शिवनेरीवर जिजाऊसाहेबांच्या पोटी पुत्र जन्मला !
फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट झाली.आकाशांतल्या चांदण्या हळूहळू विरघळू लागल्या. प्रभेचे तीक्ष्ण बाण सोडीत व अंधाराचा विध्वंस उडवीत उषा आणि प्रत्युषा क्षितिजावर आल्या.सगळी सृष्टी उजळू लागली.
बालसूर्याच्या स्वागतार्थ स्वर्गाचे देव जणूं पूर्वेकडे ओंजळी भरभरून गुलाल उधळू लागले.पूर्वा रंगली.वारा हर्षावला.पांखरें आकाश घुमवू लागली.शिवनेरीच्या नगारखान्यात सनई-चौघडा वाजू लागला आणि अत्यंत गतिमान् सप्तअश्व उधळीत बालसूर्याचा रथ क्षितिजावर आला !
घटकांमागून घटका जाऊ लागल्या. जिजाबाईसाहेबांचे पोट दुखूं लागलें.सुइणीची,कुळंबिणीची आणि वैद्यांची गडबड सुरू झाली. जिजाबाईसाहेबांनी बाळंतपणाच्या खोलीत प्रवेश केला.
विश्वासराव,नारोपंत,गोमाजी नाईक वगैरे सर्वच मायेची माणसे जिजाबाईसाहेबांच्या काळजींत व तितक्याच उत्सुकतेत चूर झार्ली.आनंद,औत्सुक्य,भीती,पुन्हा आनंद, पुन्हा काळजी, पुन्हा औत्सुक्य त्या सर्वांच्या मुखांवर आलटूनपालटून उड्या मारीत होतें. एका जागी त्यांना कसें स्वस्थ बसवलें असेल ? फार फार प्रेमळ माणसे हो हीं…!
उत्सुकता वाढत होती. मागचा क्षण पुढच्या क्षणाला उत्सुकतेने पुसत होता, "काय ?"
"अजून काही नाही !" पुढचा क्षण मागच्या क्षणाला उत्तर देत होता.
एकेक निमिष तासासारखे जड जाऊं लागलें होतें.
आणि दारावरचा पडदा हलला. एकदम बाजूला झाला. उत्सुकतेच्या भिवया वर चढल्या.माना उंचावल्या.
"काय ? काय ? काय ?"
"पुत्र !"
बातमी हसत हसत ओठांवर आली.ऐकणा-या कामांनाही शतपटीने आनंद देऊन गेली.
"पुत्र ? पुत्र ?"
" हो.होय! जिजाऊसाहेबांच्या पोटी...पुत्र ! पुत्र !!पुत्र जन्मला !!!"
बातमी कानावर पडताच शिवनेरी किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उडाला.वाद्ये कडाडूं लागली.संबळ,झांजा झणाणूं लागल्या. गडावरच्या नगारखान्यांत सनई चौघडा झडूं लागला. नौबत सहस्रशः दणाणूं लागली. नद्या, वारे, तारे, अग्नी सारे आनंदले. तो दिवस सोन्याचा ! तो दिवस रत्नांचा ! तो दिवस कौस्तुभाचा,अमृताचा ! छे: हो, छेः छेः छेः ! त्या दिवसाला उपमाच नाही ! शुभ ग्रह, शुभनक्षत्रं, शुभ तारे, शुभ घटका, शुभ पळें, शुभ निमिषे तो शुभ क्षण गाठण्यासाठीच गेली तीनशे वर्षे शिवनेरीच्या भवती घिरट्या घालीत होती !आज त्यांना नेमकी चाहूल लागली! आज तर ती सर्वजण जिजाबाईसाहेबांच्या सूतिकागृहाच्या दाराशी थबकली, थांबली, खोळंबली, अधीरलीं आणि पकडलाच त्यांनी तो शुभ क्षण ! तीनशे वर्षांनंतर ! तीनशे वर्षांनंतर ! कोणत्या शब्दात त्या सुवर्णक्षणाचे मोल सांगू ? अहो,ते अशक्य ! केवळ शतका-शतकांनीच नव्हे, युगायुगांनीच असा शुभ क्षण निर्माण होतो. त्याचे मोल अमोल ! शालिवाहन शकाच्या १५५१ व्या वर्षी, शुक्लनाम संवत्सरांत, उत्तरायणांत,फाल्गुन महिन्यांत, वद्य तृतीयेला, शिशिर ऋतूंत, हस्त नक्षत्रावर, सिंह लग्नावर, शुक्रवारी सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर शुभ क्षणी, अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे पांच ग्रह अनुकूल व उच्चीचे असताना जिजाबाईसाहेब- आईसाहेबांच्या उदरी शिवनेरी किल्यावर पुत्र जन्माला आला ! दि. १९ फेब्रुवारी, शुक्रवार, १६३० शुभमंगल मुहूर्तावर!
शुक्ल संवत्सराने आपले नांव सार्थ केले ! शुक्ल संवत्सर ! शुभसंवत्सर ! शिव संवत्सर !
गडाचे तोंड साखरेहून गोड झालें.जिजाबाईसाहेबांच्या महालापुढे पखालीतून आणि घागरींतून घो धो धबधबलेले पाणी बारा वाटा वाहत निघालें. खळाळणारा ओघ वेशीला आला ! अन् ओघ वेशीला आला. पुत्र कोणाला झाला ? पुत्र जिजाबाईसाहेबांना झाला ! पुत्र शहाजीराजांना झाला ! पुत्र सह्याद्रीला झाला ! पुत्र महाराष्ट्राला झाला ! पुत्र भारतवर्षाला झाला ! प्रत्येक जलौघ वळसे घेत घेत दिल्लीच्या,विजापूरच्या,गोव्याच्या,मुरूडजंजिऱ्याच्या आणि गोवळकोंड्याच्या वेशीकडे धावत होता.तेथल्या मग्रुर सुलतानांना बातमी सांगायला की, “सुलतान्यांनो,आला.आला ! तुमचा काळ जन्माला आला रेऽऽ ! तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त तख्ताच्या चिरफळ्या उडविण्याकरिता आला!जसा मग्रुर कंसाचा वध करायला कृष्ण जन्माला आला होता ना ! तसाच तुमच्या वध करायला आज शिव जन्माला आलाय रेऽऽ!” शहाजीराजांकडे पुत्र जन्माच्या बातमीची साखरथैली रवाना झाली.
शिवनेरीगडावर शीतल व सुगंधी वारे वाहू लागले. गडाच्या परिसरांतील खेड्यापाड्यात ही पुत्रजन्माची बातमी वारा घराघरात देऊ लागला.बातमी ऐंकून अख्खे जुन्नरमावळ आनंदले!
शिवनेरीवर कारभाऱ्यांची आनंदाने धांदल उडाली. त्यांनी वेदशास्त्रसंपन्नांना बोलावून आणलें. त्या वेदमूर्तीनी बाळाला शुभ आशीर्वाद दिले. स्वस्तिवाचन केले. नंतर सुइणींनी बाळबाळंतिणीला कढत पाण्याने न्हाऊ घातलें.
कारभाऱ्यांनी हुशार ज्योतिष्यांना सन्मानाने सदरेवर बसविलें. त्यांच्याभोवती सर्व वडिलधारी मंडळी बसली. जणू लहानशी सभाच बसली. मंडळीनी ज्योतिषीबुवांना बाळाची कुंडली मांडण्याची विनंती केली. ज्योतिष्यांनी मखर आखीत 'श्रीगणेशाय नमः।' केलें. मोठ्या चिकित्सापूर्वक, चौकस गणिताने त्यांनी नवग्रहांची स्थापना ज्याच्या त्याच्या घरात केली. कुंडली मांडली.
ती कुंडली अशी,
।। श्रीगणेशाय नमः ।।
शुभं भवतु, स्वस्ति श्रीशालिवाहननृप शके १५५१ फाल्गुन वद्य ३, शुक्लनाम संवत्सर, शुक्रवार, हस्तनक्षत्र, शिशिर ऋतु, सिंह लग्न. कन्या रास. पुत्रजन्म.
सिद्ध झालेली कुंडली हाती घेऊन त्यांनी अवलोकिली. त्या ज्योतिष्यांचे चित्त आश्चर्यमुग्ध होऊन गेलें. प्रातःकालच्या प्रफुल्ल कमलपुष्पाप्रमाणे आनंदित होत्साते ते विद्वद्वर्य आपल्या सन्मुख बसलेल्या सज्जनांप्रत माना डोलावीत त्यासमयी सांगते झालें,
"महाजनहो ! पृथ्वीचे भाग्य उदेले ! या भूमंडळाचे ठायी अति थोर सौभाग्यमुहूर्तावर हा कुमार जन्माला आला आहे ! याची कुंडली अत्यंत मोठ्या अशा भाग्ययोगांनी परिप्लुत आहे. अहो, हा सुपुत्र दिग्विजय करील ! हा परम साहसें करील ! आपली कीर्ती दिगंताला पोहोचवील ! हा आपल्या सत्तेत गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग, स्थलदुर्ग ठेवील! श्रांत पृथ्वीस शांत करील ! सकल भूमीचे ठायी हा सुपुत्र यशकीर्तिप्रतापमहिमा वाढवून चिरंजीव होईल !"
हे शुभ भविष्य ऐकून कारभाऱ्यांच्या माना डोलल्या. मुद्रा आनंदल्या. त्यांना धन्य धन्य वाटले. ओंजळी भरभरून दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणांची त्यांनी संभावना केली. इवलेंसें बाळ तें ! त्याला अजून धड रडतासुद्धा येत नव्हतें. पण त्याच्याकडून अपेक्षा केवढ्या मोठ्या !आईसाहेबांच्या सौम्य मातृदृष्टीतही त्याच अपेक्षा दाटलेल्या होत्या. सह्याद्री तर आनंदाने खदखदत होता. जणू म्हणत होता, “अरे ह्या पोराची कुंडली विती दीडवितीच्या अशा चिठोऱ्यावर काय मांडता ! सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पसरलेल्या ह्या अफाट आकाशावर ब्रह्मदेवाने याची कुंडली केव्हाच मांडून ठेवली आहे !”
मुठी वळीत बाळाने पहिला टाहो फोडला !जणू सर्व जुलुमी सुलतानांना तो इशारा होता…"मी आलोय रेऽ!अन् रयतेला साद होती…भिऊ नका.आता मी सगळा जुलूम,
अन्याय,अत्याचार दूर करीन!"
©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “पुष्प
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा