Kaayguru.Marathi

शनिवार, जुलै ०८, २०२३

भ्रम [ कविता ]


आपला आपला म्हणता...
क्षणाक्षणाला गेलो मी गुंतून
केसाने गळा कापला त्याने
आपुलकीच्या भ्रमात घेरून

आपला परका कोण ?
ओळखायला लागलो आता
माणसं कळती ठेस लागता
आपला पाय रक्तबंबाळ होता

नियमच आहे हो जगताचा
येथे कोणी नसतो कोणाचा
पाणी नाका तोंडाशी येता
माकडीण उभी माथी पिलाचा 

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, जून २८, २०२३

विठू आला [ अभंग ]

विठू आला [ अभंग ]
धावा धावा धावा । माझ्या विठू आला।
पायी फुले घाला  । माझ्या देवा ।।१।।
सोडूनी वैकुंठ      । आला वाळवंटी ।
संताचिया भेटी    । आनंदाने    ।।२।।
चंदनाची उटी      । शोभे भाळी । 
उभा वनमाळी     । विटेवरी ।।३।।
पाहुनिया रुप     । भासे जणू शिवा ।
सुख लाभे जीवा । भेटीलागी ।।४।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, मे ३१, २०२३

तुझ्यात मी![ अष्टाक्षरी]

सखे तू माझी मी तुझा 
तन दोन आत्मा  एक
ठेच  लागे मज पाया
डोळा अश्रु तुझे कैक.  ।।१।।

सख्या माझ्या हृदयी तू
कप्पा मी तुझ्या मनीचा  
शुक्रतारा  मी  तारका
दवबिंदू   तू    पर्णाचा  ।।२।।

तुझ्यासवे  जग  भासे
स्वर्गाहून       सुंदरसे
तूच  माझी  स्वप्नपरी
दुजा  सर्व  गौण दिसे  ।।३।।

नभ   तू  तुझी मी मेघ
इंद्रधनु  तू    आभाळी
सप्तरंगी   रंगते     मी
होते लाली उष:काळी  ।।४।।

रोमरोमी    तू  कन्हैया 
सूर  तू  मी  रे  बासुरी
स्पर्श   होता  अधरांचा
होते    गोविंदा   बावरी ।।५।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


मंगळवार, मे ३०, २०२३

घे झेप आभाळी! [अष्टाक्षरी]

नको अडकून राहू पिंज-यात या गड्या तू
पंख पसरुन  घ्यावी उंच आभाळी झेप तू  ।।१।।

असतील जरी दाणे  सोने रुपे नी मोत्यांचे 
टाकूनिया  दे तू सारे  पाश  मोह मायेचे तू ।।२।।

दिले  देवाने  पंखात बळ   हे  विहरण्याचे
ओलांडून जा  सागर  नदी  डोंगर  दूर  तू  ।।३।।

तोड गड्या पायाची रे बेडी सोन्याची दास्याची
सामर्थ्याचा गर्व नये हो दिनांचा कैवारी तू ।।४।।

जग एक बंदिशाळा कोणी न येथे कुणाचा
कारा तोडुनिया व्हावे जगन्नाथ सृष्टीचा तू ।।५।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, मे १४, २०२३

माझी माय


[ आज जागतिक मातृ दिवस त्यानिमित्ताने आई चरणी समर्पित काव्यसुमन!💐🙏🙏🙏]

माझी माय

चालत होतो एकटा
होती ती एक भयाण रात्र
घेऊन अनवाणी दोन पाय
तुडवित होतो रस्ता…
खाचखळगे, दगडधोंड्यांनी भरलेला
कधी पडलो,कधी ठेचाळून पडलो
खाल्ल्या अनंत खस्ता
पायात घुसला काटा 
पोहचलो कसाबसा घरी
माझ्या येण्याची वाट पाहत…
चिंतेत बसली होती दारी
दोन्ही पाय रक्तबंबाळ पाहून 
मोकले धायऽऽधाय
जिव्हाळा हृदयीचा 
शांत राहिना…
कोण हो ती? 
ती तर माझी माय ! 
ती तर माझी माय!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...