आईने गाजरं किसली अन् प्रेमाने भिजली
आज थंडीच्या पहाटे चुलीवर कढई सजली!
साजूक तुपाचा सुगंध जणू घरभर दरवळला
किसलेल्या गाजराचा केसरी रंग बहरला !
साखर विरघळली जणू दुधात स्वप्न मिसळले
हलव्यावर काजू-बदाम आईने अलगद पेरले!
चमच्याने हलवता माझ्या आठवणी बहरल्या
बालपणीच्या हट्ट लेऊन त्या बोलू लागल्या !
एक घास घेता पोट अगदी तुडूंब भरून आले
आईच्या हातचे हलवे अमृताहून गोड झाले !
©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “पुष्प”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा