अरे पाऊसा तू असा रे कसा
जरा ठेव की दया - माया
वर्षभरी येतो अवकाळी
शेतकऱ्यांची लुटतो तू रया
करीतो रे मी तुला विनवणी
येऊ दे ना रे तू करुणा
हसू दे की रे शेतशिवार
थांबव बळी राजाची दैना
तू आणितो संकट आस्मानी
मायबाप सरकार सुलतानी
कुणा रडावे कुणा आळवावे
कोरडे डोळ्यातील पाणी
चार मास तुला दिले देवाने
हसत खेळत सृष्टीस भेटावे
नको होऊ रे तू वेडाखूळा
आठ मास शांत झोपावे
ऐक अगदी साधी अन् सोपी
सांगतो गड्याऽऽ तुज युक्ती
सुखी नांदू दे हिवाळा-उन्हाळा
थांबव तुझ्या नसत्या उचापती
तू लेकीच्या मायेने भेटी यावे
सृष्टी मातेस प्रेमभरे भेटावे
घडीभरी करुन गुजगोष्टी
हर्ष आनंदें निरोप तू घ्यावे !
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "