Kaayguru.Marathi

रविवार, जानेवारी १६, २०२२

भ्रम

मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो...
हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे...
खरं तर यापैकी आपलं नसतं काही
खरंतर तुमची फक्त वेळ आहे !
ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे
नाहीतर...
सर्व जवळ असून सुध्दा परके...!
बोलायचं असतं मनातलं सारं काही
पण ऐकणारं नसतं कुणी 
सल असली तर सांगायची राहते
बल असलं तर दाखवायचं
राहून जातं...सारं काही !
साठत जातं मनाच्या कप्प्यात
एखाद्या अडगळीच्या खोलीत 
साठत जावं तसं...!


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
      

  

शनिवार, जानेवारी १५, २०२२

व्यथा [ अलक ]

            रात्रीचे ११ वाजले . सज्जन म्हणाला, साहेब, " खूप उशीर होतोय ! रिमा घरी एकटीच आहे.आतापर्यंत चार कॉल येऊन गेले हो तिचे. निघू का ? " त्याचे बोल ऐकताच मी दचकलो.
" काय? रात्रीचे अकरा वाजलेत ? " टेबलवर पडलेला मोबाईल हाती घेतला तर काय, मोबाईल स्विचऑफ ?
मोबाईल ऑन केला , पण तो ऑन झालाच नाही.
अधिक वेळ न घालवता मी सज्जनचाच फोनवर स्मिताला फोन लावला. 
" मी मंदार बोलतोय ! " 
" साहेबांना आठवण झाली वाटतं ? " स्मिताने रागातच विचारले.
" स्मिता , अग् मी आता घरी यायलाच निघालो.दहा मिनिटांतच पोहचतो हं ! सगळं काही बोलतो तुझ्याशी ! ठेवतो गं फोन ! " सज्जनला फोन हाती देत ...
" सज्जन, ऑफिस लॉक कर ! " सूचना केली.
सज्जनने मला किल्ली दिली.ती बॅगेत ठेवून मी घाईतच कार स्टार्ट केली.सज्जनला चांदणी चौकात उतरवले.
 मेन रोडवरुन  गडद अंधारातून कार सुसाट धावत होती.अचानक हेडलाईटच्या उजेडात एक तरुणी कारसमोर आली.मी कर्चऽऽकऽन ब्रेक लावला.
नशीब...तीला ठोस लागली नाही की कार उलटली नाही.दैव बलवत्तर म्हणा ना ! 
मी हेडलाईट सुरु ठेवून उतरलो.
" ए , पागल आहेस की काय ? तू तर मरशील पण मलाही मारशील ना.कुठं जायचंय तुला ?... प्रेग्नंट दिसतेय तू तर ? आणि... " 
मला बोलू न देता ती म्हणाली ,
" नाही जगायचं मला . पोटातील बाळासह मरायचंय मला ! " ती रडतच कारसमोरच बसली.
"अग्ं बाई, तूला जगावंच लागेल.आईपण म्हणजे इतकं सोपं वाटतं तुला ? आई होणं म्हणजे देवाचं वरदान . नशिबानं लाभत पोरी हे ! चल, कुठं राहते तू ? तिथं सोडतो मी तुला . "
" नाही जायचं मला त्या नरकात ! त्या राक्षसांनी आधीच माझ्या दोन मुलींचे गळे दाबून मारलं.आताही धमकी दिली,मुलगी झाली तर ती तर मरेलच...पण, तुही मरशील ! मग का जगावं मी ? मरु द्या न मला नकोय हे जगणं ! "
" ऐंक पोरी, कितीही संकटे आली तरी आशेचा दिवा कधीच विझू द्यायचा नसतो. पोटातलं बाळ घेऊन आत्महत्या करणे हे तर महापाप आहे.आणि दुसरी गोष्ट , आई होता यावे म्हणून नवससायास करतात लोकं! बाई होणं सोपं पण, आई होणं महाकठीण असतं.आईपण ही बाजारात मिळणारी एखादी वस्तू नाही.तुला सहज लाभलंय हे आईपण ! नको करु हा वाईट विचार. " मी समजूत घातली.पण ती काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हतीच .
" माझं जगणं हे मरण यातनाहून कठीण आहे.मग मी जगायचं तरी कुणासाठी ? मी शरीराने जीवंत पण मनाने कधीच मेले आहे. मरु द्या ना दादा मला ! "
" तू दादा म्हटलंय न मला ? मग ऐंक तर. पोरी, आईपण हे हृदयातून पाझरावं लागतं. बाळाला जन्मतः मरण नकोय म्हणून तूच मरायला निघालीस की नाही.पण हे शक्य नाही हो ! तू आता माझ्या स्नेहालयात राहायचं ! स्नेहालय हेच तुझं घरं आणि संसार ! ऐकतेस ना ? "
तीनं होकार दिला.तीला कारमध्ये बसवून कारने यू टर्न घेतला.तिला स्नेहालयात पोहचवून मी घरी आलो.
रात्रीचे साडेबारा वाजले होते.स्मिताची समजूत घातली.
तीने वाद न घालता मला समजून घेतले.
सकाळी सहा वाजता लॅडलाईन खणखणला.फोनवर मेट्रो राणेमावशी बोलल्या, " दादा, तुम्ही रात्री आणलं त्या पोरीने जुळ्यांना जन्म दिला . दोघे... नाही हो तिघेजण सुखरुप आहेत ! "
मी मनोमन देवाला नमस्कार केला. 
" देवा ! तुही कमाल करतो की ! जिथं एकाची उणीव तिथं तू दोन दोन लेकरं दिली की ! जय हो ! "

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


 

शुक्रवार, जानेवारी १४, २०२२

मकरसंक्रांत


श्रीविघ्नहर्ता घालितो तुला मी विनम्र दंडवत
सकल  जनांसी बळ दे करु कोरोनावर मात

सूर्यदेवा ! उत्तरायण  होऊ  दे तू आता सुखी
दुःख  दैन्य  घालव उमलू  दे  गोड शब्द मुखी

गुळ-साखरेची गोडी अन् स्निग्धता तिळाची
तिळातिळाने  वाढावी नाती स्नेह-सौख्याची

देवा, तू  दाता ! पूर्ण  कर ही मनीची इच्छा !
आनंदाने  देतो  प्रभो  मी तुमच्या  कृपेने हो 
मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा !
        
       ©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, जानेवारी १३, २०२२

पोरा , ऐंक ना जरा !

पोरा , ऐंक ना जरा!

पोरा बैस  न् जरा जवळ ऐंक रं माझ्या मनातलं
तुझ्याच रं सुखासाठी  रक्त जाळलं मी उरातलं !

सांगणार  नव्हतो रं पण आज येळच तशी आली
वृद्धाश्रमी घाला थेरड्याला सून सकाळी म्हणली

स्वतः उपाशी राहून मी घास भरवला तुला मुखी
तुझ्या आजारपणी माझ्या मांडीची होती रं उशी

तुझ्या शाळंचा खर्चापायी नाही  केली मौजमजा
आणं... तू शिकून आता  साईब  झाला रं राजा!

तुला  मोठ्ठं  करतांना  मी  लई खाल्ल्या रं खस्ता 
आता म्हातारपणी नको दावू वृद्धाश्रमाचा रस्ता

पोरा, ऐंक ! पेरलं तेच  उगवतं  हा  दैवाचा न्याय 
पटतंय का  तुझ्या मनाला विचार करुन पाहायं !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, जानेवारी १२, २०२२

शिवसूर्य जननी


स्वराज्यजननी राजमाता जिजाऊसाहेब यांना 
🙏🌹शब्दसुमनांनी विनम्र अभिवादन!🌹🙏
                       शिवसूर्य जननी
दशदिशांना काळोख असता
तू झाली सह्याद्रीच्या उषःकाल
तुझ्याच पोटी शिवसूर्य उदेला
जाळीयेला अन्यायाचा काळ 

तुझ्या रुपे प्रकटली भूवरी
अष्टभूजा जगतजननी भवानी
शब्दाशब्दात प्रसवे तुझ्या
दृष्ट दुर्जन संहारक वाणी

अनंत यातना सोसून वर्मी
आऊ ! तू मानिली ना हार
शून्यातून निर्मिले हिंदस्वराज्य
खजील केलेस शत्रू ते चार !

जिजाऊ तुमचे विचारधन
पेरीले हो मी माझ्या हृदयी 
कोटी कोटी विनम्र अभिवादन
करितो आज पावन समयी !🙏
   
🙏🙏🙏🌹विनम्र अभिवादन!🌹🙏🙏🙏
        ©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "



Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...