Kaayguru.Marathi

जीवन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जीवन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, मार्च १४, २०२२

सप्तरंग

सखे...ओळखायला शिक तू
जनमाणसांचे  उधळलेले  रंग
संशयाचे  काढून  फेक पोपडे
हर्ष येईल दारी टळेल प्रीतभंग

सखे...ओळखायला  शिक तू
तानापिहिनीपांजा रंगाचे  धर्म
कोणीही चोरी करु शकत नाही
तुझे   माझे   गोड  प्रेमळ  वर्म !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


गुरुवार, फेब्रुवारी ०३, २०२२

कुमुदिनी

जीवन  आहे एक उद्यान
निष्ठेने  करावी   मशागत
उमलतील  मग  पदोपदी
कोमल  पुष्प  शत - शत

सुख म्हणजे काय असते
शिकवते  हो  ही हिरवाई
दुःख   विसरावे  कसे   ते
सांगून  जाते  जाई - जुई

आज उमलले  ते उद्याला
कोमेजणार  आहे   जरुर
अखेरचा  श्वासा  पर्यंतची 
किर्ति  गंध वाटावा भरपूर

दुःख  क्लेश  चिंता समज
तू  गुलाबपुष्पाची पाकळी
काट्यासवे   राहून   सुद्धा 
ती आनंदें  फुलवा उद्यानी

करु  नये आयुष्यात कधी
घरोबा  गर्व  अभिमानाशी
सांगून  जाती पिवळी पर्णे
नाते  जोडताना मृत्तिकेशी

बहरु  द्यावी  हो आनंदवेल
अनुभवा  फुले  ताजेतवाने
भ्रमर  होऊन  कुमुदिनीशी
गुणगुणावे गोड जीवनगाणे 

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


मंगळवार, फेब्रुवारी ०१, २०२२

सूर्योदय


अंधकारातून होतो उष:काल
उषःकाल दाखवतो उजेडाची वाट
घाट माथ्यावर प्रकटतात नाजूक किरण
किरणांच्या जमून गोतावळा
भरतो प्रकाशकिरणांचा मेळा
करती ते आनंदाची बरसात
आशेच्या सरोवरात फुलतात
कल्पनेचा अगणित कुमुदिनी ...
मनाला उल्हसित करणारी प्रतिदिनी
सुगंधित प्रकाश वाटेच्या 
होतो मी पांथस्थ
चालू लागतो संथ-संथ
जूने टाकून घेतो मी नवे
सुसंस्कार सुविचार जे जे हवे
उघडतो मी विचारकप्पा
सोडून देतो दिगंतराळी
दुःख क्लेश चिंतेचे कातरवेळी जमलेले
अगणित  पाखरांचे थवे !
सूर्योदय होताच...!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, जानेवारी १६, २०२२

भ्रम

मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो...
हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे...
खरं तर यापैकी आपलं नसतं काही
खरंतर तुमची फक्त वेळ आहे !
ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे
नाहीतर...
सर्व जवळ असून सुध्दा परके...!
बोलायचं असतं मनातलं सारं काही
पण ऐकणारं नसतं कुणी 
सल असली तर सांगायची राहते
बल असलं तर दाखवायचं
राहून जातं...सारं काही !
साठत जातं मनाच्या कप्प्यात
एखाद्या अडगळीच्या खोलीत 
साठत जावं तसं...!


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
      

  

सोमवार, जानेवारी १०, २०२२

मानवा समजून घे !

मानवा जागा हो!

मतलबासाठी नेहमीच  पुढे  पुढे
अनंत  कोटी - कोटी अनंत हात
अखेरच्या  क्षणी रे   सरणावरती
शुष्क  लाकडांचीच मिळते साथ !

सुखात  आमचाच  म्हणणारे  ही 
संकटे  येताच  हो पळ  काढतात
अखेरच्या त्या  क्षणी  माणसाला
जमीन  पुरते  हो  साडेतीन  हात

जगी कोणीच  नसतो  रे कुणाचा
सगळेच  म्हणती  हे अंतीम सत्य
तरी  हा  माझा, ती माझी,ते माझे
म्हणतच जगती इथे हे नव्हे असत्य…!

म्हणूनच   म्हणे   हा  " पुरुषोत्तम "
नको  रे  करु  मोह  नको  रे माया
जन्मभर  का   झिजवशी  मानवा
सन्मार्ग  विसरुन  स्वार्थाने काया !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, डिसेंबर ०८, २०२१

शोधेन मी [ शेल काव्य ]


तू  खूपदा  दिली आश्वासने मला

मला आता  ना अडकायचे त्यात
तुझ्याशिवाय  चालणार  वाट मी
मी   तमात   पेटवेन    नवी   वात


करावा   लागला  न्  संघर्ष   तरी
तरी    तसूभर     हटनार     नाही
मी  संघर्षात   नवी   वाट  शोधेन
शोधेन असे मी भव्य-दिव्य काही


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


सोमवार, डिसेंबर ०६, २०२१

निष्पाप शोधू कसे ? [शेल काव्य]


निष्पाप असे शोधित फिरलो मी
मी कितीक तुडवित आलो वाटा
नव्यान्नव  टक्के जन पाहिले मी
डोळ्यात क्रुरता हातात हो काटा

काटे  उचलून  त्या  वाटेवरी  मी
मी  पसरुन दिला फुलांचा  सडा
वखवखलेल्या  त्या  नजरा मात्र 
मात्र   करुन  गेल्या अखेर  राडा

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१

जागतिक अन्न दिवस

             आज दि.१६ ऑक्टोबर : जागतिक अन्न दिवस
         आज १६ ऑक्टोबर... ' जागतिक अन्न दिवस '

संयुक्त राष्ट्रसंघाने १६ ऑक्टोबर १९४५ पासून हा दिवस
 ' जागतिक अन्न दिवस ' म्हणून निवड केली.
याच दशकात जगातील बहुसंख्य देश हे वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त /स्वतंत्र होऊ लागले होते.या देशांना विकासमार्गाची वाट चालतांना मुख्य अडचण होती " अन्न उपलब्धतेची ! " आणि हाच विधायक दृष्टिकोन ठेवून हा दिवस पालन करण्यास सुरुवात झाली.
  जगात २०२० पर्यंत कोणतीही व्यक्ती भुकेली राहणार नाही.यासाठी युएनए कडून #ZEROHUNGER
 ही एक मोहिम आखण्यात आली आहे.आजच्या दिनाच्या निमित्ताने आपणही त्यात योगदान देण्याचा संकल्प करु या !
💎 जागतिक अन्न दिवसाचे मुख्य उद्देश :-
१) जगभरातील भूक निर्मूलन कार्यासाठी जनप्रबोधन करणे.
२) उपासमारीने पिडीत लोकांसाठी अन्नसुरक्षा आणि पौष्टिक आहाराची आवश्यकता सुनिश्चित करण्यासाठी जागतिक स्तरावर जनप्रबोधन करणे.
३) " अन्न हा प्रत्येक मानवाचा मुलभूत अधिकार आहे " या बाबींवर लक्ष केंद्रित करणे.व प्रत्येकास अन्न पुरविणे.
 
💎 भूक संदर्भात विचार करता काही भयंकर मुद्दे समोर येतात.

१) सध्या जगभरात ६ कोटींहून अधिक लोक उपासमारीचे शिकार बनले आहेत.
२) दरवर्षी ४.५० लाख लोक भूक भागाााावी म्हणून दुषित अन्न सेवन करतात.त्यातच त्यांचे मृत्यू होतात.

 या दृष्टीने विचार करता २०२० ह्या वर्षी 
" वाढवा,पोषण करा,टिकाव धरता,एकत्र या![Grow,Nourish,Sustain, Together]" ही मध्यवर्ती कल्पना (थिम ) निश्चित केली होती.

💎 यंदा २०२१ ची थिम - 

" उद्या निरोगी,उद्या सुरक्षित अन्न ! "

 यानुसार विचार करता आपल्या देशात दर मिनिटाला कुपोषणामुळं दोन बळी जातात. घरात इन मीन तीन माणसं असतानाही नको तितकं स्वयंपाक करुन शिल्लक अन्न फेकून दिलं जातं. आपण हॉटेल मध्ये जेवायला जातो.तेव्हा पाहतो की,डिश मधले जितके खाल्ले जाते.त्याच्या पस्तीस ते चाळीस टक्के अन्न उष्टे म्हणून शिल्लक राहते.हे वास्तव कोणी नाकारू शकत नाही.तसेच हॉटेलमधून पार्सल आणलं की घरातील पोळीभाजीकडं कोणी पाहतही नाही... अन्नाची ही अशी ‘ किंमत ’ केली जात आहे. उत्पादित अन्नधान्य व फळांपैकी सुमारे ४० टक्के सडून / खाली सांडून वाया जातंय. त्यामुळं अन्नाची नासाडी रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. 

💎 लग्न समारंभातील ​अक्षतांचा वापर

हिंदू वैदिक विवाह पद्धतीनुसार लग्नात ‘ वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकण्याची परंपरा आहे.एका अभ्यास पाहणीनूसार एका लग्नामध्ये सरासरी पाच किलो तांदूळ अक्षतासाठी वापरला जातो. त्यातील फक्त अर्धा किलो तांदूळ वधू-वरांच्या डोक्यावर पडतो. एकूण टाकलेल्या अक्षतांपैकी फक्त दहा टक्केच अक्षता वधू-वरांच्या डोक्यावर पडतात.उर्वरित अक्षता आपल्या एकमेकांच्याच डोक्यावर पडतात,काहीवेळा डोळ्यात जातात.व ईजाही होते. अक्षता म्हणून टाकलेला व फेकलेला उर्वरित तांदूळ पायदळी तुडवला जातो. राज्यात सरासरी दीड लाख विवाह समारंभ होतात.त्यातून सुमारे सहा लाख किलो तांदळाची नासाडीच होते.हा तांदुळ वाचविण्यासाठी लग्नवेदीच्या ठिकाणी दोन मुली उभ्या केल्या व त्यांनी सर्वांच्या वतीने अक्षता टाकल्या तर केवळ शंभर दोनशे ग्रॅम अक्षता वापरून उर्वरीत तांदुळ वाचवता येईल.व त्या तांदुळामुळे दोनशे ते तिनशे लोकांची भूक भागविली जाईल.हाच विचार करून व परिस्थिती लक्षात घेऊन काही संस्था अक्षतांचे तांदूळ गोळा करून गरजू व्यक्तींना दान करतात.

💎 ​लग्नसोहळ्यातील अन्नाची नासाडी

सध्या परिस्थितीत लग्नसोहळ्यातील जेवणावळीचं स्वरुप बदलत आहे. आता पंगतीची पारंपरिक पद्धत कमी झाली असून त्याची जागा बुफे जेवणानं घेतली आहे. ही पद्धतही काही वाईट नाही. मात्र रांग लावून ताट वाढून घेण्याचा त्रास वाचविण्यासाठी अनेक जण ताटात गरजेपेक्षा जास्त वाढून घेतात. लहान मुलांच्या ताटातही सर्व पदार्थ वाढून घेतले जातात.पूर्ण न खाता ताटातुट उष्टे शिल्लक राहते.व ते कचरा कुंडीत तसेच फेकून दिले जाते. या प्रकारामुळं अन्नाची डोळ्यांदेखत नासाडी होत आहे. त्यापेक्षा हवे ते पदार्थ,हवे तितकेच घेऊन " अन्न हे पुर्णब्रम्ह " हा विचार केला तर अन्नाची नासाडी टळेल. उरलेलं अन्न गरजूंना वाटता येईल.

💎 पंगतीत आग्रहाने जेवण वाढणे 

आमच्या भागात अनेक लग्न समारंभात ,कार्यकमाप्रसंगी दिड दोन हजार लोकांची एकच पंगत बसविली जाते.त्यात खास अतिथींना,व-हाडींना, व्याही मंडळींना खास आग्रह करुन " नको ,नको, म्हणतानाही " वाढलं जात.ते खाल्ले न गेल्याने पत्रावळीवर शिल्लक राहते.व उष्टे आणि वाया म्हणून फेकून दिले जाते.हा अनावश्यक खर्च सद्विवेक बुद्धीने टाळता येईल.व अन्नाची नासाडी थांबवता येईल.

💎 ​विविध उपक्रम

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी तरुण समाजसेवक आणि स्वयंसेवी संस्था यांनी पुढे यावे. संस्था, समाजसेवक ,यांनी जनप्रबोधन करावे.लग्नसमारंभ,कार्यक्रमातील, हॉटेल्समधलं उरलेलं अन्न मिळवावे आणि भुकेल्या गरिबांमध्ये त्याचे वाटप करावे. यामुळं शिजवलेलं अन्न वाया जाणार नाही ते गरजू व्यक्तींच्या मुखात पडेल.व भूक शमविल्याचे आशीर्वाद घेता येईल.

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


बुधवार, ऑक्टोबर १३, २०२१

आयुष्य (चारोळी)

गड्या आयुष्य खूप सुंदर आहे
🌺❤️🌺❤️🌺❤️🌺❤️🌺

ते आनंद - मस्तीत जगावे,पण
🌹💎🌹💎🌹💎🌹💎🌹

ऐसे  करावे  कर्म - धर्म आपुले
🦚🦋🦚🦋🦚🦋🦚🦋🦚

चंद्र - सूर्य असे  तो अमर व्हावे
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, ऑक्टोबर १२, २०२१

भ्रम

मनुष्य भ्रमात जीवन जगतो...
हा माझा तो माझा
 माझ्या जवळचे माझे...
खरं तर यापैकी कोणीही आपलं नसतं काही
खरंतर तुमची फक्त वेळ आहे !
ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे !!!
नाहीतर...सर्व जवळ असून सुध्दा परके...!
बोलायचं असतं मनातलं सारं काही
पण ऐकणारं नसतं कुणी !
सल असली तर सांगायची राहते
बल असलं तरी
दाखवायचं राहून जातं...सारं काही !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, ऑक्टोबर ११, २०२१

धुके

धुके...
निराशेचे विरत गेले
मातीशी इमान राखून
ध्येय शिखर नजिक आले

धुके...
संकटाचे विरत गेले
मनाच्या विशाल आभाळी
शरदाचे चांदणे शिंपीत  गेले

धुके...
क्लेशाचे विरत गेले
माणूस एकाच देवाची लेकूरे
प्रीतिने सकल मेळवावे

धुके...
संशयाचे विरत गेले
प्रसन्न परिमळ पहाटे
प्राजक्त श्वासात भरुन गेले

धुके...
अपयशाचे विरत गेले
जणू रविकिरणांच्या स्पर्श होता
मुखकमल प्रसन्न फुलले

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

धुके...
निराशेचे विरत गेले
मातीशी इमान राखून
ध्येय शिखर नजिक आले

धुके...
संकटाचे विरत गेले
मनाच्या विशाल आभाळी
शरदाचे चांदणे शिंपीत  गेले

धुके...
क्लेशाचे विरत गेले
माणूस एकाच देवाची लेकूरे
प्रीतिने सकल मेळवावे

धुके...
संशयाचे विरत गेले
प्रसन्न परिमळ पहाटे
प्राजक्त श्वासात भरुन गेले

धुके...
अपयशाचे विरत गेले
जणू रविकिरणांच्या स्पर्श होता
मुखकमल प्रसन्न फुलले

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


शुक्रवार, ऑक्टोबर ०८, २०२१

मैं हूं ना![ शेलकाव्य ]

प्रिये, तू केलास ग् मनापासून प्लॅन
प्लॅन  खरंच  सुंदर विचारांचा होता
तुला अन् मला कळले नाही ते बेत
बेत फसले ग् भावाचे वाचलो स्वतः

प्रिये,नको करु चिंता घे ध्यानी मैं हूं ना
ना अडवू शकत ग् आपल्या दोघांना !
तू अन् मी दो जिस्म एक जान है हम
हम वो शख्स! न लढता जिंकू सर्वांना  

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, ऑक्टोबर ०६, २०२१

हास्य (शेलकाव्य)

रे  मित्रा  राहू  नको  तू  उदास नेहमी
नेहमी   राहा   संसारी  तू  हसतमुख
मंत्र  घे तू ध्यानी वजा करावे रे दुःख
दुःख  ते  दे सोडून त्यातच आहे सुख

उक्ती झाले गेले अन्  गंगेला मिळाले
मिळाले  ते  आपुले  रे गेले ते दुजांचे
ओंजळीत  मावते ते हो आपुले सुख
सुख  करीता वजा शेष राही स्वतःचे

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


गुरुवार, सप्टेंबर ३०, २०२१

राग नको रे!(शिरोमणी काव्य)

" शिरोमणी काव्य रचना' ’ हा एक शब्दाधारीत काव्य प्रकार आहे. हा फारच सुंदर आणि मनाला भावणारा काव्यप्रकार आहे. काही जण याला " काव्य शिरोमणी " असेही म्हणतात.

१) या काव्यात प्रत्येक कडवे चार ओळींचे असते.

२) चार ओळीत दहा शब्दांची खालील प्रमाणे विभागणी असते.....

पहिल्या ओळीत एक शब्द,

दुसऱ्या ओळीत दोन शब्द

तिसऱ्या ओळीत तीन शब्द आणि

चवथ्या ओळीत चार शब्द

अशी एकूण दहा शब्दांची मांडणी असते.

३) एका विशिष्ट गोष्टीभोवती या काव्याची पूर्ण वीण गुंफलेली असते. हा शब्द प्रत्येक कडव्यात पहील्या ओळीत स्थायी असतो. म्हणूनच कदाचित या काव्यप्रकाराला शिरोमणी हे नाव पडले असावे. बाकीच्या तीन ओळीत त्याचे गुणवर्णन अथवा सकारात्मक किंवा नकारात्मक भाव दर्शविलेले असतात.

४) प्रत्येक कडव्यातील दुसऱ्या-चौथ्या किंवा तिसऱ्या-चौथ्या ओळीत यमक जुळलेले असावे.

५) कडवी किती असावी, याला मर्यादा नाही.

-: माझी स्वरचित शिरोमणी काव्य रचना :-

राग
असतो वाईट
लागू नये नादी
करतो तो जीवनाची बर्बादी

राग
नसे चांगला
करु नये जवळ
नष्ट करीतो जगण्याचे बळ

राग
ठेवा नियंत्रित
सोडू नये मुक्त
देहाचे प्रतिक्षण आटवी रक्त

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


शनिवार, सप्टेंबर २५, २०२१

भागाकार!

आयुष्या ! 
तुला लाविला मी लळा
माणसांचा जमवला गोतावळा
सोसिल्या अनंत कळा
विश्वासघाती लोकांनी
केसाने कापला गळा
असह्य झाल्या झळा

" त्यांना " सुख द्यायला
प्राजक्त झालो मी !
मनसोक्त बहरलो
नाजूक श्वेत पुष्पानी
स्नेहाचा परिमळ 
राखून न ठेवता
वाटतच सुटलो...
वा-याच्या अश्वावर
स्वार होऊन !

सुगंध घेऊन मात्र...
बहुतेकांनी तुडवले
पायदळी...!
छिन्न विछिन्न
रक्तरंग होईतो !

वाटलं...
स्वतःच्या आयुष्याचे
गणित सोडवताना
उगीच करीत राहीलो मी
स्वतःच्या जगण्याचा भागाकार
आणि इतरांचे गणित 
सोडवताना मात्र ... मी
करीत गेलो गुणाकार!

शेवटी आयुष्याला 
आकार देतांना
सांधताना बांधताना...
साधलं काहीच नाही
पण...अनुभवला मी
माझ्याच दुख-या मनाचा
भागाकार !!!

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


शुक्रवार, सप्टेंबर २४, २०२१

यशसिद्धी

यशसिद्धी

आले अपयश जरी
खचून नका जाऊ
करा प्रयत्न पुन्हा पुन्हा
नक्की यशस्वी होऊ
          अपयशातून यशाची
          घडते पहिली कृती
          म्हणती थोर विभूती
          हिच तर खरी उक्ती
अपयश आले म्हणूनी
संपवू नको जीवन
ठेवा जिंकायचा ध्यास
शिखर बघाया शिका
          अपयश पचवायला
          काळीज ठेवा वाघाचे
          दडले त्यात रहस्य
          यशाकडे जाणाऱ्या श्रेयाचे
अपयश तर शिकवी
नवे ज्ञान क्षणोक्षणी
अशाच अनंत वेड्यांची
इतिहास सांगतो कहाणी

 © प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्पम् "
     म्हसावद, जि.नंदुरबार

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...