Kaayguru.Marathi

सोमवार, जानेवारी २४, २०२२

लेक माझी [कविता ]

आज ' राष्ट्रीय कन्या दिन ' समस्त लेकींना समर्पित 
माझे हे काव्य !
लेक माझी
  लेक माझी…
लाडाची गुणांची खाण
तिच्या जन्मानं गायलं
देवानं माझा जीवनाचं 
अविट सप्तसुरांचं गाण ।।१।।
माझ्या संसार अंगणी
उगवलं लख्ख चांदणं छान 
   लेक माझी…
भासे नवदुर्गा अंबा,भवानी
काली,अन्नपूर्णा,जगदिश्वरी,
नवविचार नऊ रुपांनी
माझा मना येई उधाण।।२।।
माझ्या संसार अंगणी 
उगवलं लख्ख चांदणं छान
  लेक माझी…
प्रात:काळची मधुर भूपाळी
माझा जगण्याचा श्वास
जन्म माझा धन्य कराया 
देवानं दिला पित्याच्या मान।।३।।
माझ्या संसार अंगणी 
उगवलं लख्ख चांदणं छान
लेक माझी…
माझा जीवनग्रंथाचं पान 
लेकीच्या रुपात धाडलं 
भगवंताने माझा दारी 
आनंदाचं शुभवर्तमान।।४।।
माझ्या संसार अंगणी 
उगवलं लख्ख चांदणं छान
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " म्हसावद

रविवार, जानेवारी २३, २०२२

आई

  आई

आई, माझ्या जन्मासाठी 
नऊ मास नऊ दिस तू
सोसल्या अनंत वेदना 
आई, तुझ्यामुळेच 
मी पाहतोय ही दुनिया ।।१।।

आई, जन्मापासून तूच
माझ्या आद्य वंद्य गुरु 
तुझ्याच संस्कार वाटेवर 
माझी वाटचाल सुरु.   ।।२।।

आई, तुझा एकेक शब्द 
मला गीता रामायण 
कृतघ्न अन् अधम ठरे 
तुझे होता विस्मरण    ।।३।।

◽प्रा.पुरूषोत्तम पटेल " पुष्प "
 म्हसावद

शनिवार, जानेवारी २२, २०२२

बुद्धदेवाचे दर्शन !


मन झाले हो आज माझे शुद्ध
दर्शनास आले आज मज बुद्ध

दिला उपदेश मज 
पाया चिरडू नये मुंगी
उतरली हो आज माझी
अभिमानाची गुंगी
सुविचारांचा पथावर झालो शुद्ध
दर्शनास आले आज मज बुद्ध

म्हणाले मज समजून घे
न दुखवावे काया वाचा कुणा
अहिंसा परमोधर्म
ध्यानी असू दे रे मना
जन्म एक कर्म नाही रे युद्ध
दर्शनास आले आज मज बुद्ध

सर्वाभूती मीच वसे
जे जे रंजले गांजले
म्हणू नये त्यासी हिन दिन
नाम अनंत रुप वेगळाले
दावी विश्वरुप प्रकटले अनिरुद्ध
दर्शनास आले आज मज बुद्ध

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, जानेवारी २१, २०२२

श्री रिद्धी सिद्धी विनायक यात्रा म्हसावद

   

 म्हसावद.... सातपुडा पायथ्यालगत नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा तालुक्याच्या उत्तर दिशेला वसलेले एक टुमदार गाव... म्हसावदच्या खांद्याला खांदा लावून स्थिरावलेले एक अनकवाडे आणि दुसरे कोकणवाडे यांची एकच ग्रुप ग्रामपंचायत कार्यान्वित आहे. वादविवाद माहिती नसलेली ही अभिमानास्पद वैशिष्ट्य असणारी ग्रामपंचायत होय. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, भौतिक, वैद्यकीय, शेती, व्यापार, उद्योग आणि  साहित्य व संस्कृती या विविधांगी  क्षेत्रात सदैव प्रयत्नशील, उल्लेखनीय नाव म्हसावद असून येथे अनेक  वर्षांपासून सातत्याने यात्रोत्सव आयोजित होत आहे. दरवर्षी पौष मासी शु.संकष्ट चतुर्थीला यात्रा भरते. म्हसावद-तोरणमाळ रस्त्यावर पुरातन नवसाला पावणारे श्री रिद्धी सिद्धी विनायक मंदिर आहे. या दैवतांच्या पावन सान्निध्यात यात्रोत्सव साजरा केला जातो.
येथील मंदिराची वैशिष्ट्ये :-

© मंदिरातील श्री. रिद्धी सिद्धी विनायक मूर्ती  ही स्वयंभू आहे.
© मंदिर पूर्वामुखी असून दोन भागात विभागलेले आहे.
© मंदिराच्या एका भागात दक्षिणेस श्री रिद्धी विनायक देवता स्थापित असून हे उजवी  सोंड असलेले  दैवत होय.
© आणि याच  भागातील मंदिरात  शिवलिंग   असून हे तारकेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध आहे.
© उत्तरेकडील दुसर्‍या भागात श्री सिद्धी विनायक देवता स्थापित आहे. हे डावी सोंड असलेले  दैवत आहे.
© याच भागातही शिवलिंग असून ते रुद्रेश्वर महादेव म्हणून पुजिले जाते.
© दर संकष्ट चतुर्थीला स्त्री पुरुष भाविक श्रद्धाभावाने दर्शनाला येतात.

© जीर्णोद्धार :-
म्हसावद येथील जुनी - जाणती जेष्ठ-वयोवृद्ध जनाकडून प्राप्त  माहिती नुसार:
© मंदिराच्या पहिला जीर्णोद्धार 1966 साली करण्यात आला.
© दुसरा जीर्णोद्धार 2003 साली करण्यात आला.

© यात्रा वैशिष्ट्ये :-
* ही यात्रा म्हसावदसह थेट सातपुडा  पर्वतराजीतील  गावपाड्यात, थेट नर्मदा काठापर्यंत आबालवृद्धाना एक वार्षिक आनंदोत्सव असते.
* यात्रेत म्हसावद आणि पंचक्रोशीतील आबालवृद्धांची हजेरी.
* महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या तिन्ही राज्यांना एकत्र आणणारी यात्रा.
* विविध भाषा, संस्कृती व वेशभूषेचे दर्शन घडविणारी यात्रा.

© खवय्येगीरी :-
* विविध हॉटेल व स्टालची आकर्षक उभारणी.
* हॉटेलमधील खास गुळाची जिलेबीची लालपरी म्हणून चविष्ट  ओळख.
* गोडशेव इंडीयन चॉकलेट नावाने आस्वादक  परिचय. आणि  खास भजी,कचोडी या पदार्थांना खवैय्यांची प्रथम पसंती असते.
* म्हसावद आणि परिसर ऊसाचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे.यात्रेत ताजा ऊसाचा रस रसवंतिच्या छूनछून वाजणा-या घुंगरूच्या तालावर पिण्याची  मजा काही औरच!

© मनोरंजन :-
यात्रेत आबालवृद्धांसाठी मनोरंजनाच्या साधनांत बालगोपाळांसाठी पालखी झुले असतात. सेल्फीचा जमान्यातही कॅमेरात फोटो काढून देणारे फोटो स्टुडिओ देखील भाव खाऊन जातात. पालखी झुल्यांवर नवतरुण-तरुणी देखील  बसून आनंद लुटताना पाहायला मिळतात.लहान मुलांसाठी  किर्र.. किर्र, कर्रर्र-कर्र वाजत मुलांना आकर्षित करणारे विविधरंगी, विविधढंगी लहान मोठे फुगे पाहून श्रावणातील इंद्रधनु धरेवर उगवला की.. असे वाटते. मनमोहक सूर आळवत यात्रेत भटकंती  करणारे बासरी विक्रेता पाहताच कृष्णसख्याच्या भेटीस आसुसलेली प्रिय सखी राधा डोळ्यासमोर उभी राहते.
दिवसभर यात्रेत भटकंती करुन रात्री विसावलेल्या शौकीनांसाठी सिनेमा थिएटर, तमाशात काळू बाळू तमाशा मंडळ, रघुवीर खेडकर, मंगलाबाई बनसोडे हे तमाशा फड आवर्जून उपस्थिती लावतात.
अशी ही श्री रिद्धी सिद्धी विनायक यात्रा..
  दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार झालेले  चावी व रिमोट कंट्रोल द्वारा चालणारी खेळणी. मोठ्या प्रमाणावर विक्री होतांना दिसतात. खेळण्याचा स्टॉलवर ' हे नको, ते हवे'. असा हट्ट  धरुन रडून आकांत करणारी मुले व त्यांची समजूत काढतांना आई बाबाची होणारी जीवाची घालमेल, प्रसंगी नवरा बायकोतील वादही पाहायला मिळतात.

©शेतीपयोगी साहित्य :-
* म्हसावद  यात्रेत शेतीपयोगी साहित्य ही पाहायला मिळते.
© महिलासाठी सौदर्यप्रसाधने :-
यात्रेत  महिलांसाठी सर्व प्रकारची सौदर्यप्रसाधने, पायातील पैंजण, जोडवी, टिकली, बांगडी व अजूनही बरेच काही स्टॉलवर मांडलेले दिसतात.
   अशी ही म्हसावद, ता.शहादा. येथील श्री रिद्धी सिद्धी विनायक यात्रा... आनंदाची,  सुखाची, आपल्यातीलच हरवलेल्यांना शोधणारी, कधी हुरहुर लावणारी, ब-याच वर्षांनी आपल्या  प्रियजनांची गाठभेट घडविणारी, मनाला नवीन उर्मी देणारी, कधी आठवणींचा हुंदका दाटवून - भावनांना अश्रूद्वारा मोकळी वाट करुन देणारी... आठवणीतील मोरपीस...!
यंदा पौष ।। कृ.३।। शुक्रवार दि.२१ जानेवारी २०२२ रोजी संकष्ट चतुर्थीच्या पावन पर्वाला भरणारा म्हसावद,ता.
शहादा येथील श्री रिद्धी सिद्धी विनायक यात्रोत्सव कोरोना पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.  यामुळे  ग्रामीण भागातील अर्थकारण पार कोलमडून गेल्याची चिंता सर्वांनाच दंश करुन गेली आहे.

पुढच्या वर्षी ही यात्रा उत्साहाने साजरी होऊ दे ! ही आर्त विनवणी यंदा सगळ्यांनी श्री रिद्धी सिद्धी विनायक चरणी मनोमन केली आहे..!🌹🙏🙏🙏

    🙏🌹 श्री रिद्धी सिद्धी विनायक नमः!🌹🙏

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " म्हसावद, ता.शहादा, जि.नंदुरबार भ्रमणध्वनी-९४२१५३०४१२

गुरुवार, जानेवारी २०, २०२२

वसुंधरे तू द्यावेस दान !

वसुंधरे तू द्यावेस दान !
हे वसुंधरे तू द्यावे मज मुक्तहस्ते
पेरीतो मुठीत  घेऊन एक दाणा
टाकून दे  भूवरी मोत्यांच्या सडा
तृप्त  होऊ   दे  सकल जीवांना !

हे वसुंधरे तू द्यावे मज मुक्तहस्ते
ओथंबून  यावे  मेघ  येथे सगळे
व्हावी शांत तृषा द्यावे समाधान 
विरुन जावी दिसणारी मृगजळे

हे वसुंधरे तू  द्यावे मज मुक्तहस्ते
फूलू  फळू   दे  शेतशिवार सारी
कणसात चमकू दे माणिक-मोती
दैन्य   सरु दे ! लक्ष्मी यावी  दारी

हे  वसुंधरे तू द्यावे मज मुक्तहस्ते
हाती न राखता नीती- मती दान
सरु दे  शत्रूबुद्धी द्वेष अन् क्लेश
दिगंतराळी जावो समृद्धीचे गाणं

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...