Kaayguru.Marathi

शुक्रवार, ऑक्टोबर २२, २०२१

अंगाई गीत

अंगाई ✍️
हातांचा करुनी पाळणा
ओढिते ममतेची दोरी
निज निज माझ्या बाळा
गाते तुला मी अंगाई ।।धृ।।

परतुनी आल्या गोठ्यात गाऊ
खोप्यात निजले चिऊ अन् काऊ
सवे खेळाया नाही कोणी
निज निज माझ्या बाळा 
गाते तुला मी अंगाई ।।१।।

नारायण गेला नारायणी
झाले शुभं करोती म्हणोनी
अंगणी झगमगे काजव्यांचा वाती 
निज निज माझ्या बाळा
गाते तुला मी अंगाई ।।२।।

गगनी चांदोबा उगवला 
चांदणं रांगोळी स्वागताला
निद्राराणी आली स्वये तुला जोजवाया
निज निज माझ्या बाळा
गाते मी तुला अंगाई ।।३।।

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, ऑक्टोबर २१, २०२१

माझी शाळा (कविता)


म्हसावद, ता.शहादा येथील कुबेर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यामंदिर विषयी कविता

माझी   शाळा 

माझी शाळा लळा लाविते बाळा
उपदेशाचा गोड गळा संजीवनी मज शाळा 


ज्ञान सेवा तू साफल्यम् ब्रिद असे हिचे थोर
ज्ञानियांचे जणू माहेर गाव म्हसावद शाळा कुबेर


थोर येथे गुरु परंपरा प्रितीची सदा वाहे धारा
जातीभेदासी नसे थारा समता पेरीतसे वारा


दूर करिते अज्ञान सकलां करीते सज्ञान
सांदिपनी जणू वरदान भासे सद्गुणांची खाण


चहू दिशी वृक्ष सावली दिनांसी शोभे माऊली
या रजकणांची धुळी शिष्य लाविती भाळी

            
कर्तृत्वाला देई मान अभ्यासाला मोठ्ठे स्थान
कुणी न् मोठा कुणी न सान शिकवी हा मंत्र महान


अशी ही धन्य धन्य माझी कुबेर शाळा
दोन्ही कर जोडून माझे कोटी प्रणाम

शब्दसौदर्य :प्रा.पुरूषोत्तम पटेल
उपमुख्याध्यापक,
कुबेर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद, ता.शहादा


बुधवार, ऑक्टोबर २०, २०२१

आई-बाप

आई बाप हे दैवत माझे मज लाभले जन्मभरी तयांच्या चरणतळी भासे मज काशी अन् पंढरी ! मुखावरी विलसे त्यांच्या कोटी कोटी सूर्य भास का मांडू गा-हाणे देवा! भास तुझे ह्या हृदयांतरी! प्रभो,गाईन मी आवडीने तुझीच रे नामावली अशीच राहो कृपा अनंता जन्मोजन्मी तुझी मजवरी © प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

हे प्रभो !

हे प्रभो,
जेथे जातो तेथे तू असावा माझा सांगाती
निति ऐसी दे मज अकर्म दिसे भीती
दे गती दे  मज शुद्धमती  !
पाप न यावे मनी,हीच माझी प्रार्थना !

वृक्ष-वल्ली दिसो डोळा
खग उडू दे दशदिशी  !
आनंदात न्हाऊ दे सकल सृष्टि !
दानवता जळू दे,मानवता फूलू दे !
बंधुभाव उपजो मनी,हीच माझी प्रार्थना !

दु:ख दैन्य जळो भले
उमलू दे हर्ष मोद पुष्पदले
उच्च नीच नसे भाव
माऊलीचे पसायदान,मुखी गाऊ दे !
गीताज्ञान कळू दे सकला,हीच माझी प्रार्थना !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, ऑक्टोबर १९, २०२१

कोऽऽजागर्ती


कोऽऽजागर्ती कोऽऽजागर्ती
बोलत येईल लक्ष्मी भेटीला
सुख समृद्धी अन् आरोग्य
देईल हो आपुल्या भक्ताला

बंधुराज चंद्र आज उधळी
अमृत किरणांची गोळी
गौदुग्धी आपुले रुप दावूनी
मानवा देई संजीवक हाळी

समस्त वाचकांना " कोजागिरी " 
पौर्णिमेच्याा अमृतमय मन:पूर्वक
हार्दिक शुभेच्छा!🌹🙏🙏🙏

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...