Kaayguru.Marathi

शुक्रवार, ऑक्टोबर २९, २०२१

बुद्धीकौशल्य

बुद्धीर्यस्य बलं तस्य निर्बुद्धेस्तु कुतो बलम् |
वने  सिंहो मदोन्मतः  शशकेन  निपातितः |
       आचार्य  चाणक्य म्हणतात की, ज्या व्यक्तीजवळ  बुद्धी असते, शक्तीसुद्धा तिच्याजवळ असते. बुद्धीहीनाचे बल असुनही
ते बल  व्यर्थ आहे. कारण  बुद्धीच्या जोरावरच   व्यक्ती बळाचा उपयोग करु शकते. अन्यथा नाही. बुद्धीच्या बळावरच  एक ससा जंगलातील गर्विष्ठ सिंहाचा मृत्यूला कसा कारणीभूत झाला. यासाठी हा दृष्टांत,
         जंगलातील  सर्व  लहान-मोठ्या प्राण्यांनी वनराज सिंहाच्या जाचापासुन मुक्ती मिळविण्यासाठी सिंहाबरोबर एक करार केला.करारानुसार जंगलातील एकेक प्राण्यांने दररोज वनराजाकडे त्याचे भोजन बनुन जावे. ठरल्याप्रमाणे दररोज  एक प्राणी न चुकता वनराजाकडे भोजन बनुन जाऊ लागला. एक दिवस एका सशाची पाळी आली. सश्याने खुप विचार केला..... आणि  विचारांती मुद्दामच वनराजाकडे खूप उशिरा पोहोचला.
         सश्याला  पाहताच  भुकेला वनराजाने  संतापाने   प्रचंड मोठी    गर्जना केली. आणि  उशिरा  येण्याचे कारण विचारले. ससा म्हणाला, महाराज  क्षमा असावी.मी तुमच्या कडे येत असताना  रस्त्यावर मला एक सिंह भेटला, त्याने मला खायची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आधी तुम्हाला सूचना  देऊन परत येतो अशी शपथ घेऊन आलो  महाराज!   सश्याचे बोल ऐकून  वनराजा  म्हणाले, कुठे आहे  तो दुसरा सिंह ?  ससा  म्हणाला,  वनराजा !  तो दुसरा सिंह  याच  विहिरीत  लपून आहे. चला महाराज . असे   बोलून  सश्याने  वनराजाला      विहिरीतील      पाण्यात        वनराजाचेच प्रतिबिंब  दाखवले.
         विहिरीतील    दुसरा   सिंह    पाहताच वनराजाने   क्षणाचाही  विलंब  न   करता विहिरीत उडी मारली. मुर्ख  वनराजाने शञुला ठार मारण्यासाठी विहिरीत उडी मारली आणि  तेथेच वनराजाचा अंत झाला.
         तात्पर्य , केवळ  एक बुद्धिमान व्यक्तीच आपल्या शक्तीचा  योग्य उपयोग करू शकतो. बुद्धिहिनाची  शक्ती  त्याला  कधीही  उपयोगी  पडत  नाही. एका  चिटुकला  पण  अत्यंत बुद्धीमान सश्याने  स्वतःपेक्षा  अधिक  शक्तीशाली  असणाऱ्या  सिंहाला मारले.

© प्रा.पुरूषोत्तम पटेल, (सातुर्खेकर)     मुं.पो.म्हसावद
   patelpm31@gmail.com

गुरुवार, ऑक्टोबर २८, २०२१

तोरणमाळ

(महाराष्ट्र राज्याचे द्वितीय क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण :- तोरणमाळ, ता.धडगाव येथील पर्यटनस्थळाचे 
काव्यमय वर्णन. )

     *  माझे तोरणमाळ  *

माझ्या सातपुडाच्या गळा शोभे
सप्तशिखरांची     माळा
तयात गिरी  तोरणमाळ 
भासे स्वर्गसुखाचा मळा              १

माझ्या  तोरणमाळची   माती
देते इतिहासाची  साक्ष 
नांदला पांडवांचा वाली
राजा इथे नाव तयाचे युवनाश्व                    २

माझ्या तोरणमाळची वाट
वळणावळणाची  बिकट
जाता येता खुणावतो 
सुंदर सात पायरीचा घाट      ३

माझ्या  तोरणमाळची भूमी
अहो किती पावन पावन
माय मांडीवर विसावले
पार्श्वनाथ आणि नागार्जून     ४

माझ्या  तोरणमाळची कथा
गातो व्यास न् कालिदास 
धन्य धन्य  या भूमिसी
सहस्रदा नमवितो मी शिष    ५

माझ्या  तोरणमाळवर फिदा
आषाढ - श्रावण  घननीळा
संगे घेऊनिया येतो
फूल फूलपाखरांचा मेळा       ६

माझ्या  तोरणमाळसी लाभले
निसर्गराजाचे वरदान
साग पळस बांबूच्या  वनी
खग गाती मंजूळ गाणं         

माझ्या  तोरणमाळच्या रक्षणा
दोन पुण्यकन्या  खास
गिरीशिखरी एक तोरणाई
दूजी सिताखाई निवास        ८

माझ्या तोरणमाळच्या कुक्षी
यशवंत  गोड जळतळे
शरदाच्या रात्री  खूले
इंद्रलोकीचे सौंदर्य  आगळे    ९

माझ्या  तोरणमाळच्या  अधरी
पद्माचे मोहक दल उले
ईको-पाॅईडशी बोलता

निनाद  तिनदा उसळे         १०

माझ्या तोरणमाळ येऊनी
पहा    खडकी    पाॅईंट
घे रे ...! डोळा साठवून 
भूदेवीच्या स्वर्गीय  थाट       ११

माझ्या  तोरणमाळच्या  भूवरी
उभा ईश् गोरक्षनाथ 
महाशिवरात्रीच्या  रात्री 
त्यांसी भेटे कैलासनाथ         १२

तोरणमाळची  होळी पहा खरोखरी
ढोल  दणाणतो मनोहारी 
शिबलीनृत्य गेरनृत्यात बेधुंद 
बिरि-बासरी संगे नर नारी      १३

माझ्या  तोरणमाळच्या  उदरी
वनौषधी    कितीऽऽतरी
अमृतकुंभ  धरूनिया हाती
येथे उभा भासे हो धन्वंतरी     १४

माझ्या  तोरणमाळच्या  भूवरी
गमते घरं  कौलारू 
गर्द हिरव्या  रानात जणू
हिंडतो सम्राटाचा  वारू          १५

माझ्या  तोरणमाळच्या  वनराई 
गातो  नि रमतो वनपिंगळा
लाविला या एका खगाने
अख्खा  जगताला लळा         १६

माझ्या  तोरणमाळच्या  आभाळी
सूर्यदेव रोज येतो हो... मस्त 
डोळियासी नवनवे  दिसे
सूर्योदय अन् सूर्यास्त            १७

ये रे दोस्ता ... एकदा तू !
पहा कीऽ माझे तोरणमाळ
तू ह्रदयी घे रे साठवून
प्रेम जिव्हाळा  सकळ           १८

कवी :-
प्रा.पुरूषोत्तम पटेल, मु.पो.म्हसावद


ता.शहादा,जि.नंदुरबार, 425432
भ्रमणध्वनी - 8421498724 

Blog-mhasawad. blogspot. In

patelpm31@gmail.com


बुधवार, ऑक्टोबर २७, २०२१

स्वप्नसुंदरी

प्रिये,तू स्वप्नसुंदरी होऊन
चंदेरी पंख लावून
सोनेरी कुंतल उडवित
पहाटस्वप्नी यावे
मलमली मिठीत घ्यावे !

तू तर माझी कमळकळी
पानावर निजलेली 
तू नभीची चांदणी
पाण्यातील रांगोळी
सोबत राहू गाऊ आपण
प्रेम तराणे नवे
प्रिये, तू स्वप्नसुंदरी होऊन
पहाटस्वप्नी यावे
मलमली मिठीत घ्यावे !

तू तर माझी सोनसाखळी
उर्वशी जशी हृदय जाळी
हास्यवदनी गाली खळी
नयन मोहक दंत कुंदकळी
न्हाऊ दे मन माझे
धुंद तुझ्या सवे
प्रिये,तू स्वप्नसुंदरी होऊन
पहाटस्वप्नी यावे
मलमली मिठीत घ्यावे !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल 
         " पुष्प "

मंगळवार, ऑक्टोबर २६, २०२१

काय हो देवा?

काय हो देवा तुम्ही असे का वागता ?
भक्तांच्या ईच्छा  पुर्ण करण्यासाठी
पाच दहा रुपयाचे गोड चणे-फुटाणे मागता ?
माहिती नाही मला तुमच्या भेटीचा रस्ता
पण... तुम्हाला भेटाया म्हणे..
खुपच खाव्या लागतात खस्ता?
हे खरे की खोटे नक्की सांगाल का?
भक्तांपेक्षा म्हणे तुम्ही भोप्यांचेच वेडे
भक्त देतातआणि तुमच्या वतीने
तेच खातात पेढे...
त्यांचा उदरभरणासाठी तुम्हाला केलंय
युगे अठ्ठावीस विटेवरी उभे...
तरीही तुम्ही हात ठेवून कटेवरी
नि:शब्द निश्चल अविरत उभेच..
तुमचे हे वागणं पाहवलं नाही
म्हणून रागावून दूरच उभी रखुमाई
देवा... सांगा ना तुम्हाला प्रिय कोण?
उन्हा पावसात हजारो कोस अंतर चालून
तीन तीन-चार चार दिवस तुमच्या
निमिषमात्र भेटीला आसुसलेला भोळा भक्त...
की मागील दाराने क्षणात येऊन
भेटणारा दांभिक भक्त...?
उत्तर... आषाढी एकादशीला
की कार्तिक वारीला..?
वाट पाहतोय वेड्या आशेने..
©प्रा. पुरुषोत्तम पटेल
           म्हसावद.

सोमवार, ऑक्टोबर २५, २०२१

बा...विठ्ठला !

विठ्ठला   केशवा  विठूराया  पंढरीनाथा
रुप   तुझे  पाहतो  चरणी  ठेवून  माथा

मूर्ती  तुझी  सावळी   गोलटोपी   शिरी
प्रसन्न  वदन   बरवे  दुःख   हरे  श्रीहरी

देवा  कानी  शोभती  लंब  मकरकुंडले 
मन  माझे  स्थिर  करी  दोन  कर्णफुले

कपाळी  तृतीय  नेत्र  वरी  चंदन टिळा 
कंठी  कौस्तुभमणी गळा तुळशीमाळा

वाम वक्षी  खळगी नाम श्रीवत्सलांछन
उजवे वक्षी वर्तुळखंड नाम श्रीनिकेतन

दोन  बाहूवरी  बांधियेले  दोन बाजुबंद
वरदायी  दोन  मनगटी  शोभे  मणीबंध

देवा, देखीले मी डोळा तुझे करकटेवरी
उभा दिसे  मज अठ्ठावीस युगे  वीटेवरी

तुझा  वाम हस्ती भासे  पांचजन्य शंख
उजव्या  हाती  धरीले तू  मोहक पंकज

रुप   तुझे  केशवा पाहिन  जन्मोजन्मी
नको  देऊ अंतर  तुझा भक्तांसी दे हमी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...