Kaayguru.Marathi

गुरुवार, जुलै ३०, २०२६

मित्र असावा सुदामासारखा अन् कृष्णासारखा!



    सुदामा,श्रीकृष्णाची मैत्री आणि सांदिपनी ऋषींच्या आश्रमातील चणे खाण्याची आणि सुदामाची द्वारकेत श्रीकृष्णाची भेट! ही एक प्रसिद्ध पौराणिक कथा आहे. या…आपण त्यातून मैत्रीचे धागे जाणून घेऊ !
   द्वापार युगात उज्जैन,हे आश्रमांचे नगर म्हणून सर्वदूर परिचित होते.तेथे क्षिप्रा नदीच्या काठावर महर्षि सांदिपनी यांचा आश्रम होता.जिथे श्रीकृष्ण अन् सुदामा गुरुकुलात अध्ययन करीत होते.
   आश्रम म्हटला की,तेथील सर्व कामे क्रमाक्रमाने प्रत्येक शिष्याला करावी लागत.एकदा गुरुमाता सुमुखी देवीने कृष्ण आणि सुदामाला जंगलातून स्वयंपाकासाठी आणि यज्ञासाठी कोरडी लाकडे गोळा करुन आणायची आज्ञा केली.
   गुरुमातेने विचार केला की,जंगलात काम करताना, भटकंती होईल व मुलांना भूक लागेल, हे ओळखून गुरु मातेने सुदामाच्या हातात सकाळी आश्रमात आलेली चण्यांची एक पोटली दिली.अन् सुदामाला स्पष्ट सांगितले की, " वत्सा,जेव्हा भूक लागेल,तेव्हा हे चणे तुम्ही दोघे अर्धे-अर्धे वाटून खा हो!" सुदामाने ती पोटली आपल्या वस्त्रात बांधून घेतली. आणि कृष्ण व सुदामा दोघेही जंगलात कोरडी लाकडे गोळा करण्यासाठी निघाले.
   दाट जंगलात अचानक काळे मेघ दाटून आले.पाहता पाहता जोराचा पाऊस सुरु झाला.पावसापासून बचाव व्हावा,कदाचित पूर आला तर वाचता येईल,म्हणून कृष्ण आणि सुदामा दोघेही वेगवेगळ्या दाट पर्णाचा मोठ्या झाडावर चढून बसले.
  पाऊस सुरु असताना सुदामाला कडाडून भूक लागली. त्याला आपल्या जवळ असलेल्या चण्याची पोटली आठवली.ती त्याने सोडली.चणे पाहताच त्याला आश्चर्याचा धक्का बसला.सुदामा हा कुलवंत ब्राह्मण होता.त्याला अंतर्ज्ञान प्राप्त होते.त्या ज्ञानामुळे त्याला कळले की,“अरे देवा,हे चणे तर शापीत आहेत की! जो कोणी हे चणे खाईल तो दारिद्र्यात जाईल.” सुदामा स्वतःशीच म्हणाला.
   सुदामाच्या डोक्यात विचार आला की, “आपण हे चणे न खाता जंगलात फेकून द्यावे.पण दुसऱ्याच क्षणी त्याला वाटले की,जर आपण हे चणे जंगलात फेकून दिले, तर इथे ते चणे पडल्यावर जमिनीत उगवतील व  हे चणे खाणारे पक्षी-प्राणी,मानव शापित होतील.म्हणून हे करणे योग्य नाही.त्यापेक्षा हे चणे मी एकट्याने खाऊन टाकलेलेच बरे!”
    सुदामाच्या डोक्यात तत्क्षणीं दुसरा विचार आला,
“असेही आपल्याला गुरुमातेने दोघांमध्ये चणे वाटून खायची आज्ञा केली आहे.मी एकटा कशाला खाऊ? कृष्णालाही मुठभर देऊ की.पण…नाही.हे सुद्धा योग्य होणार नाही.
श्रीकृष्ण हा गोकुळीचा नंदपुत्र.शिवाय सृष्टीचा पालनकर्ता. त्याचा सोबत वाटून खाल्ले तर सृष्टीचा पालनकर्ता असलेल्या श्रीकृष्णाला आणि परिणामी संपूर्ण विश्वाला दारिद्रयात खितपत पडावे लागेल.म्हणून श्रीकृष्णाला चणे देणे हिताचे ठरणार नाही.श्रीकृष्ण कोणी परका नाही.माझ्या जीवलग मित्र आहे.त्याला मी दारिद्र्यात टाकू शकत नाही.मी कृतघ्न होणार नाही. माझ्या मित्र श्रीकृष्णाला अर्थातच जगाला या भयंकर शापापासून वाचवणे मित्र म्हणून माझे आद्य कर्तव्य आहे.
विचारांती सुदामाने तो सर्व शाप स्वतःवर घेण्याचा निर्णय घेतला. आणि त्याने श्रीकृष्णाच्या नकळत ते सर्व चणे स्वतः एकट्यानेच खायला सुरुवात केली.सुदामा व कृष्ण ज्या झाडावर बसले होते त्या झाडांची पाने दाट असल्यामुळे दोघांना एकमेकांचा चेहरा दिसत नव्हता, पण कृष्णाला चणे चावण्याचा 'करम-करम' असा आवाज येताच. श्रीकृष्णाने विचारले, "सुदामा, हा कसला आवाज येत आहे? तुला थंडी वाजतेय का?" सुदामाने खोटे बोलून उत्तर दिले, “हो रे कृष्णा,थंडीमुळे माझे दात वाजत आहेत.” सुदामाने श्रीकृष्णाला त्याचा हिस्सा न देता सर्व चणे एकट्यानेच खाऊन संपवले.
जेणेकरून गरिबी,दारिद्रय फक्त त्याच्याच वाट्याला येईल आणि त्याचा मित्र कृष्ण सुरक्षित राहील.
  पाऊस मंदावला.दोघे आपापल्या झाडांवरून खाली उतरले.श्रीकृष्णाने अंतर्ज्ञानाने चण्याचा सर्व इतिहास समजून घेतला होता.तरीही त्याने एका शब्दानेही “ तू एकट्याने चणे खाल्ले!” असे म्हटले नाही.श्रीकृष्णाने जाणले होते की, पोटलीतील चणे एका वृद्ध ब्राम्हण स्रीच्या घरुन रात्रीस चोरी झालेले असून तीने ते चणे चोरी झाल्यावर एक शाप दिला,जो कोणी हे चणे खाईल तो कायम दारिद्र्यात जाईल.तेच हे चणे!
कृष्ण मनात म्हणाला, “ मित्र सुदामा,धन्य आहेस तू! कुलशिल ब्राम्हण समाजासाठी काय करु शकतो. याचा उत्तम आरसा आहेस तू!अरे, माझ्यासाठी संपूर्ण आयुष्य एकट्याने दारिद्रयात झोकून दिले.खरंच मित्र म्हणून तू खूप महान आहेस.मित्र किती उदार व समर्पित असावा याचे तू एक आदर्श उदाहरण आहेस! सुदामा, तू माझ्यावर केलेल्या उपकाराची फेड मी योग्य वेळ आल्यावर नक्कीच करेन!” कृष्णाने मनोमन संकल्प केला.
   लाकडे गोळा करुन सुदामा व कृष्ण सांदिपणी आश्रमात परतले.
सर्व विद्या,कला,कौशल्य,प्राप्त करून अध्ययनानंतर पंचवीस वर्षांनी त्यांनी आश्रमातून निरोप घेतला.
  सुदामा दारिद्र्यात जीवन कंठीत होता.एके दिवशी त्याला मित्र श्रीकृष्णाची आठवण झाली.भेटायला जातांना सुदामा पत्नी सुशीलाने,शेजारच्या घरुन मागून आणलेले चार मुठी पोहे फाटक्या,मळकट कापडात बांधून त्याचा हातात ती पोह्यांची पुरचुंडी दिली. सुदामा जेव्हा द्वारकेला आपला बालमित्र श्रीकृष्णाला भेटायला राजवाड्याच्या द्वारपाशी आला.द्वारपालाने अडवले. तेव्हा तो म्हणाला, “ अरे,मला अडवू नको.मी कृष्णाचा मित्र! मला जाऊ दे ना!” पण द्वारपालाने म्हटले, “तू… आणि द्वारकाधीशांचा मित्र? वेश बघ तुझा.मळके व फाटके धोतर,जुन्या चपला,केस विस्कटलेले.भिकारी दिसतोस तू! जा निघ!”
   शेवटी सुदामाच्या विनंतीवरून, एका रक्षकाने आत जाऊन श्रीकृष्णाला वार्ता सांगितली, “महाराज,दाराशी एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण उभा आहे. त्याचे नाव तो ‘सुदामा’ सांगत आहे आणि तो स्वतःला तुमचा मित्र म्हणत आहे.”
‘सुदामा’ हे नाव ऐकताच सिंहासनावर बसलेले श्रीकृष्ण अत्यंत व्याकुळ झाले. ते राजशिष्टाचार, मुकुट आणि पादत्राणे विसरून राजवाड्यातून मुख्य दाराच्या दिशेने अनवाणी धावत सुटले. द्वारकेच्या राजाला एका गरीब ब्राह्मणासाठी अशा प्रकारे अनवाणी पायाने धावताना पाहून राण्या व संपूर्ण द्वारकानगरी आणि सैनिक थक्क झाले.तेही श्रीकृष्णा मागे पळू लागले.
   मुख्य दारापाशी पोहोचताच श्रीकृष्णाने सुदामाला घट्ट मिठी मारली.
एकमेकांना पाहून दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रुचा पूर वाहू लागला. श्रीकृष्ण सुदामाला सन्मानाने आपल्या राजवाड्यात घेऊन आले आणि त्यांनी सुदामाला आपल्या स्वतःच्या सिंहासनावर बसवले.जेव्हा श्रीकृष्ण सुदामाचे पाय धुण्यासाठी बसले,पाय धुण्यासाठी दासी पाण्याचे भांडे घेऊन आल्या, मात्र सुदामाचे पाय काट्याकुट्यांनी आणि जखमांनी भरलेले पाहून श्रीकृष्णाचे हृदय भरून आले. असे म्हणतात की, श्रीकृष्णाने सुदामाची बिकट अवस्था पाहताच त्यांच्या डोळ्यातून इतके अश्रू वाहू लागले की त्या अश्रूंनीच सुदामाचे पाय धुतले गेले!”
कृष्णाचे प्रेम पाहून सुदामा ही गद्गद झाला.
   श्रीकृष्णाचे हे मित्र प्रेम पाहून पत्नी देवी रुक्मिणी आणि इतर राण्याही सुदामाची सेवा करू लागल्या. थोड्या वेळाने श्रीकृष्णाने विचारले, “मित्रा, गुरूमातेने माझ्यासाठी काही भेट पाठवली आहे का?” सुदामाला त्या भव्य राजवाड्यात आपले चार मुठी पोहे काढायला लाज वाटत होती, म्हणून त्याने ती पोटली आपल्या काखेत लपवली.परंतु, अंतर्यामी श्रीकृष्णाने ती पोटली ओळखून स्वतःहून काढून घेतली.
श्रीकृष्णाने आनंदाने पोह्यांची पहिली मूठ खाल्ली, आणि सुदामाला पृथ्वीचे वैभव बहाल केले. जेव्हा त्यांनी दुसरी मूठ खाल्ली, तेव्हा सुदामाला स्वर्गाचे ऐश्वर्य दिले. जेव्हा श्रीकृष्ण तिसरी मूठ खाणारच होते, तेव्हा देवी रुक्मिणीने जी साक्षात लक्ष्मीचे रूप होती श्रीकृष्णाचा हात धरला.देवी रुक्मिणी म्हणाली, “ प्रभो, जर तुम्ही तिसरी मूठही खाल्ली,तर तुम्ही स्वतःलाही सुदामाच्या स्वाधीन कराल!” 
काही दिवस राजवाड्यातील आदरातिथ्य व पाहूणचार घेऊन सुदामा आपल्या गावाकडे परत जाण्यासनिघाला. श्रीकृष्णाने सुदामाला जाताना वरवर कोणतेही धन किंवा भेटवस्तू दिली नाही.आणि सुदामानेही मित्राकडे काही मागितलेच नाही, तो फक्त मित्राच्या प्रेमाने तृप्त होऊन परतत होता.परंतु,जेव्हा सुदामा आपल्या गावी पोहोचला, तेव्हा त्याला त्याची जुनी झोपडी कुठेच दिसली नाही. तिथे श्रीकृष्णाच्या कृपेने एक भव्य सोन्याचा महाल उभा राहिला होता आणि त्याची पत्नी सुशीला व मुले राजेशाही थाटात राहत होते. सुदामाला समजले की त्याच्या मित्राने न मागता त्याला कुबेराचे वैभव दिले आहे.
सुदामा आणि श्रीकृष्ण यांच्या द्वारकेतील भेटीचा प्रसंग हा भारतीय संस्कृतीतील निःस्वार्थ मैत्री, भक्ती आणि आदराचे सर्वात सुंदर प्रतीक मानला जातो हे दोन मित्र म्हणजे उदात्त एकमेकांप्रती समर्पित प्रेमाचे आदर्श होत.श्रीकृष्ण आणि सुदामा यांची ही मैत्री प्रत्येकाने आचरणात आणावी अशी होय!

जय श्री द्वारकाधीश भगवान की !🚩🌹🙏r

जय श्रीसुदामादेवजी की !🌹🚩🙏

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “पुष्प”


७ टिप्पण्या:

  1. काय वर्णवी ही मैत्रीची गाथा..!
    खूपच सुंदर शब्दात मांडलेली ही गाथा.
    अशीच मैत्री सर्वांनीच जपावी. 👍
    आबा

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम कथा लेखन सरजी ✍️👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर कथानक... मला ही कथा पहीलांदा माहीती झाली...किती मार्मिक कथा आहे ना..मित्र असावा तर श्रीकृष्ण आणि सुदामा सारखा...एकाने स्वतःहून दारिद्र ओढवून घेतलं ..तर दुस-याने आपल्या मित्राला ऐश्वर्य अर्पण केल..दोघेही महान आहेत...पुष्पा भैसले

    उत्तर द्याहटवा
  4. जय द्वारकाधीश!🚩 छान कथा मांडणी. या कथेतून बऱ्याच जणांना सुदामाने सर्व चने खाण्याचे खरं कारण कळेल.

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

आईच्या हातचा गाजर हलवा!

आईने  गाजरं  किसली अन् प्रेमाने भिजली आज थंडीच्या पहाटे चुलीवर कढई सजली! साजूक तुपाचा सुगंध जणू घरभर दरवळला किसलेल्या  गाजराचा  ...