Kaayguru.Marathi

शनिवार, ऑक्टोबर ०४, २०२५

रम्य पहाट!

सातपुडा साहित्य मंच आयोजित
उपक्रम क्र- ६९
विषय - रम्य  पहाट !
सूचक - सौ.पुष्पा पी.पटेल " पुष्पम्"

-----------------------------------------------------------

वाट   चाले   नर  नारी
पंच   पंच   उषःकाळी
भक्ती  भावे आळवती
गाऊनिया  हो भूपाळी

आले    सोडून   वेंकुंठ
वृंदावनी      वनमाळी
खेळ   खेळे   राधासंगे
हरी   यमुनेच्या   जळी

प्राची  हसते  आकाशी
पहाटेच्या  रम्य  काळी
प्राजक्ताचा  गंध  दाटे
शांत   शांत    तरुतळी

रवि  किरणांचे    कुंकू
शोभे अवनिच्या भाळी
पहा  पाखरं   निघाली
उंच   प्रसन्न    सकाळी

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"


रविवार, सप्टेंबर १४, २०२५

लोकं काय म्हणतील?

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र. ५७
विषय- लोकं काय म्हणतील?
सूचक- सौ.राजश्री जाधव,पुणे
दि.१४/०९/२०२५
-----------------------------------------------------------
लोकं काय म्हणतील?[कविता]
लोकं काय म्हणतील 
मला  नाही घेणं देणं
सखे,मी फक्त जाणतो
आपलं प्रेम निभवणं!

सखे,तुझं सोबत येणं
माझ्यासाठी परिसस्पर्श 
तुझ्या एक एक शब्द
जगण्याला देतो  हर्ष!

सखे,तू  गंध फुलांचा
करिते प्रसन्न तन मन
नको घाबरु ग् जगाला
तू राधा मी  मनमोहन

सखे,मी तुझ्या प्राजक्त 
तू तर माझी चाफेकळी 
सखे, मिठीत  ये ना तू
चांदण्यात या तरुतळी

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेंन म.पटेल " पुष्प "

बुधवार, ऑगस्ट २७, २०२५

देवा,एक हे मागणे!



गणराया कृपा तुझी लाभू दे
दुःखहर्ता चरण तुझे पाहू दे
जन्मोजन्मी असावा तू सांगाती
देवा,एवढेच माझे हे मागणे !

देवा दर्शन घडो नित्य तुझे
ओठी गुणगुणू दे तुझे गाणे
जेथे जातो तेथे तू रहा सांगाती
देवा,एवढेच माझे हे मागणे !

रुप तुझे सदैव राहो डोळा
मुखी असू दे नाम आळवणे
दुःख संकटी तू व्हावा सांगाती
देवा,एवढेच माझे हे मागणे !

गर्व न निपजो दे सद्बुद्धी 
मनमंदिरी व्हावे सदैव येणे
नको दुरावा तुझ्या माझ्यात 
देवा,एवढेच माझे हे मागणे !

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल " पुष्प ”

मंगळवार, ऑगस्ट २६, २०२५

ओल्या सांजवेळी


ओल्या या सांजवेळी
नको   राहू   तू   दूर
तू    नसता   जवळी
मनी   दाटते   काहूर

ओल्या या सांजवेळी
भेटीस  झाले  आतूर
सख्या आळवू आपण
प्रीतीचे   मधुर   सुर

ओल्या या सांजवेळी
यावा  मिलनाचा पूर
तुझ्या  मिठीत  येता
वदनी   हर्षाचा  नूर

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल " पुष्प "

शुक्रवार, ऑगस्ट २२, २०२५

आम्ही सर्जा-राजा बोलतोय!

आम्ही सर्जा-राजा बोलतोय!
[ आज पोळा: वृषभांसाठी आनंदसोहळा ! शेतकरी धन्यासाठी सर्जा-राजाची भावना सांगणारे काव्य!]
----------------------------------------------------------
धनी… आज आमुची दिवाळी 
समस्त हिंदुवर्षातील हो “पोळा”
विसरुन वर्षभरीचे दुःख क्लेश
हर्ष भरे साजरा करू “सोहळा!”

धनी… तुमच्यासाठी हा सर्जा
अख्खं आयुष्य पणाला लावील
अंगात अखेरच्या श्वास असेतो
तुमच्या संग इमाने उभा राहिल!

धनी…ह्यो राजाच्या मनात सुद्धा 
तुमच्याविषयी खच्चून आदर !
उन पाऊस वा असो वादळ वारा
तुमच्या सेवेसी सदैव मी सादर!

धनी…आम्ही जगू तुमच्यासाठी 
विनंती आमची एक नक्की ऐका
कितीही आली संकट तरीही…
आत्महत्येचा धरु नका हो हेका!

धनी…तुम्हीच आमचं मायबाप
तुम्हासाठी आमची जीवनज्योती
विनंती मेल्यावर शेतातच पुरा 
नका हो देऊ कसायाच्या हाती !

धनी…आम्ही तुमच्यासाठी राबू
काळ्या आईशी निभावू नाती !
रात्रंदिन सेवा करता करता…
पिकवू सुखाचे माणिकमोती !

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “ पुष्प ”

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...