Kaayguru.Marathi

शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१

वाढदिवस (अलककथा)

                           🎂 💐 वाढदिवस ❤️💎

भूमिका घरातील कामं नेहमीप्रमाणेच लगबगीनं आवरण्यात गुंग होती. ट्रिंगऽऽऽट्रिंग फोनची घंटी वाजली. दुपारचा एक वाजला होता.तीने धावत जाऊन फोन घेतला.
" हॅलो! मॅम, भूमिका बोलताहेत का ? " 
" हो.मी भूमिकाच बोलतेय ? आपण कोण ?"
" मॅम ! जिज्ञासा..तिचा गाडीला अपघात झाला.आम्ही तिला लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये नेतोय,तुम्ही तिथेच या ! "
" ती बरी आ...ऽऽऽहॅलो,हॅलो…! फोन कट झाला होता."
तिच्या मनाची घालमेल सुरु झाली.तिच्या मनात शंका-कुशंकाचे लहान मोठे बेडूक टूणऽऽकन उड्या मारुन एकेक करीत बाहेर पडू लागले.तीला क्षणात घाम फूटून ती घाबरली.अस्वस्थपणे येरझाऱ्या घालू लागली.
   अंगणात बाईक थांबली.दररोज पाच वाजता येणारा अमेय आज एक वाजताच घरी पोहचला होता.त्याला पाहताच ती धावतच बाहेर आली. " बाळ,चल! बाईक स्टार्ट कर.लवकर....लाईफलाईनला पोहचायचयं आपल्याला ! जिज्ञासाला अपघात झालाय रे ! "
दहा मिनिटातच अमेय आणि भूमिका धावतच विचारांचे वावटळ घेऊन लाईफलाईनच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहचले.पाहतात तर,जिज्ञासा हातात बुके घेऊन हास्य करीत तिच्याकडे धावतच आली.

" Happy Birthday My Dear…💐💐💐"

आणि तिने तिला चक्क मिठीच मारली.
"जिज्ञासा,काय हा मुर्खपणा ? तू,आणि मग तो फोन ?"
भूमिकाला पुढे बोलू न देता ती म्हणाली, 
" वेडाबाई, I Lied ! Prank होता तो ! रांधा-वाढा-उष्टी-काढा ह्या वातावरणातून तुला बाहेर काढण्यासाठी…! बाहेरही एक सुंदर विश्व आहे ते आपली आतुरतेने वाट पाहतेय.हे तुला कळावे म्हणून ! चल, खूप मस्ती, मज्जा, धम्माल करु आपण ! "
अमेय त्या दोघीकडे अचंबीत होऊन पाहत होता.
[ टिप: ही कथा एक निव्वळ कल्पनारम्यता असून वास्तवाशी संबंधित नाही.तसे आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.]  
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
    म्हसावद


शुक्रवार, ऑक्टोबर १५, २०२१

बापरे🤭 रावण बोलतोय !🤔

      ✍️जय श्रीराम!🌹🙏
    🤭 बापरे,रावण बोलतोय!🤭

आज विजयादशमी...रावण दहनाचा कार्यक्रम करण्यात आला.मी तिथे उत्सुकता म्हणून गेलो होतो.रावण (प्रतिकात्मक पुतळा) जळतांना चक्क बोलू लागला…!
लोकहो,मी सितेचे एकदाच
अपहरण केले हो !
पण...तुम्ही मला दरवर्षीच
जाळतात हो ! का अन्याय ?

मी सीतादेवीच्या मनाविरुद्ध 
कधी अघोरी वागलोच नाही
अशोक वनात तिच्या सावलीला
क्षणभरसुद्धा थांबलो नाही

सितादेवीच्या अंगालाच काय
नाही घातला वस्रालाही हात 
खरे तर तुम्हीच वागता अघोरी
उत्तर द्या! हिंमत आहे कुणात

तुमच्या राज्यात पावलोपावली
रोज होतात अन्याय अत्याचार
श्रीराम होऊन रामराज्य आणा
करा सारासार तुम्ही विचार !

पोरी- बाळींच्या ईभ्रतीचे तर
तुम्ही लचकेच तोडतात
जाळण्याचा लायकीचे तुम्ही
पण...मलाच का जाळतात?

ऐका,प्रश्न आहे तुम्हाला माझा 
तुमच्या हृदयात आहे न् राम ?
असाल लक्ष्मणाइतके पावन
तरच करा मला जाळायचे काम

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " 






जय श्रीराम

         ✒️जय श्रीराम 🌹🙏
हृदयी वसावा राम नयनी दिसावा राम

विचारात असावा राम ओठी वदावा राम

मनात ठसावा राम कामात बसावा राम

शब्दांत मिळावा राम कर्मात लाभावा राम

सत्य शिव सुंदर राम मी करीतो प्रणाम

वाचावा राम बोलावा राम स्मरावा राम

चौ-याशीचा मुक्तीदाता जन्माचा पूर्णविराम

✒️ विजयादशमी-दसरा पावन पर्वाला
आपणास महन्मंगल शुभदायक 
🙏🙏🙏🌹हार्दिक शुभेच्छा!🌹🙏🙏🙏

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, ऑक्टोबर १४, २०२१

कळी (हायकू )

आठवणीची
कळी हो उमलली
फूल ती झाली
भावार्थ :- कळीची फूल झाल्याचे पाहून अतिव आनंद होतो.तशा सुंदर आठवणी मनाला प्रसन्नता देतात.व त्या आठवणीत आपण हरवून जातो.
पसरे गंध
दशदिशांना मंद
वारा ही धुंद
भावार्थ :- फुलांचा गंध दशदिशांना मंद मंद पसरतो.वाराही धुंदीत न्हाहतो.तसेच आठवणीं ताज्या झाल्या की मनाला धुंद करुन तजेला देतात.
झाला सूर्यास्त
आली कातरवेळ
स्मृतींचा खेळ
भावार्थ:- सूर्यास्त झाला की, कातरवेळ होते.ही कातरवेळ मोठी जीवघेणी.नको त्या स्मृती जीवंत करते.प्रेमात अडचणी आणणा-या व्यक्ती अनेकदा आपलेच प्रियजन असतात.पण,प्रेमात ब-याचदा तेच दुरावतात.ही स्मृती मन विषण्ण करुन जाते.

 © प्रा.पुरुषोत्तम पटेल   " पुष्प "

शारदीय नवरात्रोत्सव: देवी सिद्धिदात्री

🌹शारदीय नवरात्र : नववा दिवस/नववी माळा 🌹
           💎 देवी स्वरुप- सिद्धिदात्री 💎
शारदीय नवरात्र (ऑक्टोबर २०२१) मधील आजच्या नवव्या नवदुर्गेचे स्वरुप सिद्धदात्री...नवव्या माळेला देवी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते. अश्विन/शारदीय नवरात्रीची सांगता विजयादशमीने होते. आज नवदुर्गा देवी स्वरुप हे सिद्धिदात्री देवीच्या स्वरुपात आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या पृथ्वीतलावर संचार असल्याचे म्हटले जाते.

💎 कमळावर आरूढ सिद्धदात्री देवीचे स्वरुप
दुर्गा देवीचे नववे स्वरुप म्हणजे सिद्धिदात्री देवी. सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी म्हणून देवीच्या या स्वरुपाला
 " सिद्धिदात्री " असे संबोधले जाते. सिद्धिदात्री देवी
 भगवान विष्णूची प्रियतमा देवीलक्ष्मी प्रमाणेच कमलपुष्पाच्या आसनावर विराजमान आहे. देवी मधुर व गोड स्वरांनी आपल्या भक्तांना वरदान प्रदान करते. सिद्धिदात्री देवी सिंहावर स्वार असून चतूर्भूज आहे. एका हातांमध्ये कमळ,दुस-या हाती शंख, तिसऱ्या हातात गदा, आणि चौथ्या हातात सुदर्शन चक्र धारण केले आहे. सिद्धिदात्री देवी सरस्वती देवीचेही एक रुप मानले जाते. देवीने श्वेत वस्त्र परिधान केल्याने तिचे स्वरुप अधिकच मनमोहक भासते.म्हणून देवीला " प्रसन्न वदना " असेही म्हणतात. सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होते, अशी भक्तांची श्रद्धा व मान्यता आहे.

💎 अर्धनारीश्वर

१) अणिमा, २) महिमा, ३) गरीमा, ४) लघिमा, ५) प्राप्ती, ६) प्राकाम्य, ७) ईशित्व आणि ८) वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. देवी पुराणात वर्णन मिळते की, भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे भक्त श्री शंकराला ''अर्धनारीनटेश्वर '' या नावानेही ओळखतात.

💎 मंत्र

वन्दे वांछित मनोरथार्थ चन्द्रार्घकृत शेखराम्।
कमलस्थितां चतुर्भुजा सिद्धीदात्री यशस्वनीम्॥

💎 देवी सिद्धिदात्रीचा ध्यान मंत्र

सिद्धगंधर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि ।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी।।


💎 सिद्धिदात्री देवीचे पूजन 

     असे म्हणतात की, नवव्या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा ऋषि-मुनि, साधक, यक्ष, किन्नर, देवता, दानव आणि गृहस्थाश्रमी जीवन व्यतीत करणारे सांसारिक स्री-पुरुष पूजन करतात.देवीची पूजा व व्रत ठेवल्याने व्यक्तीला यश, धन आणि बलाची प्राप्ती होते.
      सिद्धिदात्री देवीचे पूजन करतांना नऊ प्रकारची फुले अर्पण करावे. नऊ जातीची फळ,आणि नऊरसांनी युक्त प्रसादाचा देवीला नैवेद्य दाखवून तो प्रसाद द्यावा.असे केल्याने भक्ताला धर्म, अर्थ,काम,मोक्ष या चार पुरुषार्थाची प्राप्ती होती.


💎 व्रताची सांगता आणि महत्त्व

देवीच्या पूजनाने यश, बल आणि धन प्राप्ती होते, असे म्हटले जाते. देवी आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते, असे सांगितले जाते. तसेच नवरात्राची सांगता सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने होत असल्यामुळे काही ठिकाणी या दिवशीही कुमारिका पूजन करण्यात येते.कुमारिका पुजनानेहीही अनन्य साधारण फळप्राप्ती होते. ९ हा अंक देवीच्या नऊ रुपांचे व नऊ शक्तीचे द्योतक असल्याने या दिवशी ९ कुमारिकांचे मनोभावे पूजन, मान-पान करावे .तसेच भैरव रुपात एका बालकाचीही
पूजा करावी. आणि नवरात्रीच्या विशेष व्रताची सांगता करावी, असे सांगितले आहे.

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
 

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...