Kaayguru.Marathi

शुक्रवार, जानेवारी २१, २०२२

श्री रिद्धी सिद्धी विनायक यात्रा म्हसावद

   

 म्हसावद.... सातपुडा पायथ्यालगत नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा तालुक्याच्या उत्तर दिशेला वसलेले एक टुमदार गाव... म्हसावदच्या खांद्याला खांदा लावून स्थिरावलेले एक अनकवाडे आणि दुसरे कोकणवाडे यांची एकच ग्रुप ग्रामपंचायत कार्यान्वित आहे. वादविवाद माहिती नसलेली ही अभिमानास्पद वैशिष्ट्य असणारी ग्रामपंचायत होय. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, भौतिक, वैद्यकीय, शेती, व्यापार, उद्योग आणि  साहित्य व संस्कृती या विविधांगी  क्षेत्रात सदैव प्रयत्नशील, उल्लेखनीय नाव म्हसावद असून येथे अनेक  वर्षांपासून सातत्याने यात्रोत्सव आयोजित होत आहे. दरवर्षी पौष मासी शु.संकष्ट चतुर्थीला यात्रा भरते. म्हसावद-तोरणमाळ रस्त्यावर पुरातन नवसाला पावणारे श्री रिद्धी सिद्धी विनायक मंदिर आहे. या दैवतांच्या पावन सान्निध्यात यात्रोत्सव साजरा केला जातो.
येथील मंदिराची वैशिष्ट्ये :-

© मंदिरातील श्री. रिद्धी सिद्धी विनायक मूर्ती  ही स्वयंभू आहे.
© मंदिर पूर्वामुखी असून दोन भागात विभागलेले आहे.
© मंदिराच्या एका भागात दक्षिणेस श्री रिद्धी विनायक देवता स्थापित असून हे उजवी  सोंड असलेले  दैवत होय.
© आणि याच  भागातील मंदिरात  शिवलिंग   असून हे तारकेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध आहे.
© उत्तरेकडील दुसर्‍या भागात श्री सिद्धी विनायक देवता स्थापित आहे. हे डावी सोंड असलेले  दैवत आहे.
© याच भागातही शिवलिंग असून ते रुद्रेश्वर महादेव म्हणून पुजिले जाते.
© दर संकष्ट चतुर्थीला स्त्री पुरुष भाविक श्रद्धाभावाने दर्शनाला येतात.

© जीर्णोद्धार :-
म्हसावद येथील जुनी - जाणती जेष्ठ-वयोवृद्ध जनाकडून प्राप्त  माहिती नुसार:
© मंदिराच्या पहिला जीर्णोद्धार 1966 साली करण्यात आला.
© दुसरा जीर्णोद्धार 2003 साली करण्यात आला.

© यात्रा वैशिष्ट्ये :-
* ही यात्रा म्हसावदसह थेट सातपुडा  पर्वतराजीतील  गावपाड्यात, थेट नर्मदा काठापर्यंत आबालवृद्धाना एक वार्षिक आनंदोत्सव असते.
* यात्रेत म्हसावद आणि पंचक्रोशीतील आबालवृद्धांची हजेरी.
* महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या तिन्ही राज्यांना एकत्र आणणारी यात्रा.
* विविध भाषा, संस्कृती व वेशभूषेचे दर्शन घडविणारी यात्रा.

© खवय्येगीरी :-
* विविध हॉटेल व स्टालची आकर्षक उभारणी.
* हॉटेलमधील खास गुळाची जिलेबीची लालपरी म्हणून चविष्ट  ओळख.
* गोडशेव इंडीयन चॉकलेट नावाने आस्वादक  परिचय. आणि  खास भजी,कचोडी या पदार्थांना खवैय्यांची प्रथम पसंती असते.
* म्हसावद आणि परिसर ऊसाचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे.यात्रेत ताजा ऊसाचा रस रसवंतिच्या छूनछून वाजणा-या घुंगरूच्या तालावर पिण्याची  मजा काही औरच!

© मनोरंजन :-
यात्रेत आबालवृद्धांसाठी मनोरंजनाच्या साधनांत बालगोपाळांसाठी पालखी झुले असतात. सेल्फीचा जमान्यातही कॅमेरात फोटो काढून देणारे फोटो स्टुडिओ देखील भाव खाऊन जातात. पालखी झुल्यांवर नवतरुण-तरुणी देखील  बसून आनंद लुटताना पाहायला मिळतात.लहान मुलांसाठी  किर्र.. किर्र, कर्रर्र-कर्र वाजत मुलांना आकर्षित करणारे विविधरंगी, विविधढंगी लहान मोठे फुगे पाहून श्रावणातील इंद्रधनु धरेवर उगवला की.. असे वाटते. मनमोहक सूर आळवत यात्रेत भटकंती  करणारे बासरी विक्रेता पाहताच कृष्णसख्याच्या भेटीस आसुसलेली प्रिय सखी राधा डोळ्यासमोर उभी राहते.
दिवसभर यात्रेत भटकंती करुन रात्री विसावलेल्या शौकीनांसाठी सिनेमा थिएटर, तमाशात काळू बाळू तमाशा मंडळ, रघुवीर खेडकर, मंगलाबाई बनसोडे हे तमाशा फड आवर्जून उपस्थिती लावतात.
अशी ही श्री रिद्धी सिद्धी विनायक यात्रा..
  दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार झालेले  चावी व रिमोट कंट्रोल द्वारा चालणारी खेळणी. मोठ्या प्रमाणावर विक्री होतांना दिसतात. खेळण्याचा स्टॉलवर ' हे नको, ते हवे'. असा हट्ट  धरुन रडून आकांत करणारी मुले व त्यांची समजूत काढतांना आई बाबाची होणारी जीवाची घालमेल, प्रसंगी नवरा बायकोतील वादही पाहायला मिळतात.

©शेतीपयोगी साहित्य :-
* म्हसावद  यात्रेत शेतीपयोगी साहित्य ही पाहायला मिळते.
© महिलासाठी सौदर्यप्रसाधने :-
यात्रेत  महिलांसाठी सर्व प्रकारची सौदर्यप्रसाधने, पायातील पैंजण, जोडवी, टिकली, बांगडी व अजूनही बरेच काही स्टॉलवर मांडलेले दिसतात.
   अशी ही म्हसावद, ता.शहादा. येथील श्री रिद्धी सिद्धी विनायक यात्रा... आनंदाची,  सुखाची, आपल्यातीलच हरवलेल्यांना शोधणारी, कधी हुरहुर लावणारी, ब-याच वर्षांनी आपल्या  प्रियजनांची गाठभेट घडविणारी, मनाला नवीन उर्मी देणारी, कधी आठवणींचा हुंदका दाटवून - भावनांना अश्रूद्वारा मोकळी वाट करुन देणारी... आठवणीतील मोरपीस...!
यंदा पौष ।। कृ.३।। शुक्रवार दि.२१ जानेवारी २०२२ रोजी संकष्ट चतुर्थीच्या पावन पर्वाला भरणारा म्हसावद,ता.
शहादा येथील श्री रिद्धी सिद्धी विनायक यात्रोत्सव कोरोना पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.  यामुळे  ग्रामीण भागातील अर्थकारण पार कोलमडून गेल्याची चिंता सर्वांनाच दंश करुन गेली आहे.

पुढच्या वर्षी ही यात्रा उत्साहाने साजरी होऊ दे ! ही आर्त विनवणी यंदा सगळ्यांनी श्री रिद्धी सिद्धी विनायक चरणी मनोमन केली आहे..!🌹🙏🙏🙏

    🙏🌹 श्री रिद्धी सिद्धी विनायक नमः!🌹🙏

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " म्हसावद, ता.शहादा, जि.नंदुरबार भ्रमणध्वनी-९४२१५३०४१२

१३ टिप्पण्या:

  1. अतिशय उत्तम आणि उपयुक्त माहिती दिली सरजी ✍️✍️🌟🌟

    उत्तर द्याहटवा
  2. म्हसावद रिद्धी - सिध्दी गणपती मंदिराची सुंदर माहिती👌👌✍️✍️

    उत्तर द्याहटवा
  3. वाहह सरजी...तुम्ही तर सर्व यात्रा शब्दश: उभी केलीत डोळ्यांसमोर...अप्रतीम लेखनशैली....👏👏👏🍫🍫🍫💐💐💐

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...