Kaayguru.Marathi

मंगळवार, डिसेंबर २८, २०२१

हे भोलेनाथ !

हे भोलेनाथ !



भोलेनाथ आलो मी तुझ्या दारी
द्यावे  दर्शन  तू  मज  क्षणभरी 

हाती  त्रिशूल शंख डमरु
जटातून वाहे गंगा भूवरी
गोड रुप असे पाहू दे मदनारी
द्यावे दर्शन तू मज क्षणभरी

सवे कार्तिकस्वामी गणपती
वामांगी तुझ्या पाहीन मी गौरी
स्वारी  अशी  यावी  नंदीवरी
द्यावे  दर्शन  तू मज क्षणभरी

देवांचा  देव  तू  महादेव
पंचानन  तू   त्रिनेत्रधारी
कर्पुरगौर कांती करुणावतारी
द्यावे दर्शन तू मज क्षणभरी

तूच तारिले अवघे विश्व
पिऊन   हलाहल   विष 
गळा सर्प निळकंठ त्रिपुरारी
द्यावे दर्शन तू मज क्षणभरी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, डिसेंबर २६, २०२१

प्रेमपुजारी


इश्क़ विश्क़ मैं क्या जानूं

मी  तर   आहे   प्रेम   पुजारी

यू  मुडकर  ना   जाओ  दिलबर

दोन  दिवसात  वरात  आणीन दारी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, डिसेंबर २४, २०२१

संकेत अंक ४ ची महती

🌹🙏श्री गणेशाय नमः!🌹🙏
संकेत अंक - ४ 
चतुर्थ - चार वस्तूचा समुच्चयापैंकी चौथ्या वस्तू/पदार्थाला संकेतांने " चतुर्थ " असे म्हणतात .
अ - धर्म ,अर्थ, काम , आणि मोक्ष.
ब - साम ,दाम, भेद, आणि दंड.
क - पान , सुपारी , चुना , कात / काथ.
चतुराक्षरी मंत्र -
(अ ) - राधाकृष्ण (ब ) - दत्तात्रय
(क) - रामकृष्ण (ड ) - वासुदेव 
चतुरानंद -
आत्मानंद , ब्रम्हानंद, अविद्यानंद , विषयानंद.
चार आयुध - शंख, चक्र, गदा, आणि पद्म ही श्रीविष्णूची चार आयुधे होत.
चतुर्विध अन्न -
भक्ष्य - चावून खाण्याचे पदार्थ.-भाकरी,पोळी वगैरे.
लेह्य - जसे पंचामृत,रायते वगैरे.
चोष्य - चोखून खाण्याचे पदार्थ - ऊस इत्यादि
पेय - पिण्याचे पदार्थ - दूध , ताक वगैरे.
चतुर्विध आसव - (चित्त - मळ )-
कामासव, दृष्टि आसव , मताभिमान , भवासव म्हणजेच पारलौकिकेच्छा.
चतुर्विध जीव -
देव, मनुष्य , तिर्यक (मनुष्येतर जीव ), नरकी.
 चार कर्तव्य विद्यार्थ्यांचे -
स्वतंत्र बुद्धी, स्वतःवर ताबा , सेवापरायणता, सर्वसावधानता. [संदर्भ - भूदान गंगा -भाग -६]
चार दाने - आहारदान - क्षुधा तृप्त करते.
ज्ञानदान - अज्ञान दूर करते.
औषधीदान - व्याधीमुक्त करते.
अभयदान - आयुष्य वाढविते.[ संदर्भ- जैन धर्म ]
चार पुरुषार्थ - धर्म, अर्थ, काम, मोक्ष .
(ज्ञानी भक्त " भक्ती " हा पंचम पुरुषार्थ मानतात.]
चतुर्विध प्रलय - (१) नित्य प्रलय (२) प्राकृत प्रलय (३) नैमित्तिक प्रलय (४) आत्यंतिक प्रलय
 चार अलौकीक भक्त -
(१) आर्तभक्त - द्रौपदी (२) जिज्ञासूभक्त - उद्धव.
(३) अर्थार्थीभक्त - ध्रूव (४) ज्ञानीभक्त - शुकदेवमुनी.
" आर्तो जिज्ञासूरथार्थी ज्ञानी च् भरतर्षभ !" 
[ संदर्भ - भगवदगीता अध्याय ७-१६]
चार भद्र - 
अ - औषधी समूह - सुंठ, अतिविष, मुस्तागवत, गुळवेल.
ब - गोड शब्दांचे दान , गर्वरहित ज्ञान, क्षमाशिल शौर्य, त्याग युक्त वित्त.
चार प्रकारचे मित्र - औरस , नात्यागोत्यातले, वंशपरंपरा ऋणानुबंधी , आणि आपत्कालीन रक्षण करणारे
चार मुक्ती - सलोकता, समीपता,सायुज्जता, सरुपता
[ दासबोध - ४-१०-२८]
चार रुपातील मूर्ती -
विराट, सुत्रात्मा, व्याकृत, तुरीय, या चारही ब्रम्हाच्या चतुर्भुज मूर्ती होत.म्हणून त्यास चतुर्भूज म्हणतात.
[ संदर्भ - विष्णू सहस्त्रनाम ]
चार व्यूह - 
अ- वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुध्द. हे पृथ्वीस आधारभूत चार व्यूह होत.
ब - रोग , आरोग्य, निदान, वैद्यशास्र
इ - शरीर पुरुष, छंद:पुरुष ,वेदपुरुष, महापुरुष .असे परब्रम्हाचे चार व्यूह आहेत.
चतु:श्लोकी भागवत -
श्रीमद् भाग्वदताच्या दुस-या स्कंधातील नवव्या अध्यायातील ३२ ते ३५ हे चार श्लोक.यांत ब्रम्हदेवाला भगवंताने सांगितलेले गुह्य ज्ञान अथवा सर्व भागवत ग्रंथा चे सार आहे.म्हणून त्यास चतु:श्लोकी भागवत असे म्हणतात.
                श्रीभगवानुवाच :
अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत् सदसत् परम्। 
पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम् ॥(१)
अर्थ - श्री भगवान म्हणतात की, सृष्टिनिर्मितीपूर्वी फक्त माझेच अस्तित्व होते.
माझ्याहून वेगळे सृष्टीत काहीही नव्हते.प्रलय काळी सृष्टीच्या विनाश झाला असता माझेच अस्तित्व उरते.ह्या सृष्टी रुपात मीच उरलो आहे.आणि जे काही या सृष्टीत प्रलयानंतर उरते ते सुद्धा मीच आहे.

ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि। 
तद्विद्यादात्मनो मायां यथाऽऽभासो यथा तमः ॥(२)
अर्थ- जे काही माझ्या मूळ तत्वाहून वेगळे प्रतीत होते.पण ते आत्म्यास प्रतीत होत नाही.त्या अज्ञाज्ञास आत्म्याची माया समज.कारण ते सावली प्रमाणे किंवा अंधारासारखे मिथ्या समजावे.

यथा महान्ति भूतानि भूतेषूच्चावचेष्वनु। 
प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्॥(३)
अर्थ- जसे पंचमहाभूते ही संसारात लहान मोठ्या सर्व पदार्थात भरुन आहेत; पण ते दिसून येत नाही.तसा मी सुद्धा सर्वांभूती व्याप्त असूनही सर्वांहून वेगळा आहे.

एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनाऽऽत्मनः। 
अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा॥(४)
अर्थ - आत्मतत्त्व समजून घेण्याची इच्छा असलेल्यांनी ही गोष्ट जाणून घ्यावी की, सृष्टी प्रलय प्रसंगी जे तत्व स्थान आणि काळाच्याही पुढे असते.ते माझेच आत्मतत्त्व आहे.

चार अपाय श्रवणाचे - १) लय- निद्रा (२) विक्षेप- वृत्तीची बहिर्मुखता (३) कषाय - राग, द्वेष इत्यादिकाचे योगाने चित्त स्तब्ध होणे.(४) रसास्वाद - प्रसंगोपात आलेली वर्णने तीच तीच ऐकण्याविषयीची आसक्ती 
[संदर्भ- - एकनाथी भागवत ११-७०५ ]

चार अश्व श्रीकृष्णाच्या रथाचे -
शैब्य , सुग्रीव , मेघपुष्प , बलाहक 
[संदर्भ- महाभारत उद्योगपर्व- ८३-१९]
चार आदर्श कामिनीचे - 
अ- १) जुनो (२) व्हिनस (३) मिनर्व्हा (४) डायना हे चार आदर्श ग्रीक रोमन समाजाने कल्पिले आहेत.
ब - १) मानिनी -सती , (२) रुपसम्राज्ञी -रती (३) शारदा (४) युद्धप्रिया -दुर्गा ह्या होत.
चार आचार्यपीठ ( श्रीशंकराचार्य स्थापित )-
१) पुर्वेस - जगन्नाथपुरी-गोवर्धन मठ (२) पश्चिमेस - द्वारकापुरी -शारदा पीठ (३) उत्तरेस -बद्रीनारायण-ज्योतिर्मठ (४) दक्षिणेस - शृंगेरी- म्हैसूर हे मुख्यपीठ होय.
 चार द्वारे आपत्तीची -
१) अयोग्यकर्माचा आरंभ (२) स्वजनांशी वैर (३) बलवंताशी स्पर्धा (४) दृष्ट स्त्रीवर विश्वास 
चार शत्रू आरोग्याचे -
१) रसनेची विकृत रुची (२) देहातील मृत तंतू (३) अनावश्यक अन्न (४) न पचता जठरात सांचणारे अन्न.
चार उपाय (ज्ञानप्राप्तीचे)-
श्रद्धा, तत्परता, इंद्रियसंयम, योगसंसिद्धी
चार ऋणे - 
देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, मनुष्यऋण.
चार ऋत्विज -
अध्वर्यू, ब्रम्हा, होता ,उद्गाता यज्ञात हे चार मुख्य ऋत्विज असतात.
चार गुण कोंबड्यापासून शिकावेत.
१) पहाटे उठणे (२) युद्ध करणे (३) स्वकष्टार्जित भाग बंधु वर्गास देणे. (४) स्रिचे आपत्तीपासून रक्षण करणे.
" युद्धं च् प्रातरुत्थानं भोजनं सहबंधुभि: । 
स्रियमापद्मता रक्षेच्चतु: शिक्षेच्च कुक्कुटात ।।"
चार गुण दुर्लभ -
१) दान - संतोषाने (२) ज्ञान - निर्गवी (३) शौर्याचे अंगी क्षमा (४) संपत्तीत - त्याग
चार गुण शाश्वत स्रित्वाचे -
१) रजोदर्शन (२) गर्भधारण (३) प्रजोत्पादन (४) प्रजापोषण [ संदर्भ-नारदिय सूक्त भाष्य -उत्तरार्ध ]
चार गुण वृद्धसन्मानाने प्राप्ती-
१) आयुष्य (२) सौंदर्य (३) सुख (४) बल 
चार गुण स्वभावसिद्ध असतात.
१) औदार्य (२) मधुर भाषण (३) धैर्य (४) युक्तायुक्त विचार.
चार गोष्टी गेल्या की पुन्हा न मिळणा-या -
१) गेलेली अब्रु (२) बोललेला शब्द (३) दवडलेली संधी 
(४) गेलेले आयुष्य.
चार गोष्टी कल्याणकारी -
१) वाणीचा संयम (२) अल्पनिद्रा (३) अल्प आहार (४) एकाग्र चित्ते भगवंत स्मरण.
चार गोष्टी नसतील तिथे वास्तव्य करु नये -
(१) मान किंवा प्रतिष्ठा (२) प्रीति (३) गोत्रज 
(४) ज्ञानसंपादन 
 चार गोष्टी पडद्याआड ठेवाव्या -
१) भोजन (२) भजन (३) संपत्ती (४) रुपवान स्री
चार गोष्टी पवित्र -
१) झ-याचे पाणी (२) पतिव्रता स्री (३) कल्याण करणारा राजा (४) संतुष्ट ब्राम्हण.
चार गोष्टी माणसाला बिघडवतात-
यौवन,धन,अधिकार ,अविवेक
चार गोष्टी लहान म्हणून उपेक्षा करु नये.
रोग , सर्प, अग्नि, शत्रू .
चार गोष्टी वर्ज्य -
आत्मनिंदा, आत्मस्तुती, परनिंदा, परस्तुती 
या चार गोष्टी भल्या माणसाने वर्ज्य मानाव्यात.
चार दुर्गुण विनाशाकडे नेणारे -
आळस, निद्रा, विसराळूपणा, दिरंगाई.
चार पण -
१) अज्ञानी-बालपण. (२) धुंद-तरुणपण,(३) पराधीन-म्हातारपण (४) बाळंतपण .
चार पार्वतीच्या सख्या-
जया , विजया, जयंती आणि मंगलारुणा
चार प्रकार प्रेमाचे -
(१) लालन प्रेम (२) वात्सल्य प्रेम (३) सख्यप्रेम (४) माधुर्य प्रेम
चार प्रकारचे मेघ -
(१) आवर्त - विशेषस्थानी वृष्टी (२) संवर्त - सर्वत्र वृष्टी
३) पुष्कर - अल्प पर्जन्य (४) द्रोण - विपूल पर्जन्य
चार प्रकारचे वाद्य -
१) तंत -तारेची वाद्ये (२) वितंत- टाळ,चिपळ्या, (३) घन- नगारा डफ वगैरे.(४) सुस्वर - सनई, बासरी वगैरे
चार प्रकारची वैद्याची वृत्ती असावी -
१) रोग्याविषयीची ममता (२) दया (३) साधा रोग बरा करण्याचा उत्साह (४) रोग असाध्य असेल तर सोडणे.ही वैद्यांची वृत्ती असावी.
चार मित्र -
१) विद्या -प्रवासात (२) पत्नी - घरी (३) औषध - व्याधिग्रस्तावस्थेत (४) धर्म - अंतसमयी
चार रत्ने -
१) सूर्य -आकाशी (२) बालक -घरी (३) स्री - शयनप्रसंगी
(४) पंडित - सभेत. 
चार वेदांचे चार द्रष्टे -
१) ऋग्वेद - अग्निऋषी (२) यजुर्वेद - वायुऋषी 
(३) सामवेद- आदित्यऋषी (४) अथर्ववेद - अंगिरसऋषी
चार व्यसने सत्ताधा-यांना असणारी -
१) मृगया, मद्यपान, द्युत, अतिरिक्त कामासक्ती.
चार शक्ती राष्ट्र जिवंत ठेवतात-
१) शिक्षकशक्ती - ब्राम्हण (२) रक्षकशक्ती - क्षत्रिय  
(३) पोषकशक्ती - वैश्य (४) सेवकशक्ती.
चार जण शत्रू वत समजावे -
१) रुपवती भार्या (२) निरक्षर पूत्र (३) ऋणकर्ता बाप 
(४) अकुलीन माता
चौघांचे स्मरणाने कलिनाश होतो-
( १) कर्कोटक नाग (२) दमयंती (३) नळराजा 
(४) राजा ऋतुपर्ण
चांडाळ चौकडी / चार- (पुराणकालीन )-
१) दुर्योधन (२) दु:शासन (३) कर्ण (४) शकूनी.

[ पुढील भागात संकेत अंक - ५ ची माहिती ]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "



संकेत अंक ३।। ✍️

🙏🌹 श्री गणेशाय नमः!🌹🙏
 
औट - याचा अर्थ साडेतीन असा होतो.
साडेतीन पीठे -अ)- १) तुळजापूरची भवानी (२) मातापूरची रेणूका (३) जोगाईची योगेश्वरी आणि १/२ कोल्हापूरची लक्ष्मीदेवी.असे हे साडेतीन पीठे आहेत.
ब ) साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे. ॐ कारामध्ये सार्धत्रय (साडेतीन) मात्रा आहेत. 'अ'कार पीठ माहूर
'उ'कार पीठ तुळजापूर
'म'कार पीठ कोल्हापूर 
आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी. सप्तश्रृग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून हे अर्धपीठ.
साडेतीन मुहूर्त - १) वर्षप्रतिपदा/गुढीपाडवा (२) अक्षय्यतृतीया (३) विजयादशमी/दसरा आणि १/२ बलिप्रतिपदा/दिवाळीपाडवा होय.
साडेतीन वाद्ये - वीणा, पखवाज, बांसरी आणि १/२ मंजिरी अशी मिळून साडेतीन वाद्ये होत.
साडेतीन शहाणे - ( पेशवेकालीन )
१) सखारामबापू बोकील (२) देवाजीपंत चोरघडे (३) विठ्ठल सुंदर आणि १/२ शहाणा नाना फडणवीस होय.

[ पुढील भागात संकेत अंक ४ वर माहिती वाचा.]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, डिसेंबर २२, २०२१

अंक संकेत - ३ ची महानता.

             🙏 ॐ नमो गणपतये। 🙏
अंक संकेत  - ३
तीन अकारण वैरी - 
) हरिण- पारधी (२) मासा - कोळी (३) साधु - खलपुरुष
तीन अग्नी - (अ) ज्ञानाग्नि  ( शुभ-अशुभ सांगतो तो. )
दर्शनाग्नि (रुपाचे दर्शन घडवितो.)
कोष्ठाग्नि (खाल्ले-प्याले पुरवितो तो.)
(ब) दावाग्नि ,वडवाग्नि,जठराग्नि
(क) पिता- गार्हपत्य अग्नि, माता- दक्षिणाग्नि, गुरु - आहवनीय अग्नि.हे तिघेही श्रेष्ठ होत.
"पिता वै गार्हपत्योऽग्निर्माताग्निर्दक्षिण: स्मृती: ।
गुरुरावहनीयस्तु साग्नित्रेता गरीयसी ।।"

तीन अंगे (धर्माची)-
आचार, व्यवहार व प्रायश्चित
तीन अतिदाने -
गौदान,भूदान आणि विद्यादान
तीन अयोनीसंभव स्त्रिया -
वेदवती जानकी,द्रौपदी या तिघी अयोनिसंभव आहेत.
वेदवती -   कुशध्वजाच्या तपस्याफलातून जन्म.
जानकी -  भूमीकन्या.
द्रौपदी   -  यज्ञातून जन्म
" संभूता वाड्:मयीकन्या नाम्ना वेदवती स्मृता । "
[संदर्भ- वाल्मीकि रामायण,उत्तरसर्ग १७-९]

तीन अवस्था -
आत्म्याच्या  : बहिरात्मा, अंतरात्मा,परमात्मा
देहाच्या.      : बाल्य,तारुण्य, वार्धक्य
नृत्यकलेच्या : लयतालमुलक,भावमुलक,रसमुलक
जीवनाच्या   : पुत्र,पती,पिता.
स्रीजीवनाच्या: कन्या,कांता ,माता
प्रेमाच्या       : पूर्वराग,मीलन,वियोग .
बाल्यदशेच्या : 
कौमार (एक ते पाच वर्ष )
पौगंड (सहा ते दहा वर्षे )
किशोर ( दहा ते पंधरा वर्षं )
" कौमारं पंचमाब्दान्तं पौगण्डं दशमावधी ।
कैशोरमांपंचदशाद्यौवनं तु तत: परम् ।। "
[संदर्भ - भागवद.स्कंध १० अध्याय.१२ तळटीप]
सृष्टीतील पदार्थांच्या: घनरुप,द्रवरुप,वायुरुप.
तीन अर्थ -
वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, व्यंगावर.
हे तीन अर्थ अलंकार शास्त्रात मानले आहे.
तीन अमावस्या :
दिपअमावस्या       (आषाढ वद्य अमावस्या)
पिठोरी अमावस्या  (श्रावण वद्य )
सर्वपित्री अमावस्या ( भाद्रपद वद्य )

तीन अश्रू : आनंदाश्रू, दु:खाश्रू ,नक्राश्रू

तीन अक्षरात तीन गोष्टींचे प्रतिनिधित्व:
भ-र-त से तीन अक्षरे होत.
भ - भाव (भावाविष्कार )
र  - राग  (रागाविष्कार )
त - ताल (प्रमाणबध्दता )

तीन आदर्श पतीव्रता : अनसूया, द्रौपदी, दमयंती.
तीन आद्य महाकवी - ब्रम्हा, वाल्मिकी,व्यास.
तीन आधारस्तंभ शरिराचे - आहार,निद्रा, ब्रम्हचर्य
तीन उपमाता -
दाई, माता नसतांनाही पालन करणारी दुसरी बाई,आणि सावत्र आई.
तीन ऋणे - देवऋण, गुरुऋण,मातृपितृऋण.
तीन ललितकला - नर्तन,गायन, वादन
" नृत्यं गीतंच् वाद्यंच् त्रयं ललितमुच्यते । "
तीन कर्मांनी पुत्रधर्माची सार्थकता -
१) असेतो पर्यंत माता-पिता यांची आज्ञा पालन.
२) कालतिथीस त्यांचे स्मृतीप्रित्यर्थ अन्नदान.
३) गयेस पिंडदान.
" जीवतो वाक्यकरणात क्षयाहे भूरिभोजनात ।
गयायां प ण्डदानाच्च त्रिभि: पुत्रस्य पुत्रता ।। "
[संदर्भ - देवी भागवत ६-४-१५]
तीन कायिक पापे -
१) दिल्याविना एखादी वस्तू घेणे.
२) निषिद्ध हिंसा 
३) परस्रीसंग. ही तीन शारीरिक पापे होत.
" अदत्तानामुपादानं हिंसा चैवाविधानत: ।
परदारोपसेवा च् कायिकं त्रिविधं स्मृतम ।। "
[संदर्भ - मनुस्मृती १२-७ ]
तीन गण - देवगण,मनुष्यगण,राक्षसगण.
तीन गया - 
मातृगया : सिद्धपूर - गुजराथ
पितृगया : गया - बिहार
शिवगया : काशी. - उत्तरप्रदेश
तीन गुण वाड्:मयाचे - माधुर्य, ओज, प्रसाद
तीन गुण काव्याचे - उपमा,अर्थगौरव,पदलालित्य.
" उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवम् ।
दण्डिन: पदलालित्यं माघे सन्ति त्रयो गुणा: "।।
तीन गुण स्रीचे महत्व वाढवितात.
रुप, शील,आणि स्वभाव (योगीश्वर याज्ञवल्क्य)
तीन गुण शास्त्रास आवश्यक -
ग्रंथाचे संपुर्ण ज्ञान, तात्पर्याचे निरुपण करता येणे ,ग्रंथाच्या भागासंबंधी विवेचन करता येणे.
तीन नयन : शंकराचे -
अ) कृशानु (अग्नि ),भानु (सूर्य ), हितकर (चंद्र )
म्हणून शंकराला ' त्रिनेत्र ' म्हणतात.
ब) श्वेतभानु -सोम, बृद्धभानु- अग्नि,भानु-सूर्य
हे महादेवाचे तीन नेत्र होत[स्तुतीकुसुमांजलि]
तीन धूर्तलक्षणे -
मुख-कमलाप्रमाणे, वाणी-चंदनाप्रमाणे शीतल, आणि पोटात राग .
" मुखं पद्मदलाकारं वाणी चंदनशीतला।
हृदयं क्रोधसंयुक्तं त्रिविधं धूर्तलक्षणम् ।।"
तीन दानाचे नाशहेतू -
दिल्य नंतर वाईट वाटणे, अपात्री दान देणं,आणि देतांना जर श्रद्धा नसेल.
" यद्दत्वा तप्यते पश्चादपात्रेभ्यस्तथा च् यत ।
अश्रद्धया च् यद्दानं दाननाशास्रयस्त्वमी ।। "
तीन नीतिशास्त्र प्रवर्तक -
शुक्र, विदूर आणि चाणक्य से तीन आद्य नीतिशास्त्र प्रवर्तक होत.
तीन पीठे - व्यासपीठ,पूजापीठ, आणि दिपपीठ.
तीन पुरुष जगात दुर्लभ -
जननिंदेला पात्र न झालेला श्रीमान.
स्वतःची प्रौढी न सांगणारा शूर आणि
सर्वत्र समदृष्टी असणारा राजा .
" श्रीमानजननिद्यश्च शूरश्चाप्यविकत्थन: ।
समदृष्टि: प्रभूश्चैव दुर्लभा: पुरुषास्रय: ।। "
[संदर्भ - योग.वा.१-१३-११]
तीन पुराणकालीन महाक्रोधी-
दुर्वास,जमदग्नि, आणि विश्वामित्र.हे तिघेही महाक्रोधी म्हणून परिचित.
तीन पुराणकालीन महालोभी -
कंस,जरासंध, दुर्योधन [महाभारत उपसंहार]
तीन पुराणकालीन मामा -
कंसमामा, जांगीळमामा (भिमपुत्र घटोत्कचाचा कारभारी ) आणि शकुनिमामा.
हे तीन कपटनीतिनिपूण मामा होत.
तीन प्रकारच्या ओढी-
१) विषयासक्त माणसाची विषयासंबंधीची
२) मातेची मुलासंबंधी असलेली.
३) सतीची पतीविषयी असलेली.
या तीन प्रकारच्या ओढीची शक्ती एकत्रित झाल्यास भगवंताचे दर्शन घडते.
तीन प्रकार सूर्यकिरणांचे-
ताप देणारे, प्रकाश देणारे, आरोग्य देणारे.
" किरणास्रिविधा: सूर्ये तापाऽरोग्यप्रकाशदा:।
हरन्ति स्वप्रभावेण दैंन्यं तापंच् पातकम् ।। "
तीन प्रकार दानाचे -
अभयदान,उपकारदान, द्रव्यदान.
तीन दूत -
१) स्वतंत्रपणे कार्य साधणारा.
२) सांगितले तेवढेच करणारा.
३) नुसता निरोप पोहोचविणारा.
तीन दोष भोजनात टाळावे-
१) जातिदोष (पदार्थांचा स्वाभाविक दर्प वगैरे.)
२) आश्रयदोष (पदार्थ शुद्ध हवा तरी अपवित्र स्थानी ठेवल्यामुळे. )
३) निमित्तदोष ( कुत्र्याच्या स्पर्शामुळे अशुद्ध)
तीन प्रकारचे नास्तिक -
क्रिया दृष्ट (कर्म न करणारे )
मनोदृष्ट (मनानेच बिघडलेले )
वाग्दुष्ट (वाणीने दोष देणारे )
तीन गोष्टी शहाणपण प्राप्तीचे -
१) शास्त्राचा अभ्यास केल्याने.
२) संप्रदायात वापरल्याने.
३) निरीक्षणातून.
तीन प्रकार सद्गुरूला शरण जाण्याचे-
प्रणिपात, प्रश्न, आणि सेवा.
तीन प्रकार स्वयंवराचे -
इच्छास्वयंवर, पण लावून स्वयंवर ,पराक्रम करुन.
तीन प्रकार स्वरांचे -
१) तारस्वर - वरचा षड्ज् = निषाद
२) मंद्रस्वर - मधला षड्ज् = मध्यम 
३) घोरस्वर- खालचा षड्ज् = खर्ज
तीन प्राचीन संस्कृत व्याकरणकार-
१) पाणिनी - सूत्रकार
२) कात्यायन- वार्तिककार 
३) पतंजली - भाष्यकार.
तीन प्राचीन भारतीय जोतिर्विद-
आर्यभट्ट, वराहमिहीर, भास्कराचार्य.
तीन महान आनंद -
१) स्वतःचा विवाह (२) सत्पुत्रलाभ (३) पुत्राला पुत्रप्राप्ती होणे.
 तीन मूर्ख - 
१) विरक्त पण लोभी (२) योगी पण इंद्रियांच्या ३)व्युत्पन्न पण क्रोधी 
तीन युगातील तीन दाते -
सत्ययुग. - बलिराजा
त्रेतायुग - श्रीरामचंद्र
द्वापारयुग - कर्ण 
तीन वस्तू परस्वाधीन करु नये.
ग्रंथ , स्री, पैसा
तीन विद्याप्राप्तीची साधने -
गुरुसेवा,विपूल धन, विद्या देऊन विद्या ग्रहण करणे.
तीन विद्येचे शत्रू -
गुरुसेवेचा अभाव, घाई, आत्मश्लाघा
" अशुश्रुषा त्वरा श्लाघा विद्याताई: शत्रुवत्त्रय:।।"
[संदर्भ- महाभारत,उद्योगपर्व ४०-४]
 तीन विश्रांतीस्थळे सांसारिकाची-
पुत्र, पत्नी, सज्जनसमागम्
तीन वेळा प्रभुचे विश्वरुपदर्शन-
१) धृतराष्ट्राच्या राजसभेत शिष्टाईस गेल्या वेळी.
२) अर्जुनास गीतोपदेश करतांना
३) युधिष्ठिराला राज्याभिषेक झाल्यानंतर द्वारकेला परत जात असतांनाच,उत्तंक नावाच्या तपोवन ऋषीस त्याचे विनंतीवरुन श्रीकृष्णाने विश्वरुपदर्शन दिले.
तीन वैभव लक्षणे -
१) दुस-याच्या गोष्टीत ढवळाढवळ न करणे.
२) आपल्या कामामध्ये मग्न असणे.
३) मिळालेल्या संपत्तीचे रक्षण करणे.
तीन गोष्टींनी प्रतिष्ठा वाढते-
संपत्ती, सत्ता, सन्मान
तीन संग्रहणीय वस्तू -
ग्रंथ , स्नेही, औषधी.यांचा संग्रह करावा.
तिघांचा नाश अटळ -
अज्ञ- ज्ञान नसणारा,
अश्रद्ध - स्वतःला ज्ञान नसून ज्ञानी पुरुषाच्या वचनावर विश्वास न ठेवणारा. आणि विश्वासघातकी.
तिघेजण स्वर्गप्राप्तीस जातात.
अन्नदान करणारा.
पाणपोई घालणारा, रोगी बरा करणारा.
या तिघांना उत्तम गती प्राप्त होते.
तिघेही सुखी असावेत-
अन्नदाता,भोजन करणारा,स्वयंपाक करणारा.
त्रिपथगा-
स्वर्ग, मृत्यू , आणि पाताळ या तिन्ही लोकांत वाहणारी (भागीरथी नदी)
त्रिदोष - वात,पित्त, कफ
त्रिभूवन- स्वर्ग,मृत्यू, पाताळ
त्रिशूल- कटिशूल(कामेच्छा) , पोटशूळ,
मस्तकशूल
त्रिस्थळी यात्रा - काशी,प्रयाग,गया.
[ पुढील भागात पाहू अंक संकेत ३।। ची माहिती]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


मंगळवार, डिसेंबर २१, २०२१

संकेत : संख्या - २

संकेत : संख्या अंक - २
दोन अयने -
अ) दक्षिणायन - यात सूर्याची गती दक्षिणेकडे असते.याचा आरंभ कर्कसंक्रांतीपासून होतो.
ब) उत्तरायण - यात सूर्याची गती उत्तरेकडे असते.याचा आरंभ मकरसंक्रांतीपासून होतो.
" अग्निर्जोतिरह: शुक्ल: ष्णमासा उत्तरायणम् । 
धूमो रात्रिस्तथा कृष्ण: षण्मासा: दक्षिणायनम् ।।''
[ संदर्भ - भगवद्गीता : ८ -२४,२५ ]

दोन अंगे (धर्माची) -
अ) तत्वज्ञान (ब) आचार

दोन अधिष्ठाने - (रोगाची) 
अ) शारीरिक (ब) मानसिक

दोन अंग मुक्तीची -
अ) त्रिविध दुःख निवृत्ती (ब) परमानंद प्राप्ती
[ हरिपाठ रहस्य ]

दोन अधिष्ठाने - (लक्ष्मीची )
अ) चंद्र (ब) कमल 
[ संदर्भ- संस्कृतीची प्रतिके ]

दोन अवस्था - (जीवनाच्या)
अ) जन्म (ब) मृत्यू 

दोन अक्षरी दोन पावक मंत्र - 
राम आणि शिव से मंत्र काशीक्षेत्रात तारक आहेत.

दोन आदर्श भक्त -
हनुमान आणि अर्जुन

दोन आद्य शाहिर (भारतभूमीचे) -
कुश आणि लव .हे श्रीरामाचे पुत्र आणि ऋषी वाल्मिकीचे शिष्य.हे दोघेही गीतरामायण ऋषीसमुदाय,यज्ञमंडप,अथवा राजमार्ग यांवर बहूजनमनोद्दिपनार्थ कोंठेहि गाऊन दाखवित असत.
[संदर्भ - आर्यारामायण वा.रा.७-९३-५]

दोन उपासना -
सगुणोपासना आणि निर्गुणोपासना

दोन गोष्टी आजन्म संपादन कराव्या -
विद्या आणि धन 
" अजरामरवत् प्राज्ञ: विद्यार्थी च् साधयेत् [ महाभारत]
दोन गोष्टींनी मानवाचा नाश होतो.
अ) गर्व आणि लोभ
ब) चिंता आणि चिता
क) अज्ञान आणि आळस

दोन गोष्टीत संयम असावा-
शब्द उच्चारताना आणि कामवासनेवर

दोन चक्र संसाररथाचे -
स्री आणि पुरुष

दोन गोष्टी स्वर्गसुखापेक्षा अधिक होत -
जननी आणि जन्मभूमी.
" नेयं स्वर्णपूरी लंका रोचते मम लक्ष्मण ।
जननी जन्मभूमि श्री स्वर्गादपि गरियसी ।।" [ महाभारत]

दोन गोष्टी पुन्हा जोडणे अशक्य-
फुटले मोती आणि तुटले मन 
" सोने अथवा हस्तचरण। मोडिल्या सांधिता विचक्षण ।
फुटले मोती तुटले मन। सांधु न शके विधाता ।। "
[ संदर्भ - मुक्तेश्वर म.भा.अध्याय १८]

दोन गोष्टी क्षणभंगूर -
तारुण्य आणि धन 
तारुण्य आणि धनाचा नको रे मोह ।
हे तर दोघे ओसरत्या जलासम डोह।। [ पुष्पकाव्य]

दोन दुरुपयोग द्रव्याचे -
१) कुपात्री दान करणे.
२) सत्पात्री दान नाकारणे.
" लब्धानामपि वित्ताणां बोद्धव्यौ द्वावतिक्रमौ ।
अपात्रे प्रतिपत्तिश्च पात्रे चाप्रतिपादनम् ।। "
[संदर्भ- महाभारत,शांती पर्व २७-३१]

दोन नर - अर्जुन आणि अश्व

दोन महान नृत्य - तांडव (शिव नृत्य ) 
                                      लास्य (पार्वती नृत्य ) 
दोन पक्ष - (पक्ष म्हणजे पंधरवडा)
शुक्ल पक्ष - अमावास्येपासून ते पौर्णिमेपर्यंत - शुक्लपक्ष.
कृष्ण पक्ष - पौर्णिमेपासून ते अमावास्येपर्यंत - कृष्णपक्ष.

दोन पाकशास्त्र प्रविण (पुराणकालीन )-
नल राजा (स्वादिष्ट गोड पदार्थ बनविण्यात कुशल)
म्हणून नलराजाने बनविलेल्या पदार्थांना नळपाक म्हणत.
भिम - ( तिखट मिठाचे पदार्थ -तामस पदार्थ बनविणे)
भिमाने बनविलेल्या पदार्थांना भिमपाक म्हणत.

दोन पुरुष -
क्षर - जो विनाश पावतो.
अक्षर - ज्याचा विनाशच होत नाही.

दोन पुरुषोत्तम -
मर्यादा पुरुषोत्तम - राजा दशरथ व कौशल्येचापुत्र श्रीराम.
पुराण पुरुषोत्तम - वसुदेव व देवकीचा पुत्र - श्रीकृष्णपण...श्रीकृष्णाचा प्रतिपाळ गोकूळात नंदबाबा आणि यशोदेने केला.म्हणून यशोदेच्या कान्हा असेही म्हणतात.

दोन वार्ताहर (पुराणकालीन )-
नारद - हा ब्रम्हदेवाचा मानसपुत्र असून सप्तखंडात तो कुठेही भ्रमंती करीत असे.त्यास सप्तखंडातील बित्तंबातमी माहिती होतं असे.व इकडून ऐकले की, तिकडे सर्व वार्ता कुशल नितीने तो कथन करीत असे.
संजय - कुरुक्षेत्रावर सुरु असलेले महाभारत युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला हस्तिनापुरात राहूनच साद्यंत करता यावे.म्हणून प्रभू कृपेने संजयांस दिव्य दूरदृष्टी प्राप्त होती.असे म्हटले जाते.

दोन कठिण प्रतिज्ञा ( पुराणकालीन )
भिष्मप्रतिज्ञा ( आजन्म अविवाहित राहण्याची)
कचप्रतिज्ञा    ( सहस्र वर्ष ब्रम्हचर्य पालनाची )

दोन प्रकार अवलोकनाचे-
सिंहावलोकन (थोडेसे चालून गेल्यावर मागे वळून पाहणे; व पुन्हा पुढे चालणे.)
विहंगावलोकन - (सूक्ष्म निरीक्षण करणे.)

दोन प्रकार सद्गुरूचे -
ध्यायी - शास्त्र आणि अनुभूती यांनी युक्त असा गुरु.
तत्त्त्ववित - जन्मतः सिद्धयोगी असा गुरु.
[संदर्भ - द्वैविध्यं सद्गुरूणांच् ध्यायितत्त्वविदाविति -योगसंहिता ]
दोन काळ अतिदु:खदायक-
मध्यान्ह काल आणि अंतकाल

दोन प्रकारचे जन्म -
दिव्य आणि पार्थिव 

दोन प्रकारचे चोर -
उघड चोर - उघडपणे चोरी करणारा.
गुप्त चोर - साळसूद दिसणारा.

दोन प्रकारची सृष्टी -
दैवी आणि आसुरी
" द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन दैवासूर एवच् ।"
[ भगवद्गीता १६-६]

दोन प्रकारचे ज्ञान - 
अ) जन्मसिद्ध आणि अनुभवसिद्ध
ब) शब्दज्ञान आणि अनुभवजन्य ज्ञान
" ज्ञानं तु द्विविधं प्रोक्तं शाब्दिकं प्रथमं स्मृतम् ।
अनुभवाख्यं द्वितीयं तु ज्ञानं तद्दुर्लंभं नृप ।।"
[संदर्भ -देवी भागवत षष्ठ स्कंध- १५-२२]

दोन प्रकारची माणसं सुखी होऊ शकतात -
१) येणारी संकटे ओळखून आगाऊ तरतूद करणारा.
२) प्रसंगी ज्याला युक्ती सुचते तो-प्रसंगावधानी
" अनागतविधाता च् प्रत्युपन्नमतिश्च य: ।
द्वामेव सुखमेधेते दीर्घसूत्री विनश्यति ।। "
[संदर्भ - महाभारत,शांती पर्व १३७-१]

दोन प्रकारची माणसे जगात विरळाच -
१) ज्याने जे मागितले ते त्यास देऊन टाकणारा - कर्ण आणि बळीराजा
२) आपण स्वतः कोणापासून काहींही न मागणारा-

दोन प्रतिज्ञा (अर्जुनाच्या )-
दैन्य न भांकणे आणि युद्धात पाठ न दाखविणे.
" अर्जुनस्य प्रतिज्ञे द्वै न दैंन्यं पलायनम् । " 

दोन राष्ट्रीय महाकवी (पुराणकालीन ) -
व्यास - महाभारताचे कर्ते
वाल्मिकी -रामायणाचे कर्ते

दोन प्रबळ कारणे (वाद होण्याची) -
कनक म्हणजेच सोने.
कामिनी - सुंदर स्री.
" कामिनी कनकं कार्य कारणं विग्रहस्य वै । " 
[संदर्भ -देवी भागवत.चतुर्थ स्कंध.१०-६ ]

दोन विद्या -
अ) शास्रविद्या आणि शस्रविद्या
ब) बला आणि अतिबला.
सर्व ज्ञानाचे उगमस्थान.अशा या देवनिर्मित विद्या : बला आणि अतिबला ऋषी विश्वामित्रांनी श्रीरामास दिल्या होत्या.
[संदर्भ- वाल्मिकी रामायण.बाल सर्ग.२२-१७]

दोघे जण पराजित-
अ) कर्ज घेणारा आणि मुलीचा बाप
ब) लोभी गुरु आणि लालची शिष्य - कबीर

दोन खरे यात्रिक -
सूर्य आणि चंद्र.

दोन जण दुर्मिळ -
अप्रिय असले तरी हितकारक सांगणारा.
अप्रिय असले तरी ते शांत ऐकूण घेणारा.
" अप्रियस्य च् पथ्यस्य श्रोता वक्ता च् दुर्लभ: । "
[संदर्भ- वाल्मीकि रामायण.अरण्य पर्व.३७-२]

[ पुढील भागात ३ वर आधारीत संकेत वाचा.]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "



संख्या संकेत


प्रिय वाचकहो, कोणत्याही भाषेत काही शब्द फार गुढार्थसूचक असतात.अशांपैकीच " संकेत " हा एक शब्द आहे.
संकेत म्हणजे काय ?
आपले म्हणणे भाषेत कितीही शब्द घालून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी एखाद्या शब्दांचे पुष्कळ अर्थ धरण्याची आपल्याला सवय असते.तो गृहीत धरलेला विशेष अर्थ ठरलेला असला तरी सर्वांना सहज कळत नाही.अशा शब्दाने गृहीत धरला जाणारा विशेष अर्थ म्हणजे " संकेत " होय.
संकेत दोन प्रकारचे असतात.ते पुढीलप्रमाणे - 
अ ) श्रद्धाप्रधान संकेत :- हे संकेत वेद,पुराणे, इतिहास वगैरे यावर आधारलेले असतात.
आ) कल्पनाप्रधान संकेत :- हे संकेत कविंनी निर्माण केलेले असतात.
असेच काही संकेत -
शून्य :-
शून्य हा आकाशवाचक शब्द.हे जगत् असत् आहे म्हणून ते शून्य आहे.सकल संसाराची उत्पत्ती शून्यापासूनच झाली आहे.हे सर्व चराचर विश्व शून्यातून निघाले आहे. ह्या विश्वाला " ब्रम्हांड " असेही म्हटले जाते.त्याच्याही आकार शून्याचाच ! ह्या शून्यातील सारे चराचर . हे शून्य
 " अ-गणित " आणि " अ-क्षय्य " आहे.असे मानतात की, शून्याचा ' वृद्धी-क्षय ' होतच नाहीत, म्हणून ते अक्षय्य होय.
शून्यकान - कान नाही असा प्राणी म्हणजे - सर्प .
शून्यचरण - चरण म्हणजे पाय नाही असा प्राणी - सर्प.
शून्यशिर - शिर नाही असा प्राणी - खेकडा.
---------------------------------------------------------
एक - एकोऽहम् .एकच ब्रम्ह . ब्रम्ह हे एकच आहे.
एक आत्मा - जगदात्मा.
एकदंत - गणपती.
एक मूळप्रकृती - आदिमाया
एकाक्षरी मंत्र - ॐ हे ईश्वराचे उत्तमोत्तम प्रतीक होय.
प्रजापतीने अनुक्रमे देव, मनुष्य व असूर या आपल्या तिन्ही अपत्यांना हा एकाक्षरी मंत्र दिला.
[संदर्भ- बृहदारण्यक अध्याय ५-२]
एक देव - एको देव: सर्वभूतेषु गूढ: । सर्व व्यापी सर्वभूतान्तरात्मा ।देव हा एकच आहे.[ श्वेताश्वेतार - ६-११]
एक शत्रू - अज्ञान .हा मानव जातीच्या सर्वात मोठा शत्रू होय.[ महाभारत शांतिपर्व-२९७-२८]
एकाच्याच आश्रयाने असणारे एकवीस गुण-
रुप,रस,गंध,स्पर्श,एकत्वम्,पृथक्वतम्,परिमाण,परत्वे,अपरत्व,बुद्धी,सुख, दुःख इच्छा,द्वेष,यत्न,
गुरुत्व,द्रवत्व,स्नेह,
संस्कार,अदृष्ट आणि शब्द.[ शब्द कल्पद्रुम ]

(पुढील भागात अंक २ वर आधारीत संकेत वाचा.)

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "





सोमवार, डिसेंबर २०, २०२१

अहोऽऽ वय वाढलंय आता !




अहो, तुम्हाला काही कळतं का ?
वयाचा तरी विचार करा थोडा
आता काय तरुण नाही हो तुम्ही
नका होऊ तुम्ही नातवाचा घोडा

अगं,जगण्याचं वय वाढलं माझं 
पण मन आजही तरुण आहे 
बालपणाची ती अल्लड आठवण
आजही नसानसात ताजी आहे

वय झालं वयऽऽअसं नको सांगू 
खंबीरपणे आपण उभे राहू
तरुणपणातील बाकी गोष्टी
आजही आपण करीत जाऊ

वय वाढतं तशी उमेद वाढते
आपण भरावी सुखाची झोळी
राग द्वेष सारे काही विसरुन
तिरसटपणाला मारु या गोळी

वय झालं तरी आपण आनंदात
नातवंडाशी हसत खेळत रहावं
जगण्याचे खाच खळगे सारे
त्यांना समजावत सुखात जगावं

अगं,वय वाढतं तसं वाढतं ग् 
आयुष्यात अनुभवांचं गाठोडे
कडू वा गोड राखून न ठेवता
देत जावे जवळचे थोडे थोडे

देवाला आजही आहे प्रार्थना
देवा जगू दे मला अजूनही
जीवनगाण्याचे सूर अजून मी
संगीतात तरी बांधलेले नाही

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
   म्हसावद
भ्रमणध्वनी-8208841364
  







रविवार, डिसेंबर १९, २०२१

दे ऐसे दान ! [प्रार्थना]


गोड तुझे नाम देवा अविट तुझे रुप
जन्मभरी पाहीन तुला द्यावे ऐसे दान !

जाईन मी जेथे तेथे,तू सोबती असावा
माऊली होऊन माझी सावली तू व्हावा
स्मरीण मी नित्य देवा तुझे ऐसे ध्यान… ।।१।।
जन्मभरी पाहीन तुला द्यावे ऐसे दान !

श्वास असे तो देवा गाऊ दे तुझे नाम 
देवा यावे भेटीलागी तू होऊन श्रीराम
जनीचा तू विठ्ठल तुकाच्या नारायण ।।२।।
जन्मभरी पाहीन तुला द्यावे ऐसे दान !

सहस्रकोटी सूर्य तेज तुझे जगन्नाथ
चक्रपाणि श्रीहरी तू लक्ष्मीचा नाथ
लक्ष्मी  सवे दर्शन  द्या हो मज  जनार्दन ।।३।।
जन्मभरी पाहीन तुला द्यावे ऐसे दान

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, डिसेंबर १७, २०२१

आई

आई 
शब्दात  जिच्या सदैव माया 
आयुष्यभर झिजविते काया
उभी राहते उन्हा - पावसात
होते लेकराची छाया...आई !

उपवास नावे सोसते त्रास
बाळा भरवी मुखीचा घास
शब्दात तीच्या अमृत शिंपण
घरादाराच्या  श्वास ... आई !

नयनी लपवीते खारे पाणी
दुःख पिते देई जीवन संजीवनी
प्रसन्न वदने घरात दरवळे 
जिव्हाळ्याची जाई... आई  !

पहाटे उठते उशिरा निजते
मोल  ती  कसला  ना  घेते
लोभ ना तिजला मोठेपणाचा
जखमेवरची  फुंकर... आई !

राब राबते परी न विसरते
मन तिचे खोप्यातच रमते
नजर पिलावरी भिरभिरते
जणू ऊंच आकाशी घार...आई !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, डिसेंबर १६, २०२१

सजनवा [भूलोळी १-२ ]

सजनवा [भूलोळी - १]
ए सजनवा, सुनो तो !
प्रेमात घडतो उपवास
निंद तो अखियनसे चली गई
पाठवला मी मॅसेज दे ना सहवास
------------------------------------

ना जाओ [ भूलोळी - २ ]

यूॅं ना जाओ रुठकर
डोळे भरुन पाहिले नाही
यूॅं ही रुक जाओ दिल में भर लूॅं
तू मनमोहीनी रुप तुझे जणू जाई


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "



बुधवार, डिसेंबर १५, २०२१

चांदण्यात फिरताना!

चांदण्यात फिरताना कळले ग् मजला
राणी... तू  तर  शुक्राची  चांदणीच  ग् 
मंद  मंद  शितल  वा-याच्या  लहरी 
पेरीत  गेल्या  प्रितगंध  माझ्या मनी ग् 

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


मंगळवार, डिसेंबर १४, २०२१

प्यारी गीता

गीता जयंती के पावन पर्व पर मंगल शब्दसुमन!🌹🙏🙏 


मॉ बनकर जीवन का सच कहती हैं।
गुरु जैसा भगवान का रुप दिखाती है।
सच्चा मित्र बनकर जीने  का मतलब बतलाती है।
दुनिया में पावन गाथा पहचानी जाती है गीता।

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः।
हतो वा प्राप्यसि स्वर्गम् जित्वा वा भोक्ष्यसे महिम्।
क्रोधाद्भवति संमोह: संमोहात्स्मृतिविभ्रम:।सीख देती गीता।

पढुॅंगा मैं अठरा अध्याय एक से एक है भारी।
श्रीकृष्ण समझाते सातसौ श्लोक जीवनतारी।
प्रिय सखा मैं बनूॅं प्रभूका सिखाती है दुलारी।
समस्त सृष्टी ज्ञान का भांडार है गीता मेरी।

🙏🌹 जय श्री कृष्णं वंदे जगत् गुरु ।🌹🙏

© प्रा. पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...