यायनी 💎
    
    ऋषी कात्यायण यांनी देवीला आपल्या तपोबलाने प्रार्थना केली की, " हे देवी ! तू माझ्या कन्येच्या रुपात माझ्या घरी जन्म घे! " देवीने ऋषी कात्यायन यांच्या इच्छेनुसार कन्या रुपात जन्म घेतला.
 सर्वप्रथम कात्यायन ऋषींनी देवीची पुजा केल्याने तिचे नाव
 " कात्यायनी " असे झाले.देवी भागवत, मार्कण्डेय पुराण आणि स्कंद पुराणात देवी कात्यायनीची कथा वाचावयास मिळते.
तत्प्रसंगी महिषासूर हा उन्मत्त झालेला होता.त्याने तिन्ही लोकी उत्पात माजविला होता.देवीने उग्र रुप धारण करुन महिषासूराचा वध केला.तिन्ही लोकी आनंद निर्माण झाला. 
 दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायणी देवीचा उल्लेख म्हणून
" महिषासुरमर्दिनी " असा केल्याचे सांगितले जाते. 

💎 कात्यायनी देवीचे स्वरुप 

कात्यायणी देवीचे स्वरुप चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. तर दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशीर्वादरुपी आहेत. कात्यायणी देवीचे स्वरुप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते.देवीचा अवतार धारण करण्याचा मुख्य उद्देश असूरांचा वध, धर्माची पुनर्स्थापना, धर्मसंरक्षण असल्याचे म्हटले जाते. 
देवीला लाल रंग अधिक प्रिय असल्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान करुन देवीची पूजा,भक्ती करणे फलदायक ठरते.

💎 कात्यायणी देवीचे पूजन

दुर्गा देवीच्या पूजनासह कात्यायणी देवीचे पूजन करताना गंगाजल, कलावा, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. कात्यायणी देवीला मध अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जुन समावेश केल्यास अधिक लाभ मिळतो तसेच देवीला गोडधोड नैवेद्यही अधिकच प्रिय असल्याचे म्हटले जाते.म्हणून कात्यायनी देवीला दुध-साखरेचा गोड प्रसाद अर्पण करता येईल. त्रास नाहीसा होईल आणि लाभ होईल.


💎 कात्यायनी देवी पूजनाचे फलित :-

मान्यता आहे कि देवी कात्यायनीला प्रसन्न करण्यासाठी ३ ते ४ फूलं घेऊन
 " कंचनाभा वराभयं पद्मधरां मुकटोज्जवलां।
   स्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते॥ "
हा मंत्र १०८ वेळा जप केल्यास व नंतर ही फुलं देवीचरणी अर्पण केल्यास फलदायी ठरते.कात्यायणी देवीचे पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो.श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही देवीचे पूजन केले असल्याचे सांगितले जाते. देवीच्या कृपेने विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. भाविकांना सुख, समृद्धी प्राप्त करणे सुलभ होते.

[टिप: या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य ऐकीव,श्रवणीय माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करावा.]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...