Kaayguru.Marathi

बुधवार, जानेवारी ०५, २०२२

अनाथांची माय : सिंधुताई

अनाथांची माई : सिंधुताई !
[ शब्दसुमनांची ही श्रद्धांजली 🌹🙏]

अनाथांची     आई     तू 
नाव     तुझं     सिंधुताई
शब्दात    तुझी     महती
सांगता     यायची  नाही

माई     जन्मापासून   तू
खूप    खाल्ल्या   खस्ता
जिद्द       मनात     ठेवून 
शोधला    सेवेचा    रस्ता

माई  तू  जळत्या चितेवर
भाजून  खाल्ली  भाकरी
स्वाभिमाने  जगली माई 
केली नाही कधी चाकरी

माई तुझ्या शब्दा-शब्दांत 
माया -ममत्वाची पखरण
तुझ्या     दोन्ही    हातात
जणू   निर्धाराचा      घण

आई-बाबाविना पोरक्यांची
माई ,   झाली  तू  तर माय 
रंजल्या  गांजल्या बाळांना
झाली   चालण्याचा    पाय

माई   तू  जगविली  ममत्वे
जणू  दिड  सहस्र  बालतरु 
ममता  बालसदन   अंगणी
आनंदें   खेळतात   लेकरु !

माई...देश  विदेशात   आहे
तुझ्या   कार्याचे     गुणगान
मिळवले    स्वकर्तृत्वाने   तू
सातशेहून  अधिक   सन्मान

माई      तुझ्या     कार्यापुढे 
वाटे     गगनही    हे   खुजे
झाले    बहू   होतीलही बहू
पण    तुझ्यासम    न   दुजे

माई   तुझ्या  विचारात मज
दिसे   आभाळाची   निळाई
तुझे   एकमेवाद्वितीय  कार्य
अनंत  पिढ्यांना     नवलाई

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, जानेवारी ०३, २०२२

समजून घे !


हे  ही  माझं ते ही माझं
हव्यास  संपतच   नाही
गड्या,असं करुन करुन
पोट  कधी  भरत  नाही

गुंठा गुंठा जमिनीसाठी
तू आयष्यभर राबलास
शेवटच्या  क्षणी  सगळं
ते  इथेच सोडून गेलास

शेत  कसता  कसता  तू 
जन्माची खाल्ली खस्ता
बांध  कोरुन  कोरुन  तू
चोरला रे  वहिवाट रस्ता

हिस्से  वाटणी  करतांना
तोलून    मापून    घेतलं
अन् एका एका इंचासाठी
भावांचंच  डोके  फोडलं

तू गेल्यावर पोराबाळांनी
गुंठा  विकून  श्राद्ध  केलं 
घामाचा  थेंब  न गाळता
मौज   मस्तीतचं  खाल्लं

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शनिवार, जानेवारी ०१, २०२२

ये ! २०२२ स्वागत असो !

 

मावळले वर्ष  दोन हजार एकवीस
वारसदार दोन हजार बावीस हजर
प्रार्थना माझी तुजला हे नुतन वर्षा
दुःख क्लेश नको ! येऊ दे हर्षलहर

पिडले  जन  केला कोरोनाने कहर
गणती  नसे  किती  गळाले मोती ?
बहरु   दे   स्नेह-सौख्य प्रितीचे मळे
जोडून  दे   नववर्षा तुटली ती नाती 

अरेऽऽ दुःख गिळूनी तुझ्या स्वागता
सज्ज   पहा  सकल झाली दुनिया !
गुंडाळून  ठेव   आता  नवीन व्याधी 
तू   तरी   दाखव   सुख-समृद्धी रया 

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "




मंगळवार, डिसेंबर २८, २०२१

हे भोलेनाथ !

हे भोलेनाथ !



भोलेनाथ आलो मी तुझ्या दारी
द्यावे  दर्शन  तू  मज  क्षणभरी 

हाती  त्रिशूल शंख डमरु
जटातून वाहे गंगा भूवरी
गोड रुप असे पाहू दे मदनारी
द्यावे दर्शन तू मज क्षणभरी

सवे कार्तिकस्वामी गणपती
वामांगी तुझ्या पाहीन मी गौरी
स्वारी  अशी  यावी  नंदीवरी
द्यावे  दर्शन  तू मज क्षणभरी

देवांचा  देव  तू  महादेव
पंचानन  तू   त्रिनेत्रधारी
कर्पुरगौर कांती करुणावतारी
द्यावे दर्शन तू मज क्षणभरी

तूच तारिले अवघे विश्व
पिऊन   हलाहल   विष 
गळा सर्प निळकंठ त्रिपुरारी
द्यावे दर्शन तू मज क्षणभरी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, डिसेंबर २६, २०२१

प्रेमपुजारी


इश्क़ विश्क़ मैं क्या जानूं

मी  तर   आहे   प्रेम   पुजारी

यू  मुडकर  ना   जाओ  दिलबर

दोन  दिवसात  वरात  आणीन दारी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...