तुला अनंत गोड गोड आशीर्वाद !
आठवतंय रं बच्चा तुला? मी तुझा दद्दूऽऽऽ !
खूप दिवस झालेत ना रे आपल्याला भेटून ! तुला माझी आठवण नाही येत का रे लऽऽब्बाडा ? तुझा दद्दुला भेटावसं नाही वाटत तुला ? जाऊ दे ! मी पण काय वेडेपणा करतोय तुझ्याशी ?
विट्टू,तुझी अन् माझ्या बछड्याची आठवण आली,म्हणून पाणावलेल्या डोळ्यांनी अन् थरथरल्या हातांनी हे पत्र लिहितोय तुला !
मला कळतंय रे विट्टू...तुझा पंखात भरारी घेण्याचं बळ नाही आलं अजून.अन् ऊंच आभाळी झेप घेण्याचं माझ्या पंखातल बळ संपून गेलंय आता…!
आता लक्षात आलं विट्टू...आपली प्रिय माणसं दूर झाली की आठवणी जास्तच उफाळून येतात.तळ्यातील पाण्यावर खडा मारताच अनेक वलयं एकामागे एक उठावित न् अगदी तसंच आठवणींचंही असतं हो !
माझ ही तसं झालं रे बच्चा ! एकटा आहे न् तुझा दद्दु म्हणून...
तू मला भेटायला यावं,ही वेडी आस उगाच लागली मला.विट्टू,माझ्या- तुझ्या भेटीला सहा वर्ष झालीत बरं का!पण ह्या सहा वर्षांत मी माझ्या बछड्याचा आणि विट्टू तुझा वाढदिवस आवर्जून साजरा करतोय.मनाने मी तुमच्याजवळ आल्याचा भास होतो मला.बच्चा,तू असो वा माझ्या बछडा... माझ्यापासून दूर असला म्हणून काय रक्ताची नाती तुटतात का रे ? नाही हं!
मी घरी होतो तेव्हा तू अवघ्या सहा महिन्यांचं पिल्लू होतास.तुझी माझी छान गट्टी जमली होती.
ईवल्याशा डोळ्यांनी तू मला पाहायचा.पाहून गोड हसायचा.तेव्हा मला स्वतः ला खूप आनंद व्हायचा.तुझं ते गोरे गोरे गाल, निळेशार काबरे, डोळे… अरे हां ,
काब-या डोळ्यावरनं आठवलं,तुझ्या आजीच्या डोळ्यासारखेच तूझे ते डोळे आहेत.तुझ्या डोळ्यात मला तुझी आज्जी दिसायची.ती गेली तेव्हा तुझी मम्मा का मम्मी,की आई ...तू आत्ता बोलायला लागला असशील ना रे विट्टू? काय म्हणतो माहित नाही मला.म्हणून अलिकडचे सगळी आईविशेषणे नमूद करुन दिली.तेव्हा सून म्हणून घरी आली नव्हती.
तुझ्या आजीला जाऊन चार महिने झाले.आणि तुझ्या आत्याचं व तुझ्या पप्पाची...पप्पाच म्हणतोस ना? माहिती यं मला,तू नक्की पप्पा किंवा डॅडू म्हणत असशील.म्हणजेच माझ्या बछड्यांचं मी लग्न लावून दिलं.तुझी आत्या बिच्चारी आमचं दोघा बाप-लेकांचं सकाळ संध्याकाळचं सगळं काही करीत करीत सासरी निघाली अन् तुझ्या आईनं लक्ष्मीच्या पावलांनी उंब-यावरचं माप ओलांडून घरात सून म्हणून प्रवेश केला.मी पण काय लिहितोय अन् बोलतोय तुझ्याशी...वाहवत गेलो रे विट्टू…काय सांगतोय तुला मी हे ? जाऊ दे,तुला नाही कळायचं हे!
तर तू नुकताच नजरेला नजर भिडवू लागला होता.
ए विट्टूऽऽ अशी हाक ऐकताच माझ्याकडे बघायचा,गाली हसायचा.हसतांना तुझ्या दोन्ही गालांवर गोड खळी पडते हं.पाहिलीस का तू ? आरशासमोर जाऊन उभा रहा बरं! दिसेल तुला ती खळी.
त्या खळीत मला माझ्या लहानपणीच्या बछड्या दिसायचा !असो,तू आता बोलायला लागला असशील,घरभर धावत असशील,माझ्या बछड्या हट्ट करायचा अन् मागितलेली वस्तू,पदार्थ मिळत नाही तोपर्यंत रडून रडून आकांड करायचा ,अख्खं घर डोक्यावर घ्यायचा.तू तसं काही करु नकोस हं बाळा !
तुला सांगतो,तो दहा वर्षांचा असतांना त्याला आईस्क्रीम खायचं होतं.तुझ्या आजीने शरबत दिलं.म्हणून पठ्ठयानं काचेच्या ग्लास माझ्या नाकावरच फेकून मारला.तो फूटला.त्याचे दोन काचेचे तुकडे माझ्या गालात घुसले.ते काढतांना मला जखम झाली.ते दोन व्रण आजही मी माझ्या गालावर कौतुकाने मिरवतोय !
विट्टू, तुला सांगतो,त्या जखमांनी महिनाभर खूप त्रास झाला मला.
शेवटी काय? बाळहट्टच ना !
होतात अशा चुका.त्या चुकांना आई बापानेच तर पोटात घालायच्या असतात.आपलेच दात,आपलेच ओठ! तक्रार तरी कोणाकडे करणार? असो.
सगळं काही सुखेनैव चाललं होतं.म्हणतात ना...सुखाला ही ग्रहण लागते म्हणे ! तुझ्यासाठी खूप मोठ्ठा शब्द झाला रे हा.आता नाही पण पुढे मोठ्ठा झाल्यावर कळेलच तुला ह्या शब्दाचा अर्थ !
आपल्या शेजारी एक कुटुंब राहायला आलं.त्या कुटुंबाने आपल्या आई-वडिलांना दूरवर वृद्धाश्रमात ठेवलं होतं म्हणे! " आई-बाबांना उतार वयात वृद्धाश्रमात ठेवायचं नसतं हो बाबा! असं कसं वागू शकतात हे लोक?"
हे दु:ख माझ्या बछड्या माझ्याशी व्यक्त करायचा.ते ऐकून मी जगातला आदर्श बाप असल्याचा मला अभिमान वाटायचा!
विट्टू,ऐक बच्चा,ती सून व मुलगा आणि त्यांचा एक मुलगा-मुलगी असं चौकोनी कुटुंबाची आपल्या कुटुंबाशी गट्टी जमली.त्या सुनेचं आपल्याकडे येणं जाणं वाढलं…
आपल्या घरात मंथरा घुसली.अरे विट्टू,विसरलोच बघ गड्या,तूला काय कळणार मंथरा ?
मनात खूप इच्छा होत्या.तुझ्याशी खेळावं,बोलावं,तुझे हट्ट पुरवावे,तुला हवे नको ते कोड-कौतुक करावे.गोष्टी सांगाव्या, रामायण,महाभारत,शिवभारत,शुभंकरोती शिकवावे,पण... सगळं काही मनातंच राहिलं.यातलं तुला काहीच देता आलं नाही.का? कोण जाणे ? पण ह्या गोष्टीचा मला आत्ताही खूप त्रास होतो रे…खूप अभागी ठरलो मी !
विट्टू,तू जन्माला आला तेव्हा मी आपल्या गावाकडे अख्या गावात पेढ्यांचे बॉक्स वाटले होते. ही फुशारकी नाही तर जिव्हाळा होता बरं.माझ्या बछड्यांला विचारलं तर तोसूद्धा आनंदाने ही गोष्ट सांगेल.म्हणतात ना रे…" नातू म्हणजे दुधावरची साय ! " तो आनंद आठवला की मला आजही नवचैतन्य मिळत हं ! "
विट्टू,तर तुला गोष्ट सांगतो.ऐक!पत्रातून का असेना,पण मनातली अतृप्त इच्छा आज पूर्ण करुन घेतो.
" अयोध्येला दशरथ नावाचा राजा होता.त्याला होत्या तीन राण्या.मोठी राणी कौसल्या.तिच्या पुत्र म्हणजेच मुलगा हो, त्याचं नाव राम होते.हा राम अयोध्येचा राजा होणार होता.अयोध्येत तशी तयारी पण झाली होती.आणि हो...एक कैकयी नावाची राणी होती.तीची दासी होती मंथरा.ही दासी वाईट विचारांची होती म्हणे! मंथराने कैकयीच्या कानात रात्रीलाच वाईट विचार भरले.म्हणाली,तुझा पुत्र भरताला राजा बनव.म्हणजे तू राजमाता होशील ! ते कैकयीने ऐकले.ती दशरथ राजाकडे गेली.म्हणाली,राजा,माझा भरताला राजा बनवा आणि रामाला चौदा वर्ष वनवासात पाठवा.विट्टू,तुला सांगतो,हे ऐकून त्याने कैकयीला खूप विनवण्या केल्या.असं करु नकोस म्हणून तो तिच्यापाशी रडला,पण कैकयीने ऐकलं नाही.कैकयीचा वेडेपणा पुढे दशरथ राजा अडला.त्याने आपल्या आवडत्या रामाला वनवासात पाठवले.भरताला राजा बनवले.हे सगळं केवळ मंथरेमुळे झालं हं! तर अशी आहे ही मंथरेची गोष्ट."
तुझे मम्मा डॅडू हळूहळू शेजारच्या त्या कुसंस्कारी कुटूंबाच्या आहारी गेले.मंथरेप्रमाणे त्यांनीही माझ्या बछड्याचे व सुनेचे कानात माझ्याबाबत विष भरवायला सुरुवात केली.मला बाबा म्हणणारी माझी सून रोज या ना त्या कारणाने माझा अपमान करु लागली.माझा बछड्याशी माझ्याबाबत खोटं-नाट सांगू लागली.रोज रोज शांत, समृद्ध घरात दोघा नवरा बायकोत कलह,भांडणं होऊ लागली.मी माझ्याच रक्ता-मांसांन उभारलेल्या घर-भिंतीमध्ये मी थेरडा,परका ठरु लागलो.
विट्टू , हे पाहून मन माझे विषण्ण झाले.घरात तुझ्या आजीने संग्रहीत केलेली व मला आवडलेली एक कविता मी आपल्या कुटुंबाच्या फोटोजवळ भिंतीवर लावलेली होती.तो फोटो काढून मी सोबत घेऊन आलोय हं.ती कविता तुला कळावी, म्हणून पत्रात लिहितोय. विट्टू ,ही कविता नक्की वाचून घे हं !
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा नकोत नुसती नाती
त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी
त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी
अश्रूतुनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी
या घरट्यातुन पिल्लू उडावे दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती
तुझ्या डॅडूच्या वाढदिवस साजरा झाला.अन् मी मनोमन ठरवलं,या घरातून आपणही वृद्धाश्रमात जावं! आपला संसार झाला.संसाररथाचं एक चाक म्हणजे तुझी आजी कधीच सोडून गेलीयं.रहिलेलं एक चाक लंगडत चाललंय.मग आपली अडचण का करावी.ठरवलं...
तसं आजच्या पोराबाळांच्या संसारात म्हातारे आई-बाबा हे अडगळच ठरतात म्हणे !म्हणजेच वठलेले झाड. फुलं-फळं येणार नाहीत असे बिनकामाचे झाड ठरतात ! त्यांची सावलीच नसते मग कोण उभं राहणार त्याच्याखाली ? हे कळलं मला! त्यापेक्षा आपणच स्वतः घराबाहेर पडावं.ही इच्छा तुझ्या मम्माला सांगितली.ती खूप आनंदली.तिनं माझ्या बछड्यालाही तयार केलं.मी तर मनानं तयारच होतो.
आणि पाच वर्षांपूर्वी तुझ्या मम्मा- डॅडूनं मला वृद्धाश्रमात आणून सोडले.तेव्हापासून तर आजपर्यंत ते मला भेटायला देखील आले नाही.कदाचित नोकरीमुळे त्याला वेळ मिळत नसावा.हे माहिती आहे मला!असो.
विट्टू,तुला एक विनंती करतो बच्चा,आई-बाबा आपले दैवत असतात.म्हातारपणात त्यांची सेवा करणे सोडून त्यांना वृद्धाश्रमात ठेवणे .हे कृतघ्नपणाचे व मोठ्ठे पाप होय.बच्चा,प्रत्यक्ष वैकुंठाचा राणा समोर आला.तरी आईबाबांची सेवा सोडून न जाणारा पुंडलिक याच भूमीवर जन्मला.आपल्या आंधळ्या आई-बाबांना तिर्थयात्रेची इच्छा पुर्ण करण्यासाठी आई-बाबांची कावड खांद्यावर घेऊन जाणारा श्रावणबाळ समजून घे,विसरु नकोस ! बापाच्या आज्ञा प्रमाण मानुन एका शब्दावर १४ वर्ष वनवासात जाणारा राम जाणून घे ! ह्या गोष्टीतील पुंडलिक, श्रावणबाळ,श्रीराम हे तुझे आदर्श व्हावेत.विट्टू ,हे लक्षात ठेव ! विसरु नकोस त्यांना !
माझ्यावर जो एकाकीपणा ओढवला.भरलेल्या घरातून मला वृद्धाश्रमात जाणे नशीबी आलं.माझी तक्रार नाही.तुम्ही जवळ यावे ही मागणी नाही.जवळ घ्यावे ही आस नाही,तुम्ही सुखात रहा...बच्चा,ही एकच इच्छा !
विट्टू , एक गोष्ट अजून लक्षात घे ! चुकूनही वाईट विचारांच्या माणसांशी, कुटुंबाशी सलगी करु नको.त्यांच्याशी उठणं,बसणं, गप्पागोष्टी टाळणं शिक. वाईट विचारांची माणसं म्हणजे पाण्यात टाकलेला गळ होय.हे विसरु नको बच्चा!
आणि शेवटचं सांगतो,आई-बाप आपल्याला लहानाचं मोठ्ठा करतात.त्यासाठी अनंत खस्ता खातात.लहाणपणी चालता पडतांना आपल्याला तेच सावरतात.म्हणून त्यांच्या म्हातारपणी त्यांना आधार हो!त्यांना दुर लोटून, वृद्धाश्रमात टाकू नको! तू शहाणं बाळ माझं! समजून घे,तुझा दद्दुचा शब्दन्शब्द ! नियमित शाळेत जा,खुप अभ्यास कर,खोड्या करुन नकोस पण खेळात रममाण हो! मन व तन समृद्धीसाठी खेळ, व्यायाम आवश्यक आहे.माझा बछड्याचे नाव उज्ज्वल कर.तू खूप मोठठा हो! त्यांना म्हातारपणात जवळ ठेव.काळजी घे,सुखात ठेव!पेरलं तेच उगवतं.असं त्यांना कधी ऐकवू नको.याला तू अपवाद हो ! 🙏विट्टु ,ही माझी तुला हात जोडून विनंती !🙏
ऐकशील ना ? जमलं तर एकदा का असेना,पण मला भेटायला माझ्या बछड्याला म्हणजेच तुझ्या डॅडू आणि मम्माला घेऊन नक्की ये ! म्हणजे मी डोळे मिटायला मोकळा...एवढं करशील ना तुझ्या दद्दुसाठी ?
ही पहिली आणि शेवटची एकच विनंती !🙏
© प्रा.पुरुषोत्तम म.पटेल " पुष्प "
उपप्राचार्य, कुबेर हायस्कूल व उच्च माध्यमिक कला-विज्ञान विद्यालय म्हसावद,ता.शहादा,जि.नंदुरबार
मोबाईल-८२०८८४१३६४
अप्रतिम सुंदर पत्र सर
उत्तर द्याहटवामनापासून आभार सरजी!🙏🙏🙏
हटवाखूपच सुंदर पत्र लेखन सर जी💐💐👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद विजयजी!🙏🙏🙏
हटवाभावस्पर्शी लेखन केले सरजी ✍️👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवामॅडम, आभारी आहे!🙏🙏🙏
हटवासर...किती सुंदर लिहिलंय छान विचार आपल्या नातवाला सांगितले खूप सुंदर शिकवणं दिली..खूप छान संदेश देणारे पत्र.. नात्यात जिव्हाळा प्रेम असावं.. खरच सर ग्रेट अप्रतिमच पत्र लिहिलेत
उत्तर द्याहटवासरजी, मनापासून आभार!🙏🙏🙏
हटवाभारी लिहिलंय👌👌
उत्तर द्याहटवालई भारी टिप्पणी ... धन्यवाद जी!🙏🙏🙏
हटवाअतिशय सुंदर...
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद देवेन्द्रजी!🙏🙏🙏
हटवामस्त लिहलं सर 🙏😇
उत्तर द्याहटवामनापासून आभारी!🙏🙏🙏
हटवाSuper Sirji 👌👌👌
उत्तर द्याहटवाThanks Tushar!🙏🙏🙏
हटवाSupre...👌👌👌
उत्तर द्याहटवाThanks !🙏🙏🙏
हटवाफार सुंदर 👍👍👍
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏🙏🙏
हटवाखूपच सुंदर लिहलय 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून आभार!🙏🙏🙏
हटवाअतिशय हृदयस्पर्शी लिखाण, पत्र 👌👌👌👌🙏निःशब्द, डोळे पाणावले, पत्रातून संदेशही चांगला दिला आहे.
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद मॅडम!🙏🙏🙏
हटवा