Kaayguru.Marathi

रविवार, सप्टेंबर २६, २०२१

लेक माझी लाडकी

मित्रहो, आज राष्ट्रीय कन्यादिन... त्यानिमित्त माझ्या लेकीविषयीच्या मनभावना...

लेक माझी भाग्यश्री

       गुणांची हो खाण 

       लेक जन्मा येता लाभला 

       आई बाबांचा मान  ||१||

                      चाल तिची दुडूदुडू 

                      मन करते प्रसन्न 

                      बोल बोबडे बोबडे 

                      कोकिळेचे मंजुळ गान ||२||

       लेक माझी खेळे बागडे 

       घरी दारी अंगणात 

       सप्तसूर निनादती 

       तिच्या रुणुझुणू पैजणात ||३||

                     रुप लेकीचं गोजीरं 

                     जणू बावनखणी सोनं 

                     देवाजीनं दिलं आम्हा 

                     सारे कुबेराचं धन ||४||

       अहो.. लेक माझी भासे 

       जणू वडाचे झाड.. 

       जन्म एक अन् फेडिते

       दोन घरांचे पाड  ||५||

            © प्रा. पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शनिवार, सप्टेंबर २५, २०२१

भागाकार!

आयुष्या ! 
तुला लाविला मी लळा
माणसांचा जमवला गोतावळा
सोसिल्या अनंत कळा
विश्वासघाती लोकांनी
केसाने कापला गळा
असह्य झाल्या झळा

" त्यांना " सुख द्यायला
प्राजक्त झालो मी !
मनसोक्त बहरलो
नाजूक श्वेत पुष्पानी
स्नेहाचा परिमळ 
राखून न ठेवता
वाटतच सुटलो...
वा-याच्या अश्वावर
स्वार होऊन !

सुगंध घेऊन मात्र...
बहुतेकांनी तुडवले
पायदळी...!
छिन्न विछिन्न
रक्तरंग होईतो !

वाटलं...
स्वतःच्या आयुष्याचे
गणित सोडवताना
उगीच करीत राहीलो मी
स्वतःच्या जगण्याचा भागाकार
आणि इतरांचे गणित 
सोडवताना मात्र ... मी
करीत गेलो गुणाकार!

शेवटी आयुष्याला 
आकार देतांना
सांधताना बांधताना...
साधलं काहीच नाही
पण...अनुभवला मी
माझ्याच दुख-या मनाचा
भागाकार !!!

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


कृष्णमुरारी

हे प्रभो कंसारी। तू कृष्ण मुरारी।
कुंजविहारी तू। गिरीधारी  ।।

देवकी नंदन  । पितांबरधारी।
बन्सीबिहारी तू ! मनोहारी ।।

कालियामर्दक । गोपालसखा तू ।
नंदनंदन तू   । वासुदेव ।।

राधारमण तू । मनमोहन तू
माखनचोर तू । वनमाळी  ।।

कंजलोचन तू। कमलवदन।
मधुसूदन तू । जगदिशा ।।

रुक्मिणी वल्लभ । शामसुंदर तू ।
पुरुषोत्तम तू । नारायण।।

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, सप्टेंबर २४, २०२१

यशसिद्धी

यशसिद्धी

आले अपयश जरी
खचून नका जाऊ
करा प्रयत्न पुन्हा पुन्हा
नक्की यशस्वी होऊ
          अपयशातून यशाची
          घडते पहिली कृती
          म्हणती थोर विभूती
          हिच तर खरी उक्ती
अपयश आले म्हणूनी
संपवू नको जीवन
ठेवा जिंकायचा ध्यास
शिखर बघाया शिका
          अपयश पचवायला
          काळीज ठेवा वाघाचे
          दडले त्यात रहस्य
          यशाकडे जाणाऱ्या श्रेयाचे
अपयश तर शिकवी
नवे ज्ञान क्षणोक्षणी
अशाच अनंत वेड्यांची
इतिहास सांगतो कहाणी

 © प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्पम् "
     म्हसावद, जि.नंदुरबार

गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१

मनाचिये द्वारी

मनाचिये द्वारी.. 
मन… ज्याला रुप नाही, वर्ण नाही, गंध नाही,आकार नाही. अगदी अमूर्त. पण जीवनात त्याचं अस्तित्व आपल्याला विसरताच येत नाही. असे एक अदृश्य आणि अलौकिक इंद्रिय म्हणून ते ओळखले जाते. बहिणाबाईंनी तर त्यावर कविता लिहितांना सुंदर वर्णन केलंय,
“ मन पाखरु पाखरु
त्याची काय सांगू मात ?
आतां व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायांत. ” 
असं हे प्रचंड वेगांने धावणारं मन. जर ते रिकामं असलं तर कुठलीही गोष्ट सहजच स्विकारायला तयार असते. म्हणूनच म्हटले आहे की,
 “ रिकामं मन म्हणजे सैतानाचं घर ”
या मनरुपी घराची कवाडे कधीही पूर्ण उघडी ठेवणे आणि पूर्ण बंद ठेवणे व्यक्ती विकासासाठी कधीच योग्य ठरणार नाही. जसं बंदद्वार घर भूतबंगला म्हणून परिसरात परिचित होते ; मात्र अधून-मधून उघडणारे व बंद होणारे घर, पै-पाहूणे, ये-जा करणाऱ्यांना परके वाटत नाही. सतत माणसांचा राबता दिसून येतो.त्या घरातील माणसांची आपुलकीने विचारपुस्त होत राहते. तसंच मनाचेही आहे. 
मनाच्या अकल्पित वेग व कल्पना, भाव-भावना, विचार इत्यादिची प्रक्रिया सतत, अव्याहतपणे सुरुच असते. म्हणूनच मनाला दोन प्रकारे नियंत्रणात आणता आले पाहिजे. 
१) आपणास मनाचे द्वार आत्यंतिक संयमाने पूर्णपणे उघडता आले पाहिजे. 
२) आपणास मनाचे द्वार पुन्हा उघडता येईल हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बंदही करता आले पाहिजे. 
अर्थात ही बाब इतकी सहजच साध्य होणारी नाही. त्यासाठी प्रचंड आत्मबल व संयमित शक्तीची उपासना आवश्यक आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. ही शक्ती साध्य झालेले युधिष्ठिर,गौतम बुद्ध आणि आधुनिक काळातील विचारवंत महात्मा गांधी याच भूमीतले आहेत.त्यांचे आदर्श जीवन व मौलिक विचार आपणास याकामी मार्गदर्शक ठरावेत. 
    वरील दोन्ही मुद्यातील मतितार्थ असा की, एका कामातून दुसर्‍या कामात लक्ष घालतांना आधीच्या कामाचे द्वार पूर्ण बंद करण्याचा सराव करावा लागेल. तरच आपणास हाती घेतलेल्या कार्यात पूर्ण लक्ष देता येईल.अन्यथा एक ना धड भाराभर चिंध्या असे होऊ शकते. शिवाय मनात आधी सुरु असलेल्या कामाचे द्वार काही वेळेसाठी बंद केल्याने ताण हलका होण्यास मदत होईल.हा एक लाभ होतो. 
अशा रितीने संपूर्ण दिवसभरात मनाचे वेगवेगळे कप्पे कधी उघडे तर कधी बंद करता यायला हवेत. असे करता आले तर एका कामातून मिळणारा आनंद दुसर्‍या कामाचा ताण हलका करणारा ठरेल. ह्यात शंकाच नाही. 
समर्थ रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे,
 मन करा रे प्रसन्न। 
सर्व सिद्धिचे कारण।। ” 
मन प्रसन्न असेल तर सर्व काही प्राप्त करता येईल. म्हणून लेखनाचा किंवा कामाचा शीण घालवायचा असेल तर “ नको रे बाबा हे काम.. खूप थकलो. पुन्हा नकोच हे काम! ” असं म्हणू नका. कारण काम कोणतेही असो ते आपणास एकतरी कौशल्य नव्याने देऊन जाते.म्हणूनच संत तुकाराम महाराज अभंगात म्हणतात, 
“ निश्चियाचे बळ तुका म्हणे तेचि फळ. ” निश्चय करण्याचे आत्मिक बळ जागृत मनामुळेच शक्य आहे. 
“ केल्याने होत आहे रे..
आधी केलेचं पाहिजे. ” 
म्हणून गांधीजी म्हणत. प्रत्येक कार्य हे ईश्वरी आदेश आहे. त्यात स्वतःला झोकून द्यावे. ” म्हणून आधीच्या मनाचा कप्पा काही वेळेसाठी बंद करावा. त्याला रिजवण्यासाठी एखादे आवडते गाणे गाणे, संगीत ऐकणे वा आवडते वाद्य वाजविणे, अगदी तोंडाने शिळ वाजवली तरी एक नवीन उर्जा प्राप्त होते हा माझा अनुभव आहे. मन तरतरीत व नव्याला सामोरे जाण्यास सिद्ध होते. निसर्गसौंदर्याच्या आस्वाद घ्या, बाग बगीचा, उद्यानात फिरुन या, थोडावेळ लुसलुसित हिरव्या गवतावर अनवाणी चालून या किंवा थोडा वेळ बसा. कार्य केल्याने शरिराला आलेला थकवा दूर करण्यासाठी देवदर्शन घ्या, लहान मुलांशी खेळा, आवडत्या व्यक्तीशी गप्पा करा,आवडता खेळ खेळा.चहा-कॉफी, शरबत किंवा शहाळ्याचे पाणी प्या ताजेतवाने वाटू लागेल. असे करता येईल. 
© प्रा.पुरूषोत्तम पटेल, म्हसावद 
    मोबाईल नं-8208841364 

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...