Kaayguru.Marathi

रविवार, ऑक्टोबर ३१, २०२१

प्रियदर्शिनी इंदिराजी

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान 
स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची आज पुण्यतिथी:
 शब्दसुमनांनी श्रद्धांजली 🌹🙏
✍️ इंदिराजी गांधी

कमला   जवाहरांची  इंदू
अटलजींच्या  दुर्गेचा मान
मोरारजींची   गुंगी गुडिया 
गौरवग्रंथी स्तुतीसुमनांचे पान 
करितो कोटी कोटी प्रणाम. १

बालपणी निर्मिली वानरसेना 
मुक्त  कराया  भारत   देशा 
केली जुलमी इंग्रजाची दैना
भोगीयलास तूम्ही कारावासा
करितो कोटी कोटी प्रणाम. २

बलाढ्य भारत सिद्ध कराया
तुझसी आवडे  विज्ञानक्रांती 
जगी  निःशस्त्रीकरण प्रणेता 
ध्यास  मनी   तव  विश्वशांती 
करितो  कोटी  कोटी  प्रणाम. ३

कणखर   नेता  विश्ववंदिता 
आद्य  हो महिला पंतप्रधान 
आत्मबळे एक्कात्तरचे समरी 
पाकचे  गळविले  देह -भान 
करितो  कोटी कोटी प्रणाम. ४

कथनी  अन् करणी यात 
कधी ना  केला तूम्ही भेद 
कर्तृत्व तुमचे महान एवढे
कोणी   ना  करीला   छेद
करितो कोटी कोटी प्रणाम. ५

श्वासात जनविकास ध्यास 
तुमचे जाणे एक विरमरण
भारतरत्न !  इंदिराजी.. .
हे तर... मातृभूमिस समर्पण 
तुम्हा कोटी कोटी वंदन ! ६

तुम्ही तर मुत्सद्दी आदि अंती 
जगी जन्म नसे कोणी दूजा
तुमच्या दृढसंकल्पा पुढती
उंच हिमगिरी वाटे हो खूजा
करितो कोटी कोटी प्रणाम! ७

© शब्दसौदर्य :-
प्रा.श्री.पुरूषोत्तम पटेल

त्रिवेणी लेखन प्रकार : नियम

काव्यलेखन प्रकार : त्रिवेणी 
नियम:-
१) त्रिवेणी ही रचना लिहायला अगदी साधीसुधी अशीच! त्रिवेणी म्हणजे तीन.तीन ओळीत लिहावयाची ही रचना,म्हणून हि " त्रिवेणी रचना " म्हणून ओळखली जाते.
२) त्रिवेणी ही रचना करतांना प्रत्येक ओळीत अक्षरांचे बंधन नाही.मात्र पहिल्या ओळीत जितकी शब्दसंख्या असेल तितकीच शब्दसंख्या तिस-या ओळीतही असावी.म्हणजेच पहिल्या आणि तिस-या ओळीत शब्दसंख्या सारखीच असावी.
३) पहिल्या दोन ओळीत एक विचार मांडलेला दिसतो.तर,तिसरी ओळ कधी पहिल्या दोन ओळींच्या अर्थामध्ये भर घालते.तर कधी ही तिसरी ओळ वेगळाच अर्थ- किंवा दृष्टिकोन देऊन जाते.
४) दुसरी ओळ लयबद्ध आणि अर्थपूर्ण होईल.इतकेच शब्द असावेत.म्हणजेच,या ओळीत पहिल्या आणि तिस-या ओळीत असतात इतके शब्द असणे बंधनकारक नाही.
५) पहिल्या आणि दुसऱ्या ओळीत शेवटच्या शब्दांत " यमक " साधला जावा.ह्यामुळे त्रिवेणी वाचतांना लयबद्धता येऊन नादमयता येते.

चला तर...✒️ लिहू या त्रिवेणी काव्य !

माझी प्रिया [ त्रिवेणी ]

तूच माझा श्वास तुझ्याविना गोड लागेना घास = 
[७ शब्द संख्या]
तुझ्याविना क्षणाक्षणाला होतात भास! 
प्रिये आयुष्यभर तुला सुखी पाहीन देवाला विनवतो ! = [७ शब्द संख्या.]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शनिवार, ऑक्टोबर ३०, २०२१

गाव माझा

गाव माझा 💎

प्रिये,  गाव   माझा    टुमदार  
येऊन  तर  पहा   तू   एकदा 
इथले  नदी  वृक्ष   पाखरं 🐦 
होतील  ग्   तुझ्यावर  फिदा 

तापी - वाकी गोमाई सरिता 
गाव  परिसराच्या भाग्यदाता
सुजलाम्   सुफलाम्  करीती
बळीराजाला या तिन्ही माता 

इथली  काळी कसदार माती
गोड   गोड  जपते  ग्   नाती 
केळी पपई गोड ऊसाचे मळे 
अन्  कापूस  भासे श्वेतमोती

रानातल्या   येता जाता वाटा
चढणी-उतरणी अन् नागमोडी 
त्यावर चालतांना   भासशील   
तू  तर  मनमोहक  गुलछडी ! 

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " 

शुक्रवार, ऑक्टोबर २९, २०२१

बुद्धीकौशल्य

बुद्धीर्यस्य बलं तस्य निर्बुद्धेस्तु कुतो बलम् |
वने  सिंहो मदोन्मतः  शशकेन  निपातितः |
       आचार्य  चाणक्य म्हणतात की, ज्या व्यक्तीजवळ  बुद्धी असते, शक्तीसुद्धा तिच्याजवळ असते. बुद्धीहीनाचे बल असुनही
ते बल  व्यर्थ आहे. कारण  बुद्धीच्या जोरावरच   व्यक्ती बळाचा उपयोग करु शकते. अन्यथा नाही. बुद्धीच्या बळावरच  एक ससा जंगलातील गर्विष्ठ सिंहाचा मृत्यूला कसा कारणीभूत झाला. यासाठी हा दृष्टांत,
         जंगलातील  सर्व  लहान-मोठ्या प्राण्यांनी वनराज सिंहाच्या जाचापासुन मुक्ती मिळविण्यासाठी सिंहाबरोबर एक करार केला.करारानुसार जंगलातील एकेक प्राण्यांने दररोज वनराजाकडे त्याचे भोजन बनुन जावे. ठरल्याप्रमाणे दररोज  एक प्राणी न चुकता वनराजाकडे भोजन बनुन जाऊ लागला. एक दिवस एका सशाची पाळी आली. सश्याने खुप विचार केला..... आणि  विचारांती मुद्दामच वनराजाकडे खूप उशिरा पोहोचला.
         सश्याला  पाहताच  भुकेला वनराजाने  संतापाने   प्रचंड मोठी    गर्जना केली. आणि  उशिरा  येण्याचे कारण विचारले. ससा म्हणाला, महाराज  क्षमा असावी.मी तुमच्या कडे येत असताना  रस्त्यावर मला एक सिंह भेटला, त्याने मला खायची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आधी तुम्हाला सूचना  देऊन परत येतो अशी शपथ घेऊन आलो  महाराज!   सश्याचे बोल ऐकून  वनराजा  म्हणाले, कुठे आहे  तो दुसरा सिंह ?  ससा  म्हणाला,  वनराजा !  तो दुसरा सिंह  याच  विहिरीत  लपून आहे. चला महाराज . असे   बोलून  सश्याने  वनराजाला      विहिरीतील      पाण्यात        वनराजाचेच प्रतिबिंब  दाखवले.
         विहिरीतील    दुसरा   सिंह    पाहताच वनराजाने   क्षणाचाही  विलंब  न   करता विहिरीत उडी मारली. मुर्ख  वनराजाने शञुला ठार मारण्यासाठी विहिरीत उडी मारली आणि  तेथेच वनराजाचा अंत झाला.
         तात्पर्य , केवळ  एक बुद्धिमान व्यक्तीच आपल्या शक्तीचा  योग्य उपयोग करू शकतो. बुद्धिहिनाची  शक्ती  त्याला  कधीही  उपयोगी  पडत  नाही. एका  चिटुकला  पण  अत्यंत बुद्धीमान सश्याने  स्वतःपेक्षा  अधिक  शक्तीशाली  असणाऱ्या  सिंहाला मारले.

© प्रा.पुरूषोत्तम पटेल, (सातुर्खेकर)     मुं.पो.म्हसावद
   patelpm31@gmail.com

गुरुवार, ऑक्टोबर २८, २०२१

तोरणमाळ

(महाराष्ट्र राज्याचे द्वितीय क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण :- तोरणमाळ, ता.धडगाव येथील पर्यटनस्थळाचे 
काव्यमय वर्णन. )

     *  माझे तोरणमाळ  *

माझ्या सातपुडाच्या गळा शोभे
सप्तशिखरांची     माळा
तयात गिरी  तोरणमाळ 
भासे स्वर्गसुखाचा मळा              १

माझ्या  तोरणमाळची   माती
देते इतिहासाची  साक्ष 
नांदला पांडवांचा वाली
राजा इथे नाव तयाचे युवनाश्व                    २

माझ्या तोरणमाळची वाट
वळणावळणाची  बिकट
जाता येता खुणावतो 
सुंदर सात पायरीचा घाट      ३

माझ्या  तोरणमाळची भूमी
अहो किती पावन पावन
माय मांडीवर विसावले
पार्श्वनाथ आणि नागार्जून     ४

माझ्या  तोरणमाळची कथा
गातो व्यास न् कालिदास 
धन्य धन्य  या भूमिसी
सहस्रदा नमवितो मी शिष    ५

माझ्या  तोरणमाळवर फिदा
आषाढ - श्रावण  घननीळा
संगे घेऊनिया येतो
फूल फूलपाखरांचा मेळा       ६

माझ्या  तोरणमाळसी लाभले
निसर्गराजाचे वरदान
साग पळस बांबूच्या  वनी
खग गाती मंजूळ गाणं         

माझ्या  तोरणमाळच्या रक्षणा
दोन पुण्यकन्या  खास
गिरीशिखरी एक तोरणाई
दूजी सिताखाई निवास        ८

माझ्या तोरणमाळच्या कुक्षी
यशवंत  गोड जळतळे
शरदाच्या रात्री  खूले
इंद्रलोकीचे सौंदर्य  आगळे    ९

माझ्या  तोरणमाळच्या  अधरी
पद्माचे मोहक दल उले
ईको-पाॅईडशी बोलता

निनाद  तिनदा उसळे         १०

माझ्या तोरणमाळ येऊनी
पहा    खडकी    पाॅईंट
घे रे ...! डोळा साठवून 
भूदेवीच्या स्वर्गीय  थाट       ११

माझ्या  तोरणमाळच्या  भूवरी
उभा ईश् गोरक्षनाथ 
महाशिवरात्रीच्या  रात्री 
त्यांसी भेटे कैलासनाथ         १२

तोरणमाळची  होळी पहा खरोखरी
ढोल  दणाणतो मनोहारी 
शिबलीनृत्य गेरनृत्यात बेधुंद 
बिरि-बासरी संगे नर नारी      १३

माझ्या  तोरणमाळच्या  उदरी
वनौषधी    कितीऽऽतरी
अमृतकुंभ  धरूनिया हाती
येथे उभा भासे हो धन्वंतरी     १४

माझ्या  तोरणमाळच्या  भूवरी
गमते घरं  कौलारू 
गर्द हिरव्या  रानात जणू
हिंडतो सम्राटाचा  वारू          १५

माझ्या  तोरणमाळच्या  वनराई 
गातो  नि रमतो वनपिंगळा
लाविला या एका खगाने
अख्खा  जगताला लळा         १६

माझ्या  तोरणमाळच्या  आभाळी
सूर्यदेव रोज येतो हो... मस्त 
डोळियासी नवनवे  दिसे
सूर्योदय अन् सूर्यास्त            १७

ये रे दोस्ता ... एकदा तू !
पहा कीऽ माझे तोरणमाळ
तू ह्रदयी घे रे साठवून
प्रेम जिव्हाळा  सकळ           १८

कवी :-
प्रा.पुरूषोत्तम पटेल, मु.पो.म्हसावद


ता.शहादा,जि.नंदुरबार, 425432
भ्रमणध्वनी - 8421498724 

Blog-mhasawad. blogspot. In

patelpm31@gmail.com


Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...