वने सिंहो मदोन्मतः शशकेन निपातितः |
आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्या व्यक्तीजवळ बुद्धी असते, शक्तीसुद्धा तिच्याजवळ असते. बुद्धीहीनाचे बल असुनही
ते बल व्यर्थ आहे. कारण बुद्धीच्या जोरावरच व्यक्ती बळाचा उपयोग करु शकते. अन्यथा नाही. बुद्धीच्या बळावरच एक ससा जंगलातील गर्विष्ठ सिंहाचा मृत्यूला कसा कारणीभूत झाला. यासाठी हा दृष्टांत,
जंगलातील सर्व लहान-मोठ्या प्राण्यांनी वनराज सिंहाच्या जाचापासुन मुक्ती मिळविण्यासाठी सिंहाबरोबर एक करार केला.करारानुसार जंगलातील एकेक प्राण्यांने दररोज वनराजाकडे त्याचे भोजन बनुन जावे. ठरल्याप्रमाणे दररोज एक प्राणी न चुकता वनराजाकडे भोजन बनुन जाऊ लागला. एक दिवस एका सशाची पाळी आली. सश्याने खुप विचार केला..... आणि विचारांती मुद्दामच वनराजाकडे खूप उशिरा पोहोचला.
सश्याला पाहताच भुकेला वनराजाने संतापाने प्रचंड मोठी गर्जना केली. आणि उशिरा येण्याचे कारण विचारले. ससा म्हणाला, महाराज क्षमा असावी.मी तुमच्या कडे येत असताना रस्त्यावर मला एक सिंह भेटला, त्याने मला खायची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आधी तुम्हाला सूचना देऊन परत येतो अशी शपथ घेऊन आलो महाराज! सश्याचे बोल ऐकून वनराजा म्हणाले, कुठे आहे तो दुसरा सिंह ? ससा म्हणाला, वनराजा ! तो दुसरा सिंह याच विहिरीत लपून आहे. चला महाराज . असे बोलून सश्याने वनराजाला विहिरीतील पाण्यात वनराजाचेच प्रतिबिंब दाखवले.
विहिरीतील दुसरा सिंह पाहताच वनराजाने क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उडी मारली. मुर्ख वनराजाने शञुला ठार मारण्यासाठी विहिरीत उडी मारली आणि तेथेच वनराजाचा अंत झाला.
तात्पर्य , केवळ एक बुद्धिमान व्यक्तीच आपल्या शक्तीचा योग्य उपयोग करू शकतो. बुद्धिहिनाची शक्ती त्याला कधीही उपयोगी पडत नाही. एका चिटुकला पण अत्यंत बुद्धीमान सश्याने स्वतःपेक्षा अधिक शक्तीशाली असणाऱ्या सिंहाला मारले.
© प्रा.पुरूषोत्तम पटेल, (सातुर्खेकर) मुं.पो.म्हसावद
patelpm31@gmail.com