Kaayguru.Marathi

जिव्हाळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जिव्हाळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, मे १४, २०२३

माझी माय


[ आज जागतिक मातृ दिवस त्यानिमित्ताने आई चरणी समर्पित काव्यसुमन!💐🙏🙏🙏]

माझी माय

चालत होतो एकटा
होती ती एक भयाण रात्र
घेऊन अनवाणी दोन पाय
तुडवित होतो रस्ता…
खाचखळगे, दगडधोंड्यांनी भरलेला
कधी पडलो,कधी ठेचाळून पडलो
खाल्ल्या अनंत खस्ता
पायात घुसला काटा 
पोहचलो कसाबसा घरी
माझ्या येण्याची वाट पाहत…
चिंतेत बसली होती दारी
दोन्ही पाय रक्तबंबाळ पाहून 
मोकले धायऽऽधाय
जिव्हाळा हृदयीचा 
शांत राहिना…
कोण हो ती? 
ती तर माझी माय ! 
ती तर माझी माय!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, ऑगस्ट ११, २०२२

रक्षाबंधन

रक्षा सूत्र बांधते तव हाती
औक्षण  करिते भाऊराया
विजयोस्तू  भव  तू  सदा!
अबाधित राहो  प्रेम माया

धागा एक हा रेशमाचा
आत स्नेह जिव्हाळाचे झरे 
दारी लखलख चंद्र सूर्य तारे
लाभो तुज प्रभूकृपेची छाया

सासरच्या परसात फुलवेन
मी प्राजक्ताची शुभ्र फुले
वा-यासवे धाडीन सुखगंध तुले 
आनंदे यावे तू मज भेटाया

जीवनात कधी न होवो
तुज षढ्रीपुंच्या विषारी स्पर्श
अंगणी नांदो गोकुळाचा हर्ष 
संकटात द्यावी कृष्णाची माया

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल 
" पुष्प "


बुधवार, मार्च २३, २०२२

आई

आई... तुझ्या  त्यागाला  जगी  उपमाच नाही
बाळाच्या  सुखकल्याणा तू विसरते सर्वकाही
तुझ्या जिव्हाळ्याचा  देवालाही वाटे हो हेवा !
उभा विटेवरी पंढरीनाथ भक्तांची होऊनी आई

आई...तुझ्या  ममतेचा भुकेला  ग्  वैकुंठनाथ
कान्हा  होऊन   जन्मला  तो देवकीच्या पोटी
झाला  यशोदेच्या  कन्हैया  अनुसूयेचा श्रीदत्त
कौसल्येचा  होऊन श्रीराम प्रकटला जगजेठी

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, फेब्रुवारी २७, २०२२

मराठी माझी माय


माय मराठी माझी
जणू सरस्वतीची वाणी
संत पंतांनी रचिली
गाऊ आज तीच गाणी

माय    मराठी  माझी
जसा  मोगरा   सुगंधी
दरवळ    दाटे   तिचा
ज्ञाना एका तुका ग्रंथी

ज्ञानपिठानी  अलंकृत
मराठीची  लेकरं  चार
विस  विवा  करंदीकर
नेमाडे  चौथा पुत्र थोर

माझ्या   मराठीला  जगात
लाभले दहावे मानाचे पान
आणिक मायदेशी लाभला
भाषाशारदा  तृतीय    मान 

माझ्या  मराठीला   शोभे
अठ्ठेचाळीस  स्वर-व्यंजनं
-हस्व दिर्घ तिला दोन हात
काना   मात्रा   दोन  चरण

अनुस्वार जणू तिचे कुंकू
उद्गार    गर्भिचा    हुंकार
दोन   अवतरणं.  सांगती
जणू  जन्म  मरणाचे  सार

अर्धविराम     स्वल्पविराम
माय मराठीचा श्वासोच्छ्वास
अपुर्णविराम अन् पुर्णविराम
जीवनाची    शिकवी   आस

मराठीचे  विकल्प चिन्ह
देतसे     विचारस्वातंत्र्य
संयोग  चिन्ह   शिकविते
जिव्हाळ्याचा  गोड   मंत्र

ऐक  मित्रा घेतला वसा मी 
माय मराठीचा करीन आदर
बोलीन,देईन, गाईन  मराठी
प्राण  असेतो करीन जागर !

® प्रा.पुरुषोत्तम पटेल," पुष्प "
   म्हसावद

सोमवार, जानेवारी २४, २०२२

लेक माझी [कविता ]

आज ' राष्ट्रीय कन्या दिन ' समस्त लेकींना समर्पित 
माझे हे काव्य !
लेक माझी
  लेक माझी…
लाडाची गुणांची खाण
तिच्या जन्मानं गायलं
देवानं माझा जीवनाचं 
अविट सप्तसुरांचं गाण ।।१।।
माझ्या संसार अंगणी
उगवलं लख्ख चांदणं छान 
   लेक माझी…
भासे नवदुर्गा अंबा,भवानी
काली,अन्नपूर्णा,जगदिश्वरी,
नवविचार नऊ रुपांनी
माझा मना येई उधाण।।२।।
माझ्या संसार अंगणी 
उगवलं लख्ख चांदणं छान
  लेक माझी…
प्रात:काळची मधुर भूपाळी
माझा जगण्याचा श्वास
जन्म माझा धन्य कराया 
देवानं दिला पित्याच्या मान।।३।।
माझ्या संसार अंगणी 
उगवलं लख्ख चांदणं छान
लेक माझी…
माझा जीवनग्रंथाचं पान 
लेकीच्या रुपात धाडलं 
भगवंताने माझा दारी 
आनंदाचं शुभवर्तमान।।४।।
माझ्या संसार अंगणी 
उगवलं लख्ख चांदणं छान
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " म्हसावद

गुरुवार, जानेवारी १३, २०२२

पोरा , ऐंक ना जरा !

पोरा , ऐंक ना जरा!

पोरा बैस  न् जरा जवळ ऐंक रं माझ्या मनातलं
तुझ्याच रं सुखासाठी  रक्त जाळलं मी उरातलं !

सांगणार  नव्हतो रं पण आज येळच तशी आली
वृद्धाश्रमी घाला थेरड्याला सून सकाळी म्हणली

स्वतः उपाशी राहून मी घास भरवला तुला मुखी
तुझ्या आजारपणी माझ्या मांडीची होती रं उशी

तुझ्या शाळंचा खर्चापायी नाही  केली मौजमजा
आणं... तू शिकून आता  साईब  झाला रं राजा!

तुला  मोठ्ठं  करतांना  मी  लई खाल्ल्या रं खस्ता 
आता म्हातारपणी नको दावू वृद्धाश्रमाचा रस्ता

पोरा, ऐंक ! पेरलं तेच  उगवतं  हा  दैवाचा न्याय 
पटतंय का  तुझ्या मनाला विचार करुन पाहायं !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शनिवार, जानेवारी ०८, २०२२

बाप समजतो तेव्हा !


बापाची    नजर    होती   करारी
रुबाब  तर  काय सांगू लई भारी
रंजल्या    गांजल्या    माणसाला
आयुष्यभर  दिली त्यांनी  उभारी 

उपाशी राहून भरवला मुखी घास
मला   दिला आनंद सुखाची रास
काट्याकुट्याची    तुडवून    वाट
माझ्या भल्यासाठी सोसला त्रास !

बाप   हयात   होता  तोपर्यंत  तो
कळूनच  आला  नाही मला कधी
बाप   समजून   यावा   म्हणून...
बाप  व्हावे  लागते आपण आधी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, डिसेंबर १७, २०२१

आई

आई 
शब्दात  जिच्या सदैव माया 
आयुष्यभर झिजविते काया
उभी राहते उन्हा - पावसात
होते लेकराची छाया...आई !

उपवास नावे सोसते त्रास
बाळा भरवी मुखीचा घास
शब्दात तीच्या अमृत शिंपण
घरादाराच्या  श्वास ... आई !

नयनी लपवीते खारे पाणी
दुःख पिते देई जीवन संजीवनी
प्रसन्न वदने घरात दरवळे 
जिव्हाळ्याची जाई... आई  !

पहाटे उठते उशिरा निजते
मोल  ती  कसला  ना  घेते
लोभ ना तिजला मोठेपणाचा
जखमेवरची  फुंकर... आई !

राब राबते परी न विसरते
मन तिचे खोप्यातच रमते
नजर पिलावरी भिरभिरते
जणू ऊंच आकाशी घार...आई !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, नोव्हेंबर २६, २०२१

अंगाईगीत

अंगाईगीत

सजली रात्र चांदण्याच्या शालू नेसुनी
रातकिडे वाजवती पिपाणी
वारा   गातसे  मंजुळ गाणी
निज रे माझ्या बाळा गाते तुला अंगाई

परसात निजली बाळा जाई जुई
जोजवण्या आली रातराणी ताई
सोबतीस तिच्या निद्रा राणी बाई
निज रे माझ्या बाळा गाते तुला अंगाई

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, नोव्हेंबर २४, २०२१

सासुरवाशीण लेकीचं बाबांना पत्र...

सासुरवाशीण लेकीचं बाबांना पत्र…

प्रिय बाबा...!
   बाबा, मी सासरी आल्यापासून ते आजपर्यंत एकही क्षण तुमच्या आठवणीवाचून गेला नाही...
रोज पहाटे लवकर उठतांना तुम्ही मला आठवता….
  तुम्ही आईला नेहमी म्हणायचे, अग.. झोपू दे! हे काय सासर आहे का लवकर उठाया? 

रोज पहाटेपासून उठल्यावर घरातील सगळ्याचं हवं नको ते करतांना दमछाक होताच बाबा तुम्ही आठवता…
माझ्याकडे कामाचा तगादा लावणा-या आईला तुम्ही म्हणत, अग, किती काम करुन घेशील तिच्याकडून..?
ती काय यंत्र आहे का एकसारखं काम करायला? बस्स. पुरे आता! 

स्वयंपाकघरात गेल्यावर बाबा तुम्ही आईशी केलेला संवाद आठवू लागतो…
अग, तूच कर ना आज स्वयंपाक. सासरी गेली का आपली ताऊ करणारच आहे सासरच्यांसाठी सुगरणीचा स्वयंपाक..! 

दिवसभराच्या रांधा वाढा उष्टी काढा करुन उशिरा झोपतांना तुम्ही डोळ्यासमोर उभे राहता...
अरे, बेटा! झोपली नाही अजून. बरीच रात्र झाली; झोप आता. उशिरा झोपणे प्रकृतीसाठी योग्य नाही बरे! 

रात्री झोपतांना अंगावर पांघरुन घ्यायलाही त्राण नसतांना बाबा तुम्ही आठवता...
काळजीने मी झोपले की नाही हे पाहण्यासाठी आले असता... किती वेडी पोर ही.. एवढ्या थंडीतही पांघरुन न घेताच झोपली.. अन् स्वतःचे पांघरुन माझ्या अंगावर घालणारे तुम्ही ..! 

बाबा, अंगात तापाची कणकण येताच तुमच्या मायेची ऊब आठवते...
अरे, आज आमचं वेडं फूल कसं हिरमुसले? अरेरे.. ताऊला तर ताप चढलाय. चला, चला..! उशिर नको. डॉक्टरांकडे लवकर जाऊ या. अंगावर ताप मिरवणे आरोग्यासाठी चांगले नाही बेटी ! 

बाबा, सासरी आल्यापासून हे सारं काही आठवतं हो.. पण त्या आठवण्याला सुगंध असतो तुमच्या मायेचा अन् आंतरिक जिव्हाळ्याचा..!
तुम्हाला माझी असणारी काळजी मला  जगण्यासाठीचे  हे बळ... म्हणजे अमृतसंजीवनी हो बाबा!

लेक… बापासाठी वडाचा पार !
लेक… बापाच्या सुखाचं सार !
लेकीवर जीवापाड प्रेम करणा-या सर्व बाबांना समर्पित...!

©प्रा.पुरूषोत्तम पटेल " पुष्प "

शनिवार, ऑक्टोबर ३०, २०२१

गाव माझा

गाव माझा 💎

प्रिये,  गाव   माझा    टुमदार  
येऊन  तर  पहा   तू   एकदा 
इथले  नदी  वृक्ष   पाखरं 🐦 
होतील  ग्   तुझ्यावर  फिदा 

तापी - वाकी गोमाई सरिता 
गाव  परिसराच्या भाग्यदाता
सुजलाम्   सुफलाम्  करीती
बळीराजाला या तिन्ही माता 

इथली  काळी कसदार माती
गोड   गोड  जपते  ग्   नाती 
केळी पपई गोड ऊसाचे मळे 
अन्  कापूस  भासे श्वेतमोती

रानातल्या   येता जाता वाटा
चढणी-उतरणी अन् नागमोडी 
त्यावर चालतांना   भासशील   
तू  तर  मनमोहक  गुलछडी ! 

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " 

गुरुवार, ऑक्टोबर २१, २०२१

माझी शाळा (कविता)


म्हसावद, ता.शहादा येथील कुबेर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यामंदिर विषयी कविता

माझी   शाळा 

माझी शाळा लळा लाविते बाळा
उपदेशाचा गोड गळा संजीवनी मज शाळा 


ज्ञान सेवा तू साफल्यम् ब्रिद असे हिचे थोर
ज्ञानियांचे जणू माहेर गाव म्हसावद शाळा कुबेर


थोर येथे गुरु परंपरा प्रितीची सदा वाहे धारा
जातीभेदासी नसे थारा समता पेरीतसे वारा


दूर करिते अज्ञान सकलां करीते सज्ञान
सांदिपनी जणू वरदान भासे सद्गुणांची खाण


चहू दिशी वृक्ष सावली दिनांसी शोभे माऊली
या रजकणांची धुळी शिष्य लाविती भाळी

            
कर्तृत्वाला देई मान अभ्यासाला मोठ्ठे स्थान
कुणी न् मोठा कुणी न सान शिकवी हा मंत्र महान


अशी ही धन्य धन्य माझी कुबेर शाळा
दोन्ही कर जोडून माझे कोटी प्रणाम

शब्दसौदर्य :प्रा.पुरूषोत्तम पटेल
उपमुख्याध्यापक,
कुबेर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद, ता.शहादा


सोमवार, ऑक्टोबर १८, २०२१

बायको नावाचं पुस्तक

बायको नावाचे पुस्तक (कविता )

मित्रहो,बायको...अत्यंत संवेदनशील विषय. " बायको " ही प्रत्येक नव-याची अंतर्मनाची प्रेमळ हाक आणि मदतीची साद असते.तिच्याविषयी प्रेमाच्या गोष्टी जशा हृदयात साठवतो न् आपण ; तशाच  कडू गोष्टीही आपल्याच हृदयात जतन कराव्यात.कोणाशीही हा " ओटीपी " कधीही शेअर करु नका.[हीच जाणीव बायकोने ही ठेवावी  !]


बायको नावाचं पुस्तक 
आजन्म जपावे मनात
संसारातील छोटी मोठी गोष्ट
निरंतर जपावी हृदयात

बायको नावाच्या पुस्तकांची
पाने फाडू नये चारचौघात
कडू असो वा गोड आठवण
निरंतर जपावी आपण हृदयात

असावी प्रेमळ अतिसुंदर
छबी नवरोबाच्या मनात
दोघांत दिसू नये कधी अंतर
दिसावी एकमेकांच्या हृदयात

दोघांची जोडी जणू शोभावी
लक्ष्मी-नारायण जनात
कणभरही संशयाला नसावी 
जागा नवरोबाच्या हृदयात

बायको स्रित्वाचे एक दैवी रुप
ती तर नवदुर्गा सप्तखंडात
प्रसन्न वागा प्रतिदिन तिच्याशी 
क्लेश ठेवू नये हृदयात

बायको म्हणजे संसाराची 
फुलणारी पुष्पलता सुगंधित
जपावा तिच्या शब्द नवरोबाने
गीता वेद समजून हृदयात !


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, ऑक्टोबर १७, २०२१

सुगरण

    सुगरण (कविता)
कधी शिकशील माणसा
सुगरणीची  तू  रे  कला
झाडावर  बांधीला  सुंदर
पिलांना  झुलता  बंगला

तिला  नाही   दोन  हात
ना  कोणी  रे  सोबतीला 
बघ   ईवलुश्या   चोचीने
खोपा   अविट   विणला

तिला   माहित  ना  माप
इंच   मिटर   अन्    फूट
बांधते  नाजूक  फांदीला
खोपा किती सुंदर अतूट

तीन   इंचाचा   हा  पक्षी
काडी  गुंफितो   दिसभर
पिला  आयुष्य   द्यावया
जीव   टांगतो  शेंड्यावर

मुठभरीचा  हा  रे  जीव
माया  ममतेला  चांगला
पिला  वाटते  ना  भिती
निजे बिनघोर खोप्याला

© प्रा.पुरुषोत्तम पटेल 
          " पुष्प "

मंगळवार, सप्टेंबर २८, २०२१

आजोबांचे नातवास पत्र

आजोबाचे नातवास पत्र.
 
प्रिय विट्टू…
तुला अनंत गोड गोड आशीर्वाद !
आठवतंय रं बच्चा तुला? मी तुझा दद्दूऽऽऽ !
खूप दिवस झालेत ना रे आपल्याला भेटून ! तुला माझी आठवण नाही येत का रे लऽऽब्बाडा ? तुझा दद्दुला भेटावसं नाही वाटत तुला ? जाऊ दे ! मी पण काय वेडेपणा करतोय तुझ्याशी ? 
विट्टू,तुझी अन् माझ्या बछड्याची आठवण आली,म्हणून पाणावलेल्या डोळ्यांनी अन् थरथरल्या हातांनी हे पत्र लिहितोय तुला !
मला कळतंय रे विट्टू...तुझा पंखात भरारी घेण्याचं बळ नाही आलं अजून.अन् ऊंच आभाळी झेप घेण्याचं माझ्या पंखातल बळ संपून गेलंय आता…!
आता लक्षात आलं विट्टू...आपली प्रिय माणसं दूर झाली की आठवणी जास्तच उफाळून येतात.तळ्यातील पाण्यावर खडा मारताच अनेक वलयं एकामागे एक उठावित न् अगदी तसंच आठवणींचंही असतं हो !
माझ ही तसं झालं रे बच्चा ! एकटा आहे न् तुझा दद्दु म्हणून...
तू मला भेटायला यावं,ही वेडी आस उगाच लागली मला.विट्टू,माझ्या- तुझ्या भेटीला सहा वर्ष झालीत बरं का!पण ह्या सहा वर्षांत मी माझ्या बछड्याचा आणि विट्टू तुझा वाढदिवस आवर्जून साजरा करतोय.मनाने मी तुमच्याजवळ आल्याचा भास होतो मला.बच्चा,तू असो वा माझ्या बछडा... माझ्यापासून दूर असला म्हणून काय रक्ताची नाती तुटतात का रे ? नाही हं!
मी घरी होतो तेव्हा तू अवघ्या सहा महिन्यांचं पिल्लू होतास.तुझी माझी छान गट्टी जमली होती.
ईवल्याशा डोळ्यांनी तू मला पाहायचा.पाहून गोड हसायचा.तेव्हा मला स्वतः ला खूप आनंद व्हायचा.तुझं ते गोरे गोरे गाल, निळेशार काबरे, डोळे… अरे हां ,
काब-या डोळ्यावरनं आठवलं,तुझ्या आजीच्या डोळ्यासारखेच तूझे ते डोळे आहेत.तुझ्या डोळ्यात मला तुझी आज्जी दिसायची.ती गेली तेव्हा तुझी मम्मा का मम्मी,की आई ...तू आत्ता बोलायला लागला असशील ना रे विट्टू? काय म्हणतो माहित नाही मला.म्हणून अलिकडचे सगळी आईविशेषणे नमूद करुन दिली.तेव्हा सून म्हणून घरी आली नव्हती.
तुझ्या आजीला जाऊन चार महिने झाले.आणि तुझ्या आत्याचं व तुझ्या पप्पाची...पप्पाच म्हणतोस ना? माहिती यं मला,तू नक्की पप्पा किंवा डॅडू म्हणत असशील.म्हणजेच माझ्या बछड्यांचं मी लग्न लावून दिलं.तुझी आत्या बिच्चारी आमचं दोघा बाप-लेकांचं सकाळ संध्याकाळचं सगळं काही करीत करीत सासरी निघाली अन् तुझ्या आईनं लक्ष्मीच्या पावलांनी उंब-यावरचं माप ओलांडून घरात सून म्हणून प्रवेश केला.मी पण काय लिहितोय अन् बोलतोय तुझ्याशी...वाहवत गेलो रे विट्टू…काय सांगतोय तुला मी हे ? जाऊ दे,तुला नाही कळायचं हे!
तर तू नुकताच नजरेला नजर भिडवू लागला होता.
ए विट्टूऽऽ अशी हाक ऐकताच माझ्याकडे बघायचा,गाली हसायचा.हसतांना तुझ्या दोन्ही गालांवर गोड खळी पडते हं.पाहिलीस का तू ? आरशासमोर जाऊन उभा रहा बरं! दिसेल तुला ती खळी.
त्या खळीत मला माझ्या लहानपणीच्या बछड्या दिसायचा !असो,तू आता बोलायला लागला असशील,घरभर धावत असशील,माझ्या बछड्या हट्ट करायचा अन् मागितलेली वस्तू,पदार्थ मिळत नाही तोपर्यंत रडून रडून आकांड करायचा ,अख्खं घर डोक्यावर घ्यायचा.तू तसं काही करु नकोस हं बाळा !
तुला सांगतो,तो दहा वर्षांचा असतांना त्याला आईस्क्रीम खायचं होतं.तुझ्या आजीने शरबत दिलं.म्हणून पठ्ठयानं काचेच्या ग्लास माझ्या नाकावरच फेकून मारला.तो फूटला.त्याचे दोन काचेचे तुकडे माझ्या गालात घुसले.ते काढतांना मला जखम झाली.ते दोन व्रण आजही मी माझ्या गालावर कौतुकाने मिरवतोय !
विट्टू, तुला सांगतो,त्या जखमांनी महिनाभर खूप त्रास झाला मला.
शेवटी काय? बाळहट्टच ना ! 
होतात अशा चुका.त्या चुकांना आई बापानेच तर पोटात घालायच्या असतात.आपलेच दात,आपलेच ओठ! तक्रार तरी कोणाकडे करणार? असो.  
सगळं काही सुखेनैव चाललं होतं.म्हणतात ना...सुखाला ही ग्रहण लागते म्हणे ! तुझ्यासाठी खूप मोठ्ठा शब्द झाला रे हा.आता नाही पण पुढे मोठ्ठा झाल्यावर कळेलच तुला ह्या शब्दाचा अर्थ ! 
आपल्या शेजारी एक कुटुंब राहायला आलं.त्या कुटुंबाने आपल्या आई-वडिलांना दूरवर वृद्धाश्रमात ठेवलं होतं म्हणे! " आई-बाबांना उतार वयात वृद्धाश्रमात ठेवायचं नसतं हो बाबा! असं कसं वागू शकतात हे लोक?"
हे दु:ख माझ्या बछड्या माझ्याशी व्यक्त करायचा.ते ऐकून मी जगातला आदर्श बाप असल्याचा मला अभिमान वाटायचा!
विट्टू,ऐक बच्चा,ती सून व मुलगा आणि त्यांचा एक मुलगा-मुलगी असं चौकोनी कुटुंबाची आपल्या कुटुंबाशी गट्टी जमली.त्या सुनेचं आपल्याकडे येणं जाणं वाढलं…
आपल्या घरात मंथरा घुसली.अरे विट्टू,विसरलोच बघ गड्या,तूला काय कळणार मंथरा ? 
मनात खूप इच्छा होत्या.तुझ्याशी खेळावं,बोलावं,तुझे हट्ट पुरवावे,तुला हवे नको ते कोड-कौतुक करावे.गोष्टी सांगाव्या, रामायण,महाभारत,शिवभारत,शुभंकरोती शिकवावे,पण... सगळं काही मनातंच राहिलं.यातलं तुला काहीच देता आलं नाही.का? कोण जाणे ? पण ह्या गोष्टीचा मला आत्ताही खूप त्रास होतो रे…खूप अभागी ठरलो मी !
विट्टू,तू जन्माला आला तेव्हा मी आपल्या गावाकडे अख्या गावात पेढ्यांचे बॉक्स वाटले होते. ही फुशारकी नाही तर जिव्हाळा होता बरं.माझ्या बछड्यांला विचारलं तर तोसूद्धा आनंदाने ही गोष्ट सांगेल.म्हणतात ना रे…" नातू म्हणजे दुधावरची साय ! " तो आनंद आठवला की मला आजही नवचैतन्य मिळत हं ! "
विट्टू,तर तुला गोष्ट सांगतो.ऐक!पत्रातून का असेना,पण मनातली अतृप्त इच्छा आज पूर्ण करुन घेतो.
 " अयोध्येला दशरथ नावाचा राजा होता.त्याला होत्या तीन राण्या.मोठी राणी कौसल्या.तिच्या पुत्र म्हणजेच मुलगा हो, त्याचं नाव राम होते.हा राम अयोध्येचा राजा होणार होता.अयोध्येत तशी तयारी पण झाली होती.आणि हो...एक कैकयी नावाची राणी होती.तीची दासी होती मंथरा.ही दासी वाईट विचारांची होती म्हणे! मंथराने कैकयीच्या कानात रात्रीलाच वाईट विचार भरले.म्हणाली,तुझा पुत्र भरताला राजा बनव.म्हणजे तू राजमाता होशील ! ते कैकयीने ऐकले.ती दशरथ राजाकडे गेली.म्हणाली,राजा,माझा भरताला राजा बनवा आणि रामाला चौदा वर्ष वनवासात पाठवा.विट्टू,तुला सांगतो,हे ऐकून त्याने कैकयीला खूप विनवण्या केल्या.असं करु नकोस म्हणून तो तिच्यापाशी रडला,पण कैकयीने ऐकलं नाही.कैकयीचा वेडेपणा पुढे दशरथ राजा अडला.त्याने आपल्या आवडत्या रामाला वनवासात पाठवले.भरताला राजा बनवले.हे सगळं केवळ मंथरेमुळे झालं हं! तर अशी आहे ही मंथरेची गोष्ट."
 तुझे मम्मा डॅडू हळूहळू शेजारच्या त्या कुसंस्कारी कुटूंबाच्या आहारी गेले.मंथरेप्रमाणे त्यांनीही माझ्या बछड्याचे व सुनेचे कानात माझ्याबाबत विष भरवायला सुरुवात केली.मला बाबा म्हणणारी माझी सून रोज या ना त्या कारणाने माझा अपमान करु लागली.माझा बछड्याशी माझ्याबाबत खोटं-नाट सांगू लागली.रोज रोज शांत, समृद्ध घरात दोघा नवरा बायकोत कलह,भांडणं होऊ लागली.मी माझ्याच रक्ता-मांसांन उभारलेल्या घर-भिंतीमध्ये मी थेरडा,परका ठरु लागलो.
विट्टू , हे पाहून मन माझे विषण्ण झाले.घरात तुझ्या आजीने संग्रहीत केलेली व मला आवडलेली एक कविता मी आपल्या कुटुंबाच्या फोटोजवळ भिंतीवर लावलेली होती.तो फोटो काढून मी सोबत घेऊन आलोय हं.ती कविता तुला कळावी, म्हणून पत्रात लिहितोय. विट्टू ,ही कविता नक्की वाचून घे हं !

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा नकोत नुसती नाती

त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी

त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी
अश्रूतुनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी

या घरट्यातुन पिल्लू उडावे दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती

तुझ्या डॅडूच्या वाढदिवस साजरा झाला.अन् मी मनोमन ठरवलं,या घरातून आपणही वृद्धाश्रमात जावं! आपला संसार झाला.संसाररथाचं एक चाक म्हणजे तुझी आजी कधीच सोडून गेलीयं.रहिलेलं एक चाक लंगडत चाललंय.मग आपली अडचण का करावी.ठरवलं...
तसं आजच्या पोराबाळांच्या संसारात म्हातारे आई-बाबा हे अडगळच ठरतात म्हणे !म्हणजेच वठलेले झाड. फुलं-फळं येणार नाहीत असे बिनकामाचे झाड ठरतात ! त्यांची सावलीच नसते मग कोण उभं राहणार त्याच्याखाली ? हे कळलं मला! त्यापेक्षा आपणच स्वतः घराबाहेर पडावं.ही इच्छा तुझ्या मम्माला सांगितली.ती खूप आनंदली.तिनं माझ्या बछड्यालाही तयार केलं.मी तर मनानं तयारच होतो.
आणि पाच वर्षांपूर्वी तुझ्या मम्मा- डॅडूनं मला वृद्धाश्रमात आणून सोडले.तेव्हापासून तर आजपर्यंत ते मला भेटायला देखील आले नाही.कदाचित नोकरीमुळे त्याला वेळ मिळत नसावा.हे माहिती आहे मला!असो.
विट्टू,तुला एक विनंती करतो बच्चा,आई-बाबा आपले दैवत असतात.म्हातारपणात त्यांची सेवा करणे सोडून त्यांना वृद्धाश्रमात ठेवणे .हे कृतघ्नपणाचे व मोठ्ठे पाप होय.बच्चा,प्रत्यक्ष वैकुंठाचा राणा समोर आला.तरी आईबाबांची सेवा सोडून न जाणारा पुंडलिक याच भूमीवर जन्मला.आपल्या आंधळ्या आई-बाबांना तिर्थयात्रेची इच्छा पुर्ण करण्यासाठी आई-बाबांची कावड खांद्यावर घेऊन जाणारा श्रावणबाळ समजून घे,विसरु नकोस ! बापाच्या आज्ञा प्रमाण मानुन एका शब्दावर १४ वर्ष वनवासात जाणारा राम जाणून घे ! ह्या गोष्टीतील पुंडलिक, श्रावणबाळ,श्रीराम हे तुझे आदर्श व्हावेत.विट्टू ,हे लक्षात ठेव ! विसरु नकोस त्यांना !
माझ्यावर जो एकाकीपणा ओढवला.भरलेल्या घरातून मला वृद्धाश्रमात जाणे नशीबी आलं.माझी तक्रार नाही.तुम्ही जवळ यावे ही मागणी नाही.जवळ घ्यावे ही आस नाही,तुम्ही सुखात रहा...बच्चा,ही एकच इच्छा !
विट्टू , एक गोष्ट अजून लक्षात घे ! चुकूनही वाईट विचारांच्या माणसांशी, कुटुंबाशी सलगी करु नको.त्यांच्याशी उठणं,बसणं, गप्पागोष्टी टाळणं शिक. वाईट विचारांची माणसं म्हणजे पाण्यात टाकलेला गळ होय.हे विसरु नको बच्चा!
आणि शेवटचं सांगतो,आई-बाप आपल्याला लहानाचं मोठ्ठा करतात.त्यासाठी अनंत खस्ता खातात.लहाणपणी चालता पडतांना आपल्याला तेच सावरतात.म्हणून त्यांच्या म्हातारपणी त्यांना आधार हो!त्यांना दुर लोटून, वृद्धाश्रमात टाकू नको! तू शहाणं बाळ माझं! समजून घे,तुझा दद्दुचा शब्दन्शब्द ! नियमित शाळेत जा,खुप अभ्यास कर,खोड्या करुन नकोस पण खेळात रममाण हो! मन व तन समृद्धीसाठी खेळ, व्यायाम आवश्यक आहे.माझा बछड्याचे नाव उज्ज्वल कर.तू खूप मोठठा हो! त्यांना म्हातारपणात जवळ ठेव.काळजी घे,सुखात ठेव!पेरलं तेच उगवतं.असं त्यांना कधी ऐकवू नको.याला तू अपवाद हो ! 🙏विट्टु ,ही माझी तुला हात जोडून विनंती !🙏
 ऐकशील ना ? जमलं तर एकदा का असेना,पण मला भेटायला माझ्या बछड्याला म्हणजेच तुझ्या डॅडू आणि मम्माला घेऊन नक्की ये ! म्हणजे मी डोळे मिटायला मोकळा...एवढं करशील ना तुझ्या दद्दुसाठी ?
ही पहिली आणि शेवटची एकच विनंती !🙏

© प्रा.पुरुषोत्तम म.पटेल " पुष्प "
उपप्राचार्य, कुबेर हायस्कूल व उच्च माध्यमिक कला-विज्ञान विद्यालय म्हसावद,ता.शहादा,जि.नंदुरबार
मोबाईल-८२०८८४१३६४


Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...