Kaayguru.Marathi

शनिवार, नोव्हेंबर २७, २०२१

अहो दाजी...!

अहो दाजी ! जाऊ नका हो लांब,
कशाला चाचपडता शिळी ती भाजी
बघा या झाडाला 
लगडले आंबे आले की पाडाला
रस चाखाया व्हा की तुम्ही राजी
अहो दाजी ! कशाला चाचपडता शिळी ती भाजी

आठवा भेट ती आपुली पहिली
रिमरिम सरी त्या ऋतू पावसाळी
नभी चमकली विज अवकाळी
कवेत येता तुमच्या झाले मी राजी
रस चाखाया या ना हो तुम्ही दाजी
अहो दाजी ! कशाला चाचपडता शिळी ती भाजी

मन झाले अधीर भेटाया हुरहूर
वाट पाहिन सायंकाळी नाक्यावर
घडता भेट तुमची आणि माझी
कशाला हवा दोघांत आपुल्या काझी
रस चाखाया या ना हो तुम्ही दाजी
अहो दाजी ! कशाला चाचपडता शिळी ती भाजी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, नोव्हेंबर २६, २०२१

अंगाईगीत

अंगाईगीत

सजली रात्र चांदण्याच्या शालू नेसुनी
रातकिडे वाजवती पिपाणी
वारा   गातसे  मंजुळ गाणी
निज रे माझ्या बाळा गाते तुला अंगाई

परसात निजली बाळा जाई जुई
जोजवण्या आली रातराणी ताई
सोबतीस तिच्या निद्रा राणी बाई
निज रे माझ्या बाळा गाते तुला अंगाई

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, नोव्हेंबर २५, २०२१

शेल चारोळी लेखन नियम

शेल चारोळी/काव्य रचना 
एका ओळीत मुळाक्षरांची [ अक्षरसंख्या] संख्या जी आहे तीच इतर ओळींमधे असायला हवी. .
✒️ लेखन नियम :-
अ ) लेखन चार ओळीतच असावे.ही शेल चारोळी म्हटली जाते.
ब ) चार-चार ओळींचे दोन,तीन,गट केल्यास ते शेलकाव्य म्हटले जाते.
१ ) ओळीत अक्षरसंख्या किती असावी.याला बंधन नाही.पण...मला वाटते दहा सोळा-सतरा अक्षरे योग्य ठरतात.
२ ) पहिल्या ओळीत आलेली अक्षरसंख्या ही उर्वरित तीनही ओळीत सारखीच असावी.म्हणजेच चारही ओळीत समान अक्षरसंख्या यावी.
३ ) शब्दसंख्येचे बंधन नाही.पण एक ते चार ओळीत अक्षरसंख्या समसमान असावी. 
४ ) पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द हा दुसऱ्या ओळीची सुरूवात असावा .
५) दुस-या ओळीच्या शेवटच्या शब्दाने तिसऱ्या ओळींची सुरुवात नसावी.
६ ) तिसरी ओळ स्वतंत्र सुरुवात असावी. 
७ ) तिसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दानेच चौथ्या ओळीची सुरुवात करावी.
८) यमक हे दुसऱ्या ओळीच्या शेवटी व चौथ्या ओळीच्या शेवटी जुळविला असावा.
९ ) चारही ओळी ह्या परस्परांना अर्थदृष्ट्या पुरक असाव्यात.
उदा. शेल चारोळी 

✒️ आपण दोघे 

सखी,ती वेळ पुन्हा परत यावी   [अक्षरे - १२]
यावी घेऊन पुन्हा त्या आठवणी [अक्षरे - १२]
आठवणींच्या झोक्यावर असावे [अक्षरे - १२]
असावे आपण दोघे नको भीती  [अक्षरे - १२]


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

उदा. शेलकाव्य
नात्याची विण
उसवू नको ग तू नात्याची विण   [अक्षरे - १२ ]
विण पुन्हा तशी जुळणार नाही   [अक्षरे - १२ ]
तू उगाच नको वाढवूस वाद.      [अक्षरे - १२ ]
वाद हा विनाशाचे कारण होई.   [अक्षरे - १२ ]

नाते मिळत नाही कुठे बाजारी    [अक्षरे - १२ ]
बाजारी नात्याला नसतेच नाव    [अक्षरे - १२ ]
विण असू द्यावी फिट्ट आणि घट्ट [अक्षरे - १२ ]
घट्ट विणीत नक्की गावतो गाव   [अक्षरे - १२ ]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "



नको हे हेवेदावे ![ शेल काव्य ]


खरंय...हे  हेवेदावे  का आणि कशाला

कशाला  त्या  वेदना कोमल हृदयाला !
स्वतः प्रामाणिक असावे  नको देखावा
देखावा  कळे  मन  जळे  क्षणाक्षणाला

जिभेवर   कटूता   समोर   येता  स्तुती
स्तुती असेल  तिथे समजावा हो स्वार्थ
निडरपणे    बोला   हे   वाईट   हे  भले
भले    करता  दुजांचे   लाभे   परमार्थ

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


बुधवार, नोव्हेंबर २४, २०२१

सासुरवाशीण लेकीचं बाबांना पत्र...

सासुरवाशीण लेकीचं बाबांना पत्र…

प्रिय बाबा...!
   बाबा, मी सासरी आल्यापासून ते आजपर्यंत एकही क्षण तुमच्या आठवणीवाचून गेला नाही...
रोज पहाटे लवकर उठतांना तुम्ही मला आठवता….
  तुम्ही आईला नेहमी म्हणायचे, अग.. झोपू दे! हे काय सासर आहे का लवकर उठाया? 

रोज पहाटेपासून उठल्यावर घरातील सगळ्याचं हवं नको ते करतांना दमछाक होताच बाबा तुम्ही आठवता…
माझ्याकडे कामाचा तगादा लावणा-या आईला तुम्ही म्हणत, अग, किती काम करुन घेशील तिच्याकडून..?
ती काय यंत्र आहे का एकसारखं काम करायला? बस्स. पुरे आता! 

स्वयंपाकघरात गेल्यावर बाबा तुम्ही आईशी केलेला संवाद आठवू लागतो…
अग, तूच कर ना आज स्वयंपाक. सासरी गेली का आपली ताऊ करणारच आहे सासरच्यांसाठी सुगरणीचा स्वयंपाक..! 

दिवसभराच्या रांधा वाढा उष्टी काढा करुन उशिरा झोपतांना तुम्ही डोळ्यासमोर उभे राहता...
अरे, बेटा! झोपली नाही अजून. बरीच रात्र झाली; झोप आता. उशिरा झोपणे प्रकृतीसाठी योग्य नाही बरे! 

रात्री झोपतांना अंगावर पांघरुन घ्यायलाही त्राण नसतांना बाबा तुम्ही आठवता...
काळजीने मी झोपले की नाही हे पाहण्यासाठी आले असता... किती वेडी पोर ही.. एवढ्या थंडीतही पांघरुन न घेताच झोपली.. अन् स्वतःचे पांघरुन माझ्या अंगावर घालणारे तुम्ही ..! 

बाबा, अंगात तापाची कणकण येताच तुमच्या मायेची ऊब आठवते...
अरे, आज आमचं वेडं फूल कसं हिरमुसले? अरेरे.. ताऊला तर ताप चढलाय. चला, चला..! उशिर नको. डॉक्टरांकडे लवकर जाऊ या. अंगावर ताप मिरवणे आरोग्यासाठी चांगले नाही बेटी ! 

बाबा, सासरी आल्यापासून हे सारं काही आठवतं हो.. पण त्या आठवण्याला सुगंध असतो तुमच्या मायेचा अन् आंतरिक जिव्हाळ्याचा..!
तुम्हाला माझी असणारी काळजी मला  जगण्यासाठीचे  हे बळ... म्हणजे अमृतसंजीवनी हो बाबा!

लेक… बापासाठी वडाचा पार !
लेक… बापाच्या सुखाचं सार !
लेकीवर जीवापाड प्रेम करणा-या सर्व बाबांना समर्पित...!

©प्रा.पुरूषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...