Kaayguru.Marathi

बुधवार, नोव्हेंबर ०३, २०२१

राष्ट्रीय गृहिणी दिवस

राष्ट्रीय गृहीणी दिवस 

मित्र मैत्रिणींनो 
आज ३ नोव्हेंबरचा दिवस.
हा दिवस आपण भारतीय नागरिक " राष्ट्रीय गृहिणी दिवस " म्हणून साजरा करतो.खरे पाहता, संसारातील सर्वात कठीण कार्य कोणते ? याचे उत्तर निश्चितच " गृहिणी " बनणे असेच येईल. कारण घर आणि कुटुंबाला ख-या अर्थाने एकात्मतेच्या धाग्यात बांधून ठेवण्याचे काम " गृहिणी " करते.म्हणूनच तिच्या हा एकमेवाद्वितीय त्याग आणि ती नि:स्वार्थपणे करीत असलेल्या कर्तव्याप्रती तिच्या सन्मान वर्षातून एक दिवस का असेना ,आपण सर्वांनी तिला द्यावा.म्हणून हा दिवस तिलाच समर्पित आहे.
या दिनी तिच्या गौरव, अभिनंदन करावे.यासाठी आजचा हा ३ नोव्हेंबर हा दिवस खास भारतात " गृहिणींसाठी " राखून ठेवण्यात आला आहे.
 मी तर असे म्हणेन की, एक महिला ही मुलगी,सून,आई, आजी,काकू,मावशी,आणि मैत्रीण असू शकते...पण ती एक उत्तम " गृहिणी " असणे अती कठीणच!
 मला वाटते ,गृहीणी कोणाला म्हणावे ? तर जिच्या सेवेप्रती सगळे गृह म्हणजे घर ऋणी म्हणजे देणेकरी बनते तीच खरी " गृहिणी " होय.अशा गृहीणीचे आदर्श गुण मी पुढीलप्रमाणे वर्णन करेन :-
१) घर व कुटुंबाला २४×७ आपल्या निःस्वार्थ हेतूने एकाच धाग्यात बांधून ठेवते.
२) स्वतःच्या नोकरी व्यवसाय सांभाळून पती,मुले, सासू, सासरे यांच्यात योग्य समन्वयकाची भूमिका पार पाडते.
३) आपले कुटुंब गुण्यागोविंदाने एकत्र रहावे.त्यांच्यात वाचा - मने कोणतीही कटुता निर्माण होणार नाही.म्हणून सदैव वादविवाद टाळते.
४) कुटुंब विभक्त होणे ही काळाची गरज आहेच! पण,विभक्त कुटुंबातील आपलेपणा भंग पावणार नाही याचीही काळजी घेते.
५) घर-कुटुंबाची धुरा सांभाळताना योग्य त्या आवश्यक गरजांचीच पूर्तता करुन अनावश्यक खर्च आवर्जून टाळते.
६) स्वयंपाक करतांना आवश्यक तो मिठ,मोहरी,तिखट,
मिरची,मसाला,तेल,इंधन वापरुन निगुतीने अन्नपूर्णेच्या स्वयंपाक बनविते.
७) कुटुंबात सर्वांना पुरेल,पण जास्तीचे काही पदार्थ उरणार नाही.याचा योग्य अंदाज राखून सकाळ सायंकाळच्या स्वयंपाक बनविते.
८) घरातील वडीलधारी मंडळींच्या मान राखून प्रसंगी त्यांच्याशी सल्लामसलत करते.घरी आलेल्या नातेवाईकांचा योग्य सन्मान करते.
९) शेजा-यांशी स्नेह,आपुलकी राखते.सुख-दुखात सहभागी होते,अडीअडचणीच्या प्रसंगी शक्य त्या मदतीला धावून जाते.
१०) घरात असो वा, शेजारणींच्या बाबतीत,किंवा नातेवाईक स्त्रियांच्या बाबतीत सदैव सलोखा राखून " चुगलखोरपणा " कटाक्षाने टाळते.
११) आपल्या पती व कुटुंबाशी एकनिष्ठ राहून क्रोध, संताप ,उर्मटपणा टाळते.
१२) मुला-मुलींवर,सुनेवर योग्य संस्कार उदा, वडिलधाऱ्या मंडळींचा मान राखणे, क्रोध न करणे,कुलदेवतेचे पूजन, कुलदेवतेचे वर्षाकाठी दर्शन करणे,कुलाचार पाळणे, रुढी,प्रथा ,परंपरा,सण उत्सव आनंदाने साजरे करणे, सर्वांशी आपुलकीने वागणे, इत्यादि संस्कार करते.
१३) सर्वात महत्वाचे मुला मुलींप्रती सदैव जागृत राहते, त्यांच्या आवडी-निवडी जोपासणे,हौस -मौज पुरविते,स्वतः व्यसनांपासून दूर राहून मुला-मुलींना शिक्षण व विज्ञानाचे महत्त्व पटवून देते, श्रद्धा जोपासावी,पण अंधश्रद्धा टाळते.
१४) आपल्या उत्पन्न मर्यादा समजून काटकसरीने आर्थिक व्यवहार करते.कर्ज न करणे.गरजेसाठी कर्ज घेतल्यास ते इमानदारीने व वेळेवर परतफेड करते.
१६) वस्तू,पदार्थ, रोख रक्कम इ.ची उसनवारी टाळते.
    मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, मला जन्माने मिळालेली माझी आई...तिच्या वागण्या-बोलण्यात मी हे गुण अनुभवले.व ते गुण मी माझ्या जगण्याचे ' मूलमंत्र ' बनविले.दुसरी गोष्ट मला लाभलेली माझी अर्धांगिनी सुद्धा वरील गुणांचा एक " आदर्श ठेवा " आहेच!
म्हणूनच… " मी एक भाग्यवान पुरुष आहे की, माझ्या जन्म एक आदर्श मातेच्या पोटी झाला. व माझा विवाह एका आदर्श पत्नीशी झाला असून ह्या दोन्ही महिला म्हणजे माझ्या जीवनरथाच्या मुख्य आस आहेत. आजच्या राष्ट्रीय गृहिणी दिनानिमित्त मी सदैव त्यांच्या ऋणातच राहणे पसंत करेन! "
कारण आईने आदर्श गृहिणी बनुन माझे आयुष्य फुलविले.आई आज माझ्यापासून कोटी योजन दूर निघून गेली असली तरी ती विचाराने सदैव जवळच आहे.तिला विनम्र अभिवादन!🌹🙏🙏🙏
     पत्नीने आदर्श गृहिणी बनुन माझा संसार फुलविला.
तिच्या सोबतीने संसारात मी पूर्ण समाधानी आहे तिलाही आजच्या दिवशी मनभावन हार्दिक शुभकामना! 🌹🙏🙏

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " 

संस्कार

संस्कार
          संस्कार. ... प्रत्येकाच्या जीवनवेलीवर उमलणारे अप्रतिम पुष्प ! पुष्प जसे सुगंधित वासाचे आणि बिनसुगंधित वासाचे असे दोन प्रकारचे असतात, तसे संस्काराचे देखील आपणास दोन प्रकार सांगता येतील.
 १) पवित्र-आदर्श संस्कार आणि 
 २) कुसंस्कार; हा विघाशक विघातक  संस्कार होय.
          अयोध्यापती श्रीरामचंद्रजी यांचावर जे संस्कार झाले ते पवित्र व आदर्श होत. विनम्रता, सहिष्णुता, प्रजाहितदक्षता,मातृ-पितृभाव,गुरूज्ञाचे पालन,
कुटुंबवत्सलता,परस्त्रीला माता मानणे,पित्रृज्ञेचे पालन, एकपत्नीभाव,सज्जनाचे रक्षण, दृष्टांचे निर्दालन, बंधूभाव त्याग व इतराप्रति समर्पण ,बाहूबलाचा समाज संघटनेसाठी उपयोग इ.संस्कार झाले.त्यातून त्यांची प्रतिमा व वर्तन समाजाला ललामभूत ठरली.हजारो वर्षे झाली आहेत तरी श्रीरामप्रभुजी आपणास वरील संस्कारामुळे आदर्श ठरतात.
हीच गोष्ट छत्रपती शिवाजी राजेबाबत म्हणता येईल.आजही ते अखील मानव विश्वाला आदर्श वाटतात.
     तर दुसरीकडे रावणासारख्या महापराक्रमी ,शिवभक्त, वेदांच्या सर्वश्रेष्ठ व्यासंगी, शुरविर असा त्याचा सप्तखंडात सर्वदूर लौकिक होता. पण.... रावणाकडे प्रचंड सामर्थ्य असूनही त्याला या सर्वाचा उपयोग स्वत:च्या विषयवासनेपलीकडे जाऊन करता आलेच नाही. कारण गम्य ते गेले तरी दुसरे गम्य ते प्राप्त करणे.हे रावणाचे ध्येय असे.हे संस्कार त्याचावर माता कैकसीच्या वाणी-वर्तनातून कोरले गेले होते. हे लक्षात घ्यावे लागेल. हीच गोष्ट मुघल सम्य्रा औरंगजेब याांच्याबाबत सांगता येईल. 
याउलट श्रीरामप्रभुंनी विषयापलीकडे जाऊन निर्णय घेतला. मग तो पितृआज्ञेतून मिळालेला चौदा वर्षांच्या वनवासही सहज स्विकारला.हा संस्कार मुलाचे पित्यावरील अलौकिक प्रेम सिध्द करतो.रावणाच्या आयुष्यात त्यांस असा आदेश झाला असता तर त्याने आदेश करणारा व हट्ट धरणा-या या दोहोंच्या जागीच तत्क्षणी शिरच्छेद केला असता. या सर्व गोष्टी संस्कारावरच ठरतात. यापैकी एक श्रीरामप्रभु हे
 " रघूकुल रीत सदा चली आयी
     प्राण जाय पर वचन ना जाई "
अशा संस्कारात वाढत होते. तर रावण हा
  " त्रिखंड मे मेरे जैसा बडा ना कोई " या संस्कारात वाढत राहीला.शेवटी या कुसंस्कारानी रावणाच्या   नाश ओढवला.
संपूर्ण कुटुंबासह लंकेचा विनाश ओढवला.
     
प्रा.पुरूषोत्तम पटेल, उपप्राचार्य,म्हसावद, भ्रमणध्वनी-9421530412

मंगळवार, नोव्हेंबर ०२, २०२१

धनत्रयोदशी

                ✍️ धनत्रयोदशी 🪔🙏

दिवाळी सण-उत्सवातील धनत्रयोदशी म्हणजे आश्विन पंधरवड्यातील तेरावा दिवस.आश्विन महिन्यातील दुस-या पंधरवड्यातील आश्विन ।। कृ।। त्रयोदशीचा हा मंगलमय दिवस.
" धनत्रयोदशी " या शब्दांत सहा अक्षरे आहेत.प्रत्येक अक्षर एक नैतिक मूल्य शिकवून जाते.या दिवसाचे शब्दमय पावन महत्व ✍️ 

✒️ - धर्माचरण ( धर्माने आचरण करणे )
✒️ - नम्राचरण ( विनम्रतेने वागणे )
✒️त्र - त्रपाचरण ( ऋग्वेद, यजुर्वेद,
             सामवेदानुसार आचरण करणे.)
✒️यो - योगाचरण ( आठ नियम व त्यातील
             " योग " नियमाचे पालन)
✒️  - दयाचरण. ( सर्वांभूती दयाभाव राखणे )
✒️शी - शीताचरण ( शांत राहणे व क्रोध न करणे.)

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

घडवू देश नवा

घडवू देश नवा *
स्वच्छतेची शपथ घेऊ या 
नवा भारत  देश घडवू या
चारही  बाजू  स्वच्छ  ठेऊ 
कचरा उचलून फेकू या || धृ. ||
        ओला कचरा सुका कचरा
        वेगवेगळा  टाकू  चला
        त्यावरती  संस्कार करुनि 
        उज्ज्वल भारत घडवू या ||१||
शौचास जाता बाहेर 
उघड्यावर बसणे टाळू या
शौचालय बांधून आपण
गाव हागणदारीमुक्त करु या || २||
        घर असू द्या भुवन
        गाव बनवू नंदनवन
        स्वच्छ ठेवा तन-मन आपुले 
        संकल्प आपण करुया ||३||

©प्रा. पुरुषोत्तम पटेल, उपमुख्याध्यापक 
कुबेर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज म्हसावद,
ता. शहादा, जि.नंदुरबार. 
mhasawad.blogspot.in

सोमवार, नोव्हेंबर ०१, २०२१

दिपावली

ही दिपावली आपणास सुखाची, समाधानाची,
समृद्धीची,आनंदाची, भरभराटीची,व समस्त
इच्छापूर्तीचा आनंद देणारी ठरो!ही शुभेच्छा!
🪔🪔🪔🪔🪔🎇🎆🪔🪔🪔🪔🪔

     दिपावली (कविता)

महालक्ष्मी देवी मी नमितो
आद्य वंदन चरणी तुजला 
लावितो दिपावली ज्योती
आई !आशिष दे तू मजला ।।१।।

पसरु   दे अखिल संसारी 
लखलख     चंदेरी आनंद
विश्वाचे   दुःख दूर कराया
मनी लागू दे छंद मजला ।।२।।
महालक्ष्मी देवी मी नमितो
...आई, आशिष दे मजला

दे   सद्बुद्धी   जळो  क्लेश
मनामनात  जुळू  दे नाते !
दुष्प्रवृत्ती, दृष्टभाव  हरोनी
नीति,सूमती किर्ती सकला।।३।।
महालक्ष्मी देवी मी नमितो
...आई, आशिष दे मजला

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...