Kaayguru.Marathi

मंगळवार, मार्च ०३, २०२६

चिमणीची गोष्ट!


चिमणीने  चोचीत  पाणी घेऊन

आग  विझवण्याची लहान गोष्ट

सामाजिक ऐक्य रुजवायचे देते

प्रत्येक वाचकाला शिक्षण स्पष्ट!

वाचू या गोष्ट...

एक होती चिमणी...


गोष्ट आहे छोटीशी दिसणा-या चिमणी आणि सहज नजरेत भरणा-या कावळ्याची ! एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात विविध प्राणी,पक्षी राहत होते.एक दिवसजंगलाला मोठी आग लागली.आगीच्या भीतीने सर्व प्राणी, पक्षी इकडे तिकडे पळू लागले.त्यावेळी चिमणीने विचार केला ही आग विझली तरच आपले घरटे वाचेल! ध्येयाने झपाटलेली चिमणी आपल्या इवल्याशा चोचीमध्ये पाणी भरून त्या आगीवर आणून टाकू लागली. तिची ती धडपड बराच वेळ चालली.पण,आग काही आटोक्यात येईना. तिथे असलेला एक कावळा त्या चिमणीला पाहत होता.न राहवून त्या कावळ्याने चिमणीला प्रश्न केला. " चिऊताई, चिऊताई तुझ्या इवल्याशा चोचीमधील पाण्याने जंगलाला लागलेली ही आग विझणार नाही ग ?" असे म्हणून तो कावळा हसला.

       चिमणीने त्याच्या हसण्याकडे लक्ष न देता ती पुन्हा आपल्या कामात गर्क झाली.चिमणी धडपड करून चोचीत जेवढे पाणी मावेल तेवढे आणून त्या आगीवर ओतत होती.पण...ती आग वाढतच चालली होती.मात्र चिमणीची धडपड कमालीची होती.चिमणीची ती धडपड बघून कावळा आणखी मोठ्याने हसला.त्याचे ते हास्य कुत्सित होते हे मात्र खरे हं ! तो कावळा पुन्हा चिमणीला म्हणाला-
"चिऊताई,चिऊताई  तुझ्या चोचीतल्या पाण्याने आग विझेल असे वाटतंय का तुला?छे...तू ना वेडी झालीस ग बाई?" आता मात्र चिमणीला रहावले नाही.चिमणी कावळ्याला म्हणाली
" अहो कावळेदादा, कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी वेडेच व्हावे लागते.अन् हो...या जंगलाला आग लागली असता ह्या आगीला विझविण्याचा प्रयत्न करणा-यांचा जेंव्हा इतिहास लिहिला जाईल न... तेंव्हा त्यात माझे नाव आग लावणा-याच्या किंवा आग लावणाऱ्यां लोकांचा समर्थकांच्या यादीत नसेल.माझे नाव नक्कीच आग विझवणा-यांच्या यादीत सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल !"

तात्पर्य -  प्रामाणिकपणे कर्तव्य करणारा किती मोठा वा किती लहान याला महत्व नसून त्याने अंगिकारलेले विचार व कृतीतून जे सामाजिक ऐक्य, शांतता,समृद्धी, शांतता, स्थैर्य निर्माण होते.अशा कर्तृत्ववान व्यक्तीचेच कार्य समाज अनंत काळापर्यंत आदर्श म्हणून स्मरणात ठेवतो.

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल " पुष्प"


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...