Kaayguru.Marathi

मंगळवार, डिसेंबर २८, २०२१

हे भोलेनाथ !

हे भोलेनाथ !



भोलेनाथ आलो मी तुझ्या दारी
द्यावे  दर्शन  तू  मज  क्षणभरी 

हाती  त्रिशूल शंख डमरु
जटातून वाहे गंगा भूवरी
गोड रुप असे पाहू दे मदनारी
द्यावे दर्शन तू मज क्षणभरी

सवे कार्तिकस्वामी गणपती
वामांगी तुझ्या पाहीन मी गौरी
स्वारी  अशी  यावी  नंदीवरी
द्यावे  दर्शन  तू मज क्षणभरी

देवांचा  देव  तू  महादेव
पंचानन  तू   त्रिनेत्रधारी
कर्पुरगौर कांती करुणावतारी
द्यावे दर्शन तू मज क्षणभरी

तूच तारिले अवघे विश्व
पिऊन   हलाहल   विष 
गळा सर्प निळकंठ त्रिपुरारी
द्यावे दर्शन तू मज क्षणभरी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, डिसेंबर २६, २०२१

प्रेमपुजारी


इश्क़ विश्क़ मैं क्या जानूं

मी  तर   आहे   प्रेम   पुजारी

यू  मुडकर  ना   जाओ  दिलबर

दोन  दिवसात  वरात  आणीन दारी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, डिसेंबर २४, २०२१

संकेत अंक ४ ची महती

🌹🙏श्री गणेशाय नमः!🌹🙏
संकेत अंक - ४ 
चतुर्थ - चार वस्तूचा समुच्चयापैंकी चौथ्या वस्तू/पदार्थाला संकेतांने " चतुर्थ " असे म्हणतात .
अ - धर्म ,अर्थ, काम , आणि मोक्ष.
ब - साम ,दाम, भेद, आणि दंड.
क - पान , सुपारी , चुना , कात / काथ.
चतुराक्षरी मंत्र -
(अ ) - राधाकृष्ण (ब ) - दत्तात्रय
(क) - रामकृष्ण (ड ) - वासुदेव 
चतुरानंद -
आत्मानंद , ब्रम्हानंद, अविद्यानंद , विषयानंद.
चार आयुध - शंख, चक्र, गदा, आणि पद्म ही श्रीविष्णूची चार आयुधे होत.
चतुर्विध अन्न -
भक्ष्य - चावून खाण्याचे पदार्थ.-भाकरी,पोळी वगैरे.
लेह्य - जसे पंचामृत,रायते वगैरे.
चोष्य - चोखून खाण्याचे पदार्थ - ऊस इत्यादि
पेय - पिण्याचे पदार्थ - दूध , ताक वगैरे.
चतुर्विध आसव - (चित्त - मळ )-
कामासव, दृष्टि आसव , मताभिमान , भवासव म्हणजेच पारलौकिकेच्छा.
चतुर्विध जीव -
देव, मनुष्य , तिर्यक (मनुष्येतर जीव ), नरकी.
 चार कर्तव्य विद्यार्थ्यांचे -
स्वतंत्र बुद्धी, स्वतःवर ताबा , सेवापरायणता, सर्वसावधानता. [संदर्भ - भूदान गंगा -भाग -६]
चार दाने - आहारदान - क्षुधा तृप्त करते.
ज्ञानदान - अज्ञान दूर करते.
औषधीदान - व्याधीमुक्त करते.
अभयदान - आयुष्य वाढविते.[ संदर्भ- जैन धर्म ]
चार पुरुषार्थ - धर्म, अर्थ, काम, मोक्ष .
(ज्ञानी भक्त " भक्ती " हा पंचम पुरुषार्थ मानतात.]
चतुर्विध प्रलय - (१) नित्य प्रलय (२) प्राकृत प्रलय (३) नैमित्तिक प्रलय (४) आत्यंतिक प्रलय
 चार अलौकीक भक्त -
(१) आर्तभक्त - द्रौपदी (२) जिज्ञासूभक्त - उद्धव.
(३) अर्थार्थीभक्त - ध्रूव (४) ज्ञानीभक्त - शुकदेवमुनी.
" आर्तो जिज्ञासूरथार्थी ज्ञानी च् भरतर्षभ !" 
[ संदर्भ - भगवदगीता अध्याय ७-१६]
चार भद्र - 
अ - औषधी समूह - सुंठ, अतिविष, मुस्तागवत, गुळवेल.
ब - गोड शब्दांचे दान , गर्वरहित ज्ञान, क्षमाशिल शौर्य, त्याग युक्त वित्त.
चार प्रकारचे मित्र - औरस , नात्यागोत्यातले, वंशपरंपरा ऋणानुबंधी , आणि आपत्कालीन रक्षण करणारे
चार मुक्ती - सलोकता, समीपता,सायुज्जता, सरुपता
[ दासबोध - ४-१०-२८]
चार रुपातील मूर्ती -
विराट, सुत्रात्मा, व्याकृत, तुरीय, या चारही ब्रम्हाच्या चतुर्भुज मूर्ती होत.म्हणून त्यास चतुर्भूज म्हणतात.
[ संदर्भ - विष्णू सहस्त्रनाम ]
चार व्यूह - 
अ- वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुध्द. हे पृथ्वीस आधारभूत चार व्यूह होत.
ब - रोग , आरोग्य, निदान, वैद्यशास्र
इ - शरीर पुरुष, छंद:पुरुष ,वेदपुरुष, महापुरुष .असे परब्रम्हाचे चार व्यूह आहेत.
चतु:श्लोकी भागवत -
श्रीमद् भाग्वदताच्या दुस-या स्कंधातील नवव्या अध्यायातील ३२ ते ३५ हे चार श्लोक.यांत ब्रम्हदेवाला भगवंताने सांगितलेले गुह्य ज्ञान अथवा सर्व भागवत ग्रंथा चे सार आहे.म्हणून त्यास चतु:श्लोकी भागवत असे म्हणतात.
                श्रीभगवानुवाच :
अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत् सदसत् परम्। 
पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम् ॥(१)
अर्थ - श्री भगवान म्हणतात की, सृष्टिनिर्मितीपूर्वी फक्त माझेच अस्तित्व होते.
माझ्याहून वेगळे सृष्टीत काहीही नव्हते.प्रलय काळी सृष्टीच्या विनाश झाला असता माझेच अस्तित्व उरते.ह्या सृष्टी रुपात मीच उरलो आहे.आणि जे काही या सृष्टीत प्रलयानंतर उरते ते सुद्धा मीच आहे.

ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि। 
तद्विद्यादात्मनो मायां यथाऽऽभासो यथा तमः ॥(२)
अर्थ- जे काही माझ्या मूळ तत्वाहून वेगळे प्रतीत होते.पण ते आत्म्यास प्रतीत होत नाही.त्या अज्ञाज्ञास आत्म्याची माया समज.कारण ते सावली प्रमाणे किंवा अंधारासारखे मिथ्या समजावे.

यथा महान्ति भूतानि भूतेषूच्चावचेष्वनु। 
प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्॥(३)
अर्थ- जसे पंचमहाभूते ही संसारात लहान मोठ्या सर्व पदार्थात भरुन आहेत; पण ते दिसून येत नाही.तसा मी सुद्धा सर्वांभूती व्याप्त असूनही सर्वांहून वेगळा आहे.

एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनाऽऽत्मनः। 
अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा॥(४)
अर्थ - आत्मतत्त्व समजून घेण्याची इच्छा असलेल्यांनी ही गोष्ट जाणून घ्यावी की, सृष्टी प्रलय प्रसंगी जे तत्व स्थान आणि काळाच्याही पुढे असते.ते माझेच आत्मतत्त्व आहे.

चार अपाय श्रवणाचे - १) लय- निद्रा (२) विक्षेप- वृत्तीची बहिर्मुखता (३) कषाय - राग, द्वेष इत्यादिकाचे योगाने चित्त स्तब्ध होणे.(४) रसास्वाद - प्रसंगोपात आलेली वर्णने तीच तीच ऐकण्याविषयीची आसक्ती 
[संदर्भ- - एकनाथी भागवत ११-७०५ ]

चार अश्व श्रीकृष्णाच्या रथाचे -
शैब्य , सुग्रीव , मेघपुष्प , बलाहक 
[संदर्भ- महाभारत उद्योगपर्व- ८३-१९]
चार आदर्श कामिनीचे - 
अ- १) जुनो (२) व्हिनस (३) मिनर्व्हा (४) डायना हे चार आदर्श ग्रीक रोमन समाजाने कल्पिले आहेत.
ब - १) मानिनी -सती , (२) रुपसम्राज्ञी -रती (३) शारदा (४) युद्धप्रिया -दुर्गा ह्या होत.
चार आचार्यपीठ ( श्रीशंकराचार्य स्थापित )-
१) पुर्वेस - जगन्नाथपुरी-गोवर्धन मठ (२) पश्चिमेस - द्वारकापुरी -शारदा पीठ (३) उत्तरेस -बद्रीनारायण-ज्योतिर्मठ (४) दक्षिणेस - शृंगेरी- म्हैसूर हे मुख्यपीठ होय.
 चार द्वारे आपत्तीची -
१) अयोग्यकर्माचा आरंभ (२) स्वजनांशी वैर (३) बलवंताशी स्पर्धा (४) दृष्ट स्त्रीवर विश्वास 
चार शत्रू आरोग्याचे -
१) रसनेची विकृत रुची (२) देहातील मृत तंतू (३) अनावश्यक अन्न (४) न पचता जठरात सांचणारे अन्न.
चार उपाय (ज्ञानप्राप्तीचे)-
श्रद्धा, तत्परता, इंद्रियसंयम, योगसंसिद्धी
चार ऋणे - 
देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, मनुष्यऋण.
चार ऋत्विज -
अध्वर्यू, ब्रम्हा, होता ,उद्गाता यज्ञात हे चार मुख्य ऋत्विज असतात.
चार गुण कोंबड्यापासून शिकावेत.
१) पहाटे उठणे (२) युद्ध करणे (३) स्वकष्टार्जित भाग बंधु वर्गास देणे. (४) स्रिचे आपत्तीपासून रक्षण करणे.
" युद्धं च् प्रातरुत्थानं भोजनं सहबंधुभि: । 
स्रियमापद्मता रक्षेच्चतु: शिक्षेच्च कुक्कुटात ।।"
चार गुण दुर्लभ -
१) दान - संतोषाने (२) ज्ञान - निर्गवी (३) शौर्याचे अंगी क्षमा (४) संपत्तीत - त्याग
चार गुण शाश्वत स्रित्वाचे -
१) रजोदर्शन (२) गर्भधारण (३) प्रजोत्पादन (४) प्रजापोषण [ संदर्भ-नारदिय सूक्त भाष्य -उत्तरार्ध ]
चार गुण वृद्धसन्मानाने प्राप्ती-
१) आयुष्य (२) सौंदर्य (३) सुख (४) बल 
चार गुण स्वभावसिद्ध असतात.
१) औदार्य (२) मधुर भाषण (३) धैर्य (४) युक्तायुक्त विचार.
चार गोष्टी गेल्या की पुन्हा न मिळणा-या -
१) गेलेली अब्रु (२) बोललेला शब्द (३) दवडलेली संधी 
(४) गेलेले आयुष्य.
चार गोष्टी कल्याणकारी -
१) वाणीचा संयम (२) अल्पनिद्रा (३) अल्प आहार (४) एकाग्र चित्ते भगवंत स्मरण.
चार गोष्टी नसतील तिथे वास्तव्य करु नये -
(१) मान किंवा प्रतिष्ठा (२) प्रीति (३) गोत्रज 
(४) ज्ञानसंपादन 
 चार गोष्टी पडद्याआड ठेवाव्या -
१) भोजन (२) भजन (३) संपत्ती (४) रुपवान स्री
चार गोष्टी पवित्र -
१) झ-याचे पाणी (२) पतिव्रता स्री (३) कल्याण करणारा राजा (४) संतुष्ट ब्राम्हण.
चार गोष्टी माणसाला बिघडवतात-
यौवन,धन,अधिकार ,अविवेक
चार गोष्टी लहान म्हणून उपेक्षा करु नये.
रोग , सर्प, अग्नि, शत्रू .
चार गोष्टी वर्ज्य -
आत्मनिंदा, आत्मस्तुती, परनिंदा, परस्तुती 
या चार गोष्टी भल्या माणसाने वर्ज्य मानाव्यात.
चार दुर्गुण विनाशाकडे नेणारे -
आळस, निद्रा, विसराळूपणा, दिरंगाई.
चार पण -
१) अज्ञानी-बालपण. (२) धुंद-तरुणपण,(३) पराधीन-म्हातारपण (४) बाळंतपण .
चार पार्वतीच्या सख्या-
जया , विजया, जयंती आणि मंगलारुणा
चार प्रकार प्रेमाचे -
(१) लालन प्रेम (२) वात्सल्य प्रेम (३) सख्यप्रेम (४) माधुर्य प्रेम
चार प्रकारचे मेघ -
(१) आवर्त - विशेषस्थानी वृष्टी (२) संवर्त - सर्वत्र वृष्टी
३) पुष्कर - अल्प पर्जन्य (४) द्रोण - विपूल पर्जन्य
चार प्रकारचे वाद्य -
१) तंत -तारेची वाद्ये (२) वितंत- टाळ,चिपळ्या, (३) घन- नगारा डफ वगैरे.(४) सुस्वर - सनई, बासरी वगैरे
चार प्रकारची वैद्याची वृत्ती असावी -
१) रोग्याविषयीची ममता (२) दया (३) साधा रोग बरा करण्याचा उत्साह (४) रोग असाध्य असेल तर सोडणे.ही वैद्यांची वृत्ती असावी.
चार मित्र -
१) विद्या -प्रवासात (२) पत्नी - घरी (३) औषध - व्याधिग्रस्तावस्थेत (४) धर्म - अंतसमयी
चार रत्ने -
१) सूर्य -आकाशी (२) बालक -घरी (३) स्री - शयनप्रसंगी
(४) पंडित - सभेत. 
चार वेदांचे चार द्रष्टे -
१) ऋग्वेद - अग्निऋषी (२) यजुर्वेद - वायुऋषी 
(३) सामवेद- आदित्यऋषी (४) अथर्ववेद - अंगिरसऋषी
चार व्यसने सत्ताधा-यांना असणारी -
१) मृगया, मद्यपान, द्युत, अतिरिक्त कामासक्ती.
चार शक्ती राष्ट्र जिवंत ठेवतात-
१) शिक्षकशक्ती - ब्राम्हण (२) रक्षकशक्ती - क्षत्रिय  
(३) पोषकशक्ती - वैश्य (४) सेवकशक्ती.
चार जण शत्रू वत समजावे -
१) रुपवती भार्या (२) निरक्षर पूत्र (३) ऋणकर्ता बाप 
(४) अकुलीन माता
चौघांचे स्मरणाने कलिनाश होतो-
( १) कर्कोटक नाग (२) दमयंती (३) नळराजा 
(४) राजा ऋतुपर्ण
चांडाळ चौकडी / चार- (पुराणकालीन )-
१) दुर्योधन (२) दु:शासन (३) कर्ण (४) शकूनी.

[ पुढील भागात संकेत अंक - ५ ची माहिती ]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "



संकेत अंक ३।। ✍️

🙏🌹 श्री गणेशाय नमः!🌹🙏
 
औट - याचा अर्थ साडेतीन असा होतो.
साडेतीन पीठे -अ)- १) तुळजापूरची भवानी (२) मातापूरची रेणूका (३) जोगाईची योगेश्वरी आणि १/२ कोल्हापूरची लक्ष्मीदेवी.असे हे साडेतीन पीठे आहेत.
ब ) साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे. ॐ कारामध्ये सार्धत्रय (साडेतीन) मात्रा आहेत. 'अ'कार पीठ माहूर
'उ'कार पीठ तुळजापूर
'म'कार पीठ कोल्हापूर 
आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी. सप्तश्रृग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून हे अर्धपीठ.
साडेतीन मुहूर्त - १) वर्षप्रतिपदा/गुढीपाडवा (२) अक्षय्यतृतीया (३) विजयादशमी/दसरा आणि १/२ बलिप्रतिपदा/दिवाळीपाडवा होय.
साडेतीन वाद्ये - वीणा, पखवाज, बांसरी आणि १/२ मंजिरी अशी मिळून साडेतीन वाद्ये होत.
साडेतीन शहाणे - ( पेशवेकालीन )
१) सखारामबापू बोकील (२) देवाजीपंत चोरघडे (३) विठ्ठल सुंदर आणि १/२ शहाणा नाना फडणवीस होय.

[ पुढील भागात संकेत अंक ४ वर माहिती वाचा.]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, डिसेंबर २२, २०२१

अंक संकेत - ३ ची महानता.

             🙏 ॐ नमो गणपतये। 🙏
अंक संकेत  - ३
तीन अकारण वैरी - 
) हरिण- पारधी (२) मासा - कोळी (३) साधु - खलपुरुष
तीन अग्नी - (अ) ज्ञानाग्नि  ( शुभ-अशुभ सांगतो तो. )
दर्शनाग्नि (रुपाचे दर्शन घडवितो.)
कोष्ठाग्नि (खाल्ले-प्याले पुरवितो तो.)
(ब) दावाग्नि ,वडवाग्नि,जठराग्नि
(क) पिता- गार्हपत्य अग्नि, माता- दक्षिणाग्नि, गुरु - आहवनीय अग्नि.हे तिघेही श्रेष्ठ होत.
"पिता वै गार्हपत्योऽग्निर्माताग्निर्दक्षिण: स्मृती: ।
गुरुरावहनीयस्तु साग्नित्रेता गरीयसी ।।"

तीन अंगे (धर्माची)-
आचार, व्यवहार व प्रायश्चित
तीन अतिदाने -
गौदान,भूदान आणि विद्यादान
तीन अयोनीसंभव स्त्रिया -
वेदवती जानकी,द्रौपदी या तिघी अयोनिसंभव आहेत.
वेदवती -   कुशध्वजाच्या तपस्याफलातून जन्म.
जानकी -  भूमीकन्या.
द्रौपदी   -  यज्ञातून जन्म
" संभूता वाड्:मयीकन्या नाम्ना वेदवती स्मृता । "
[संदर्भ- वाल्मीकि रामायण,उत्तरसर्ग १७-९]

तीन अवस्था -
आत्म्याच्या  : बहिरात्मा, अंतरात्मा,परमात्मा
देहाच्या.      : बाल्य,तारुण्य, वार्धक्य
नृत्यकलेच्या : लयतालमुलक,भावमुलक,रसमुलक
जीवनाच्या   : पुत्र,पती,पिता.
स्रीजीवनाच्या: कन्या,कांता ,माता
प्रेमाच्या       : पूर्वराग,मीलन,वियोग .
बाल्यदशेच्या : 
कौमार (एक ते पाच वर्ष )
पौगंड (सहा ते दहा वर्षे )
किशोर ( दहा ते पंधरा वर्षं )
" कौमारं पंचमाब्दान्तं पौगण्डं दशमावधी ।
कैशोरमांपंचदशाद्यौवनं तु तत: परम् ।। "
[संदर्भ - भागवद.स्कंध १० अध्याय.१२ तळटीप]
सृष्टीतील पदार्थांच्या: घनरुप,द्रवरुप,वायुरुप.
तीन अर्थ -
वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, व्यंगावर.
हे तीन अर्थ अलंकार शास्त्रात मानले आहे.
तीन अमावस्या :
दिपअमावस्या       (आषाढ वद्य अमावस्या)
पिठोरी अमावस्या  (श्रावण वद्य )
सर्वपित्री अमावस्या ( भाद्रपद वद्य )

तीन अश्रू : आनंदाश्रू, दु:खाश्रू ,नक्राश्रू

तीन अक्षरात तीन गोष्टींचे प्रतिनिधित्व:
भ-र-त से तीन अक्षरे होत.
भ - भाव (भावाविष्कार )
र  - राग  (रागाविष्कार )
त - ताल (प्रमाणबध्दता )

तीन आदर्श पतीव्रता : अनसूया, द्रौपदी, दमयंती.
तीन आद्य महाकवी - ब्रम्हा, वाल्मिकी,व्यास.
तीन आधारस्तंभ शरिराचे - आहार,निद्रा, ब्रम्हचर्य
तीन उपमाता -
दाई, माता नसतांनाही पालन करणारी दुसरी बाई,आणि सावत्र आई.
तीन ऋणे - देवऋण, गुरुऋण,मातृपितृऋण.
तीन ललितकला - नर्तन,गायन, वादन
" नृत्यं गीतंच् वाद्यंच् त्रयं ललितमुच्यते । "
तीन कर्मांनी पुत्रधर्माची सार्थकता -
१) असेतो पर्यंत माता-पिता यांची आज्ञा पालन.
२) कालतिथीस त्यांचे स्मृतीप्रित्यर्थ अन्नदान.
३) गयेस पिंडदान.
" जीवतो वाक्यकरणात क्षयाहे भूरिभोजनात ।
गयायां प ण्डदानाच्च त्रिभि: पुत्रस्य पुत्रता ।। "
[संदर्भ - देवी भागवत ६-४-१५]
तीन कायिक पापे -
१) दिल्याविना एखादी वस्तू घेणे.
२) निषिद्ध हिंसा 
३) परस्रीसंग. ही तीन शारीरिक पापे होत.
" अदत्तानामुपादानं हिंसा चैवाविधानत: ।
परदारोपसेवा च् कायिकं त्रिविधं स्मृतम ।। "
[संदर्भ - मनुस्मृती १२-७ ]
तीन गण - देवगण,मनुष्यगण,राक्षसगण.
तीन गया - 
मातृगया : सिद्धपूर - गुजराथ
पितृगया : गया - बिहार
शिवगया : काशी. - उत्तरप्रदेश
तीन गुण वाड्:मयाचे - माधुर्य, ओज, प्रसाद
तीन गुण काव्याचे - उपमा,अर्थगौरव,पदलालित्य.
" उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवम् ।
दण्डिन: पदलालित्यं माघे सन्ति त्रयो गुणा: "।।
तीन गुण स्रीचे महत्व वाढवितात.
रुप, शील,आणि स्वभाव (योगीश्वर याज्ञवल्क्य)
तीन गुण शास्त्रास आवश्यक -
ग्रंथाचे संपुर्ण ज्ञान, तात्पर्याचे निरुपण करता येणे ,ग्रंथाच्या भागासंबंधी विवेचन करता येणे.
तीन नयन : शंकराचे -
अ) कृशानु (अग्नि ),भानु (सूर्य ), हितकर (चंद्र )
म्हणून शंकराला ' त्रिनेत्र ' म्हणतात.
ब) श्वेतभानु -सोम, बृद्धभानु- अग्नि,भानु-सूर्य
हे महादेवाचे तीन नेत्र होत[स्तुतीकुसुमांजलि]
तीन धूर्तलक्षणे -
मुख-कमलाप्रमाणे, वाणी-चंदनाप्रमाणे शीतल, आणि पोटात राग .
" मुखं पद्मदलाकारं वाणी चंदनशीतला।
हृदयं क्रोधसंयुक्तं त्रिविधं धूर्तलक्षणम् ।।"
तीन दानाचे नाशहेतू -
दिल्य नंतर वाईट वाटणे, अपात्री दान देणं,आणि देतांना जर श्रद्धा नसेल.
" यद्दत्वा तप्यते पश्चादपात्रेभ्यस्तथा च् यत ।
अश्रद्धया च् यद्दानं दाननाशास्रयस्त्वमी ।। "
तीन नीतिशास्त्र प्रवर्तक -
शुक्र, विदूर आणि चाणक्य से तीन आद्य नीतिशास्त्र प्रवर्तक होत.
तीन पीठे - व्यासपीठ,पूजापीठ, आणि दिपपीठ.
तीन पुरुष जगात दुर्लभ -
जननिंदेला पात्र न झालेला श्रीमान.
स्वतःची प्रौढी न सांगणारा शूर आणि
सर्वत्र समदृष्टी असणारा राजा .
" श्रीमानजननिद्यश्च शूरश्चाप्यविकत्थन: ।
समदृष्टि: प्रभूश्चैव दुर्लभा: पुरुषास्रय: ।। "
[संदर्भ - योग.वा.१-१३-११]
तीन पुराणकालीन महाक्रोधी-
दुर्वास,जमदग्नि, आणि विश्वामित्र.हे तिघेही महाक्रोधी म्हणून परिचित.
तीन पुराणकालीन महालोभी -
कंस,जरासंध, दुर्योधन [महाभारत उपसंहार]
तीन पुराणकालीन मामा -
कंसमामा, जांगीळमामा (भिमपुत्र घटोत्कचाचा कारभारी ) आणि शकुनिमामा.
हे तीन कपटनीतिनिपूण मामा होत.
तीन प्रकारच्या ओढी-
१) विषयासक्त माणसाची विषयासंबंधीची
२) मातेची मुलासंबंधी असलेली.
३) सतीची पतीविषयी असलेली.
या तीन प्रकारच्या ओढीची शक्ती एकत्रित झाल्यास भगवंताचे दर्शन घडते.
तीन प्रकार सूर्यकिरणांचे-
ताप देणारे, प्रकाश देणारे, आरोग्य देणारे.
" किरणास्रिविधा: सूर्ये तापाऽरोग्यप्रकाशदा:।
हरन्ति स्वप्रभावेण दैंन्यं तापंच् पातकम् ।। "
तीन प्रकार दानाचे -
अभयदान,उपकारदान, द्रव्यदान.
तीन दूत -
१) स्वतंत्रपणे कार्य साधणारा.
२) सांगितले तेवढेच करणारा.
३) नुसता निरोप पोहोचविणारा.
तीन दोष भोजनात टाळावे-
१) जातिदोष (पदार्थांचा स्वाभाविक दर्प वगैरे.)
२) आश्रयदोष (पदार्थ शुद्ध हवा तरी अपवित्र स्थानी ठेवल्यामुळे. )
३) निमित्तदोष ( कुत्र्याच्या स्पर्शामुळे अशुद्ध)
तीन प्रकारचे नास्तिक -
क्रिया दृष्ट (कर्म न करणारे )
मनोदृष्ट (मनानेच बिघडलेले )
वाग्दुष्ट (वाणीने दोष देणारे )
तीन गोष्टी शहाणपण प्राप्तीचे -
१) शास्त्राचा अभ्यास केल्याने.
२) संप्रदायात वापरल्याने.
३) निरीक्षणातून.
तीन प्रकार सद्गुरूला शरण जाण्याचे-
प्रणिपात, प्रश्न, आणि सेवा.
तीन प्रकार स्वयंवराचे -
इच्छास्वयंवर, पण लावून स्वयंवर ,पराक्रम करुन.
तीन प्रकार स्वरांचे -
१) तारस्वर - वरचा षड्ज् = निषाद
२) मंद्रस्वर - मधला षड्ज् = मध्यम 
३) घोरस्वर- खालचा षड्ज् = खर्ज
तीन प्राचीन संस्कृत व्याकरणकार-
१) पाणिनी - सूत्रकार
२) कात्यायन- वार्तिककार 
३) पतंजली - भाष्यकार.
तीन प्राचीन भारतीय जोतिर्विद-
आर्यभट्ट, वराहमिहीर, भास्कराचार्य.
तीन महान आनंद -
१) स्वतःचा विवाह (२) सत्पुत्रलाभ (३) पुत्राला पुत्रप्राप्ती होणे.
 तीन मूर्ख - 
१) विरक्त पण लोभी (२) योगी पण इंद्रियांच्या ३)व्युत्पन्न पण क्रोधी 
तीन युगातील तीन दाते -
सत्ययुग. - बलिराजा
त्रेतायुग - श्रीरामचंद्र
द्वापारयुग - कर्ण 
तीन वस्तू परस्वाधीन करु नये.
ग्रंथ , स्री, पैसा
तीन विद्याप्राप्तीची साधने -
गुरुसेवा,विपूल धन, विद्या देऊन विद्या ग्रहण करणे.
तीन विद्येचे शत्रू -
गुरुसेवेचा अभाव, घाई, आत्मश्लाघा
" अशुश्रुषा त्वरा श्लाघा विद्याताई: शत्रुवत्त्रय:।।"
[संदर्भ- महाभारत,उद्योगपर्व ४०-४]
 तीन विश्रांतीस्थळे सांसारिकाची-
पुत्र, पत्नी, सज्जनसमागम्
तीन वेळा प्रभुचे विश्वरुपदर्शन-
१) धृतराष्ट्राच्या राजसभेत शिष्टाईस गेल्या वेळी.
२) अर्जुनास गीतोपदेश करतांना
३) युधिष्ठिराला राज्याभिषेक झाल्यानंतर द्वारकेला परत जात असतांनाच,उत्तंक नावाच्या तपोवन ऋषीस त्याचे विनंतीवरुन श्रीकृष्णाने विश्वरुपदर्शन दिले.
तीन वैभव लक्षणे -
१) दुस-याच्या गोष्टीत ढवळाढवळ न करणे.
२) आपल्या कामामध्ये मग्न असणे.
३) मिळालेल्या संपत्तीचे रक्षण करणे.
तीन गोष्टींनी प्रतिष्ठा वाढते-
संपत्ती, सत्ता, सन्मान
तीन संग्रहणीय वस्तू -
ग्रंथ , स्नेही, औषधी.यांचा संग्रह करावा.
तिघांचा नाश अटळ -
अज्ञ- ज्ञान नसणारा,
अश्रद्ध - स्वतःला ज्ञान नसून ज्ञानी पुरुषाच्या वचनावर विश्वास न ठेवणारा. आणि विश्वासघातकी.
तिघेजण स्वर्गप्राप्तीस जातात.
अन्नदान करणारा.
पाणपोई घालणारा, रोगी बरा करणारा.
या तिघांना उत्तम गती प्राप्त होते.
तिघेही सुखी असावेत-
अन्नदाता,भोजन करणारा,स्वयंपाक करणारा.
त्रिपथगा-
स्वर्ग, मृत्यू , आणि पाताळ या तिन्ही लोकांत वाहणारी (भागीरथी नदी)
त्रिदोष - वात,पित्त, कफ
त्रिभूवन- स्वर्ग,मृत्यू, पाताळ
त्रिशूल- कटिशूल(कामेच्छा) , पोटशूळ,
मस्तकशूल
त्रिस्थळी यात्रा - काशी,प्रयाग,गया.
[ पुढील भागात पाहू अंक संकेत ३।। ची माहिती]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...