छत्रपती शिवाजीराजे बोलले अन्...!
आज अखिल महाराष्ट्राचे...नव्हे; संपूर्ण हिंदूस्थानाचे दैवत, प्रेरणास्रोत, अन्याय अत्याचाराविरूद्ध लढण्याचे, तन मनाचे सामर्थ्य निर्माण करणारे,“अरे,सुलतानांनो…जर माझ्या माय भगिनींना वाकड्या नजरेने बघाल तर,तुमचे डोळे काढून शिर धडावेगळे करीन!” असा खंबीर इशारा देणारे शहाजीराजे अन् मॉंजिजाऊसाहेब यांचे पुत्र…नाही हो…सुपुत्र, आमच्या श्वासाश्वासातील हुंकाराची प्रचंड ताकद, प्रचंड सामर्थ्यवान कंसाचा जुलमी सत्तेच्या छातीवर जसा श्रीकृष्ण उभे राहीला होता तसेच जुलमी राजवटी़च्या कर्दनकाळ ठरलेले,शून्यातून वाटचाल करीत आत्मविश्वासाने हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे नरसिंह छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिनशे शहाण्णवावी जयंती…!
पुण्यपावन, प्रेरणादायी कर्तृत्वाचे महामेरू छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन!💐 🙏 🙏 🙏
आज छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करताना माझ्या कानावर आवाज आला. “ ए माझ्या मावळा!” मी गर्रकन् मागे वळून पाहिले.कोणीच दिसेना आवाज कुठून आला.कोण बोलले बरे? मी विचार करु लागलो.पुन्हा आवाज … “ अरे,मी तुझ्या राजा,मी शिवराय बोलतोय!”
“ राजे…तुम्ही! राजे मुजरा करतो!” म्हणत मी पुन्हा चक्क राजांना तिनदा वाकून मुजरा केला.तसा राजे आशीर्वाद देत बोलले.
“ आज तू आणि तुझ्याप्रमाणे माझ्यावर प्रेम करणारे अनंत मावळे मला भेटून आशीर्वाद घेत आहेत.हे पाहून आनंद वाटतोय मला.पण…दुःखही वाटतेय गड्या!”
मी धीर धरुन बोललो.
“ राजे,माफ करा.काही चुकलंय का हो माझं?”
“तुम्ही सगळेच तर चुकताय.रोज नव नव्या चुका करताय.मला वर्षातून दोन वेळा वंदन केले,माझे स्टेटस ठेवले,मला मुजरा केला की संपलं आपलं काम!असं वाटतंय ना तुम्हा सर्वांना ! एवढंच काय रे माझे कार्य? एवढे मर्यादित आहे का रे माझे विचार?याचसाठी मी आयुष्यभर शत्रुशी लढलोय का रे? ”
राजांचे हे शब्द माझ्या हृदयावर हातोडा मारावा तसे पडत होते.मला तर शब्दच ओठावर येईना.मी खाली मान घालून गप्पच!
राजे बोलले, “ ए बाळा!ऐंकतोय ना?”
“ अ…हं. राजे ! काय आज्ञा?” मी कसाबसा बोललो.
“ ऐंक तर…तुम्ही आज दिवसभर जय भवानी! जय शिवाजी! या नावाने जयघोष करणार.लहान मोठे कार्यक्रम घेणार.मला वंदन करणार.मी कोणत्या काळात जन्मलो,मॉसाहेबांनी मला कसा घडविला,मी रायरेश्वरी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणासोबत घेतली, तोरणा किल्ला कसा सर केला, मॉसाहेबांची शिकवण स्मरुन आदिलशहाला नतमस्तक झालो नाही, एकेक किल्ला सर करून त्याला धडकी भरवली,रांझाच्या पाटलाने एका भगिनीवर अत्याचार केला म्हणून त्याला चौरंग शिक्षा केली, सुरत शहर लुटून अपार धन दौलत मिळवली,जुलमी मत्तवाल अफजलखानाचा कोथळा काढून स्वराज्य रक्षण केले.तानाजीचे कार्य अमर रहावे, म्हणून कोंढाणा किल्ल्याला सिंहगड ,बाजीप्रभूचे कार्य सतत प्रेरणा देत रहावे म्हणून घोडखिंडला पावनखिंड हे नामकरण केले, आग्र्याहून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन सहीसलामत स्वराज्यात परतलो, कल्याणच्या सुभेदार स्वराज्याचा शत्रू असूनही त्याचा रुपवान सुनेकडे मी वाकड्या नजरेने न पाहता माय भगिनी मानून तिला सन्मानाने कल्याणला पाठविले.माझ्या खांद्याला सतत आधार देऊन,स्वराज्यासाठी प्राणार्पण करणा-या मावळ्यांचा मान सन्मान राखला.ह्या सर्व गोष्टीचे तुम्ही गुणगौरव कराल.पण खरं सांगतो….मला हे तुमच्याकडून अपेक्षित नाही बरं का?” बोलतांना महाराज थांबले.गहिवरून आले त्यांना.मी चोरट्या नजरेने महाराजांकडे पाहिले.तर महाराजांच्या मुद्रेवर नैराश्य जाणवले.माझी बोलण्याची हिंमत झाली नाही.
महाराज पुन्हा बोलू लागले.
“ ऐक गड्या, आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर माता भगिनींवर,लेकी-सुनांवर रात्री…नव्हे; दिवसाढवळ्या अन्याय अत्याचार होतोय. अत्याचारी रंगेहाथ सापडला तरी तो सहिसलामत सुटतोच कसा? अरे,हे लोकं मला आदर्श मानतात ना? माझे नाव घेऊन प्रत्येक सभेची सुरुवात करता ना…? मग मी निर्माण केलेले कायदे, बलात्कारीसाठीची “ चौरंग शिक्षा” अंमलात आणायला लाज वाटते का रे यांना?
रस्त्यावर चालणाऱ्या,शाळा महाविद्यालयात जाणा-या लेकींना छळता…त्यांना त्रास देतांना यांना माझी शिकवण,माझे आदर्श आठवत नाही का? माझे वडील शहाजीराजे यांना आदिलशहाच्या आदेशाने अफजल्याने अटक केली.का ? तर मी त्यांचे जिंकून घेतलेले किल्ले परत द्यावे म्हणून! मला त्याचा हा फतवा मिळताच मी जिंकलेल्या किल्ल्यांचा क्षणाचाही मोह न धरता ‘ पिताश्रीच्या मुक्ततेसाठी’ आदिलशहाचे किल्ले परत देऊन त्यांना मुक्त करविले.ही पितृ सेवा मला का दिसत नाही. गुंठाभर जमिनीच्या तुकड्यासाठी आज बापाचे खून करणारे महाभाग राज्यात पाहतो तेव्हा किळस वाटते मला या वृत्तीची!
आजही आठवतो मला ११ मे १६६६ रोजीचा आग्रा येथील औंरंगजेबासमोरील प्रसंग…मला औंरंगजेबाने आग्र्याचा दरबारात मलाच पाठ दाखवून धुम पळालेल्या कनिष्ठ दर्जाच्या सरदारांच्या रांगेत उभे करून अपमानित केले,ह्या गोष्टीचा मी भर दरबारात निषेध नोंदवला.व तडक दरबारातून बाहेर पडलो.हा स्वाभिमान कुठे हरवलाय? स्वाभिमान दिल्लीच्या पायावर घातल्याचे मी ऐकतो तेव्हा मला वाटते…याच साठी तर नव्हता माझ्या अट्टाहास? माझ्या महाराष्ट्राने वैचारिक गुलामगिरी, चापलूसी स्विकारल्याचे पाहताच माझी तळपायाची आग मस्तकी पोहचते रे!आणि हो…मी माझ्या हिंदवी स्वराज्यात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज द्यायचो.शेतसारा माफ करायचो. शेतक-यांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या सावकारांना भर चौकात शिक्षा द्यायचो.हे धोरण माझे नाव घेऊन राज्य करणा-या सत्ताधिशांना आठवत नाही काय? हा निर्लज्जपणा,कोडगेपणा असलेल्यांना धडा शिकविण्याचे तुमचे बळ कुठे हरवले रे? अन्याय, अत्याचाराविरुद्ध पेटून उठा.ही माझी शिकवण का विसरलाय तुम्ही? माझ्या राज्यात भ्रष्टाचार करणा-यास
हत्तीच्या पायी देणे वा टकमक टोकावरून कडेलोट करण्याची शिक्षा होती.त्यामुळे सहजासहजी भ्रष्टाचार करायची हिंमत कोणी करीत नव्हता.आज मी काय ऐंकतोय.भ्रष्टाचार करणारा लोकप्रतिनिधी बनतो,मंत्री बनतो.हे तर अती निंदनीय! हे पाहता मला खूप वेदना होतात रे! धर्म म्हणजे कर्तव्य! पण…आज तर हिंदू मुस्लिम असा धर्मभेद करुन धर्माधर्मात भांडणे लावल्याची गोष्ट ऐकून येतेय.विसरलेत का? माझ्या हिंदवी स्वराज्यात अनेक निष्ठवान मुस्लिम अधिकारी व सैनिक उच्च पदांवर कार्यरत होते. यामध्ये आरमाराचे प्रमुख दर्यासारंग व दौलत खान, पायदळ प्रमुख नूरखान बेग, तसेच सिद्धी हिलाल, सिद्धी इब्राहिम (अंगरक्षक), काझी हैदर (वकील) आणि मदारी मेहतर यांसारख्या प्रमुख व्यक्तींचा समावेश होता.हे सर्व जीवाला जीव देणारे होते.सर्वधर्मसमभाव स्विकारून मी स्वराज्य स्थापन केले.म्हणून ते तडीस गेले.या गोष्टींचा आज सर्वांना विसर पडला काय? आणि जेव्हा अन्याय, अत्याचार होतो तेव्हा बहुतांश पिडीत म्हणतात…’ राजे, जन्माला या! का? मीच का हवाय तुम्हाला? अरे,मी माझ्या एकोणपन्नास वर्षाच्या आयुष्यात जीवाचा विचार न करता अनेक लढाया धिरोदात्तपणे लढलो.शत्रुला सळो की पळो करुन सोडले.माय माऊलींनो “ शिवाजी जन्मावा!पण…शेजारच्या घरात!” हा संकुचित विचार सोडून द्या . तुम्हाला एक विनंती की,तुमच्या प्रत्येकीचा शब्दांशब्दांत माझ्यासारखा शिवबा घडविण्याच्या विचार येऊ द्या. स्वकिय व परकीय जुलूमांपासून रक्षण करण्यासाठी जिजाऊसाहेबांनी अखेरच्या श्वासापर्यंत मेहनत घेतली.आऊसाहेबांचा हाच विचार आत्मसात करून बघा.घराघरात माझेच प्रतीरुप जन्माला येऊन तुमच्यावरील अन्याय अत्याचार नक्की दूर होईल.
मी शून्यातून गड,किल्ले,हत्ती, घोडे, पायदळ,आरमार, तोफखाना, स्वतःची टांकसाळ हे सर्व केले.राजमुद्रा करवून हिंदवी स्वराज्याचा छत्रपती झालो.हे करतांना मी वतनदारी नामशेष केली.हे लक्षात घ्या.आज मात्र गुंडगिरीच्या माध्यमातून आधुनिक वतनदारी निर्माण होत असल्याचे पाहून मला खूप दुःख वाटते.कुठून उगवली ही वतनदारीची पिलावळं? अन् मनात विचार येतो…पुन्हा जन्म घ्यावा अन् हाती भवानी तलवार घेऊन कापून टाकावे या एकेक नराधमाला!
तुला सांगतो,ऐंक! तू आता तुझ्या लेखणीतून प्रत्येक घराघरातून माझ्या विचारांचा एक निष्ठावंत पाईक घडव! हीच तुझ्याकडून मला माझ्या जयंतीची खरी वंदना ठरेल!”
हं.जाता जाता एक सांगतो,ज्यांना कोणाला माझे नाव घेऊन मिरवायचे असेल तर,माझ्या विचारांचे गोडवे आज एक दिवस गाऊ नका…तर,आयुष्यभरासाठी अंमलात आणा.प्रत्येक स्त्रीकडे माय भगिनींच्या निर्मळ नजरेने पहा. राज्यकर्ते वा अधिकारी असाल तर कर्तव्य व जबाबदारी ओळखून काम करा. नागरिक व वनाधिकारी म्हणून हिरवे तरुवर न तोडता त्यांची जोपासना करा.वन वाढवा.पर्यावरण वाचवण्याचे, न्याय,निती,समता,स्वातंत्र्य ,सहिष्णुता शत्रु-मित्र,रयतेचे कल्याण,राज्यकर्त्यांची जबाबदारी व कर्तव्य, याबद्दलचे माझे विचार मी तयार केलेल्या “ आज्ञापत्र” या ग्रंथात वाचन करून त्याप्रमाणे कर्तव्य करा.अन्याय अत्याचार लाथाडून जगायला शिका.न्यायाधिश असाल तर निःपक्ष, निःसंशयपणे न्यायदान करायला शिका.तरच माझे नाव घ्या.तरच माझ्या जयजयकार करा.मला तोंडदेखलेपणा आवडत नाही.हे सदैव लक्षात ठेवायला शिकव.
माझे हे विचार नुसते कागदावर ठेवू नको.व्याख्यानातून बोलू नको. प्रत्यक्ष घराघरांतून आत्मसात करण्याचे बाळकडू प्रत्येक मातेने बाळाला पाजण्याचे आवाहन कर! तर...तर महाराष्ट्रात सुरु असलेले महिलांवरील अन्याय,अत्याचार थांबतील. न्याय,नितिचे सुराज्य निर्माण होईल.यात शंकाच नाही.”
मी विनम्र होत महाराजांना म्हटले,
“ राजे,आपली आज्ञा शिरसावंद्य मानून मी कार्याला लागतो. आशीर्वाद द्या राजे!”
“ तथास्तु! शुभास्ते पन्थानः सन्तु” आशीर्वाद देऊन महाराज क्षणार्धात दिसेनासे झाले! धिरोदात्त आवाज शांत झाला.
जय शिवाजी जय भवानी! 🚩🌹🙏
©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “पुष्प”
वाकड,पुणे.