Kaayguru.Marathi

शुक्रवार, जानेवारी २१, २०२२

श्री रिद्धी सिद्धी विनायक यात्रा म्हसावद

   

 म्हसावद.... सातपुडा पायथ्यालगत नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा तालुक्याच्या उत्तर दिशेला वसलेले एक टुमदार गाव... म्हसावदच्या खांद्याला खांदा लावून स्थिरावलेले एक अनकवाडे आणि दुसरे कोकणवाडे यांची एकच ग्रुप ग्रामपंचायत कार्यान्वित आहे. वादविवाद माहिती नसलेली ही अभिमानास्पद वैशिष्ट्य असणारी ग्रामपंचायत होय. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, भौतिक, वैद्यकीय, शेती, व्यापार, उद्योग आणि  साहित्य व संस्कृती या विविधांगी  क्षेत्रात सदैव प्रयत्नशील, उल्लेखनीय नाव म्हसावद असून येथे अनेक  वर्षांपासून सातत्याने यात्रोत्सव आयोजित होत आहे. दरवर्षी पौष मासी शु.संकष्ट चतुर्थीला यात्रा भरते. म्हसावद-तोरणमाळ रस्त्यावर पुरातन नवसाला पावणारे श्री रिद्धी सिद्धी विनायक मंदिर आहे. या दैवतांच्या पावन सान्निध्यात यात्रोत्सव साजरा केला जातो.
येथील मंदिराची वैशिष्ट्ये :-

© मंदिरातील श्री. रिद्धी सिद्धी विनायक मूर्ती  ही स्वयंभू आहे.
© मंदिर पूर्वामुखी असून दोन भागात विभागलेले आहे.
© मंदिराच्या एका भागात दक्षिणेस श्री रिद्धी विनायक देवता स्थापित असून हे उजवी  सोंड असलेले  दैवत होय.
© आणि याच  भागातील मंदिरात  शिवलिंग   असून हे तारकेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध आहे.
© उत्तरेकडील दुसर्‍या भागात श्री सिद्धी विनायक देवता स्थापित आहे. हे डावी सोंड असलेले  दैवत आहे.
© याच भागातही शिवलिंग असून ते रुद्रेश्वर महादेव म्हणून पुजिले जाते.
© दर संकष्ट चतुर्थीला स्त्री पुरुष भाविक श्रद्धाभावाने दर्शनाला येतात.

© जीर्णोद्धार :-
म्हसावद येथील जुनी - जाणती जेष्ठ-वयोवृद्ध जनाकडून प्राप्त  माहिती नुसार:
© मंदिराच्या पहिला जीर्णोद्धार 1966 साली करण्यात आला.
© दुसरा जीर्णोद्धार 2003 साली करण्यात आला.

© यात्रा वैशिष्ट्ये :-
* ही यात्रा म्हसावदसह थेट सातपुडा  पर्वतराजीतील  गावपाड्यात, थेट नर्मदा काठापर्यंत आबालवृद्धाना एक वार्षिक आनंदोत्सव असते.
* यात्रेत म्हसावद आणि पंचक्रोशीतील आबालवृद्धांची हजेरी.
* महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या तिन्ही राज्यांना एकत्र आणणारी यात्रा.
* विविध भाषा, संस्कृती व वेशभूषेचे दर्शन घडविणारी यात्रा.

© खवय्येगीरी :-
* विविध हॉटेल व स्टालची आकर्षक उभारणी.
* हॉटेलमधील खास गुळाची जिलेबीची लालपरी म्हणून चविष्ट  ओळख.
* गोडशेव इंडीयन चॉकलेट नावाने आस्वादक  परिचय. आणि  खास भजी,कचोडी या पदार्थांना खवैय्यांची प्रथम पसंती असते.
* म्हसावद आणि परिसर ऊसाचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे.यात्रेत ताजा ऊसाचा रस रसवंतिच्या छूनछून वाजणा-या घुंगरूच्या तालावर पिण्याची  मजा काही औरच!

© मनोरंजन :-
यात्रेत आबालवृद्धांसाठी मनोरंजनाच्या साधनांत बालगोपाळांसाठी पालखी झुले असतात. सेल्फीचा जमान्यातही कॅमेरात फोटो काढून देणारे फोटो स्टुडिओ देखील भाव खाऊन जातात. पालखी झुल्यांवर नवतरुण-तरुणी देखील  बसून आनंद लुटताना पाहायला मिळतात.लहान मुलांसाठी  किर्र.. किर्र, कर्रर्र-कर्र वाजत मुलांना आकर्षित करणारे विविधरंगी, विविधढंगी लहान मोठे फुगे पाहून श्रावणातील इंद्रधनु धरेवर उगवला की.. असे वाटते. मनमोहक सूर आळवत यात्रेत भटकंती  करणारे बासरी विक्रेता पाहताच कृष्णसख्याच्या भेटीस आसुसलेली प्रिय सखी राधा डोळ्यासमोर उभी राहते.
दिवसभर यात्रेत भटकंती करुन रात्री विसावलेल्या शौकीनांसाठी सिनेमा थिएटर, तमाशात काळू बाळू तमाशा मंडळ, रघुवीर खेडकर, मंगलाबाई बनसोडे हे तमाशा फड आवर्जून उपस्थिती लावतात.
अशी ही श्री रिद्धी सिद्धी विनायक यात्रा..
  दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार झालेले  चावी व रिमोट कंट्रोल द्वारा चालणारी खेळणी. मोठ्या प्रमाणावर विक्री होतांना दिसतात. खेळण्याचा स्टॉलवर ' हे नको, ते हवे'. असा हट्ट  धरुन रडून आकांत करणारी मुले व त्यांची समजूत काढतांना आई बाबाची होणारी जीवाची घालमेल, प्रसंगी नवरा बायकोतील वादही पाहायला मिळतात.

©शेतीपयोगी साहित्य :-
* म्हसावद  यात्रेत शेतीपयोगी साहित्य ही पाहायला मिळते.
© महिलासाठी सौदर्यप्रसाधने :-
यात्रेत  महिलांसाठी सर्व प्रकारची सौदर्यप्रसाधने, पायातील पैंजण, जोडवी, टिकली, बांगडी व अजूनही बरेच काही स्टॉलवर मांडलेले दिसतात.
   अशी ही म्हसावद, ता.शहादा. येथील श्री रिद्धी सिद्धी विनायक यात्रा... आनंदाची,  सुखाची, आपल्यातीलच हरवलेल्यांना शोधणारी, कधी हुरहुर लावणारी, ब-याच वर्षांनी आपल्या  प्रियजनांची गाठभेट घडविणारी, मनाला नवीन उर्मी देणारी, कधी आठवणींचा हुंदका दाटवून - भावनांना अश्रूद्वारा मोकळी वाट करुन देणारी... आठवणीतील मोरपीस...!
यंदा पौष ।। कृ.३।। शुक्रवार दि.२१ जानेवारी २०२२ रोजी संकष्ट चतुर्थीच्या पावन पर्वाला भरणारा म्हसावद,ता.
शहादा येथील श्री रिद्धी सिद्धी विनायक यात्रोत्सव कोरोना पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.  यामुळे  ग्रामीण भागातील अर्थकारण पार कोलमडून गेल्याची चिंता सर्वांनाच दंश करुन गेली आहे.

पुढच्या वर्षी ही यात्रा उत्साहाने साजरी होऊ दे ! ही आर्त विनवणी यंदा सगळ्यांनी श्री रिद्धी सिद्धी विनायक चरणी मनोमन केली आहे..!🌹🙏🙏🙏

    🙏🌹 श्री रिद्धी सिद्धी विनायक नमः!🌹🙏

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " म्हसावद, ता.शहादा, जि.नंदुरबार भ्रमणध्वनी-९४२१५३०४१२

गुरुवार, जानेवारी २०, २०२२

वसुंधरे तू द्यावेस दान !

वसुंधरे तू द्यावेस दान !
हे वसुंधरे तू द्यावे मज मुक्तहस्ते
पेरीतो मुठीत  घेऊन एक दाणा
टाकून दे  भूवरी मोत्यांच्या सडा
तृप्त  होऊ   दे  सकल जीवांना !

हे वसुंधरे तू द्यावे मज मुक्तहस्ते
ओथंबून  यावे  मेघ  येथे सगळे
व्हावी शांत तृषा द्यावे समाधान 
विरुन जावी दिसणारी मृगजळे

हे वसुंधरे तू  द्यावे मज मुक्तहस्ते
फूलू  फळू   दे  शेतशिवार सारी
कणसात चमकू दे माणिक-मोती
दैन्य   सरु दे ! लक्ष्मी यावी  दारी

हे  वसुंधरे तू द्यावे मज मुक्तहस्ते
हाती न राखता नीती- मती दान
सरु दे  शत्रूबुद्धी द्वेष अन् क्लेश
दिगंतराळी जावो समृद्धीचे गाणं

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, जानेवारी १८, २०२२

टोपणनाव : कालचे आणि आजचे !

टोपणनाव:कालचे आणि आजचे !

     मी नोकरीच्या निमित्ताने जन्मगाव सोडून वालगावी आलो.कधी न पाहिलेले हे गाव.१९९१ चे ते दिवस होते.१९९० च्या दशकात महाराष्ट्रात बहुतांश शिक्षण संस्थांकडून शाळा सुरु करण्याचा सपाटा सुरु होता.जसा मृगाच्या सरी बरसल्या की, बळीराजाची पेरणीची लगबग सुरु होते.तशी गाव-खेड्यात-पाड्यात नवीन शाळा उघडल्या जाऊ लागल्या...अर्थात त्या शाळा विनाअनुदान तत्वावरच सुरु होत होत्या.आणि एक दोन वर्षांत सरकारी अनुदानावर येत होत्या.
     अशाच एका विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयात मी रुजू झालो.नशिबाने म्हणा किंवा संस्थेचे पूर्वकार्य संचिताने म्हणा,ही शाळा दोनच वर्षांत अनुदानपात्र ठरली.माझे मूळ गाव पन्नास कि.मी.अंतरावर असल्याने (तेव्हा आजसारखी दळणवळणाची साधने मुबलक नव्हती.) मी एक खोली घेऊन वालगावीच राहू लागलो.माझे गाव जेमतेम आठशे हजार वस्तीचे ;तर वालगावं हे सुमारे आठ नऊ हजार लोकवस्तींचे गांव. गावात अठरापगड जाती सुखैनैव नांदत होत्या.असे चित्र मी अनुभवत येथे राहू लागलो.
     आपल्या मुला-मुलींना कोडकौतुकाने कसे बोलवावे.हे मी राहत असलेल्या गल्लीत अनुभवत होतो.प्रारंभी मीही नवीनच असल्याने घरातील, गल्लीतील बाया-माणसे ज्या नावांनी त्या मुला-मुलींना हाक मारीत त्याच नावाने मीही हाक मारु लागलो.त्यात प्रामुख्याने मुलींमध्ये " मुन्नी, गुड्डी, चक्कू, पिकी, टिंकी, भुरी, माई, आक्कू " ही नावे अग्रस्थानी होती.तर मुलांच्या नावात " भैय्या, लोदू, पप्पू, पिंटू, बापू, लोटू, गोटू,अण्णा, दादू " ही नावे अग्रस्थानी होती.मी विचार करायचो की, ह्या मुला-मुलींना ही खरी नावे असतील का ? हो ! ही नावे खरीच असली पाहिजे.
याला पुष्टी मिळणारी गोष्ट मी स्वतः आजमावली होती . अर्थात ह्याला कारणही तसेच होते म्हणा ना ! मी ज्या अकरावी वर्गाच्या वर्गशिक्षक होतो, त्याच वर्गाच्या कॅटलागवर मी एका विद्यार्थिनीचे नाव " अक्का *** पाटील " असेच लिहित असे.तर एका मुलाचे नाव लिहितांना " अजय अण्णा खैरनार '' असे लिहित असे.
दिवसामागून दिवस वर्षामागून वर्ष जाऊ लागली.मी राहत असलेल्या गल्लीतील मुलें मुली मोठी होत होती.ती आता माझ्या शाळेत शिकायला येऊ लागली.मग कळले " अरे ! यांची खरीखुरी नावे किती किती सुंदर आहे.त्यात कुणाचे नाव मुग्धा, मंदाकिनी, निलिमा ,गुणवंती, प्राजक्ता अशी तर मुलांच्या नावात चेतन,गौरव, राकेश, प्रकाश, ध्रुव,प्रजल अशी सुंदर आधुनिक नावे होती.पण घरातील वडीलधारी मंडळी, आई-वडील,आजी-आजोबा त्यांना आत्यंतिक प्रेमाने, कौतुकाने - मुन्नी, गुड्डी, चक्कू, पिकी,भुरी,टिकी , माई, आक्कू " या नावांनी संबोधित असत.मुलांना भैय्या, लोदू, पप्पू, पिंटू, बापू, अण्णा,लोटू, दादू ,भू-या " ही नावे होत.सुमारे सहा सात वर्षांनंतर हळुहळू कळू लागले की ,अरे... ही तर कोडकौतुकाने ठेवलेली टोपण नावे आहेत.
     माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण घेतांना मराठी कथा, कविता,धडा अभ्यासतांना बरीच टोपण नावे तोंडपाठ करावी लागली होती.त्यात बालकवी, केशवसूत, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, कवी बी, आरती प्रभू, माधव ज्यूलीयन, स्वातंत्र्यवीर, साने गुरुजी, अनिल, साहित्यसम्राट,ग्रेस,कुंजविहारी,दत्त, अज्ञातवासी असे अनेक साहित्यिकांची नावे मराठीच्या शिंदे सरांनी आमच्या कडून तोंडपाठ करवून घेतली होती.ही नावे मला ज्ञात होती.त्यांचे कार्यकर्तृत्वही सरांकडून जाणून घेतले होते.
ह्या नावांना साहित्याचा मलमली स्पर्श, अमृताची चव,आणि गंगेचे शुचित्व आणि गंधर्व नगरीचे सूर प्राप्त होते.ते तर महाराष्ट्रातील वाचकांच्या तना-मनात सतत रुंजी घालणारी नावे होती.
      ...पण एक शिक्षक म्हणून वालगावात मी जी काही टोपण नावे अनुभवत होतो.आणि आजही अनुभवतो आहे.त्यातील ९९.९९ टक्के मुला-मुलींची खरीखुरी नावे आजही गाव-गल्लीत ठाऊक नाहीत.सर्वांचीच लग्न झाली.मुली सासरी निघून गेल्या.तरी त्यांची ओळख अमक्याची मुन्नी, पिकी ! तमक्याची गुड्डी,भूरी,चक्कू हीच नावे सर्वामुखी टिकून आहेत.तर मुलांपैकी बहुसंख्य बाप बनले आहेत. त्यांच्या मुला मुलींना विचारले , तू कोणाचा मुलगा किंवा कोणाची मुलगी ग्ं ? " ती लहान मुलं आजही बोबड्या बोलात म्हणतात, " मी पिंट्याचा मुलगा, मी मुन्नी बाईची मुलगी, मी चक्कूचा, मी लोट्याचा मुलगा! " अशी गंमतीशीर व ओठांवर हसू आणणारी उत्तरे ऐकायला मिळतात.म्हणतात ना, " लहान मूल हे सर्व गोष्टी मोठ्यांच्या निरीक्षणातून, ऐकण्यातून, कृतीतून शिकतात.आपल्या आई-बाबांना घरातील मंडळी, नात्यातील मंडळी, गल्लीबोळातून कोणत्या नावाने हाक मारली जाते.ते ते ऐकतात.तीच नावे लक्षात ठेऊन स्वतःची ओळख गंमतीशीर नाव जोडून देतात. हा त्यांचा दोष म्हणता येणार नाही.मग हा सुद्धा एक संस्कार म्हणावा का ? तो चांगला की वाईट हे वैचारिक मंथनातून सिद्ध होईलच!
पण तत्पूर्वी गल्लीबोळातील या टोपणनावांना एक विशिष्ट वयाची मर्यादा असावीच! हे ठरवायलाच हवे!अशी टोपण नावे ठेवणे आपणास योग्य वाटते काय? 

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, जानेवारी १७, २०२२

कविता लेखन करतांना...

कविता म्हणजे काय ?
असे म्हणतात की, " गोष्टीला द्रवरूप होऊन भिडण्याची क्षमता म्हणजे कविता होय. " 
म्हणून म. सु. पाटील म्हणतात, 
‘ तिचा वेध घेण्यासाठी कवी स्वत:मध्ये जितका खोलवर बुडी घेतो, तितका तो कमी वैयक्तिक बनत जातो. तो मानवाच्या मूलभूत स्वभावापर्यंत पोचतो. अशा वेळी सर्वांना समान अशा मानवभावांची नाना रूपे आकलण्यात व ती अभिव्यक्त करण्यात तो गढून गेलेला असतो. तेथे कवीचे भाव वैयक्तिक राहत नाहीत. आविष्कार प्रक्रियेतच ते स्व-पर-तटस्थ
संबंधांच्या पलीकडे जातात.म्हणून ते कोणाचेही होतात. त्यांना विश्वात्मता प्राप्त होते. ’ त्यामुळे जगण्याच्या सर्वसामान्य तऱ्हांपेक्षा ती जाणिवेला अधिक तीव्र भासते. या तीव्रतेमागे चिरंतन आणि सार्वत्रिक होण्याची इच्छा प्रबळपणे कार्यरत असते. सर्वसामान्य चेहऱ्यांमधीलच एक स्वतंत्र आवाज म्हणजे " कविता " होय
२) रचना आणि धारणा यांमधील सगळ्यात कमी अंतर म्हणजे कविता होय. त्यामुळे ‘स्व’ला पुन:पुन्हा मोडण्यातून आणि रचण्यातून ती उत्पन्न पावते.
' स्वप्न रचणे ’ हा कवितेचा स्थायी भाव असतो. त्यामुळे ‘ कविता ’ ही रचना तीनही काळांच्या पार्श्वभूमीवर खरचटून उभी राहणारी रचना ठरते. ती विसंगतीने व्याकूळ होऊन घडणारी रचना आहे. त्यामुळे कवितेतील कुठलेही विधान जितके अधिक स्वप्नपूर्ण, तितके तीनही काळांच्या पार्श्वभूमीवर ते अधिकाधिक प्रभावी ठरते. कारण हे स्वप्नपूर्ण विधान काळाशी, वास्तवाशी फटकून उभे राहत नाही, तर काळाला सामावून त्याच्या पुनर्रचनेतून हे विधान उभे राहते.

@ प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, जानेवारी १६, २०२२

भ्रम

मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो...
हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे...
खरं तर यापैकी आपलं नसतं काही
खरंतर तुमची फक्त वेळ आहे !
ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे
नाहीतर...
सर्व जवळ असून सुध्दा परके...!
बोलायचं असतं मनातलं सारं काही
पण ऐकणारं नसतं कुणी 
सल असली तर सांगायची राहते
बल असलं तर दाखवायचं
राहून जातं...सारं काही !
साठत जातं मनाच्या कप्प्यात
एखाद्या अडगळीच्या खोलीत 
साठत जावं तसं...!


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
      

  

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...