मी नोकरीच्या निमित्ताने जन्मगाव सोडून वालगावी आलो.कधी न पाहिलेले हे गाव.१९९१ चे ते दिवस होते.१९९० च्या दशकात महाराष्ट्रात बहुतांश शिक्षण संस्थांकडून शाळा सुरु करण्याचा सपाटा सुरु होता.जसा मृगाच्या सरी बरसल्या की, बळीराजाची पेरणीची लगबग सुरु होते.तशी गाव-खेड्यात-पाड्यात नवीन शाळा उघडल्या जाऊ लागल्या...अर्थात त्या शाळा विनाअनुदान तत्वावरच सुरु होत होत्या.आणि एक दोन वर्षांत सरकारी अनुदानावर येत होत्या.
अशाच एका विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयात मी रुजू झालो.नशिबाने म्हणा किंवा संस्थेचे पूर्वकार्य संचिताने म्हणा,ही शाळा दोनच वर्षांत अनुदानपात्र ठरली.माझे मूळ गाव पन्नास कि.मी.अंतरावर असल्याने (तेव्हा आजसारखी दळणवळणाची साधने मुबलक नव्हती.) मी एक खोली घेऊन वालगावीच राहू लागलो.माझे गाव जेमतेम आठशे हजार वस्तीचे ;तर वालगावं हे सुमारे आठ नऊ हजार लोकवस्तींचे गांव. गावात अठरापगड जाती सुखैनैव नांदत होत्या.असे चित्र मी अनुभवत येथे राहू लागलो.
आपल्या मुला-मुलींना कोडकौतुकाने कसे बोलवावे.हे मी राहत असलेल्या गल्लीत अनुभवत होतो.प्रारंभी मीही नवीनच असल्याने घरातील, गल्लीतील बाया-माणसे ज्या नावांनी त्या मुला-मुलींना हाक मारीत त्याच नावाने मीही हाक मारु लागलो.त्यात प्रामुख्याने मुलींमध्ये " मुन्नी, गुड्डी, चक्कू, पिकी, टिंकी, भुरी, माई, आक्कू " ही नावे अग्रस्थानी होती.तर मुलांच्या नावात " भैय्या, लोदू, पप्पू, पिंटू, बापू, लोटू, गोटू,अण्णा, दादू " ही नावे अग्रस्थानी होती.मी विचार करायचो की, ह्या मुला-मुलींना ही खरी नावे असतील का ? हो ! ही नावे खरीच असली पाहिजे.
याला पुष्टी मिळणारी गोष्ट मी स्वतः आजमावली होती . अर्थात ह्याला कारणही तसेच होते म्हणा ना ! मी ज्या अकरावी वर्गाच्या वर्गशिक्षक होतो, त्याच वर्गाच्या कॅटलागवर मी एका विद्यार्थिनीचे नाव " अक्का *** पाटील " असेच लिहित असे.तर एका मुलाचे नाव लिहितांना " अजय अण्णा खैरनार '' असे लिहित असे.
दिवसामागून दिवस वर्षामागून वर्ष जाऊ लागली.मी राहत असलेल्या गल्लीतील मुलें मुली मोठी होत होती.ती आता माझ्या शाळेत शिकायला येऊ लागली.मग कळले " अरे ! यांची खरीखुरी नावे किती किती सुंदर आहे.त्यात कुणाचे नाव मुग्धा, मंदाकिनी, निलिमा ,गुणवंती, प्राजक्ता अशी तर मुलांच्या नावात चेतन,गौरव, राकेश, प्रकाश, ध्रुव,प्रजल अशी सुंदर आधुनिक नावे होती.पण घरातील वडीलधारी मंडळी, आई-वडील,आजी-आजोबा त्यांना आत्यंतिक प्रेमाने, कौतुकाने - मुन्नी, गुड्डी, चक्कू, पिकी,भुरी,टिकी , माई, आक्कू " या नावांनी संबोधित असत.मुलांना भैय्या, लोदू, पप्पू, पिंटू, बापू, अण्णा,लोटू, दादू ,भू-या " ही नावे होत.सुमारे सहा सात वर्षांनंतर हळुहळू कळू लागले की ,अरे... ही तर कोडकौतुकाने ठेवलेली टोपण नावे आहेत.
माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण घेतांना मराठी कथा, कविता,धडा अभ्यासतांना बरीच टोपण नावे तोंडपाठ करावी लागली होती.त्यात बालकवी, केशवसूत, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, कवी बी, आरती प्रभू, माधव ज्यूलीयन, स्वातंत्र्यवीर, साने गुरुजी, अनिल, साहित्यसम्राट,ग्रेस,कुंजविहारी,दत्त, अज्ञातवासी असे अनेक साहित्यिकांची नावे मराठीच्या शिंदे सरांनी आमच्या कडून तोंडपाठ करवून घेतली होती.ही नावे मला ज्ञात होती.त्यांचे कार्यकर्तृत्वही सरांकडून जाणून घेतले होते.
ह्या नावांना साहित्याचा मलमली स्पर्श, अमृताची चव,आणि गंगेचे शुचित्व आणि गंधर्व नगरीचे सूर प्राप्त होते.ते तर महाराष्ट्रातील वाचकांच्या तना-मनात सतत रुंजी घालणारी नावे होती.
...पण एक शिक्षक म्हणून वालगावात मी जी काही टोपण नावे अनुभवत होतो.आणि आजही अनुभवतो आहे.त्यातील ९९.९९ टक्के मुला-मुलींची खरीखुरी नावे आजही गाव-गल्लीत ठाऊक नाहीत.सर्वांचीच लग्न झाली.मुली सासरी निघून गेल्या.तरी त्यांची ओळख अमक्याची मुन्नी, पिकी ! तमक्याची गुड्डी,भूरी,चक्कू हीच नावे सर्वामुखी टिकून आहेत.तर मुलांपैकी बहुसंख्य बाप बनले आहेत. त्यांच्या मुला मुलींना विचारले , तू कोणाचा मुलगा किंवा कोणाची मुलगी ग्ं ? " ती लहान मुलं आजही बोबड्या बोलात म्हणतात, " मी पिंट्याचा मुलगा, मी मुन्नी बाईची मुलगी, मी चक्कूचा, मी लोट्याचा मुलगा! " अशी गंमतीशीर व ओठांवर हसू आणणारी उत्तरे ऐकायला मिळतात.म्हणतात ना, " लहान मूल हे सर्व गोष्टी मोठ्यांच्या निरीक्षणातून, ऐकण्यातून, कृतीतून शिकतात.आपल्या आई-बाबांना घरातील मंडळी, नात्यातील मंडळी, गल्लीबोळातून कोणत्या नावाने हाक मारली जाते.ते ते ऐकतात.तीच नावे लक्षात ठेऊन स्वतःची ओळख गंमतीशीर नाव जोडून देतात. हा त्यांचा दोष म्हणता येणार नाही.मग हा सुद्धा एक संस्कार म्हणावा का ? तो चांगला की वाईट हे वैचारिक मंथनातून सिद्ध होईलच!
पण तत्पूर्वी गल्लीबोळातील या टोपणनावांना एक विशिष्ट वयाची मर्यादा असावीच! हे ठरवायलाच हवे!अशी टोपण नावे ठेवणे आपणास योग्य वाटते काय?
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "