Kaayguru.Marathi

बुधवार, जुलै १३, २०२२

माझे गुरु

आज आषाढ शुद्ध पौर्णिमा: व्यासपौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा - या पावन दिनी समस्त ज्ञात अज्ञात गुरुंना विनम्र साष्टांग नमन!💐🙏
आज उगवला अती पावन दिन
आपण गुरुदेवा चरणी होऊ लिन

आई बाप आद्य गुरु आपुले
जन्म देऊनी जग त्यांनी शिकविले

द्वितीय गुरु ते गुरुकुली भेटे
त्यांचा शब्द जणू अमृत वाटे

कृष्णासम सखा तृतीय गुरु
संकटात दूर करीतो अंधारु

चतुर्थ गुरु सखी सचिव ती
देतसे संसाराला सामर्थ्य ती

गुरु तो पंचम मानावी सृष्टी
दुःख क्लेश जाळाया देई दृष्टी

षष्ठ गुरु केली मी वसुंधरा
देते पेरावे ते उगवे संदेश खरा

सप्तम गुरु करावा घननीळा
शिकवी रिते व्हावे देऊन सकळा

अष्ट गुरु सागर सरिता झरा
तिरा येता जीव उद्धरावा खरा 

नवम् गुरु पुष्प लता वृक्षवल्ली
शत्रू मित्र विसावता तळी देती सावली

दशम गुरु चंद्र सूर्य ग्रह तारे
भेद न करता नित्य सृष्टी उदधारे

घडले दर्शन जसे गायिली गाथा
सकल गुरु चरणी ठेवितो माथा

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, जुलै ०६, २०२२

नको ना रे बाबा…

नको  ना रे बाबा मला असा दूर सारु
तूच  तर  माय  माझी मी तुझी वासरु

बाबा...तू वटवृक्ष तर मी तुझी पारंबी
तुझ्या जीवनाची आहे  मी सुंदर छबी
नको ना रे  बाबा मला  असा दूर करु
तूच  तर  माय माझी  मी तुझी वासरु

बाबा…तू  शिंपले  तर  मी  तुझा मोती
तुझी  माझी सुंदर अनमोल गोड नाती
तुझा डोळ्यांत ओघळते होऊन मी अश्रू
नको  ना  रे  बाबा मला असा दूर सारु

बाबा…तू   बासरी  तर   मी   तिचे  सूर
माझं  हसणं  खेळणं  देई निराशेला नूर
नको  ना   सोडू   तुझं  लाडकं  कोकरु
नको  ना  रे  बाबा  मला असा दूर सारु

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, जून २८, २०२२

भक्तीचा छंद


प्रभो मज लागो । भक्तीचा हा छंद ।
गाईन मी नाम   । आवडीने ।।१।।

गोड  तुझे  नाम । गोड तुझे रुप ।
पाहीन मी रुप   । आवडीने ।।२।।

तुच माझी माय  । तुच माझा बाप ।
चरणाचा दास   । आवडीने ।।३।।

द्यावा मज वर   । गोड तो प्रसाद ।
करावी तू कृपा  । आवडीने ।।४।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


शनिवार, जून १८, २०२२

नामकरण

प्रिये ये ना तू जवळी
अशी लांब नको जाऊ
तुझ्या माझ्या प्रेमाला
मधूर नाव आपण देऊ!

प्रीतिचे विश्वनिर्माते
विसरता येत नाही कधी
राधाकृष्ण नलदमयंती
स्मरण करु तयांचे आधी

प्रेम करावे मेघासारखे
जगून गेली मिरा दिवाणी
शिरी-फरहाद लैला-मजनू
हिर-रांझा बाजीराव-मस्तानी

आपल्याही निकोप प्रीतिचे
आपणही करु बिजारोपण
उगवेल तरु निस्सीम समर्पणाचे
दुनिया करेल त्याचे नामकरण!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


गुरुवार, जून १६, २०२२

आई

आई✍️

आई...अचानक स्वर्गीच्या यात्रेला
जायची का ग् केली तू घाई?
तू सहज निघून गेली पण...
येता आठव अश्रू थांबत नाही!

आई...क्षणभराचा ग् विलंब
जणू आला हवेचा झोत
जाऊन पळत वैद्य आणेतो
विझून गेली तुझी प्राणज्योत !

आई...सारे सुख संपत्ती वैभव
आज तर माझ्या दारी आले
तू नसता माझ्या जवळी वाटे
मातृछत्र कायमचे मी गमावले

आई...फिरुन ये ना ग् तू...
या भूलोकी एकदा माझ्यासाठी
फिरव माया ममता जिव्हाळ्याचा
हात तू प्रेमाने माझा पाठी !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल
" पुष्प "

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...