Kaayguru.Marathi

रविवार, ऑगस्ट ०४, २०२४

माझी बाहुली

 


बाहुली  माझी इवलिशी
गाल  तिचे   गोरे  गोबरे
डोईवरचे   केस   कुरळे
डोळे  शोभे   घारे   घारे

बाहुली माझी छान छान
दिसते  जणू राजकुमारी
तिच्या   संगे   खेळतांना
आनंद  मावेना  ग्   उरी

बाहुलीला जेव्हा येई राग
नाकाची शेंडी  होई लाल
कोपऱ्यात बसता रुसुबाई
सगळेच   होती    बेहाल

बाहुली   आणि   माऊची
खूपच    जमलीय     गट्टी
माऊ   बिचारी  साधीसुधी
बाहुली  मात्र खूपच  हट्टी

बाहुली  माझी  निजतांना
ऐंकते   गोड  अंगाई गीत
धैर्य तिच्या अंगी बहु मोठे
बागुलबुवाला  नाही भीत

बाहुली  विना   घर - दार
अगदी  वाटते  सुने   सुने
तिच्या   सोबत   रमतांना
माऊली  गाते प्रेमाचे गाणे

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


शुक्रवार, जुलै १२, २०२४

विठू तुझे नाम

विठू तुझे नाम ( भक्तीगीत)
विठू तुझे नाम वाटे मज भारी
जगी फक्त चाले देवा तुझी वारी
भुवरीचा स्वर्ग देवा तुझी पंढरी
जय जय विठ्ठल जय हरी !

विठू नाम घेता टळे जन्म फेरी
तुच मुक्ती दाता त्रिखंडात तारी
भुवरीचा स्वर्ग देवा तुझी पंढरी
जय जय विठ्ठल जय हरी !

तुझ्या सेवेपायी मिळे मुक्ती चारी
तुच माझा अंतरी तुच रे वैखरी
भुवरीचा स्वर्ग देवा तुझी पंढरी
जय जय विठ्ठल जय हरी !

आलो तुझ्या द्वारी दर्शन दे क्षणभरी
विठू पितांबरधारी जीव तू उद्धारी 
भुवरीचा स्वर्ग देवा तुझी पंढरी
जय जय विठ्ठल जय हरी !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल “पुष्प ”


🙏गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांची एक सुरेख प्रार्थना!🙏


   
देवा... ! विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही ; तर,विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये…एवढीच माझी प्रार्थना !

दु:खतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे
तू सांत्वन करावंस अशी माझी इच्छा नाही; तर,
दु:खावर विजय मिळवण्याचा विश्वास माझ्यात यावा…एवढीच माझी प्रार्थना !

माझ्या मदतीला कोणी न आल्यास माझं बळ मोडून पडू नये…एवढीच माझी प्रार्थना !

तू माझं सतत रक्षण करावंस,मला तारावंस, ही माझी प्रार्थना नाहीच,संकटात तरून जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं…एवढीच माझी प्रार्थना !

माझं ओझं हलकं करुन तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही.ते ओझं वाहायची शक्ती माझ्यात यावी…एवढीच माझी प्रार्थना !

सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढीनच! आणि दु:खाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करील तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात तिळमात्रही शंका निर्माण होऊ नये…एवढीच माझी प्रार्थना !

© गुरुदेव रवींद्रनाथ टागोर

रविवार, एप्रिल २१, २०२४

साडी [ चारोळी]

अंगभर साडी-चोळी
सौंदर्याला देई निखार
वस्राविना उघडा देह
पाहता वाढवी विकार

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, नोव्हेंबर २०, २०२३

आम्ही दोघी

आम्ही  दोघी  बहिणी
नाते आमुचे अमृतावाणी
ओठी प्रितीची गाणी
सोबत निर्मळ गंगेवाणी

आम्ही दोघींचे नाते
जसे फणसाचे गरे
ठेस लागता एकीला
दुजी डोळा अश्रूंचे झरे

आम्ही दोघींचे जगणे
जसे नदि अन् किनारा
विश्वास असा अतुट
सोबत झेलतो वादळवारा

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...