Kaayguru.Marathi

शनिवार, जून १८, २०२२

नामकरण

प्रिये ये ना तू जवळी
अशी लांब नको जाऊ
तुझ्या माझ्या प्रेमाला
मधूर नाव आपण देऊ!

प्रीतिचे विश्वनिर्माते
विसरता येत नाही कधी
राधाकृष्ण नलदमयंती
स्मरण करु तयांचे आधी

प्रेम करावे मेघासारखे
जगून गेली मिरा दिवाणी
शिरी-फरहाद लैला-मजनू
हिर-रांझा बाजीराव-मस्तानी

आपल्याही निकोप प्रीतिचे
आपणही करु बिजारोपण
उगवेल तरु निस्सीम समर्पणाचे
दुनिया करेल त्याचे नामकरण!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


गुरुवार, जून १६, २०२२

आई

आई✍️

आई...अचानक स्वर्गीच्या यात्रेला
जायची का ग् केली तू घाई?
तू सहज निघून गेली पण...
येता आठव अश्रू थांबत नाही!

आई...क्षणभराचा ग् विलंब
जणू आला हवेचा झोत
जाऊन पळत वैद्य आणेतो
विझून गेली तुझी प्राणज्योत !

आई...सारे सुख संपत्ती वैभव
आज तर माझ्या दारी आले
तू नसता माझ्या जवळी वाटे
मातृछत्र कायमचे मी गमावले

आई...फिरुन ये ना ग् तू...
या भूलोकी एकदा माझ्यासाठी
फिरव माया ममता जिव्हाळ्याचा
हात तू प्रेमाने माझा पाठी !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल
" पुष्प "

मंगळवार, जून १४, २०२२

माझ्या गावाचे रहस्य

माझ्या  गावाचे   रहस्य
केवळ मीच हो जाणतो
येणा-या प्रत्येक व्यक्तीला
अतिथि  देवो  मानतो !               ‌‌   

माझ्या  गावाचे   रहस्य
फक्त  मीच  रे   जाणतो
सर्वधर्म जाती पंथ भाषा
गुण्यागोविंदाने हो नांदतो

माझ्या   गावाचे   रहस्य
मलाच   आहे  की ठाव !
सासु - सुना  एकमेकींना
   आई-लेकी मानतात राव!             

माझ्या   गावाचे   रहस्य
आहे वळणावळणाची वाट
पण, घराघरात पाहशील !
सुसंगती सुसंस्कारी थाट

माझ्या गावाला येता वाटे
करावी सगळ्यांशी दोस्ती
आबालवृद्ध सगळे नरनारी
संकट येता एकमेका हात देती        

तुला वाट्टेल नवल
ऐकता माझ्या गावाचे रहस्य
ना ठावे दुःख क्लेश राग लोभ
सर्वामुखी  प्रसन्न  हास्य!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, मे २६, २०२२

प्रतिक्षा

प्रिये,खूप झालीय ग तुझ्या येण्याची प्रतीक्षा
प्रतीक्षा करुन वेळ आली ग वेडे होण्याची !
प्रिये,  बघ  आभाळी चंद्रही झाला ग उदास
उदास माझ्या मनाला ओढ मिठीत घेण्याची

शांत    मनसागरी   शंकेचा  वन्ही ग्  पेटला
पेटला  अंतरी    हा   वडवानल    सोसवेना
बकुळफुलांचा   गजरा   कोमेजला  ग्  प्रिये
प्रिये  असह्य   एकांत  कसा  घालवू कळेना

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल "पुष्प "


बुधवार, मे २५, २०२२

आई...!

आई...तू माझ्यासाठी खर्चिल्या दिवसांची
होऊच शकत नाही ग् गणती
तूच तर माझ्या आयुष्याचा नंदादिप
कृतज्ञ मी तुझ्या चरणावरती

आई...तू तर सोशीला नऊमास अन्
नऊ दिवसाचा असह्य भार
फिटणार नाही ऋण तुझे आई
घेतले मी जरी जन्म हजार !

आई...मज येता कणकण तापाची
तू जागून काढते कितिक रात्री
दुःख संकट व्याधीशी लढते
होऊन तू जणू कालरात्री

आई...तुला ना ठावे नटणे सजणे
लेकरासाठी विसरते मौजमजा
आई,शब्द देतो मी तुला !
नाही करणार माझा जीवनातून वजा

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...