🌺
शारदीय नवरात्रोत्सव : चौथी माळ 🌺 🌹 देवीस्वरुप- कुष्मांडा 🌹
" कु " ह्या अक्षराचा अर्थ आहे - पृथ्वी. ऊष् शब्दाचा अर्थ - आधार,उष्णता. आणि मा अक्षर हे आई किंवा लक्ष्मी अर्थाने. आणि अंड शब्दाचा अर्थ - मोठा...या अर्थाने विश्वातील सर्वात मोठे आहे ते ब्रम्हांड किंवा सृष्टि.
अर्थातच जिच्या उष्णतेने हे ब्रम्हांड किंवा सृष्टी उत्पन्न झाली,ती देवी कुष्मांडा ! म्हणजेच नवरात्रीतील चौथे दुर्गारुप आई " कुष्मांडा " होय.
" सुरासम्पूर्णकलशं रूधिराप्लुतमेंव च।
दधाना हस्तपदमाभ्यां कुष्माण्डा शुभदास्तु में।। "
दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव '' कुष्मांडा '' आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते.
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन '' अदाहत '' चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती, आदिमाया, आदिजननी आहे.
कुष्मांडा देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहाही दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे.
💎 कुष्मांडा देवीचे स्वरूप :-
कुष्मांडा देवीच्या आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातात अनुक्रमे कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे.
💎 कुष्मांडा देवीची पुजा-अर्चा :-
कुष्मांडा देवीची पुजा करताना लाल रंगाची फुले, जास्वंद किंवा गुलाबाचे फूल आवर्जुन वहावे. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. कूष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा
💎 कूष्मांडा देवीचा मंत्र
कुष्मांडा देवीचे पूजन करताना पुढील मंत्र म्हणावा. शक्य असल्यास यथाशक्ती जप करावा.
🙏१) ॐ देवी कूष्माण्डायै नमः॥
🙏२)या देवी सर्वभूतेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
💎 कुष्मांडा देवीची कृपा प्राप्ती :-
कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. मनुष्य पूर्णपणे अनन्यभावे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडा मातेची उपासना मनु्ष्याला रोगापासून मुक्त करते. भक्ताला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे.
{टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करावा.}
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "