चैत्र मास शुद्ध नवमी राजा दशरथाचे नगरी
राणी कौशल्या उदरी जन्मले वैकुंठीचा हरी ।।१।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी
पुष्पांजली अर्पितसे स्वर्गीचे सुरवर ऋषीमुनी
प्रसन्न होऊन नाचती नभीच्या दिशा चारी ।।२।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी
पुत्रदर्शने आनंद अश्रु दाटे कौसल्या लोचनी
कुंकुम लाली विलसे कैकयी सुमित्रा गालावरी।।३।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी
पाळणा सोनियाचा आज सजला राजमहाली
बाळाच्या मुखदर्शना गर्दी दाटली राजद्वारी ।।४।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी
आनंदे नाचती अवघी अवधपुरीची नरनारी
कल्लोळ उठे दशदिशी वाजते सनई तुतारी ।।५।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी
उष्ण वायू अश्ववेगे पुण्य वार्ता घेऊन पळे
स्तब्ध कळ्या फुलल्या दरी खोरी तरुवेलीवरी।।६।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी
सूर्यही थांबला नभी पाहाया हर्ष मुखकमळे
कुहुकुहू गाते कोकिळ सु-स्वरे आम्रवृक्षावरी ।।७।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी
चौखूर उधळीत आल्या पान्हावल्या धेनू अंगणी
भाट गाती स्तुतीसुमने नृपतीचे मध्यान्ह प्रहरी।।८।।
चला सखींनो पाहू चला
कौसल्यानंदन राजमंदिरी
©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “पुष्प”
खुपच सुंदर रामजन्म गीत 👏 रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏!🙏
हटवाखुपच सुंदर रचना,....👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवारामनवमीच्या शुभेच्छा 🙏🙏💐
मनापासून धन्यवाद 🙏!
हटवा