Kaayguru.Marathi

मंगळवार, फेब्रुवारी १५, २०२२

स्वप्नात मी !


पहाटे  पहाटे  अवचित असे घडले
न  कळे मज मी स्वप्न तुझे पाहिले
प्रीतिचा शुक्रतारा जणू चमचमला
तुझ्या  मलमली  मिठीत  मी न्हाले

स्वप्न  ते  अनोखे  विसरु  कसे  मी
सहवास तो  पहिला सांगू कशी मी
उठते  लाट  विरते  सागरात  जशी
बेधुंद  पंचउष:काली  तुझ्यात  मी !

स्वप्नातला  तू  चंद्र मी चकोर तुझी
जिवलगा  विसरु  कशी मी तुजला 
तू पाऊस  पहिला मी चातक तुझी
ये ! स्वप्नकुमारा  हृदयी  घे  मजला

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, फेब्रुवारी १४, २०२२

मृगनयनी


राणी, तुझा मुखचंद्र पाहता

विसरुन जातो  मी देहभान

गालावरची  गोड ती  खळी

ओठांवर  आणते  प्रीतगान

मृगनयनी  चंदेरी  हे  कुंतल

भूरळ  घालते  मज ती अदा

समजत  नाही  ग्  वेडे  मन

झालो  ग्   तुझ्यावरी  फिदा

©प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शनिवार, फेब्रुवारी १२, २०२२

* मन तुझे *


मन तुझे  जरी खट्याळ आहे
भेटणे   आपुले  अटळ  आहे

रुसलीस ग्  जरी  तू कितीही
मनवणे   तुला   अटळ  आहे

जाणून आहे   तुझा  वेडा हट्ट
राणी  मनाने  तू  सरळ  आहे

राग  लोभ  नसावा मनी कधी
भरता    हृदयी   गरळ    आहे

प्रेम  स्नेह  सौख्य निपजे मनी
जग    दुरचे   निकटची   आहे

© प्रा.पुरुषोतम पटेल " पुष्प "

सोमवार, फेब्रुवारी ०७, २०२२

स्वप्न [ चारोळी ]

सोड ना रे तू आता
रोज स्वप्नात माझ्या येणे
आता झाले मी दुज्याची
गाऊ दे मज सुखाचे गाणे 

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, फेब्रुवारी ०६, २०२२

भेटेन मी!

[ आपल्या मायभूमीच्या रक्षणार्थ आई-बाबा,पत्नी व घरदार सोडून सीमेवर अहोरात्र पहारा देत  उभ्या असलेल्या सैनिकाची आई,पत्नी यांची आणि विर सैनिकाची हृदयस्पर्शी भावना....!]
* आई -
बाळा...करु नको माझी चिंता
आणू नको तू डोळ्यांत पाणी
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गरियसी
शिकवण रे दिधली ऋषीमुनी

बाळा जन्मदात्री ही  मी रे तुझी
परी  तुज पोशिते ही माय भूमी
सेवा  कर  तू प्राणाहून प्रियही
आशिष ठेविते  तुझा  शिरी  मी

* अर्धांगिनी -
हे  औक्षण  करीते तुम्हा मी !
दिव्य  ज्योती  पेटवुनी नयनी
वाट  पाहीन  द्यावे वचन मज
भेटावे हो तुम्ही सुखे परतोनी

* वीर सैनिक-
लाज राखाया  मातृतभूमीची
प्रिये, लढता लढता  मरेन मी
नऊ महिन्यांनी  पुन्हा भेटाया
तुझ्याच उदरी जन्मेन मी !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...