Kaayguru.Marathi

रविवार, ऑक्टोबर १७, २०२१

रुप-स्वरुप

रुप-स्वरुप (कविता)

शोना, क्षणभर पाहता तुला
तू माझा हृदयात केले घर
आता तर शक्यच नाही ग्
तुझ्याविना दूर राहणं क्षणभर

राणी सांगतो मी तुला ऐक !
क्षणात मनात ठसते ते रुप
विचारांना समजून घेऊन 
डोळ्यात साठते ते स्वरूप

प्रिये, तुझ्यासोबत ग् संचार
जीवनात भासे वसंतबहर
तुझ्या एक एक शब्द जणू 
श्वासात भरे संजिवक लहर

सखी,तू तर झाली ग् माझा
संसाराचा कणखर आधार
शब्दच सापडत नाही मला
कसे मानू मी तुझे आभार!

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

 

सुगरण

    सुगरण (कविता)
कधी शिकशील माणसा
सुगरणीची  तू  रे  कला
झाडावर  बांधीला  सुंदर
पिलांना  झुलता  बंगला

तिला  नाही   दोन  हात
ना  कोणी  रे  सोबतीला 
बघ   ईवलुश्या   चोचीने
खोपा   अविट   विणला

तिला   माहित  ना  माप
इंच   मिटर   अन्    फूट
बांधते  नाजूक  फांदीला
खोपा किती सुंदर अतूट

तीन   इंचाचा   हा  पक्षी
काडी  गुंफितो   दिसभर
पिला  आयुष्य   द्यावया
जीव   टांगतो  शेंड्यावर

मुठभरीचा  हा  रे  जीव
माया  ममतेला  चांगला
पिला  वाटते  ना  भिती
निजे बिनघोर खोप्याला

© प्रा.पुरुषोत्तम पटेल 
          " पुष्प "

शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१

जागतिक अन्न दिवस

             आज दि.१६ ऑक्टोबर : जागतिक अन्न दिवस
         आज १६ ऑक्टोबर... ' जागतिक अन्न दिवस '

संयुक्त राष्ट्रसंघाने १६ ऑक्टोबर १९४५ पासून हा दिवस
 ' जागतिक अन्न दिवस ' म्हणून निवड केली.
याच दशकात जगातील बहुसंख्य देश हे वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त /स्वतंत्र होऊ लागले होते.या देशांना विकासमार्गाची वाट चालतांना मुख्य अडचण होती " अन्न उपलब्धतेची ! " आणि हाच विधायक दृष्टिकोन ठेवून हा दिवस पालन करण्यास सुरुवात झाली.
  जगात २०२० पर्यंत कोणतीही व्यक्ती भुकेली राहणार नाही.यासाठी युएनए कडून #ZEROHUNGER
 ही एक मोहिम आखण्यात आली आहे.आजच्या दिनाच्या निमित्ताने आपणही त्यात योगदान देण्याचा संकल्प करु या !
💎 जागतिक अन्न दिवसाचे मुख्य उद्देश :-
१) जगभरातील भूक निर्मूलन कार्यासाठी जनप्रबोधन करणे.
२) उपासमारीने पिडीत लोकांसाठी अन्नसुरक्षा आणि पौष्टिक आहाराची आवश्यकता सुनिश्चित करण्यासाठी जागतिक स्तरावर जनप्रबोधन करणे.
३) " अन्न हा प्रत्येक मानवाचा मुलभूत अधिकार आहे " या बाबींवर लक्ष केंद्रित करणे.व प्रत्येकास अन्न पुरविणे.
 
💎 भूक संदर्भात विचार करता काही भयंकर मुद्दे समोर येतात.

१) सध्या जगभरात ६ कोटींहून अधिक लोक उपासमारीचे शिकार बनले आहेत.
२) दरवर्षी ४.५० लाख लोक भूक भागाााावी म्हणून दुषित अन्न सेवन करतात.त्यातच त्यांचे मृत्यू होतात.

 या दृष्टीने विचार करता २०२० ह्या वर्षी 
" वाढवा,पोषण करा,टिकाव धरता,एकत्र या![Grow,Nourish,Sustain, Together]" ही मध्यवर्ती कल्पना (थिम ) निश्चित केली होती.

💎 यंदा २०२१ ची थिम - 

" उद्या निरोगी,उद्या सुरक्षित अन्न ! "

 यानुसार विचार करता आपल्या देशात दर मिनिटाला कुपोषणामुळं दोन बळी जातात. घरात इन मीन तीन माणसं असतानाही नको तितकं स्वयंपाक करुन शिल्लक अन्न फेकून दिलं जातं. आपण हॉटेल मध्ये जेवायला जातो.तेव्हा पाहतो की,डिश मधले जितके खाल्ले जाते.त्याच्या पस्तीस ते चाळीस टक्के अन्न उष्टे म्हणून शिल्लक राहते.हे वास्तव कोणी नाकारू शकत नाही.तसेच हॉटेलमधून पार्सल आणलं की घरातील पोळीभाजीकडं कोणी पाहतही नाही... अन्नाची ही अशी ‘ किंमत ’ केली जात आहे. उत्पादित अन्नधान्य व फळांपैकी सुमारे ४० टक्के सडून / खाली सांडून वाया जातंय. त्यामुळं अन्नाची नासाडी रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. 

💎 लग्न समारंभातील ​अक्षतांचा वापर

हिंदू वैदिक विवाह पद्धतीनुसार लग्नात ‘ वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकण्याची परंपरा आहे.एका अभ्यास पाहणीनूसार एका लग्नामध्ये सरासरी पाच किलो तांदूळ अक्षतासाठी वापरला जातो. त्यातील फक्त अर्धा किलो तांदूळ वधू-वरांच्या डोक्यावर पडतो. एकूण टाकलेल्या अक्षतांपैकी फक्त दहा टक्केच अक्षता वधू-वरांच्या डोक्यावर पडतात.उर्वरित अक्षता आपल्या एकमेकांच्याच डोक्यावर पडतात,काहीवेळा डोळ्यात जातात.व ईजाही होते. अक्षता म्हणून टाकलेला व फेकलेला उर्वरित तांदूळ पायदळी तुडवला जातो. राज्यात सरासरी दीड लाख विवाह समारंभ होतात.त्यातून सुमारे सहा लाख किलो तांदळाची नासाडीच होते.हा तांदुळ वाचविण्यासाठी लग्नवेदीच्या ठिकाणी दोन मुली उभ्या केल्या व त्यांनी सर्वांच्या वतीने अक्षता टाकल्या तर केवळ शंभर दोनशे ग्रॅम अक्षता वापरून उर्वरीत तांदुळ वाचवता येईल.व त्या तांदुळामुळे दोनशे ते तिनशे लोकांची भूक भागविली जाईल.हाच विचार करून व परिस्थिती लक्षात घेऊन काही संस्था अक्षतांचे तांदूळ गोळा करून गरजू व्यक्तींना दान करतात.

💎 ​लग्नसोहळ्यातील अन्नाची नासाडी

सध्या परिस्थितीत लग्नसोहळ्यातील जेवणावळीचं स्वरुप बदलत आहे. आता पंगतीची पारंपरिक पद्धत कमी झाली असून त्याची जागा बुफे जेवणानं घेतली आहे. ही पद्धतही काही वाईट नाही. मात्र रांग लावून ताट वाढून घेण्याचा त्रास वाचविण्यासाठी अनेक जण ताटात गरजेपेक्षा जास्त वाढून घेतात. लहान मुलांच्या ताटातही सर्व पदार्थ वाढून घेतले जातात.पूर्ण न खाता ताटातुट उष्टे शिल्लक राहते.व ते कचरा कुंडीत तसेच फेकून दिले जाते. या प्रकारामुळं अन्नाची डोळ्यांदेखत नासाडी होत आहे. त्यापेक्षा हवे ते पदार्थ,हवे तितकेच घेऊन " अन्न हे पुर्णब्रम्ह " हा विचार केला तर अन्नाची नासाडी टळेल. उरलेलं अन्न गरजूंना वाटता येईल.

💎 पंगतीत आग्रहाने जेवण वाढणे 

आमच्या भागात अनेक लग्न समारंभात ,कार्यकमाप्रसंगी दिड दोन हजार लोकांची एकच पंगत बसविली जाते.त्यात खास अतिथींना,व-हाडींना, व्याही मंडळींना खास आग्रह करुन " नको ,नको, म्हणतानाही " वाढलं जात.ते खाल्ले न गेल्याने पत्रावळीवर शिल्लक राहते.व उष्टे आणि वाया म्हणून फेकून दिले जाते.हा अनावश्यक खर्च सद्विवेक बुद्धीने टाळता येईल.व अन्नाची नासाडी थांबवता येईल.

💎 ​विविध उपक्रम

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी तरुण समाजसेवक आणि स्वयंसेवी संस्था यांनी पुढे यावे. संस्था, समाजसेवक ,यांनी जनप्रबोधन करावे.लग्नसमारंभ,कार्यक्रमातील, हॉटेल्समधलं उरलेलं अन्न मिळवावे आणि भुकेल्या गरिबांमध्ये त्याचे वाटप करावे. यामुळं शिजवलेलं अन्न वाया जाणार नाही ते गरजू व्यक्तींच्या मुखात पडेल.व भूक शमविल्याचे आशीर्वाद घेता येईल.

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


वाढदिवस (अलककथा)

                           🎂 💐 वाढदिवस ❤️💎

भूमिका घरातील कामं नेहमीप्रमाणेच लगबगीनं आवरण्यात गुंग होती. ट्रिंगऽऽऽट्रिंग फोनची घंटी वाजली. दुपारचा एक वाजला होता.तीने धावत जाऊन फोन घेतला.
" हॅलो! मॅम, भूमिका बोलताहेत का ? " 
" हो.मी भूमिकाच बोलतेय ? आपण कोण ?"
" मॅम ! जिज्ञासा..तिचा गाडीला अपघात झाला.आम्ही तिला लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये नेतोय,तुम्ही तिथेच या ! "
" ती बरी आ...ऽऽऽहॅलो,हॅलो…! फोन कट झाला होता."
तिच्या मनाची घालमेल सुरु झाली.तिच्या मनात शंका-कुशंकाचे लहान मोठे बेडूक टूणऽऽकन उड्या मारुन एकेक करीत बाहेर पडू लागले.तीला क्षणात घाम फूटून ती घाबरली.अस्वस्थपणे येरझाऱ्या घालू लागली.
   अंगणात बाईक थांबली.दररोज पाच वाजता येणारा अमेय आज एक वाजताच घरी पोहचला होता.त्याला पाहताच ती धावतच बाहेर आली. " बाळ,चल! बाईक स्टार्ट कर.लवकर....लाईफलाईनला पोहचायचयं आपल्याला ! जिज्ञासाला अपघात झालाय रे ! "
दहा मिनिटातच अमेय आणि भूमिका धावतच विचारांचे वावटळ घेऊन लाईफलाईनच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहचले.पाहतात तर,जिज्ञासा हातात बुके घेऊन हास्य करीत तिच्याकडे धावतच आली.

" Happy Birthday My Dear…💐💐💐"

आणि तिने तिला चक्क मिठीच मारली.
"जिज्ञासा,काय हा मुर्खपणा ? तू,आणि मग तो फोन ?"
भूमिकाला पुढे बोलू न देता ती म्हणाली, 
" वेडाबाई, I Lied ! Prank होता तो ! रांधा-वाढा-उष्टी-काढा ह्या वातावरणातून तुला बाहेर काढण्यासाठी…! बाहेरही एक सुंदर विश्व आहे ते आपली आतुरतेने वाट पाहतेय.हे तुला कळावे म्हणून ! चल, खूप मस्ती, मज्जा, धम्माल करु आपण ! "
अमेय त्या दोघीकडे अचंबीत होऊन पाहत होता.
[ टिप: ही कथा एक निव्वळ कल्पनारम्यता असून वास्तवाशी संबंधित नाही.तसे आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.]  
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
    म्हसावद


शुक्रवार, ऑक्टोबर १५, २०२१

बापरे🤭 रावण बोलतोय !🤔

      ✍️जय श्रीराम!🌹🙏
    🤭 बापरे,रावण बोलतोय!🤭

आज विजयादशमी...रावण दहनाचा कार्यक्रम करण्यात आला.मी तिथे उत्सुकता म्हणून गेलो होतो.रावण (प्रतिकात्मक पुतळा) जळतांना चक्क बोलू लागला…!
लोकहो,मी सितेचे एकदाच
अपहरण केले हो !
पण...तुम्ही मला दरवर्षीच
जाळतात हो ! का अन्याय ?

मी सीतादेवीच्या मनाविरुद्ध 
कधी अघोरी वागलोच नाही
अशोक वनात तिच्या सावलीला
क्षणभरसुद्धा थांबलो नाही

सितादेवीच्या अंगालाच काय
नाही घातला वस्रालाही हात 
खरे तर तुम्हीच वागता अघोरी
उत्तर द्या! हिंमत आहे कुणात

तुमच्या राज्यात पावलोपावली
रोज होतात अन्याय अत्याचार
श्रीराम होऊन रामराज्य आणा
करा सारासार तुम्ही विचार !

पोरी- बाळींच्या ईभ्रतीचे तर
तुम्ही लचकेच तोडतात
जाळण्याचा लायकीचे तुम्ही
पण...मलाच का जाळतात?

ऐका,प्रश्न आहे तुम्हाला माझा 
तुमच्या हृदयात आहे न् राम ?
असाल लक्ष्मणाइतके पावन
तरच करा मला जाळायचे काम

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " 






Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...