Kaayguru.Marathi

रविवार, फेब्रुवारी ०८, २०२६

अस्तित्व

शेतकरी आणि त्याचा सर्जा-राजा यांचं नातं अतूट असतं!आपल्या  धन्याशी इमान राखण्याचे वचन देऊन त्यास धिरोदात्तपणे जगण्याचे बळ देणारी ही भावस्पर्शी रचना !

मालक, कितीही  येवू द्या...
पाऊस वादळ अन्  वारा
आम्ही सर्जा राजा सदा सोबत
येऊ  देऊ नका अश्रुधारा

श्वास असेतो तुमच्यासाठी
चिखलात चालू आम्ही वाट
तुमच्यासवे दिवसरात्र राबू
पाहू आपण समृद्धीचा घाट

उन्ह  असो  वा कडक थंडी
तमा आम्ही बाळगणार नाही
स्वेदगंगेत न्हाऊ दोघे  सदैव
शेत  फुलवायला  बारमाही

जगाचा  पोशिंदा  म्हणून ...
मालक, जपून  ठेवा  सत्व
विनंती आहे माझी तुम्हाला
राखा बळीराजा म्हणून अस्तित्व!

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"

शनिवार, डिसेंबर ०६, २०२५

कुणाच्या प्रेमात?


कुणाच्या  प्रेमात कोण?
आपण  विचारावे  कसे
सवाल ऐकताच  येते हो
दुसऱ्याला आपल्यावर हसे !

पुत्र म्हणून...मी आहे हो
आईच्या वात्सल्य प्रेमात
अन् आकंठ बुडालोय मी
प्रिय बाबाचा विश्वासात!

पती   म्हणून... पत्नीवर
करतो मी जिवापाड प्रेम
मला वाटते  तुमचे माझे
अन् जगभर असेल सेम!

कुटुंब  प्रमुख म्हणून तर
सगळ्यांचा  मला  लळा
चंदनाची शितलता जपून
फुलवितो प्रेमाचा  मळा !

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"


रविवार, नोव्हेंबर ०९, २०२५

माझा पहिला प्रवास


माझा   पहिला   प्रवास 
आजही आठवतो मला 
आईसोबत नावेत बसून
गेलो मामाच्या  गावाला 

नावाड्याने मग सोडले
नावेवरचे  पांढरे  शिड 
नाव वल्हवत पाहताना 
पळून गेली मनीची भिड

भरले होते सूर्यकन्येचे 
दोन्ही काठ पूर्ण जलपात्र
नाव डोलतांना व्हायचा
बालमनाला आनंद मात्र

मध्यभागी नाव येताच 
आईने एक रुपया काढला  
तापीमायला केला अर्पण
मनोभावे नमस्कार केला

प्रकाशा क्षेत्रावर जाताच
आजही स्मरतो तो प्रवास
पुलावरुन गाडीत जातांना
होत  नाही आनंद खास !

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"

शनिवार, ऑक्टोबर ०४, २०२५

रम्य पहाट!

सातपुडा साहित्य मंच आयोजित
उपक्रम क्र- ६९
विषय - रम्य  पहाट !
सूचक - सौ.पुष्पा पी.पटेल " पुष्पम्"

-----------------------------------------------------------

वाट   चाले   नर  नारी
पंच   पंच   उषःकाळी
भक्ती  भावे आळवती
गाऊनिया  हो भूपाळी

आले    सोडून   वेंकुंठ
वृंदावनी      वनमाळी
खेळ   खेळे   राधासंगे
हरी   यमुनेच्या   जळी

प्राची  हसते  आकाशी
पहाटेच्या  रम्य  काळी
प्राजक्ताचा  गंध  दाटे
शांत   शांत    तरुतळी

रवि  किरणांचे    कुंकू
शोभे अवनिच्या भाळी
पहा  पाखरं   निघाली
उंच   प्रसन्न    सकाळी

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"


Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...