Kaayguru.Marathi

शुक्रवार, ऑक्टोबर १५, २०२१

जय श्रीराम

         ✒️जय श्रीराम 🌹🙏
हृदयी वसावा राम नयनी दिसावा राम

विचारात असावा राम ओठी वदावा राम

मनात ठसावा राम कामात बसावा राम

शब्दांत मिळावा राम कर्मात लाभावा राम

सत्य शिव सुंदर राम मी करीतो प्रणाम

वाचावा राम बोलावा राम स्मरावा राम

चौ-याशीचा मुक्तीदाता जन्माचा पूर्णविराम

✒️ विजयादशमी-दसरा पावन पर्वाला
आपणास महन्मंगल शुभदायक 
🙏🙏🙏🌹हार्दिक शुभेच्छा!🌹🙏🙏🙏

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, ऑक्टोबर १४, २०२१

कळी (हायकू )

आठवणीची
कळी हो उमलली
फूल ती झाली
भावार्थ :- कळीची फूल झाल्याचे पाहून अतिव आनंद होतो.तशा सुंदर आठवणी मनाला प्रसन्नता देतात.व त्या आठवणीत आपण हरवून जातो.
पसरे गंध
दशदिशांना मंद
वारा ही धुंद
भावार्थ :- फुलांचा गंध दशदिशांना मंद मंद पसरतो.वाराही धुंदीत न्हाहतो.तसेच आठवणीं ताज्या झाल्या की मनाला धुंद करुन तजेला देतात.
झाला सूर्यास्त
आली कातरवेळ
स्मृतींचा खेळ
भावार्थ:- सूर्यास्त झाला की, कातरवेळ होते.ही कातरवेळ मोठी जीवघेणी.नको त्या स्मृती जीवंत करते.प्रेमात अडचणी आणणा-या व्यक्ती अनेकदा आपलेच प्रियजन असतात.पण,प्रेमात ब-याचदा तेच दुरावतात.ही स्मृती मन विषण्ण करुन जाते.

 © प्रा.पुरुषोत्तम पटेल   " पुष्प "

शारदीय नवरात्रोत्सव: देवी सिद्धिदात्री

🌹शारदीय नवरात्र : नववा दिवस/नववी माळा 🌹
           💎 देवी स्वरुप- सिद्धिदात्री 💎
शारदीय नवरात्र (ऑक्टोबर २०२१) मधील आजच्या नवव्या नवदुर्गेचे स्वरुप सिद्धदात्री...नवव्या माळेला देवी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते. अश्विन/शारदीय नवरात्रीची सांगता विजयादशमीने होते. आज नवदुर्गा देवी स्वरुप हे सिद्धिदात्री देवीच्या स्वरुपात आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या पृथ्वीतलावर संचार असल्याचे म्हटले जाते.

💎 कमळावर आरूढ सिद्धदात्री देवीचे स्वरुप
दुर्गा देवीचे नववे स्वरुप म्हणजे सिद्धिदात्री देवी. सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी म्हणून देवीच्या या स्वरुपाला
 " सिद्धिदात्री " असे संबोधले जाते. सिद्धिदात्री देवी
 भगवान विष्णूची प्रियतमा देवीलक्ष्मी प्रमाणेच कमलपुष्पाच्या आसनावर विराजमान आहे. देवी मधुर व गोड स्वरांनी आपल्या भक्तांना वरदान प्रदान करते. सिद्धिदात्री देवी सिंहावर स्वार असून चतूर्भूज आहे. एका हातांमध्ये कमळ,दुस-या हाती शंख, तिसऱ्या हातात गदा, आणि चौथ्या हातात सुदर्शन चक्र धारण केले आहे. सिद्धिदात्री देवी सरस्वती देवीचेही एक रुप मानले जाते. देवीने श्वेत वस्त्र परिधान केल्याने तिचे स्वरुप अधिकच मनमोहक भासते.म्हणून देवीला " प्रसन्न वदना " असेही म्हणतात. सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होते, अशी भक्तांची श्रद्धा व मान्यता आहे.

💎 अर्धनारीश्वर

१) अणिमा, २) महिमा, ३) गरीमा, ४) लघिमा, ५) प्राप्ती, ६) प्राकाम्य, ७) ईशित्व आणि ८) वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. देवी पुराणात वर्णन मिळते की, भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे भक्त श्री शंकराला ''अर्धनारीनटेश्वर '' या नावानेही ओळखतात.

💎 मंत्र

वन्दे वांछित मनोरथार्थ चन्द्रार्घकृत शेखराम्।
कमलस्थितां चतुर्भुजा सिद्धीदात्री यशस्वनीम्॥

💎 देवी सिद्धिदात्रीचा ध्यान मंत्र

सिद्धगंधर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि ।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी।।


💎 सिद्धिदात्री देवीचे पूजन 

     असे म्हणतात की, नवव्या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा ऋषि-मुनि, साधक, यक्ष, किन्नर, देवता, दानव आणि गृहस्थाश्रमी जीवन व्यतीत करणारे सांसारिक स्री-पुरुष पूजन करतात.देवीची पूजा व व्रत ठेवल्याने व्यक्तीला यश, धन आणि बलाची प्राप्ती होते.
      सिद्धिदात्री देवीचे पूजन करतांना नऊ प्रकारची फुले अर्पण करावे. नऊ जातीची फळ,आणि नऊरसांनी युक्त प्रसादाचा देवीला नैवेद्य दाखवून तो प्रसाद द्यावा.असे केल्याने भक्ताला धर्म, अर्थ,काम,मोक्ष या चार पुरुषार्थाची प्राप्ती होती.


💎 व्रताची सांगता आणि महत्त्व

देवीच्या पूजनाने यश, बल आणि धन प्राप्ती होते, असे म्हटले जाते. देवी आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते, असे सांगितले जाते. तसेच नवरात्राची सांगता सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने होत असल्यामुळे काही ठिकाणी या दिवशीही कुमारिका पूजन करण्यात येते.कुमारिका पुजनानेहीही अनन्य साधारण फळप्राप्ती होते. ९ हा अंक देवीच्या नऊ रुपांचे व नऊ शक्तीचे द्योतक असल्याने या दिवशी ९ कुमारिकांचे मनोभावे पूजन, मान-पान करावे .तसेच भैरव रुपात एका बालकाचीही
पूजा करावी. आणि नवरात्रीच्या विशेष व्रताची सांगता करावी, असे सांगितले आहे.

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
 

बुधवार, ऑक्टोबर १३, २०२१

शारदीय नवरात्रोत्सव: आठवां दिवस : महागौरी

शारदीय नवरात्रोत्सव :आठवा दिवस/आठवी माळ🌹
           💎 नवदुर्गा स्वरुप : महागौरी 💎
 
शारदीय ( ऑक्टोबर २०२१ ) नवरात्रीच्या आठवा दिवस हा देवी महागौरी पुजनाचा असतो. 
२०२१ च्या शारदीय नवरात्रोत्सव यंदा नऊ दिवसांसाठी नाहीतर, आठच दिवसांसाठी साजरा केला जाणार आहे. शारदीय नवरात्र, यंदाच्या वर्षी गुरुवारी ७ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरु होऊन, १४ ऑक्टोबर गुरुवारीच संपन्न होणार आहे. एक तिथीचा लोप झाल्यानं यंदा नवरात्री आठ दिवसच साजरा होणार आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत गुरुचा विशेष योग जुळून येणार आहे. ७ ऑक्टोबर गुरुवारी अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदापासून सुरु होऊन दुर्गा महानवमी १४ ऑक्टोबरपर्यंत साजरी होणार आहे. तसेच १५ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे.

 💎 काय आहे गुरुचा विशेष योग?

भारतीय धर्मशास्त्रानुसार, गुरु हे ज्ञान आणि बुद्धिचे दैवत मानले जातात.. त्यांना सर्व देवांचं गुरु मानलं जातं. यंदाच्या वर्षी गुरुवारी नवरात्री सुरु झाली आणि गुरुवारीच नवरात्रोत्थान होणं शुभं मानलं जात आहे. असा योग अनेक वर्षांतून एकदाच जुळून येतो. 
म्हाळसा फलज्योतिष केंद्राचे (ज्योतिष प्रविण) श्री. वसंत कुलकर्णी ( म्हसावद,ता.शहादा) म्हणाले की, "अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा ६ ऑक्टोबर बुधवारी संध्याकाळी ४.३४ वाजता प्रारंभ झाली आणि जी गुरुवारी ७ ऑक्टोबर दुपारी १.४६ वाजेपर्यंत राहिली.त्यामुळे ७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी घटस्थापना झाली असून याच दिवसापासून देवीची आराधनाही केली जाते आहे.

💎 देवीचा आवडता रंग
  
आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. देवीला गुलाबी रंग अत्यंत प्रिय असून हा सौभाग्य आणि प्रेमाचे प्रतिक समजला जातो. 

💎 का आठच दिवस साजरी केली जाणार नवरात्र? 

यंदाच्या वर्षी तृतीया तिथी आणि चतुर्थी शनिवारी एकाच दिवशी आली आहे. ज्यामुळे चतुर्थीचा लोप झाला. म्हणून यंदा चंद्रघंटा आणि कुष्मांडा या देवीच्या रुपांची एकाच दिवशी पूजा करण्यात आली आहे. याच कारणामुळं नवरात्रोत्सव आठ दिवस साजरा करण्यात येत आहे. 

💎 देवी स्वरुप: महागौरी 
शारदीय नवरात्रोत्सवात महालक्ष्मी व्रताला आत्यंतिक महत्व आहे.जे भाविक भक्त नवरात्रीला पहिल्या दिवसापासून व्रत ठेवतात.ते नवरात्रीत दुर्गाअष्टमीचे व्रत हमखास ठेवतात.
पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीशिवशंकर आपल्याला पती म्हणून लाभावे.यासाठी पार्वतीने कठोर व घोर तपश्चर्या केली होती.तपाचरणामुळे देवी पार्वतीच्या देहाचा गौर रंग काळा झाला होता.पार्वतीच्या कठोर तपश्चर्येने भगवान कैलासनाथ प्रसन्न झाले त्यांनी देवीला पुन्हा गौरवर्ण प्राप्तीचे वरदान दिले.म्हणून देवी पार्वती ही " महागौरी " म्हणून ओळखली जाऊ लागली.महागौरीचे श्रद्धापूर्वक पूजन करुन आणि महालक्ष्मीचे व्रत राखल्यास भक्तांना सुख,समृद्धी,प्राप्त होऊन त्यांचे पाप नष्ट होते.अशी भक्तांची श्रद्धा आहे.

💎 होम हवन :-

दुर्गा अष्टमीच्या पावन पर्वाला अनेक ठिकाणी होम हवन विधी केला जातो.

💎 देवीचा बीज मंत्र: 

" श्री क्लीं ह्रीं वरदायै नम:। "

अन्य मंत्र:

१] " माहेश्वरी वृष आरूढ़ कौमारी शिखिवाहना।

      श्वेत रूप धरा देवी ईश्वरी वृष वाहना।। "

२] ओम देवी महागौर्यै नमः।

💎 कन्या पूजन व महत्त्व

देवीच्या उत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीत स्त्रीशक्तीची उपासना केली जाते. सरस्वती, दुर्गा,भवानी,अंबा, काली, चंडिका,लक्ष्मी ही स्त्रीशक्तीची प्रमुख रूपे. महन्मंगल मातृरूप पार्वती, कलासक्त गौरी अशा अनेक रूपात तिची आराधना केली जाते. संपूर्ण भारतवर्षात देवीची ५१ शक्तिपीठे असून त्यापैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत.
ती शक्तीपीठे :-
(१) कोल्हापूरची महालक्ष्मी (२) तुळजापूरची भवानी (३) माहुरगडाची रेणुका ही तीन पूर्ण पीठे व (४) वणीची सप्तश्रृंगीनिवासिनी हे अर्धपीठ. महिषासुराचा वध केल्यानंतर काही काळच आदिशक्ती येथे विसावली होती. म्हणून हे अर्धेपीठ मानले जाते.
नवरात्रीचा संबंध जगत्जननी दुर्गा देवीशी आहे. नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. देवी दुर्गाची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नसते. असे म्हणतात की,ह्या विश्वात स्त्रीत्वात देवीचा अंश असतो.आणि म्हणूनच. नवरात्रीत दोन ते दहा वर्ष वयाच्या नऊ मुलींची/ कुमारिकांची पूजा करण्याची अनादिकाळापासून परंपरा आहे. या बालिकांना साक्षात ९ देवीचे रूप मानले जाते. यांना कुमारिका असे म्हणतात. कुमारिकांचे पायांचे पूजन करून त्यांना जेवायला घालण्याची प्रथा चालत आली आहे..
     कुमारिकांना पाय धुऊन आसनावर बसवावे. हातावर लाल रंगाचा धागा बांधून कपाळी कुंकू लावावे. प्रसाद आणि दक्षिणा द्यावी. घरातून पाठवताना पाया पडून आशीर्वाद घ्यावा. 
कुमारिका वयाच्या कितव्या वर्षी देवीच्या कोणत्या रूपात असते. आणि तिचे पूजन केल्याने काय फळ मिळते ते पुढीलप्रमाणे :-

 १) दोन वर्षाची बालिका कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य नष्ट होते.
२) तीन वर्षाची बालिका त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख-समृद्धी नांदते.
३) चार वर्षाची बालिका कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं.
४) पाच वर्षाची बालिका रोहिणी रूपात असते. ती संपूर्ण घर रोगमुक्त ठेवते.
५) सहा वर्षाची बालिका कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते.
६) सात वर्षाची बालिका चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते.
७) आठ वर्षाची बालिका शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होते.
९) नऊ वर्षाची बालिका दुर्गा देवीचे रूप असते. ही शत्रूंचा नाश करते.
१०) दहा वर्षाची बालिका सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते.

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

आयुष्य (चारोळी)

गड्या आयुष्य खूप सुंदर आहे
🌺❤️🌺❤️🌺❤️🌺❤️🌺

ते आनंद - मस्तीत जगावे,पण
🌹💎🌹💎🌹💎🌹💎🌹

ऐसे  करावे  कर्म - धर्म आपुले
🦚🦋🦚🦋🦚🦋🦚🦋🦚

चंद्र - सूर्य असे  तो अमर व्हावे
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...