माय मराठी माझी
जणू सरस्वतीची वाणी
संत पंतांनी रचिली
गाऊ आज तीच गाणी
माय मराठी माझी
जसा मोगरा सुगंधी
दरवळ दाटे तिचा
ज्ञाना एका तुका ग्रंथी
ज्ञानपिठानी अलंकृत
मराठीची लेकरं चार
विस विवा करंदीकर
नेमाडे चौथा पुत्र थोर
माझ्या मराठीला जगात
लाभले दहावे मानाचे पान
आणिक मायदेशी लाभला
भाषाशारदा तृतीय मान
माझ्या मराठीला शोभे
अठ्ठेचाळीस स्वर-व्यंजनं
-हस्व दिर्घ तिला दोन हात
काना मात्रा दोन चरण
अनुस्वार जणू तिचे कुंकू
उद्गार गर्भिचा हुंकार
दोन अवतरणं. सांगती
जणू जन्म मरणाचे सार
अर्धविराम स्वल्पविराम
माय मराठीचा श्वासोच्छ्वास
अपुर्णविराम अन् पुर्णविराम
जीवनाची शिकवी आस
मराठीचे विकल्प चिन्ह
देतसे विचारस्वातंत्र्य
संयोग चिन्ह शिकविते
जिव्हाळ्याचा गोड मंत्र
ऐक मित्रा घेतला वसा मी
माय मराठीचा करीन आदर
बोलीन,देईन, गाईन मराठी
प्राण असेतो करीन जागर !
® प्रा.पुरुषोत्तम पटेल," पुष्प "
म्हसावद
Sundar rachna👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचनाविष्कार सरजी ✍️🌟🌟🌟
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना केली सर
उत्तर द्याहटवा