Kaayguru.Marathi

रविवार, फेब्रुवारी २७, २०२२

मराठी माझी माय


माय मराठी माझी
जणू सरस्वतीची वाणी
संत पंतांनी रचिली
गाऊ आज तीच गाणी

माय    मराठी  माझी
जसा  मोगरा   सुगंधी
दरवळ    दाटे   तिचा
ज्ञाना एका तुका ग्रंथी

ज्ञानपिठानी  अलंकृत
मराठीची  लेकरं  चार
विस  विवा  करंदीकर
नेमाडे  चौथा पुत्र थोर

माझ्या   मराठीला  जगात
लाभले दहावे मानाचे पान
आणिक मायदेशी लाभला
भाषाशारदा  तृतीय    मान 

माझ्या  मराठीला   शोभे
अठ्ठेचाळीस  स्वर-व्यंजनं
-हस्व दिर्घ तिला दोन हात
काना   मात्रा   दोन  चरण

अनुस्वार जणू तिचे कुंकू
उद्गार    गर्भिचा    हुंकार
दोन   अवतरणं.  सांगती
जणू  जन्म  मरणाचे  सार

अर्धविराम     स्वल्पविराम
माय मराठीचा श्वासोच्छ्वास
अपुर्णविराम अन् पुर्णविराम
जीवनाची    शिकवी   आस

मराठीचे  विकल्प चिन्ह
देतसे     विचारस्वातंत्र्य
संयोग  चिन्ह   शिकविते
जिव्हाळ्याचा  गोड   मंत्र

ऐक  मित्रा घेतला वसा मी 
माय मराठीचा करीन आदर
बोलीन,देईन, गाईन  मराठी
प्राण  असेतो करीन जागर !

® प्रा.पुरुषोत्तम पटेल," पुष्प "
   म्हसावद

गुरुवार, फेब्रुवारी २४, २०२२

झाडाचा महिमा

झाड देते सुख-सावली
स्वतः उन्ह पाऊस सोसून
हृदयी भरुन घ्यावा
सुसंस्कार  त्याचापासून !

झाड दातृत्वाची शाळा
सर्वांनी नोंदवावे  नाव
पान  फूल  खोड  मूळ
शिकवीती  त्याग भाव !

झाड क्षणाक्षणाला देते
सकल  जीवांना  श्वास
नि:स्वार्थ उभे वादळातही
नसे त्यास स्वार्थाची आस

झाडही जाणते प्रेम सौख्य
सुख दुःख महान भावना
सांगून गेले थोर ऋषीमुनी
वंदावे तयासी करु नका दैना

स्मरण असावा तुकाचा मंत्र
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी...
आयुष्यभर  करुया आपण
सुंदर   मैत्री शत वृक्षांवरी !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


बुधवार, फेब्रुवारी २३, २०२२

कल्पनेचे जग!

कल्पनेने भरलेले जग...
दाखवते नवनवीन भास
वास्तव आयुष्य जगताना मात्र
कितीतरी सोसावा लागतोय त्रास ... !

कल्पनेने भरलेले जग...
आहे सुंदर पण असतो आभास
कधीच मानू नये हो ते आपुले !
पाऊला पाऊलावर कठीण ठरतो श्वास!

कल्पनेच्या जगात करु नये
शहाण्या माणसाने कधी फेरफटका
ते तर पा-यासारखे नाजूक
हाती घेता आयुष्याला बसतो झटका !

कल्पनेच्या जगाला नसते कधी
वास्तवाशी काही घेणे - देणे
तो तर समजावा सागरातील भोवरा
अवघड ठरते आतून बाहेर पडणे !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, फेब्रुवारी २१, २०२२

सखे...! [ भूलोळी ]

सखे…! [ भूलोळी ]

टूटा तारा यूॅं बिखरा
पाहता वाटे मोत्याच्या सडा
मोती की माला बॉंधी तेरे बालोमे
सखे नभांगण भासे ग् तुझा अंबाडा !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


शनिवार, फेब्रुवारी १९, २०२२

शिवराजे ! जय हो ...

शिवराजे ! जय हो…
श्रीपती गडपती अश्वपती
माझे शिवराजे छत्रपती….
ठेवितो मस्तक आज मी
तुमच्या चरणावरती ।।१।।

भूपती श्रीमंतयोगी गजपती 
माझे शिवराजे छत्रपती…
ठेवितो मस्तक आज मी
तुमच्या चरणावरती ।।२।।

सुवर्णरत्नश्रीपती प्रजापती
माझे शिवराजे छत्रपती…
ठेवितो मस्तक आज मी
तुमच्या चरणावरती ।।३।।

अष्टप्रधानपती अष्टावधानपती
माझे शिवराजे छत्रपती…
ठेवितो मस्तक आज मी
तुमच्या चरणावरती ।।४।।

शस्रास्रपारंगती शूरविरराजनीति
माझे शिवराजे छत्रपती…
ठेवितो मस्तक आज मी
तुमच्या चरणावरती ।।५।।

सागराधिपती आरमाराधिपती
माझे शिवराजे छत्रपती…
ठेवितो मस्तक आज मी
तुमच्या चरणावरती ।।६।।

प्रौढप्रतापपुरंदर सिंहासनाधिपती
माझे शिवराजे छत्रपती…
ठेवितो मस्तक आज मी
तुमच्या चरणावरती ।।७।।

मनामनाधिपती न्यायाधिपती
माझे शिवराजे छत्रपती…
ठेवितो मस्तक आज मी
तुमच्या चरणावरती ।।८।।

स्वराज्याधिपती राजेशिवछत्रपती
माझे शिवराजे हृदयाधिपती…
ठेवितो मस्तक आज मी
तुमच्या चरणावरती ।।९।।

जय भवानी जय शिवाजी
गातो तेजाची आरती
ठेवितो मस्तक आज मी
शिवराजे तुमच्या चरणावरती ।।१०।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
          म्हसावद,जि.नंदुरबार






Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...