Kaayguru.Marathi

गुरुवार, डिसेंबर ०२, २०२१

अवकाळी पाऊस

अरे पाऊसा तू असा रे कसा
जरा   ठेव  की दया - माया
वर्षभरी    येतो   अवकाळी
शेतकऱ्यांची  लुटतो  तू  रया

करीतो रे मी तुला विनवणी
येऊ  दे  ना  रे  तू   करुणा
हसू  दे  की   रे   शेतशिवार
थांबव   बळी  राजाची  दैना

तू आणितो संकट आस्मानी
मायबाप सरकार सुलतानी
कुणा रडावे कुणा आळवावे
कोरडे   डोळ्यातील   पाणी

चार  मास  तुला दिले देवाने
हसत  खेळत सृष्टीस भेटावे
नको  होऊ  रे  तू  वेडाखूळा
आठ   मास    शांत  झोपावे

ऐक अगदी साधी अन् सोपी 
सांगतो  गड्याऽऽ तुज  युक्ती
सुखी नांदू दे हिवाळा-उन्हाळा
थांबव तुझ्या नसत्या उचापती

तू लेकीच्या मायेने भेटी यावे
सृष्टी  मातेस   प्रेमभरे भेटावे
घडीभरी   करुन   गुजगोष्टी
हर्ष  आनंदें   निरोप  तू घ्यावे !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, डिसेंबर ०१, २०२१

साखरझोप


आज  पहाटे  साखरझोपेत !
एक  गोड  स्वप्न  मी पाहिले
प्रिये !  अमृतात  न्हाली   तू !
माझे   भाग्य    फळा   आले

आज स्वप्नसुंदरीचे भाळी मी
कुंकू माझ्या नावाचे लाविले!
प्रिये  !  मधाळलेल्या   देहाने
तू   समर्पित मजला जाहले !


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, नोव्हेंबर ३०, २०२१

संघर्ष माझा!


पराभव मी सहजच पचवून घेतो
मनात न ठेवता संयमाने जाहीर करतो !
लढेन  पण कधी  वाकणार नाही
संघर्षाला न  घाबरता तयारी मी करतो !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " 

शनिवार, नोव्हेंबर २७, २०२१

अहो दाजी...!

अहो दाजी ! जाऊ नका हो लांब,
कशाला चाचपडता शिळी ती भाजी
बघा या झाडाला 
लगडले आंबे आले की पाडाला
रस चाखाया व्हा की तुम्ही राजी
अहो दाजी ! कशाला चाचपडता शिळी ती भाजी

आठवा भेट ती आपुली पहिली
रिमरिम सरी त्या ऋतू पावसाळी
नभी चमकली विज अवकाळी
कवेत येता तुमच्या झाले मी राजी
रस चाखाया या ना हो तुम्ही दाजी
अहो दाजी ! कशाला चाचपडता शिळी ती भाजी

मन झाले अधीर भेटाया हुरहूर
वाट पाहिन सायंकाळी नाक्यावर
घडता भेट तुमची आणि माझी
कशाला हवा दोघांत आपुल्या काझी
रस चाखाया या ना हो तुम्ही दाजी
अहो दाजी ! कशाला चाचपडता शिळी ती भाजी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, नोव्हेंबर २६, २०२१

अंगाईगीत

अंगाईगीत

सजली रात्र चांदण्याच्या शालू नेसुनी
रातकिडे वाजवती पिपाणी
वारा   गातसे  मंजुळ गाणी
निज रे माझ्या बाळा गाते तुला अंगाई

परसात निजली बाळा जाई जुई
जोजवण्या आली रातराणी ताई
सोबतीस तिच्या निद्रा राणी बाई
निज रे माझ्या बाळा गाते तुला अंगाई

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...