आयुष्यभर झिजविते काया
उभी राहते उन्हा - पावसात
होते लेकराची छाया...आई !
उपवास नावे सोसते त्रास
बाळा भरवी मुखीचा घास
शब्दात तीच्या अमृत शिंपण
घरादाराच्या श्वास ... आई !
नयनी लपवीते खारे पाणी
दुःख पिते देई जीवन संजीवनी
प्रसन्न वदने घरात दरवळे
जिव्हाळ्याची जाई... आई !
पहाटे उठते उशिरा निजते
मोल ती कसला ना घेते
लोभ ना तिजला मोठेपणाचा
जखमेवरची फुंकर... आई !
राब राबते परी न विसरते
मन तिचे खोप्यातच रमते
नजर पिलावरी भिरभिरते
जणू ऊंच आकाशी घार...आई !
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "