Kaayguru.Marathi

शनिवार, फेब्रुवारी ०५, २०२२

माणूसघाणा (अलक )

     अमित... स्वत:ला खूप महान समजायचा.त्याला वाटे,मी एकटा फर्डा वक्ता आहे,मी सुरेल गायक आहे,मी अप्रतिम कुंचल्याचा धनी आहे;सप्तरंगाची जाण माझ्याशिवाय दुस-या कोणालाच नाही.मी सिद्धहस्त लेखक,कवी,गीतकारआहे,संगीतकार आहे. सर्वांनी आपलं 
कौतुक करावं.असे त्याला मनातून वाटायचे.पण,दुस-यांचे कौतुक करणे त्याला आवडायचेच नाही.तरीही सुरुवातीच्या काही दिवसांत त्याचे कौतुक झालेही.इतरांनी कविता,गीतलेखन,गीतगायन,व्याख्यान असं काही केलं की, मनातल्या मनातच कुढत राही.त्यांचे सतत दोष काढत राही.तो हेवा करु लागे.दुर्मुखलेलाच होई.सुंदर,छान,असे शब्दहीत्याचा ओठांवर येत नसत. किंवा चांगले,ठिक, वाईट कोणतीही प्रतिक्रिया देणे त्याला मोठे संकटच वाटायला लागे.त्याला मनातून वाटे,'आपल्यावाटेवर कोणी चालूच नये! इतरांनी मोठे होऊच नये.'
     म्हणतात ना ! ' समय बडा बलवान है। ' मन चिंती ते वैरी न चिंती या उक्तीप्रमाणे उत्तरोत्तर अमितची लोकप्रियता कमी होऊ लागली.त्याचाच काळात ,त्याचाच समोर अनेकांनी जनमानसात राहून सर्वांगीण क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठले.आणि आपल्या यशाचे खरे श्रेय आपल्या हितचिंतकांना, समिक्षकांना,वाचकांना दिलेही. त्यांच्याच ‌ऋणात राहून वाटचाल करण्याचे संकल्पही केले.ते बहुसंख्य आज लोकप्रियतेच्या शिखरावर दैदिप्यमान होऊन विराजित झाले आहे.त्यांनी इतरांसाठी मनात असूया न जोपासता आपुलकी जोपासली.आपल्या पदपथावर ते इतरांसोबत चालत आहेत ते आजही समाजात कौतुकाचे धनी ठरत आहेत.त्यांच्या एका शब्दाला हजारोंची ' वाहवा ' मिळत आहे.
    अमित मात्र आज ' व्वाव, बहोत खूब 'अशा शब्दांनाही पारखा झाला आहे.त्याची ' माणूसघाणा ' प्रवृत्तीच त्याचा लयाला कारणीभूत ठरली आहे.
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, फेब्रुवारी ०३, २०२२

कुमुदिनी

जीवन  आहे एक उद्यान
निष्ठेने  करावी   मशागत
उमलतील  मग  पदोपदी
कोमल  पुष्प  शत - शत

सुख म्हणजे काय असते
शिकवते  हो  ही हिरवाई
दुःख   विसरावे  कसे   ते
सांगून  जाते  जाई - जुई

आज उमलले  ते उद्याला
कोमेजणार  आहे   जरुर
अखेरचा  श्वासा  पर्यंतची 
किर्ति  गंध वाटावा भरपूर

दुःख  क्लेश  चिंता समज
तू  गुलाबपुष्पाची पाकळी
काट्यासवे   राहून   सुद्धा 
ती आनंदें  फुलवा उद्यानी

करु  नये आयुष्यात कधी
घरोबा  गर्व  अभिमानाशी
सांगून  जाती पिवळी पर्णे
नाते  जोडताना मृत्तिकेशी

बहरु  द्यावी  हो आनंदवेल
अनुभवा  फुले  ताजेतवाने
भ्रमर  होऊन  कुमुदिनीशी
गुणगुणावे गोड जीवनगाणे 

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


मंगळवार, फेब्रुवारी ०१, २०२२

सूर्योदय


अंधकारातून होतो उष:काल
उषःकाल दाखवतो उजेडाची वाट
घाट माथ्यावर प्रकटतात नाजूक किरण
किरणांच्या जमून गोतावळा
भरतो प्रकाशकिरणांचा मेळा
करती ते आनंदाची बरसात
आशेच्या सरोवरात फुलतात
कल्पनेचा अगणित कुमुदिनी ...
मनाला उल्हसित करणारी प्रतिदिनी
सुगंधित प्रकाश वाटेच्या 
होतो मी पांथस्थ
चालू लागतो संथ-संथ
जूने टाकून घेतो मी नवे
सुसंस्कार सुविचार जे जे हवे
उघडतो मी विचारकप्पा
सोडून देतो दिगंतराळी
दुःख क्लेश चिंतेचे कातरवेळी जमलेले
अगणित  पाखरांचे थवे !
सूर्योदय होताच...!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, जानेवारी ३१, २०२२

द्रोण काव्य लेखन नियम

द्रोण काव्य कसे लिहावे ? 
द्रोण काव्यरचना करतांना कोणते नियम लक्षात घ्यावे.याचे हे सुंदर नियम आज आपण समजून घेणार आहोत.
चला तर...नियम समजून घेऊन द्रोण काव्य लिहू या !
१) यमक गरजेचे नसते.
२) पहिल्या ओळीत जेवढी अक्षरे असतील, त्यापेक्षा दुसऱ्या ओळीत एक अक्षर घटलेले हवे. दुसऱ्या ओळीत जेवढी अक्षरे असतील त्यापेक्षा तिसऱ्या ओळीत एक अक्षर घटलेले हवे. असेच एकेक अक्षर घटवीत पुढे लिहीत जावे.
३) शेवटच्या ओळीत केवळ एक अक्षर असलेला शब्द हवा! 
४) खालील उदाहरण पहा म्हणजे नियम समजतील:
द्रोण काव्य : शिर्षक - का ?
पाणी काहीच का दाटत नाही -------------११
आता आधीसारखे डोळ्यात--------------१०
का कोण जाणे अलीकडे ----------------- ९
काही वाटतंच नाही -----------------------८
कोणाविषयी मला ------------------------७
का बरे रडावे ---------------------------- ६
नाहकच मी ------------------------------५
कुणासाठी--------------------------------४
कशाला----------------------------------३
नाही ----------------------------------- २
का ---------------------------------- ---१
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
म्हसावद.  

रविवार, जानेवारी ३०, २०२२

षढाक्षरी काव्यलेखन

षढाक्षरी काव्यलेखन 
------------------------------------------------------
षढाक्षरी काव्यलेखन हा कविता लेखनातील एक सहज सुलभ काव्यनिर्मितीचा प्रकार होय.
षढाक्षर शब्दांची फोड अशी करता येईल.
षढ् म्हणजे सहा .याचाच अर्थ सहा अक्षरात लिहायचे ते षढाक्षरी काव्य.
काव्य लेखन नियम :-
१) हे काव्य लिहितांना सामान्यतः चार ओळींचे एक कडवे असे लिहावे.
२) चार ओळींची कडवी किती असावी ? याला बंधन नाही.
३) पण...शक्यतो षढाक्षरी काव्यलेखन करतांना चार चार ओळींचे सहा कडवे रचिले तर ते अधिक सुंदर वाटावे.
[ माझे मत.]
४) हे काव्य लिहितांना काव्यातील प्रत्येक ओळीत मोजून सहाच अक्षरे असावीत.
५) ओळीच्या प्रारंभीच्या शब्द एक दोन तीन चार अक्षरी असला तरी चालतो.
६) अष्टाक्षरी काव्यलेखनाप्रमाणे शब्दलेखनाचे बंधन नाही.
७) कडव्यातील प्रत्येक ओळ ही सहा-सहा अक्षरांचीच असावी.
८) चार ओळीपैंकी दुस-या आणि चौथ्या ओळीत " यमक " साधला जावा.हे लक्षात घ्यावे.
९) कडव्यातील प्रत्येक ओळ ही सहा-सहा अक्षरांचीच असावी. 
उदा. १).                       २) 
काय मागू देवा.        * सखे तुझे रुप
तुजपाशी मी रे.        * वेड लावी मला
न मागता दिले          * काढू कसा ग मी
तू सर्वकाही रे.          * जीव हा गुंतला
चला तर मग...लिहू आपण षढाक्षरी काव्य !👍
          🙏🌹शुभस्य शिघ्रम !🌹🙏
         ©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...