देवा... ! विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही ; तर,विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये…एवढीच माझी प्रार्थना !
दु:खतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे
तू सांत्वन करावंस अशी माझी इच्छा नाही; तर,
दु:खावर विजय मिळवण्याचा विश्वास माझ्यात यावा…एवढीच माझी प्रार्थना !
माझ्या मदतीला कोणी न आल्यास माझं बळ मोडून पडू नये…एवढीच माझी प्रार्थना !
तू माझं सतत रक्षण करावंस,मला तारावंस, ही माझी प्रार्थना नाहीच,संकटात तरून जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं…एवढीच माझी प्रार्थना !
माझं ओझं हलकं करुन तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही.ते ओझं वाहायची शक्ती माझ्यात यावी…एवढीच माझी प्रार्थना !
सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढीनच! आणि दु:खाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करील तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात तिळमात्रही शंका निर्माण होऊ नये…एवढीच माझी प्रार्थना !
© गुरुदेव रवींद्रनाथ टागोर
