Kaayguru.Marathi

मंगळवार, ऑक्टोबर १२, २०२१

शारदीय नवरात्रोत्सव : देवी कालरात्री

🌹 नवरात्रोत्सव : सातवी माळा : 🌹


💎 देवी स्वरुप : देवी कालरात्री 💎


नवरात्रोत्सवातील  सप्‍तमी त‍िथी ही देवी कालरात्रीला समर्पित आहे. सातवी माळ झेंडूच्या फुलांची बांधावी, व भक्ताने  देवीची श्रद्धाभावे उपासना करावी.

💎 कालरात्री देवीचे स्वरुप 

देवीचे स्वरुप रात्रीच्या अंधारासारखे काळे आहे.देवीच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतात.देवीचे केस विस्कटलेले असून गळ्यात विद्युल्लता सारखी चमकणारी नर मुंडमाला घातली आहे.देवी कालरात्री चतुर्भूज असून देवीच्या एका होती कटोरा,एका हातात लोहंकुश आहे.आणि उर्वरित दोन हात मुद्रा स्थितीत असून पैकी एक हात वर मुद्रा आणि दुसरा  अभय मुद्रेत आहे.देवी त्रीनेत्रा असून गर्दभावर स्वार आहे.तिची भावमुद्रा भयानक कोपीष्ट अशी आहे.

 💎 देवीची प्रकट कथा     

असे म्हटले जाते की, भगवती कालरात्री देवीची उत्पत्ती असूर चण्ड-मुण्ड यांच्या निर्दालनासाठीच झाली.कथानुसार दैत्य राज शुंभच्या आज्ञेने चण्ड-मुण्ड आपली चतुरंग सेना घेऊन प्रत्यक्ष देवीला बंदी करण्याच्या हेतूने गिरीराज हिमालय पर्वतावर गेले.तेथे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष देवीला बंदिवान करण्याचे धाडस केले.त्यांच्या त्या दृष्ट कृत्याने देवी भगवती अत्यंत क्रोधीत झाली.देवीला प्रचंड संताप झाला..क्रोधाने भगवतीचे वदन प्रचंड काळे झाले आणि बाहू मध्ये प्रचंड स्फूरण निर्माण झाले.त्याक्षणी अत्यंत क्रुद्ध देवी भगवतीने कालीस्वरुप धारण केले.

💎 देवीचे आवडते रंग 

आज बुधवार तिथी महाष्टमीच्या पावक पर्वाला नवरात्रोत्सवाला कालरात्रीची पूजा करण्यात येते. देवीला गडद नीळा रंग अतिप्रिय असून या रंगदर्शनाने देवीचे रुप अतुलनीय आनन्दाची अनुभूती देते. निळा रंग हा समृद्धी आणि शांतीचे प्रतिक म्हणून वापरला जातो.नवदुर्गा देवीने कालरात्री रुपात चण्ड-मुण्ड दैत्यांचा विनाश करुन त्रिखंडात सुख ,समृद्धी आणि शांतता निर्माण केली होती.देवीच्या या रुपातील दर्शनाने भक्तांच्या जीवनात चैतन्य येऊन समृद्धी आणि शांतता निर्माण होते.अशी दृढ समज आहे.

💎 कालरात्री देवीची आयुधे 

देवी कालरात्रीने आपल्या एका हातात तलवार आणि एका हातात पाशांकुश,शरीरावर लाल रंगाचे चर्मांबर परिधान केले असून,आणि गळ्यात नरमुण्डमाला विराजित आहेत. प्रकटप्रसंगी  देवी कालरात्रीच्या अंगावरील मांस पुर्णपणे नष्ट होऊन देवीचे शरीर हे फक्त हाडांचा सापळाच उरला होता.असे वर्णन आढळते.भगवतीचे  हे रुप प्रचंड भितीकारक व क्रुद्ध भासत होते.देवीचे तोंड प्रचंड विशाल ,आणि सळसळत्या जीभेमुळे देवीचे स्वरूप पाहताच भिती वाटावी इतके भयप्रद बनले होते.डोळ्यातून क्रोधाचा अंगार बाहेर पडत होता.देवीच्या भयंकर गर्जंनांनी दशदिशा जणू प्रचंड नाद उमटत होता.देवीने कालरात्री रुपात महाभयानक अशा दैत्यांचा वधाचे सत्र आरंभिले.आणि चण्ड-मुण्डच्या चतुरंग सेनेवर देवी कालरात्री वायुवेगे तुटून पडली व सैन्याचे भक्षण करीत देत्य सेनेला त्राहीमाम करीत सुटली.

💎 देवी कालरात्रीच्या जप  मंत्र

 " दंष्ट्राकरालवदने शिरोमालाविभूषणे।

   चामुण्डेुण्डमथने नारायणी नमोऽस्तु ते।

   या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता।

   नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।। " 

देवी कालरात्री भक्तवत्सला असून सदैव आपल्या भक्तांवर कृपा करणारी म्हणून ओळखली जाते. ती भक्तांनी केलेल्या भक्तीने प्रसन्न होऊन शुभदायक फल देते.म्हणून देवी कालरात्रीला " शुभंकरी " असेही म्हणतात.भक्तांच्या सर्व दुःख,दैन्य,व्याधी,ताप दूर करणारी ही कालरात्री समस्त संकटे दूर करण्याचे वरदान देणारी म्हणून तिची ख्याती आहे.

💎 देवी कालरात्री पूजनाचे फलित 

देवीची कृपा मिळविण्यासाठी तिला अनन्य भावे शरण जाऊन भक्ती,पूजन केले असता,ती भक्तांना पावते.देवीचे पवित्र गंगाजलाने,पंचामृताने आणि फुलं,गंध, अक्षतांनी पूजा करावी.देवीला गुळाचा प्रसाद अती प्रिय असून हा प्रसाद द्यावा.देवी कालरात्री चे पूजन करतांना ब्रम्हचर्य व्रताचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून काया वाचा मनाने भक्त पावक असावा.

[ टिप - सदर लेखातील माहिती ही सामान्य माहिती असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ पंडीताची मदत घ्यावी.ब्लाॅग लेखक कोणतीही हमी देत नाही.]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

भ्रम

मनुष्य भ्रमात जीवन जगतो...
हा माझा तो माझा
 माझ्या जवळचे माझे...
खरं तर यापैकी कोणीही आपलं नसतं काही
खरंतर तुमची फक्त वेळ आहे !
ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे !!!
नाहीतर...सर्व जवळ असून सुध्दा परके...!
बोलायचं असतं मनातलं सारं काही
पण ऐकणारं नसतं कुणी !
सल असली तर सांगायची राहते
बल असलं तरी
दाखवायचं राहून जातं...सारं काही !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

नवरात्रोत्सव : देवी स्वरुप :कात्यायनी

🌹 शारदीय नवरात्र: सहावी माळ : 🌹
💎 देवी स्वरुप : कात्यायनी 💎
    
    ऋषी कात्यायण यांनी देवीला आपल्या तपोबलाने प्रार्थना केली की, " हे देवी ! तू माझ्या कन्येच्या रुपात माझ्या घरी जन्म घे! " देवीने ऋषी कात्यायन यांच्या इच्छेनुसार कन्या रुपात जन्म घेतला.
 सर्वप्रथम कात्यायन ऋषींनी देवीची पुजा केल्याने तिचे नाव
 " कात्यायनी " असे झाले.देवी भागवत, मार्कण्डेय पुराण आणि स्कंद पुराणात देवी कात्यायनीची कथा वाचावयास मिळते.
तत्प्रसंगी महिषासूर हा उन्मत्त झालेला होता.त्याने तिन्ही लोकी उत्पात माजविला होता.देवीने उग्र रुप धारण करुन महिषासूराचा वध केला.तिन्ही लोकी आनंद निर्माण झाला. 
 दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायणी देवीचा उल्लेख म्हणून
" महिषासुरमर्दिनी " असा केल्याचे सांगितले जाते. 

💎 कात्यायनी देवीचे स्वरुप 

कात्यायणी देवीचे स्वरुप चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. तर दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशीर्वादरुपी आहेत. कात्यायणी देवीचे स्वरुप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते.देवीचा अवतार धारण करण्याचा मुख्य उद्देश असूरांचा वध, धर्माची पुनर्स्थापना, धर्मसंरक्षण असल्याचे म्हटले जाते. 
देवीला लाल रंग अधिक प्रिय असल्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान करुन देवीची पूजा,भक्ती करणे फलदायक ठरते.

💎 कात्यायणी देवीचे पूजन

दुर्गा देवीच्या पूजनासह कात्यायणी देवीचे पूजन करताना गंगाजल, कलावा, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. कात्यायणी देवीला मध अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जुन समावेश केल्यास अधिक लाभ मिळतो तसेच देवीला गोडधोड नैवेद्यही अधिकच प्रिय असल्याचे म्हटले जाते.म्हणून कात्यायनी देवीला दुध-साखरेचा गोड प्रसाद अर्पण करता येईल. त्रास नाहीसा होईल आणि लाभ होईल.


💎 कात्यायनी देवी पूजनाचे फलित :-

मान्यता आहे कि देवी कात्यायनीला प्रसन्न करण्यासाठी ३ ते ४ फूलं घेऊन
 " कंचनाभा वराभयं पद्मधरां मुकटोज्जवलां।
   स्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते॥ "
हा मंत्र १०८ वेळा जप केल्यास व नंतर ही फुलं देवीचरणी अर्पण केल्यास फलदायी ठरते.कात्यायणी देवीचे पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो.श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही देवीचे पूजन केले असल्याचे सांगितले जाते. देवीच्या कृपेने विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. भाविकांना सुख, समृद्धी प्राप्त करणे सुलभ होते.

[टिप: या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य ऐकीव,श्रवणीय माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करावा.]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, ऑक्टोबर ११, २०२१

धुके

धुके...
निराशेचे विरत गेले
मातीशी इमान राखून
ध्येय शिखर नजिक आले

धुके...
संकटाचे विरत गेले
मनाच्या विशाल आभाळी
शरदाचे चांदणे शिंपीत  गेले

धुके...
क्लेशाचे विरत गेले
माणूस एकाच देवाची लेकूरे
प्रीतिने सकल मेळवावे

धुके...
संशयाचे विरत गेले
प्रसन्न परिमळ पहाटे
प्राजक्त श्वासात भरुन गेले

धुके...
अपयशाचे विरत गेले
जणू रविकिरणांच्या स्पर्श होता
मुखकमल प्रसन्न फुलले

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

धुके...
निराशेचे विरत गेले
मातीशी इमान राखून
ध्येय शिखर नजिक आले

धुके...
संकटाचे विरत गेले
मनाच्या विशाल आभाळी
शरदाचे चांदणे शिंपीत  गेले

धुके...
क्लेशाचे विरत गेले
माणूस एकाच देवाची लेकूरे
प्रीतिने सकल मेळवावे

धुके...
संशयाचे विरत गेले
प्रसन्न परिमळ पहाटे
प्राजक्त श्वासात भरुन गेले

धुके...
अपयशाचे विरत गेले
जणू रविकिरणांच्या स्पर्श होता
मुखकमल प्रसन्न फुलले

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


रविवार, ऑक्टोबर १०, २०२१

शारदीय नवरात्रोत्सव : पाचवी माळ: स्कंदमाता

शारदीय नवरात्रोत्सव: पाचवी माळ 
💎दुर्गादेवीचे स्वरूप : स्कंदमाता 💎

आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे, व अदृष्ट शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे. आतापर्यंत आपण देवीच्या चार रुपांची माहिती जाणून घेतली.
नवरात्रीचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे.   
 
नवरात्रीचा पाचवा दिवस : देवी स्कंदमाता

" सिंहासनगता नित्य पद्माश्रितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी।। "

दुर्गेचे पाचवे रूप '' स्कंदमाता " या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन " विशुद्ध '' चक्रात स्थिर झालेले असते. भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते.
भगवान स्कंद '' कुमार कार्तिकेय '' नावानेही ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे देवीच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओंळखले जाते. 
💎 दुर्गादेवीचे स्कंदमाता स्वरुप 

स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे.डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे.बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे नवदुर्गेचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे. सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे.

💎 स्कंद शब्दाचा अर्थ: 
 
स्कंद म्हणजे तज्ञ, निष्णात. सामान्यपणे जे तज,प्रविण असतात ते उद्धट असतात. पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे. नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पदमासना स्कंदमातेच्या रूपात तल्ल‍ीन होते. यादरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे. सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे.

💎 स्कंदमाता उपासनेचे फळ 

स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते. स्कंदमाता देवीचे व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते. स्कंदमाता देवीचे व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात. घरात सुख, शांतता, समृद्धी नांदते, अशी मान्यता आहे. आपण एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही.
      हा पाचवा दिवस स्कंदमाता देवीला समर्पित आहे. दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरुप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते. 

💎 पाचवी माळ

पाचवी माळ ही बेल किंवा कुंकवाची वाहतात..

💎 स्कंदमाता देवीचा मंत्र

" सिंहासना गता नित्यं पद्माश्रि तकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी।।
या देवी सर्वभू‍तेषु मां स्कंदमाता रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।। "

💎 स्कंदमाता पूजन 

देवीचे पूजन करताना सौभाग्यलंकार अर्पण करावे. लाल रंगाचे फूल, अक्षता वाहावे. 

💎 स्कंदमातेला नैवेद्य :

 देवीला केळ्याचा समावेश असलेला नैवेद्य अर्पण करावा. देवीला पिवळा रंग प्रिय असल्यामुळे नैवेद्यात आणि पूजन करताना पिवळ्या रंगाचा समावेश असलेल्या गोष्टींचा आवर्जुन वापर करावा.

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प  "

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...